जीवन अनुभव – सुजाता पीटर तुस्कानो

जीवन अनुभव

  •  श्रीमती सुजाता पीटर तुस्कानो,

                     निवृत्त आरोग्यसाहाय्यिका, महाराष्ट्र शासन

गुलाबाचे काटे

     तेव्हा मी इयत्ता ८ वीच्या वर्गात होते. दुपारची शाळा होती माझी. ११ वाजता तयारीला लागले की मग ११:४५ ला शाळेत पोहचायचे. तशी शाळा आमची के. जी. हायस्कूल, घरापासून १२ मिनीटांवर होती व तयारी तशी काही फारशी नसायची. माझी दादय म्हणजेच आईने सकाळी १० वाजता केस विंचरून चांगल्या उंचावर डोक्यावरील दोन घट्ट वेण्या दोन दिवस तशाच राहायच्या. कपडे एकच जोडी, जी धुतली ती चढवली जायची, अशी तऱ्हा असायची… चपला प्लास्टीकच्या व मजबूत टिकाऊ होत्या, चांगली शिवून शिवून २-३ वर्षे जायची त्यावर… व त्याच सगळीकडे घरात, दारात, बाहेर व नाहीतर अनवाणी मस्त फिरायचे.

     वाडीमधील मजूरी त्यावेळेस करणे सोपेच जाई  व दोन पैसे हातालाही लागत. पहाटे आई लवकरच ५ वाजता उठवायची, कशीबशी चूळ भरून लगेच धूम पळायचो. कारण मजूरीचे ५० पैसे मिळायचे. आदल्या दिवशीच ‘मोगरा’ कळी खुडण्याची अनेक आमंत्रणे यायची. आगाशी परिसरांत चांगल्या बागायतदारांकडे पूर्वी मोगरा फुलशेती असायची. मोगरा कळी पहाटेच तोडावी लागे व त्यासाठी मजूरीला त्यांना कमी पैशात मुले मिळाली तर बरे पडत असे. मुलं म्हणून फक्त आठ आणे मजूरी मिळे, परंतू तेव्हा गरीबीत आठ आणे पण आम्हाला घरातले एक ठिगळ लावायला कामी येत असत.

     दूरच्या नात्यातल्या लोकांना आधीच माहीत असायचे. लहान २/३ भावंडे आहेत तर त्यापैकी कुणीतरी कामाला येईलच. तशी तर मी जरा धीट, चपळ व काळी ठूस्स होती व काम चपळाइने करायचे व माझा नंबर अधिक लागे. चाळपेठ ते कातरवडी… व चाळपेठ ते नवापूर / अर्नाळा असा काळोखात ५-३० ला प्रवास असे. मग थंडी असो की पाऊस. रस्ता, चिखल, दगडमाती, साप, सरडा ह्या अंधारातील भितीला व तक्रारीला वावच नव्हता तेव्हा. पावसात डोक्यावर एखादा प्लास्टीकचा तुकडा मिळे व थंडीत बोचऱ्या थंडीचे काही कौतुकच नव्हते. मोगरा फुलझाडांवर २/३ दिवसांवर औषध फवारणी असे. खूप वेळेस अॅलर्जीने अंगावर पुरळ येई व अस्वस्थ होई कळी तोडतांना पण तेव्हा कुरकुर करून सांगणार कुणाला… कमरेला डागाळलेली कापडी पिशवी बांधली कि मग ती भरे पर्यत.. दोन्ही हातांच्या हालचाली व त्या गरीब कळ्या इतकच दिसे… कधी तर फुलझाडांवरील अधूनमधून सुरवंट व हिरव्या किडींना स्पर्श होई व अंगावर शिसारी येई.

