बाबूल मोरा – डॉ. अनुपमा उजगरे

बाबूल मोरा

  • डॉ. अनुपमा उजगरे, ठाणे

साहित्य अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जायचं ठरल्याबरोबर ‘आता ह्यावेळी अमृतसर नक्की’ अशी उसळी माझ्या मनाने घेतली. त्यासरशी मी लगेच बेळगावला मीराला फोन लावला. माझा बेत सांगून म्हटलं, “बघ तुला सोयीस्कर आहे का ते, नाहीतर मी एकटी तर जाणारच आहे.” हे मी कुठल्या जोरावर बोलून गेले होते कुणास ठाऊक ! मीराने सगळ्या सफरीच्या प्लॅनिंगची जबाबदारी आनंदाने माझ्यावर सोपवून आपण यायला एका पायावर तयार असल्याचं ताबडतोब सांगितलं.

मी मग उत्साहाने अमृतसरची माहिती मिळवण्याच्या कामी लागले. पुढच्या रविवारी चर्चची पायरी चढण्याऐवजी मुलुंड कॉलनीच्या गुरुद्वाराची पायरी चढले. तेव्हा नेट नव्हतं म्हणून नेटाने घरापासून चेकनाका, चेकनाक्यापासून ह्या गुरुद्वारापर्यंत दोन रिक्षा करून आले खरी, पण इथे लग्नाचं जेवण उरकून वर्‍हाडी मंडळीची पांगापांग व्हायला सुरुवात झाली होती. स्त्रियांचा समावेश असलेल्या सरदारजींच्या घोळक्याकडे मी माझा मोर्चा वळवला आणि सुवर्णमंदिर, बाघा बॉर्डर, जालियनवाला बाग इथे कसं जायचं, राहण्याच्या काय सोयी आहेत, वगैरे विचारलं.

“आधी पत्र पाठवून रूम बुक केलेली अधिक बरं ना?” मी विचारलं.

“ना जी ना. उसकी कोई जुरुरत नहीं है. और वे ठहरे सब सरदार. पता नहीं चिठ्ठी पढेंगे भी या नहीं. आप जाओ ऐसेही. जगहकी कोई कमी तो वहाँ है नहीं. अरामसे मिल जायेगी.”

“वे ठहरे सब सरदार” हे एका सरदारजींच्याच तोंडून ऐकताना गंमत वाटली.

“आपको तो यह जानकारी ठाणेके हायवे पर जो गुरुद्वारा है, वहाँ भी मिल जाती, आप इतनी तकलिफ उठाकर यहाँ तक आयीं?”

तो हुश्शार सरदार म्हणाला तेव्हा खरंच हे आपल्या कसं लक्षात आलं नाही, असं वाटून गेलं. मुलुंड कॉलनीतलं हे गुरुद्वारा माहीत होतं. इथे दोन वर्षं राहिलो होतो, येण्याजाण्याच्या वाटेवर होतं, म्हणून पाय इकडेच वळले. उत्साहाच्या भरात द्राविडी प्राणायाम घडला होता खरा. मग परतताना आता मिळालेल्या माहितीची खात्री करून घ्यावी, काही नवी माहिती मिळाली तर पाहावी म्हणून ठाण्याच्या गुरुद्वारातही जाऊन आले.

कुठलाही पूर्वसंपर्क न साधता ठरल्याप्रमाणे मी आणि मीरा अमृतसरच्या विमानतळावर उतरलो. बाहेर पडतापडता एक सुखवस्तू पंजाबी वृद्धा माझ्याकडे पाहत असलेली दिसली. हिच्याकडून खरेदीची ठिकाणं माहीत करून घेता येतील म्हणून ‘नमस्ते जी’ म्हणत मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. तीपण खुलून बोलली. मग म्हणाली,

“आप पंजाबी नहीं दिखती?”

“जी, मैं महाराष्ट्रसे आयी हूँ.”