     असे ९ वाजेपर्यत हे काम संपले कि मग एक क्वचितच कोरा चहा मिळे. बाजूलाच असलेल्या केळीच्या पानांतल्या द्रोणात गरम वाफाळलेला चहा त्याच मोगऱ्याच्या बांधावर पितांना एकाच दमात संपे, कारण जरा कुठे हलला, तर तो जमीनीत जाण्याची भिती असे.  त्या चहामुळे दुपारच्या दोनच्या जेवणापर्यत बरीच ऊर्जा मिळे. पुन्हा चालतच ९-३० पर्यत घराकडे पोहोचत असू. घरी पोहचल्या पोहचल्या आई वेणीफणी करी व ओटीवर जमीनीवर बसल्याबसल्या सांगे, “अगं.. ती शालीवहीनी आली होती मालविडे आळीतली, तिला लग्नघाईचा सिजन आहे व खुप वेण्या बनवायची ॲार्डर आहे व ती गुलाब काढण्यासाठी तुला बोलवायला आली होती. मला आईचा खरं तर खूप राग येत होता त्या वेळी.

     “आत्ताच तर आले ना गं मी. आत्ता मी नाही जाणार परत आणि मला शाळेला पण जायचे आहे.”

     “अगं, वाजले का अकरा, बघ अजून १ तास आहे, तोपर्यंत तू पटकन येशील पण जावून… जा.. जा.. बाय माझी शहाणी आणि बघ, ती तुला गुपचुप काही खाऊपण देईल.”

     एकीकडे परत ५० पैसे व काहीतरी शिळापाका खाऊ मिळणार हे मला मनोमन सुखावत होतं. किशोरवयातील वाढती भूक, बऱ्याचदा कुणी काही लाडू, रवा, चॅाकलेट किंवा चार चणे जरी हातावर ठेवले तरी बरे वाटे. पण मला ते ‘गुलाब काढणी’चे काम नको नको वाटे. गुलाबासाठी खुप दुरवर पोहचल्यानंतर आधी मला त्या काट्यांचा खुप राग येई. मोठमोठी माझ्या उंचीपेक्षा वर वाढलेली जुनाट झाडे, एकमेकांच्या फांद्या एकदुसऱ्या झाडांत अडकून गुंताच झालेला असे. गळाभेट घेत जणू नात्यांतील मैत्रीतील गोडवाच गात.  पण माझा संताप हा की मला गुलाब तोडण्यासाठी उंच उडी मारावी लागे. आत्ता कात्री व हत्यारे आहेत गुलाब खुडण्यासाठी. पूर्वी एखादी गंजकी विळी किंवा हातानेच चांगले वितभर अंतर ठेवून फांदीतून अलगद गुलाब तोडावा लागे. गुलाबाचे फुल कधी उन्हात तर कधी आडोशाला असे लपत असे कि मला त्यास शोधण्यात पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी तेच काटे व त्याच झोंबी पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ करीत. एक जरी गुलाब फांदीवर लटकलेला राहीला तर वहीनी मालकिण मला लगेचच दम भरी. “नीट काढ गुलाब नाहीतर तुला पैसे नाय मिळणार.”

     बऱ्याचदा बोचरी थंडी अंगाला झोंबे व झाडांना विहीरीचे पाणी दिल्याने जमिनीतील चिखलांत पाय रुतून पायात चिखलाचे जाड रबरी बुट बसविल्यागत पाय जड होत व पाण्यात सतत भिजल्या कुजल्यामुळे एक प्रकारे बुरसटत असत. बालपणातील ती कोवळी त्वचा अकाली आलेल्या परिस्थितीच्या वातावरणाने निब्बर झाली होती. त्या कुजलेल्या पायांची आग आग होते, ती शमविण्याचे रामबाण उपाय तेल चोळत असू. किंवा रात्री चुलीच्या आगीने तापलेल्या विटेला शेकत असू, मग आराम पडे. औषध व मलम हे तर कधी पाहीलंही नव्हतं तेव्हा.