“ओह! महाराष्ट्र के लोग बहोssत अच्छे होते हैं। एकदम साफ दिल. हमारी पंजाबी औरतें ऐसी नहीं होती हैं।”

तिचे हे कवतिकाचे बोल ऐकून माझ्या मराठी मनात हर्ष माईनासा झाला. त्याचवेळी हेही जाणवलं की, माझ्या महाराष्ट्रदेशाची ही चांगली प्रतिमा जोपासण्याबाबत मी दक्ष राहायला हवं.

अमृतसरच्या लहानशा विमानतळावर उतरलेले प्रवासी आपापल्या बॅगा ताब्यात घेतल्यावर दहा-पंधरा मिनिटांत पांगले अन् सगळं सामसूम झालं. टॅक्सीची चौकशी केली तर, गुरुद्वारापर्यंत थोडेथोडके नाहीतर चांगले पाचशे रुपये! बाहेर टॅक्सीचे रेट्स कमी असतील किंवा घासाघीस करता येईल म्हणून आम्ही बाहेर जाऊ लागलो तर, टॅक्सी काऊंटरवरच्या पावत्या फाडणाऱ्या त्या भरभक्कम सरदारजीने मळ्यात द्यावी तशी मोठ्ठ्याने हाळी दिली,

“ओ मैडमजीSSS, पर्ची फाडी है। पाँचसौ देकर ले जाईये. बाहर कोई टैक्सी वैक्सी मिलनेवाली नहीं।”

त्याच्या म्हणण्यात कितपत तथ्य होतं, देव जाणे! पण बाहेरचा टॅक्सीवाला तरी कशावरून भरवशाचा असेल? हा निदान विमानतळावरचा अधिकृत तरी आहे. काही झालं तर ह्याला जबाबदार धरता येईल. नाही तरी आता उखळात शिर दिलंच आहे. मीराला तर एकटीने जाण्याची माझी तयारी असल्याचं बोलले होते मी! आता तिच्या सोबतीने प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायचं, असं मनात म्हणत सरदारजीपुढे पाचशेची नोट सरकवली. निर्विकार चेहऱ्याने त्याने माझ्यासमोर पर्ची ठेवली अन् माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून तो आपल्या मित्राशी गप्पा करायला लागला. मीच त्याला टॅक्सीची दिशा विचारली. आमच्या टॅक्सीत एक पुरुष प्रवासी आधीच बसलेला पाहून आम्ही विचारात पडलो. हा टॅक्सीवाल्याचा ‘माणूस’ असेल काय? हा आपल्या पाचशेत फुकट येणार की काय? हा भाडं शेअर करील काय? ह्याची सोबत घेणं योग्य की अयोग्य? आमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्हं पाहून तो प्रवासी दुसऱ्या टॅक्सीतून निघून गेला. उरलो आम्ही दोघीच. आता एकच टॅक्सी उरली होती. आम्हांला दुसरा पर्यायच नव्हता. खडखड करत चाललेल्या त्या जुनाट टॅक्सीतून जाताना आम्ही आपापल्या खिडक्यांतून रस्त्यावरच्या स्थलनाम मार्गदर्शक पाट्यांवर नजर ठेवून होतो.

एकमेकींना नजरेनेच दिलासा देत होतो. एकीकडे आपापल्या देवांना वेठीस धरून बसलो होतो. बरंच अंतर कापून गेल्यावर आलं एकदाचं सुवर्णमंदिर. आता ह्या टॅक्सीवाल्याला आपण इथे नवीन असल्याचं कळलं तर खुशाल कळू दे म्हणत आम्ही पुढच्या सोयीविषयी त्याला विचारलं. त्याने सरायची चौकशी जिकडे करा म्हणून सांगितलं, त्या दिशेला मी निघाले. मीरा सामानाजवळ थांबली.

“नमस्ते जी. महाराष्ट्रसे हम दो महिलाएँ आयी हैं। खास सुवर्णमंदिर के दर्शन के लिये. रहनेको अच्छी सुविधावाली-।”

मला पुढे बोलू न देता खिडकीपलीकडून भरदार आवाज आला-

“वहाँसे पर्ची लेके आईये.”

त्याने इशारा केला तिथून पर्ची आणून मी त्याच्या सुपूर्द केली. त्यावर त्याने काही खरडलं. म्हणाला, “आप रिक्षावालेको यह दे देना जी.”

“आपही बात कर लें उससे तो अच्छा रहेगा जी.” मी अजिजीने त्याला म्हटलं. कारण त्याने लिहिलेली लिपी मला अगम्य होती. काय लिहिलंय हे तोंडी सांगितलं असतं तर थोडंफार कळेल तरी, म्हणून ही माझी अजिजी.

त्याने माझ्यासोबत एका तरुण सरदाराला पाठवलं. त्यानेच रिक्षा ठरवली अन् रिक्षावाल्याला कुठे जायचं तेही सांगितलं. खरं म्हणजे त्या रिक्षा इतक्या अरुंद होत्या की, त्यात एकच पंजाबी माणूस एसपैस मावू शकला असता. म्हणजे माणशी एक रिक्षा इथे चालतात की काय, असं वाटून गेलं. आम्ही दोघींनी कसंबसं स्वतःला त्या उतरत्या रिक्षात ‘मावून’ घेतलं. आमच्या पाठीमागे आमच्या सूटकेसेस. एक हात स्व-आधारासाठी रिक्षाच्या दांड्याला तर दुसरा सूटकेसला आधार म्हणून. आमची सायकलरिक्षा अमृतसरच्या अरुंद गल्लीबोळांतून डुलतडुलत, ठेचकाळत- हिंदकळत एकदाची कुठेतरी थांबली.

“ये लो जी, आ गयी आपकी सराय.” म्हणत रिक्षवाला घाम पुसत उभा राहिला. मघाच्या त्या साऱ्या गडबडीत मी त्याला पाहिलंच नव्हतं. चेहऱ्यावरचा घाम पुसून फडकं त्याने डोक्याला गुंडाळलं. अरे, हा तर अगदी बलराज साहनी! कुठल्या तरी सिनेमात हातगाडी ओढणारा का, ओझं वाहणारा, उंचापुरा, रेखीव नाकडोळ्यांचा बलराज साहनी मला आठवला.

रिक्षा ठरवून देणाऱ्या त्या सरदारने ह्याला दहा रुपये द्यायला सांगितले होते. आम्ही वीसची नोट त्याच्या हाती ठेवली. सराय म्हणजे मला वाटलं, कुठल्या बकाल धर्मशाळेत घेऊन आलाय कोण जाणे! पण अतिशय सुंदर इमारत समोर दिसत होती. बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागणार होतं. आपापली सूटकेस घेऊन आम्ही सरायच्या पायऱ्या चढू लागलो तर तो मागून आला. आमच्या हातातल्या सूटकेसेस घेऊन एका दमात तो म्हातारा बलराज साहनी वर जाऊन उभा राहिला! प्रवेशद्वारातच तगडा तरुण सरदार हातात नंगी तलवार घेऊन उभा असलेला दिसला.

काऊंटरवर मी पुन्हा एकदा “नमस्ते जी. महाराष्ट्रसे हम दो महिलाएँ आयी हैं खास सुवर्णमंदिर के दर्शन के लिये … ” वगैरेची रेकॉर्ड वाजवली.