     गुलाब १/२ दिवसाआड काढत असू. गुलाबाचे प्रकार गावठी साधा फिक्कट गुलाबी गुलाब, त्यात एक लाल भडक गुलाबी गुलाब व एक अत्तरी गुलाब असत. परंतू त्या गुलाबाकडे कधी निरखुनही पाहिलं नव्हतं तेव्हा. हा गुलाब काढतांना दोन्ही हातांना अनेकदा चरे पडायचे व हात रक्तबंबाळ व्हायचे. तेव्हा ना सनकोट होता  ना ॲप्रन. परंतू गुलाब हाती आल्याचा आनंद त्या चऱ्यांपेक्षा मोठा असायचा. त्याचे दुःख जेव्हा घरी सायंकाळी आंघोळी व्हायच्या तेव्हा गरम पाणी टाकताक्षणी जाणवायचे व अंगाला अधिक काटे टोचायचे. खुप रडत कुढत अंघोळ उरकायची. पुढे अनेक काळ शाळेत व काही वर्षे पुढे कॅालेजात जावू लागले तरी ही मजूरी व हे चक्र सुरूच होतं. सगळ्या माझ्या वर्गमैत्रीणींचे कपडे सुंदर असायचे व त्याचबरोबर किशोरवयातील ती उमललेली कांती तुकतुकित व नित्तळ असायची. हे सर्व पाहून मी माझ्या हातापायांकडे पाहायची व ते माझे घाण, ओल्या सुक्या रेघोट्या व चरे पडलेले हात पाहून माझी मलाच किव यायची. हात व पाय तर लपविलेलेच बरे असे होते. परंतु परिस्थितीच्या चूलीवरील शिजणाऱ्या अन्नाला यातनाच्या वाऱ्यानेच धगधविले जाणार होते.

     दुःखानंतर सुख प्राप्तीही असतेच हयाची अनुभूती व त्या सुवर्णक्षणांची प्रसुती इतकी सुंदर झाली की मला हीच गुलाबांची फुले ५० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शृंगार, सौदर्यतेज, गुलकंद, शांतता, मैत्री, कौतुक, प्रेम, सुशोभिकरणासाठी विराजमान असलेल्या गुलाबाचे महत्व क्षणोक्षणी स्मरण देवून गेली. ज्या गुलाबांसाठी मला अनेक काट्यांनी रक्तबंबाळ केले होते, त्याच सर्व काट्यांनी माझ्यावरील उपकारांची परतफेड रंगीबेरंगी गुलाबपुष्पांनी शंभर पटीने एकत्र येत मैत्री करून माझ्या दारी आज सुंदर तोरणे उभारली व आज मी त्या सर्व काट्यांना विनम्रतेने पुन्हा पुन्हा न्याहाळते आहे. स्वर ओठांवर आळवते आहे.

     काट्यांनाही कळली माझ्या त्या वेदनेची भाषा. फिटतां फिटत नाही ऋण हे पुष्पगंधा, अनेकां हाती स्विकारता. गरीबीत का वसतो ईश्वरा, तुझे रूप साजीरे दिसते आज मला, अजूनी काय हवी मनीषा, अजूनी काय हवी मनीषा…

शेणांतील सुगंध

     काही दिवसांपूर्वी एका पाड्यावर बीसीजी लसीकरण समूपदेशनासाठी गेले होते. तो पाडा होता, थळ्याचा पाडा. मी लाभार्थ्यांना बोलविण्यास एका झोपडीत वाकले. “कुणी आहे का घरात ?” आत अंधार होता. काही दिसतच नव्हतं. तेवढ्यात एक तिशीतील महिला बाहेर आली.” हो, मी आहे ताई. काय झालं ताई ? तुमी कोण ? जरा तिथेच थांबा हं बाहेर.” ती हळूवार आदरयुक्त भावनेने म्हणाली, “आत येऊ नका, बरं. पाय व कपडे घाण होतील तुमचे.” ”का ग ?” “आज आमच्या आतल्या घरात ना, आम्ही शेणाने नुकतेच सारवलयं. शेणाचा घाण वास येतोय व ओलं आहे सर्व मीच बाहेर येते.” पटकन हातच काम तसच ठेवून ती माऊली बाहेर आली.