काचेपलीकडच्या दाढीमिश्यांच्या जंजाळातल्या धारदार नजरेत मला कुतूहल आणि आदर डोकावल्याचा भास झाला. त्याने पर्ची फाडण्यापूर्वीच ‘हम रूम देखना चाहते हैं’ असं मी म्हणणार तेवढ्यात त्याच्या शेजारच्याने पर्ची फाडून समोर ठेवलीसुद्धा. त्याच्यावरच्या रकमेचा आकडा पाहून मी चकितच झाले! मघाच्या टॅक्सीपेक्षा कमी. तरीसुद्धा ‘आधी व्यवस्था काय आहे ती बघू दे’ म्हणावंसं वाटत होतं. पण ‘इथे कमी बोलावे’ ची पाटी असल्यासारखे सगळे आपापली कामं करत होते. सरदारपोऱ्या आमच्या सूटकेसेस उचलून निघालासुद्धा. ‘आता संध्याकाळ झालीय. आजचा दिवस बघू इथं कसं काय आहे ते, नंतर चौकशी करून जाऊ दुसरीकडे’ असा विचार करून मुकाट्याने पैसे भरले आणि त्या सरदारपोऱ्याच्या मागोमाग आम्ही निघालो. काचेचं दार उघडून आम्ही आत गेलो. चार खोल्यांचा स्वतंत्र, राखीव विभाग असावा, असा तो भाग वाटला. एका खोलीतून पोराबाळांचे आवाज येत होते. मी मागे वळून पाहिलं तर, काऊंटरवरच्या धारदार नजरा आमच्याकडेच रोखलेल्या होत्या. त्यांच्या देखरेखीखाली हा विभाग सुरक्षित असावा असं जाणवलं. कॉरिडॉरचं दारसुद्धा मुद्दाम काचेचं होतं. चला, म्हणजे इमर्जन्सीला काऊंटर धावून येईल. काळजीचं कारण नाही.

आमची रूम चांगली प्रशस्त होती. आत बाथरूमही ऐसपैस नि स्वच्छ होती. चोवीस तास पाणी. भरपूर हवा, प्रकाश. हिला सराय कोण म्हणेल? ही तर एखाद्या चांगल्या हॉटेलचीच खोली वाटली. त्या सरायमध्ये स्वस्त, अतिस्वस्त, महाग अशी सर्व प्रकारची व्यवस्था होती, तीही अतिशय अल्पदरात. मला मुलुंड कॉलनीतल्या गुरुद्वारात भेटलेल्या त्या सरदारजीचं बोलणं आठवलं. खरंच राहण्याच्या जागा उत्तम आणि मुबलक होत्या. आपण इथवर येण्याचं अचाट धाडस केलं खरं, पण सोय चांगली झालीय तेव्हा काळजीचं काही कारण नाही.

मुळात एवढं धाडस का करावंसं वाटलं होतं मला? धाडसच नाही तर काय? नगरला मिलिटरीचे रणगाडे रस्त्यावरून जाऊ लागले की, आम्ही लहान मुलं कितीतरी वेळ त्यांच्याकडे बघत उभे राहत असू. कधी कधी रणगाड्यांबरोबर शर्यत लावल्यासारखं थरथरत्या रस्त्याच्या कडेने दम लागेपर्यंत पळत असू. पण शेण गोळा करायला मोकळ्या मैदानावर गेलो तर एखाददुसरा सरदारजी तिथून पायी किंवा सायकलवर जाताना दिसला की, ‘अगं शिखडा आला गंऽऽ’ म्हणत जीव मुठीत घेऊन आम्ही मुली पळत असू. नंतर कितीतरी वेळ एकमेकींना म्हणत राहायचो ‘बघ, अजून माझ्या छातीत धडधडतंय…’ आणि आज त्याच सरदारजींच्या मुलखात एकटीने येऊन थडकायचं म्हणजे जरा अतिच नव्हतं का झालं? मीराने साथ दिली, हे छानच झालं.

पण खरंच मी इथे एकटी आले असते तर? सुखाचा जीव का उगाच दुःखात अन् धोक्यातही घालायला निघाले होते मी? फक्त सुवर्णमंदिर? छे: ! स्वर्णमंदिर? नाही नाही, दरबारसाहब बघायला? सोन्यानं झगमगणारं ते मंदिर पाहून तर माझे डोळे जराही दिपले नाहीत. एवढा देखणा तो ताजमहाल निरंजनसारख्या रसिक सख्याच्या सोबतीने पाहतानाही माझ्या मनाच्या तळ्यात एक हलकासाही तरंग उठला नव्हता. आपण तर इतक्या हळव्या स्वभावाच्या. मग इतकी दगडी वृत्ती आपल्यात अधूनमधून का निर्माण होते? इतिहासाच्या पुस्तकातला जालियनवाला बाग प्रत्यक्षात पाहताना थोडंसं आत गलबललं. पण भोवतालच्या लोकांच्या अतिउत्साही पिकनिकी मूडमध्ये आतलं आतच जिरून-विरून गेलं. बाघा बॉर्डरचा तो ध्वज उतरवण्याचा समारंभ मला शांत चित्ताने अनुभवायचा होता. पण तिथेही तोच पिकनिकी गोंधळ. दोन्ही देशांतले तिथे जमलेले लोक आपापल्या राष्ट्राचा जयकार आणि दुसऱ्याचा धिक्कार बेंबीच्या देठापासून ओरडून करत होते. त्यात बुलंद होता तो आपल्या भारतीयांचा आवाज. त्यांना उकसवणारा होता सीमेवरचा आपलाच एक अधिकारी. लोकांच्या पुढे येऊन माईकवरून देशाच्या जयजयकाराच्या घोषणांना उत्तेजन देऊन झालं की, थोडासा मागे जाऊन हातांनी खुणा करत शब्द न उच्चारता तो बोलायचा, “मारा ना बोंब. शांत काय बसलात? मोठ्याने, आणखी मोठ्याने…”

आपले लोक तसतसे चेकाळून नारेबाजी करत होते. मनात आलं, ह्या ऑफिसरला जिवाची भीती नाही वाटत? ह्याला चिथावणी देताना पाहून पलीकडून कुणी गोळी झाडली तर? का हे सीमारक्षकांचं नाटक असेल? नंतर सामसूम झाल्यावर त्यांची आपसात हातमिळवणी असेल? त्या अधिकाऱ्याला हे प्रश्न विचारावेसे वाटले. पण गर्दीमुळे मनातच राहून गेले. त्याच्याशी हस्तांदोलन करायला झुंबड उडाली होती. शिवाय वेळ संपली म्हणून सगळ्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं. त्या कोलाहलात माणसांचे आतले आवाज मला ऐकूच आले नाहीत. आपण ह्या सांध्यक्षणी फार कासावीस होऊ की काय असं मला मुंबईहून निघताना वाटत होतं. पण मन कोरडंच राहिलं. मी आणि मीराने एकमेकींशी काहीच न बोलता आपापल्या मनातली वादळं मनातच ठेवत, चौकीवर ठेवलेल्या आपापल्या पर्सेसच्या सुरक्षिततेच्या काळजीने सायकलरिक्षावाल्याने सांगितले तेवढे पैसे कबूल करून परतीची वाट धरली. वाटेत सुमोवाला सांगत होता, इथल्या काहींची शेती तिकडे तर, त्यांच्याकडच्या काहींची इकडे असल्याने त्यांचं रोज येणंजाणं आहे. मग त्यांचे आपसात संबंध कसे असतील? फाळणीनंतर आता इतक्या वर्षांत सीमेपलीकडे स्थिरावलेल्या त्यांच्याविषयी इकडच्यांना काय वाटत असेल, असे बरेच प्रश्न माझ्या मनात होते.

रात्री अंथरुणावर पडल्यावर अनेक प्रश्न मीच मला विचारत होते. आपल्याही भावना इतरांसारख्याच बोथट झाल्यात काय? आपल्या जन्मापूर्वीच्या ऐतिहासिक घटना ह्या एवढ्याच दृष्टीने आपण जालियनवाला बागेकडे नि फाळणीकडे बघतो आहोत काय? मग त्यासाठी इथवर तंगडतोड करत येण्याची काय गरज होती? ग्रंथालयात बसून दोन-चार तासात इतिहास उगाळून झाला असता की. ह्या इतिहासाच्या ओढीने जर मी इथे आले नाही, तर मग कुठल्या अदृश्य ओढीने मला अमृतसरचा उंबरठा ओलांडायला लावलाय? ह्या प्रश्नांच्या उत्तराचा मागोवा घेण्याच्या निष्फळ प्रयत्नात कधी माझा डोळा लागला, कळलंच नाही.