     “मी सिस्टर आहे, ह्या गावात नवीन आले आहे” मी तिला लसीबाबत समजावले व मग तिला एक प्रेमळ हास्य देत परत मागे फिरले. मनात विचार सुरू होते, गरीबी व परिस्थितीचे व्यवस्थापन करतांना आपल्या गरीबीला कुणी हसू नये म्हणून तिचा किती हा आटापीटा होता आणि घर शेणानेच तर सारवलं होतं. त्यात कसली लाज आणि घाण. पण तिला वाटत असावं, शुभ्र व स्वच्छ कपड्यातल्या बाईंना ह्या घाणीचे व शेणाचे काय महत्व कळणार बरं… तिने गरीबीची व श्रीमंतीची एक व्याख्या मनात तयार केली असावी. मी दुसऱ्या घराकडे चालत होते.

     मला काही क्षणात ते माझे बालपण आठवले…. रात्रीचा अंधार संपून पहाट होण्याच्या तयारीची वेळ माझ्या आईला रोज घड्याळाआधीच संकेत देत असे. “चल सुजा ऊठ, शेणाला जा बघू.” आईची एक आरोळी म्हणजे फार मोठ्ठा धाक असे. परिस्थिती बरोबर मिळतजुळतं केल्यामुळे कुरबुर न करता उठून कामाला लागणे हेच सत्य होतं. अमुल, गोकुळ, वारणा अशा मोठ्या दुधकंपन्या जेव्हा उदयास व नावारूपास आल्या नव्हत्या, तो काळ म्हणजे १९५० ते सर्वसाधारण १९८५, जेव्हा साऱ्या मुंबईच्या दुधाची तहान वसई तालुका भागवित असे. गावागावांतील प्रत्येक घरात सर्वसाधारणपणे एक दोन म्हैस असायची व गावांतील २ ते ३ मोठ्या घरांत ३५/४० म्हशींचा तबेला असायचा व गरीबीमध्ये जळावू इंधनाची सोय म्हणजे शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या.

     आम्हाला ७ जणांच्या स्वयंपाकासाठी रोजच्या दैनंदिन जळणाची गरज शेणाच्या गोवऱ्या भागवित असत व त्यासाठीच हा संघर्ष असे. अवघ्या १०/११ वर्षात जगण्याचा संघर्ष परिस्थितीने व नियतीने आपोआप शिकविला होता. आईबरोबर मिळेल तशी मजूरी कामे, शाळेची हजेरी, दोन वेळचे पोटभर अन्न, अंगात एक जुना फ्रॅाक व केसांच्या वरती टांगवलेल्या आईच्या घट्ट विणेतल्या दोन वेण्या, इतकंच राहाणीमान “सुखाची व्याख्या” सांगत असे. घरात सगळ्यांसाठी सकाळी ७/८ वाजता चहा बनेल तेव्हाच तो मिळे. उठल्या उठल्या बाकी काही प्रोटोकॅाल नव्हतेच मुळी. लहान बहीणीला अंग हलवीत, “चल उठ ना गं लवकर, आपल्याला शेणाला जायचंय, आत्ता उगवेल लवकर. चल.” तीही मग घाबरून उजेड पडेल कि काय म्हणून माझ्या मागे डोळे चोळत निघे.  मी सुध्दा डोळे चोळतच, अंथरूण झटकत घराबाहेर कारवीच्या कुडाला लावलेले टोपले घेत असे.

     टोपले आईने चांगले शेणाचे सारवण केलेले सुंदर असे होते व त्याच्या जवळच एक छोटे न सारवलेले निखुरले म्हणजे छोटे जाळीदार टोपले असे होते. मोठं टोपलं म्हणजे एक संतापच होता तेव्हा. रिकामे असतांना त्याचा काही भार नव्हता. पण जेव्हा ते शेण ओतपोत भरून सांडू लागे तेव्हा मात्र जबाबदारीच्या व मोठेपणाच्या कर्तव्याच्या जाणीवेचे ओझे त्याला व मलाही जाणवल्याशिवाय राहात नसे. काळोखातच वाट शोधत दोघी निघायचो. गावात लांब लांब घरे होती. आमच्यासाठी नेहमीच मोठे तबेले व जमीनदार माणसे महत्वाची वाटत. कारण जमीन, शेती, बागायती व त्यांस शेतीबरोबर जोडधंदा म्हणून म्हशी, दूधदूभते असा मोठा व्यवसाय असल्याने आम्हाला एक आधार मिळे. आम्हाला जाळणासाठी इंधन म्हणून त्यांच्या गोठ्यातील शेण स्वस्त व मस्त पडे. मग एक दिवसाआड आमचे नियोजन ठरे. आज कुणाच्या गोठ्यातले शेण चोरून आणायचं बरं ?

     होय.. खरंय .. चोरूनच.. तसं तर सहजी कुणी न्या म्हणून स्वत: सांगत नसे. अगदीच शेण उचलणारा गडी माणूस नसेल तरच आम्हाला निरोप येई शेण हवं तर या न्यायला म्हणून व तेव्हा आम्ही छाती फुगवीत टोपल्या उडवत दिवसाढवळ्या शेणाला जात. पण असं फारच क्वचित घडे. कारण शेण हे उकिरड्यावर एक खड्डा् शेणकळीत टाकून तेच पुन्हा बागायतीला टाकले जाई व ते काही निरूपयोगी नव्हतेच तेव्हादेखील. पण खरचं आजही मला त्या आमच्या गावकरी जमीनदार दिलदार व्यक्तींचे ऋण व माझ्या कुटुंबावर केलेली दया विसरता येणार नाही. कारण रोज आपली म्हैस रात्रीत शेणाचे किती शेण-शेणपे देते हे गुराखी व शेतकरी हमखास जाणतो. असे असतांना १०/१२ म्हशीच्या शेणातील एक टोपली शेण जरी आम्ही पहाटे पहाटे चोरले तरीही त्यांना समजत असे व चोरही नक्किच ठाऊक असे. अनेकदा आपण म्हणतो तसं सेवा दाखवून केली जाते. परंतू खुपवेळेस ती कुणासही न बोलता कशी केली जाते हे मला आज उमगते आहे, त्यांनी कधीच गावगोंगाटा किंवा कुठे वाच्यता देखील कधी केली नाही हेच मोठ ह्दय होतं त्यांच्या दान सेवेचे.

     आम्ही शेण पळवतो हे त्यांना निश्चितच ठाऊक असावे. मालक तर पहाटे लवकरच उठत. कारण पहाटेच्या गुरांच्या दूधकाढणीची वेळ ३/४ वाजताचीच बहुदा असे, गोठ्यात अंधुक दिवा पेटलेला असे व कधीकधी तर गुरांचा चारा-खुराक सुध्दा बादल्यांमध्ये पडलेला असे. गावात व आजूबाजूच्या गावात आमचे नाना, पास्कूकाका ह्यांच्या गोठ्यात व अगदीच नाही शेण मिळाले तर “मिनेजआळी” म्हणजे थोड्या दूरवरही जायचो. कुत्रे तर आमच्या पाचवीला पुजलेलेच असायचे. लहानपणी शेणाच्या ह्या खेपांमध्ये मला दोनदा श्वानांच्या लचक्यांना सामोरे जावे लागले होते व तब्बल पोटात १४ / १४ इंजेक्शन सुध्दा दिली गेली होती. परंतू त्या विजयखुणाच म्हणाव्या लागतील आज. काळोखात खुप घाबरत, दबक्या पावलांनी आम्ही गोठा गाठायचो. गोठ्यात शिरल्यावर कधी कधी तर खुप आनंद व्हायचा. इतका की पंचपक्वान्न मिळाल्यागत. कारण म्हशींच्या मलमुत्राच्या असण्याने आमच्या वाट्याला थोडेथोडके शेण यायचे व आमची चूल धगधगायची. खुप ढीगभर शेणातले थोडे शेण पळवतांना अंतरी काही चोरल्याचे दुःख व्हायचे नाही कारण मालकाला पुरून उरेल इतकेच आम्ही पळवायचो. मग काय.. लूटच..