‘आज जरा पायीच फिरू या’ म्हणत मी आणि मीरा सकाळीच बाहेर पडलो. पायी चालणाऱ्या आम्हांला रिक्षावाले येऊन पुन्हा पुन्हा विचारत होते, ‘मण्डी चलणा है जी? सिर्फ बीस रुपये दे देना.’ आमचा नकार ऐकूनसुद्धा चिकाटीने त्यांची विचारणा चालूच होती. एकापेक्षा दुसरा रिक्षाचं भाडं कमी कमी करत गिर्‍हाईक गटवण्याचा प्रयत्न चढाओढीने करत होता. बीस रुपयांवरून शेवटी ‘दो रुपये दे देना, ले चलते हैं’ असा लकडा सुरू झाला, तेव्हा त्या सगळ्या बलराज सहानींची मला अतिशय कणव आली. जरा पुढे गेलो तर ‘बाघा बार्डर जाणा है?’ म्हणत सुमोवाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी आम्हांला घेराव घातला. त्यातून कसेबसे सुटलो तरी एकाने आम्हांला गाठलंच. आपण इतरांपेक्षा कसे स्वस्त दरात नेऊ, आपली टॅक्सी किती आरामाची आहे, दिलेल्या वेळेत सुखरूप नेऊ-आणू ह्याची हमी देत तो माझ्या बरोबरीने चालता चालता सांगत होता. शेवटी मी चालायची थांबले. त्याच्याकडे बघत मिस्कीलपणे हसत उभी राहिले. ‘गिर्‍हाईक गाठलं’ ह्या खात्रीने तो उत्साहाने तीच माहिती तो पुन्हा एकदा मला ऐकवून पटवण्याचा प्रयत्न करू लागला. मी गालातल्या गालात हसतेय पाहून त्याच्या टकळीला ब्रेक लागला. माझ्याकडे त्याने नव्याने पाहिलं. चकित होऊन तो उद्गारला,

“ऐं? मैडमजी आप?”

मी नुसतीच हसले. हसत हसत तोही शेवटी वाट बदलून दिसेनासा झाला.

काल वाघा बॉर्डरला एक जण आम्हांला अव्वाच्या सव्वा रेटला त्याच्या टॅक्सीतून घेऊन जाणार होता. शेवटची टॅक्सी म्हणून आम्ही बसलोही. तेवढ्यात नेमक्या दोनच सीट्स रिकाम्या असलेली आणि ह्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये नेणारी एक टॅक्सी समोर आली. आम्ही पटकन त्यात बसलो तर आधीचा टॅक्सीवाला हमरीतुमरीवर आला. आमच्याशी आणि ह्या नव्या टॅक्सीवाल्याशी भांडू लागला. नव्या टॅक्सीवाल्याने सुसाट टॅक्सी पळवली. तोच हा भांडखोर सरदार मुलगा आता ‘बाघा बार्डर जाणा है?’ विचारत होता.

अमृतसरच्या गल्लीबोळांतून फिरून छान बंगले असलेल्या कॉलनीच्या रस्त्यावरून आम्ही दोघी रमतगमत चालत होतो. सगळं बघून झालं होतं. खरेदी आटोपली होती. निवांत वेळ हातात होता. ‘संपूर्णपणे अनोळखी प्रदेशात येऊन खूप मज्जा केली’ ह्याचं समाधान आणि ‘केवढं धाडस केलं ना आपण?’ हे स्वतःची पाठ थोपटणारं कौतुक आमच्या एकमेकींशी चाललेल्या बोलण्यातून, आम्हांला येणाऱ्या फोनच्या संभाषणातून करणं चालू होतं. मीराचे नि माझे सूर छान जुळले होते. आमच्या गप्पा चालू होत्या. हास्यविनोद चालू होते. तरीही आम्ही एकमेकींच्या मानसिक एकांतात ढवळाढवळ करत नव्हतो. त्यामुळेच ह्या गल्लीबोळांतून अन् सुंदर बंगल्यांच्या कॉलनीतून निरुद्देश फिरताना, माझ्या मनात काय चाललंय ह्याचा थांगपत्ता मीराला असणं शक्य नव्हतं. त्या सुंदर बंगल्यांच्या एका नेमप्लेटवर मला एका नावाआधी मेजर शब्द दिसला आणि लहानपणची एक आठवण उसळी मारून वर आली.