     आजूबाजूला पावडे व घमेले असायचे पण आवाज व गोंगाट नको म्हणून हातांनीच चांगले भरभर भरून घ्यायचो. सकाळी पहाटे नखांमध्ये शिरलेले शेण रात्रीपर्यत सुगंध देत राहायचं. “शेणाचा सुगंध आजही अंतर्मनात तसाच अत्तराप्रमाणे साठवून ठेवलाय व त्याच बरोबर त्या गोठ्यातील मालकाच्या औदार्याचे ते ऋण” छोटे निखुरले शेण भरून मोठ्या टोपल्यात भरायला सोपे जाई. पण गंमत अशी होई की गोठ्यात शिरल्याने जनावरांना आमच्या आगमनाने मालक आल्याची जाणीव होत असे व ती खाण्याच्या आशेने अचानक उभी राहात व खडबड आवाज होई. बऱ्याचदा दावणीला बाधलेल्या गळ्यातील जाड साखळ्यांचा आवाज गोंधळ उडवी आमचा. कधी तर त्यातील एकदोन म्हैस लगेचच शेण व मुत्र टाकी. तेव्हा मात्र आमची तारांबळ उडे. मग अशा वेळेस आम्ही लगेचच छोटी टोपली म्हशीच्या गुदद्वाराजवळ लटकवत शेण जमीनीवर पडू न देता टोपलीत जमवल्याचा आनंद मिळवत असू. कित्ती मज्जा होती ती. पण बऱ्याचदा ते जनावरांना पसंद येत नसावे. अनेकदा त्या म्हशीच्या लांब झुपकेदार शेपट्या माझ्या गालावर नक्षीदार डिजाईन व चुरचुरीत लाल छापा उठवित अद्दलदेखील घडवित. मुत्रमिश्रीत शेण बऱ्याचदा नको नको वाटे, कारण ते गोळा करतांना हातांतून निसटे व डोक्यावर घेतल्यावर टोपलींच्या चिरांमधून देखील ते केसांतून अंगाखांद्यावर निथळे. अखेर पहिली मोठी टोपली भरभर भरून झाली कि मग छोटी निखुरली भरून घेत. मोठी टोपली भरली कि ती माझ्या डोक्यावर चढवणे माझ्या लहान बहीणीला सोपे जाई. दोघींनाही सगळी ताकद लावून मगच ते करावं लागे.

     टोपली डोक्यावर ठेवण्याच्या ह्या झटापटीत अनेकदा प्रयत्न अयशस्वी देखील झालायं व संपुर्ण टोपले कधी खाली पडलयं तर कधी टोपले माझ्या अंगावरून खाली ओघळलयं. असे किस्से घडल्यावर देखील एकमेकांना रागावता येत नसे कारण पुढे काही पर्यायही नसे. छोट्या बहीणीला डोक्यावर ठेवतांना पुन्हा अडचण नको म्हणून तर ते छोटं निखुरलं टोपलं होतं तिच्यासाठी. आमची आई नेहमी म्हणायची, “गाढव मेलं ओझ्याने आन शिंगरू मेलं हेलपाट्याने. ह्या संघर्षातील गमतीजमतीमध्ये परिस्थिती, मेहनत, कष्ट व संघर्ष दडला होता. ह्याच शेणाच्या सुगंधाने सारवलेल्या लिंपनाची माझ्या शुभ्रसाडीला घाण व डाग लागू नये असचं वाटत असावं त्या माऊलीला आज. तिला तरी कुठे ठाऊक आहे की ह्या घाण शेणांतून निर्माण झालेल्या ‘सोनखतांनी व गोवऱ्यांनी’  माझ्या आयुष्याचे सोनं केलयं. ह्या जीवनाच्या विषम, कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी, अत्यंत कुशलतेने संकटांना तोंड देतांना ती अपराधीपणाची भावना किंवा लज्जा ह्या दोन्ही गोष्टी कितीतरी दूर दूर होत्या. आजही चुकून रस्त्यात पडलेल्या त्या आखीव रेखीव शेणाच्या गोळ्याकडे, शेणप्याकडे मी तेवढ्याचं कुतूहलाने व प्रेमाने पाहते की अजून कुणी हयांस सारवणास कसे नेले नाही बरं..

‘शेणातील सुगंधात‘ संघर्षात अनेक मोती दडलेले आहेत व त्यांच्या अनेक गाथांना शोधायचं राहून गेलयं…