मी पाच-सहा वर्षांची असेन तेव्हा. शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा झाली की, मिलिटरी कॅम्पमधल्या आजीकडे माझा मुक्काम रविवार दुपारपर्यंत असायचा. आमचा गोईंद्या मला सायकलवर घेऊन जायचा. घरी पोहचल्यावर मला भेटायला दोन व्यक्ती फार उत्सुक असलेल्या दिसायच्या. एक आमची अल्सेशियन जीब आणि दुसरे कॅप्टन शरणसिंग. ते मी यायच्या आधीच येऊन बसलेले असायचे. मला पाहताच आनंदानेते मला उचलून घ्यायचे. म्हणायचे,

“बिटिया, हमारे साथ अमृतसर चलोगी आप? हम और आपकी चाचीजी आपको बहुत प्यार देंगे। आपको मिठाई बहुत पसंद है ना? आपकी चाचीजी आपके लिये रोज अपने हाथोंसे असली घीवाली नयी नयी मिठाई बनाके आपको खिलायेंगी. रोज नये नये फ्रॉक्स अपने हाथोंसे सिलाकर पहनायेंगी। हम छुट्टियोंमें यहाँ आया करेंगे। चलेंगी ना आप बिटिया रानी? आप तो हमारी लाडो हो…”

बोलता बोलता चाचाजी मला छातीशी घट्ट धरायचे. रडरड रडायचे. माझा जीव गुदमरून जायचा. ते मला अमृतसरला घेऊन जातील, ह्या भीतीने ते येताहेत म्हटलं की, मी संडासात, नाही तर आमच्या बंगल्यामागच्या शेतात तासन्तास लपून बसावं. गवतातले किडे चावायचे. कुसळं टोचायची. पायात गोळे यायचे. पण अंधार पडला तरी घरचे कुणी हाका मारत तिथपर्यंत आल्याशिवाय मी तिथून हलत नसे. मी तयारी दर्शवली असती तर ह्या अमृतसरच्या मातीत ‘पंजाब दी कुडी’ म्हणून माझी जडणघडण झाली असती आणि घुमानला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंजाबी कवयित्री म्हणून मी मराठी साहित्यिकांचं कदाचित स्वागत केलं असतं…

मी जी नेमप्लेट पाहिली ती चाचाजींच्या नावाची नव्हती. मला त्या नेमप्लेटवरून चाचाजी आठवले इतकंच. पुढे चालताचालता ओळखीचं नाव दिसतंय का मी बघू लागले. कुठे आहात तुम्ही चाचाजी? मी आलेय तुमच्या अमृतसरमध्ये. कदाचित तुम्ही हाक मारल्यामुळेच… नाहीतर माझ्या पावलांना इकडची ओढ का वाटावी? दिल्लीपर्यंत ह्यापूर्वीही कित्येकदा येऊन गेलेच की. अमृतसरला काही वेळासाठी थांबूनही गेले होते. पण ह्याचवेळी मला अमृतसर गाठण्याची तीव्र इच्छा का व्हावी? असं म्हणतात की, म्हातारपणी वर्तमानकाळाचा विसर पडून भूतकाळच जास्त आठवत राहतो. चाचाजींच्या बाबतीत तसं काही झालं असेल काय? त्यांना माझी आठवण तीव्रतेने झाली असेल काय? पण मग मी इथे आल्याचं माझ्या अप्रत्यक्ष भेटीचं समाधान त्यांच्या मनाला झालं असेल? दिलसे दिलको राह होती है म्हणतात, तसंच आहे का हे? चाचाजी, माझंही मन तुम्हांला अगदी थेट तळापासून हाकारतंय. मला मला तुमचा ठावठिकाणा ठाऊक नाही. तुम्ही हयात तरी आहात का, की एखाद्या युद्धात शहीद झालात, माहीत नाही. ज्या घरात तुम्ही मला आपली ‘बिटिया रानी’ म्हणून घेऊन जाणार होता, वाढवणार होता त्याच घरावरून तर मी आत्ता जात नाहीय ना? चाचाजी, तुमची लाडो येऊन गेलीय हो तुमच्या अमृतसरला, एवढंच सांगते…

रस्त्याने चालता चालता मी मनातल्या मनात केवढं तरी मनापासून बोलत होते. घराच्या पाट्यांवर कॅप्टन, मेजर, ब्रिगेडियर असं काही लिहिलेलं शरणसिंग चाचाजींचं नाव दिसतंय का, माझे डोळे शोधत होते. माझ्या लहानपणी मी जवळून पाहिलेली मिलिटरीतली कितीतरी पंजाबी माणसं मला एकामागोमाग एक काही क्षणांत आठवून गेली. मोहिंदर सिंग चाचाजी, त्यांची ती मीनाकुमारीसारखी दिसणारी बायको मोहिंदरकौर चाची, त्यांचा मोठा मुलगा बलवंत त्याला आम्ही ‘खादाडखाऊ नि लांडग्याचा भाऊ’ म्हणून चिडवत असू. त्याला अर्थ कळायचा नाही, पण आशय कळायचा. पत्ते खेळताना स्थितप्रज्ञासारखे बसणारे ते घुमे महावीरसिंग चाचाजी. आमच्यावरच्या मायेने खुशाल पत्ते फोडणारे ते प्रेमळ दीपसिंगचाचाजी. (त्याकाळी वडीलधाऱ्या सगळ्यांनाच आम्ही चाचाजी म्हणत असू. त्यामुळे आज चाचू हे रूप नाही म्हटलं तरी खटकतंच.) जिच्या नावाचा मला हेवा वाटायचा ती अतिशय नाजूक नि देखणी अशी माझी जिवलग मैत्रीण शशिबाला, धाकटा भाऊ मानून ज्याचे मी भरपूर लाड करण्याची हौस भागवून घेतली होती, तो तिच्याचसारखा गोरापान, नाजूक, लालचुटक ओठांचा तिचा भाऊ अजय… सगळे आठवले पण एकच चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत एनलार्ज होत स्थिरावला, तेव्हाच्या तरुण कॅप्टन शरणसिंगचाचाजींचा. काल अंथरुणावर पडल्यापडल्या अनेक प्रश्न मला पडले होते. आज अमृतसरचे गल्लीबोळ फिरून आल्यावर अंथरुणावर पडले तेव्हा मात्र कुठलाच प्रश्न समोर नव्हता. आपण इथे कुठल्या ओढीने यायला निघालो होतो, ह्याचं उत्तर मिळाल्यात जमा होतं. मन थकलं होतं, पण शांत झालं होतं. अपत्यसुखाला आचवलेले शरणचाचा आठवले. आठवले मला पाहताच वात्सल्याने ओथंबणारे त्यांचे डोळे. माझ्यासाठी तरसणारे आणि बसरणारे त्यांचे डोळे… माझ्या मस्तकावरून फिरणारा त्यांचा मायेचा हात… चिंबभिजल्या उशीवर मला कधी झोप लागली कळलंच नाही.

अमृतसर सोडून संध्याकाळी आम्हांला दिल्लीसाठी निघायचं होतं. बसस्टँडवरच्या एका हॉटेलमधल्या रेडियोत सहगल- खुद्द सहगलच माझ्यासाठी, हो माझ्याचसाठी गात होता, “बाबूल मोराsss नैहर छूटो ही जाये…”