कृतीशील ‘पेरणी’ फा. एलायसची
- सिडनी जस्टीन मोरायस, नायगाव पाली
मो. – 9604385985
माणसं मरत नाहीत ती जिवंत राहतात, आठवणीच्या रूपाने. कारण ते चांगल्या संस्कारांची ‘पेरणी’ करून गेलेले असतात, कुणाच्या मनात तर कुणाच्या हृदयात. असाच एक कर्मयोगी जनमाणसात खिस्ताची सुवार्ता गाजवून आध्यात्माची पेरणी करणारा स्व. फादर एलायस रॉड्रीग्ज !
‘गास रे गास तिथं सोन्याची रास’ हया सोन्याच्या राशीतून निपजलेले हे शब्दकोषाचं एक माणिक. आपल्या बुध्दीमत्तेचं दान स्वतःपुरतंच न ठेवता अनेकांचे जीवन सुसंवादी सुरमयी होण्यासाठी वापरले व अनेकांची जीवनं ख्रिस्ताच्या शिकवणूकीने हिर्याप्रमाणे चमकवली ते हे फा. एलायस !
६ नोव्हेंबर १९७१ ला हा उंच धिप्पाड असा तरूण खिस्तसभेत सुवार्तेची पेरणी करण्यांस दिक्षित झाला आणि ७ महीने पाली चर्चला स्व. रेव्ह. फा. पिटर गोम्स हया अमराठी गोवन पॅरीश प्रिस्टच्या सहाय्याला आले, त्यांची १ जून १९७२ पासून नंदाखाल चर्चमध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून नेमणूक होईपर्यत. ७ महिन्यात ‘पाली दिलवाली’ असल्याचा अनुभव घेऊन गेले ते हे फा. एलायस !
१९७१ साल माझ्या तारूण्याचा काळ. मी शुभवर्तमान पॅरिश प्रिस्टना वाचून दाखवी. ते गोवन भाषेत वहीत लिहित. ती वही वेदीवर बायबलमध्ये गुंफवून ते शुभवर्तमान वाचत. तिच नक्कल त्यांनी ‘मिस्साएल’ ची केलेली. त्यामुळे भाविकांना वाटे फादरांना मराठी वाचता येते. हे पाहून फादर एलायसला हसू ही आले आणि पॅरीशनर्सची कीव ही आली की, १० वर्षात तुम्ही धर्मगुरूंना मराठी वाचायला शिकवले नाही ? मग ७ महीने फा. एलायसने वेदीचा ताबा घेतला. शुभवर्तमान प्रवचने सुचना अस्सखलीत मराठी भाषेत ऐकण्याची संधी पालीवाशियांना दिली ते हे फा. एलायस !
१९७१ ची खिस्तजयंती, १९७२ सालची उपवासकालीन पासाची प्रवचने, पवित्र आठवडा पालीकरांसाठी जणू आध्यात्माचा वसंतऋतूच होता. त्या वर्षी प्रथमच पालीला ‘उपवासकालीन समाचार पत्र’ प्रकाशित केले. मला लिहीते केले. ‘आशेचा उपवासकाळ’ हा माझा पहिला लेख फादरांनी संस्कारीत करून छापला. मला हाताशी ठेवून छपाईचे काम केले. माझ्या लेखणीस प्रथम प्रसिध्दी देणारे ते होते फा. एलायस !
जगण्याला ग्रहण लागलेली त्या काळातील गरीब जनता. माणसं भयभीत झाली होती. आयुष्य आजच्या इतकं सुरक्षित व सुसंपन्न नव्हतं, गरीबी आ वासून उभी होती. जेव्हा नव्या समस्या, नवे प्रश्न उभे राहतात तेव्हा समाजात धीराचे शब्द पेरणारे ज्ञानी लोक देव पाठवतो. खिस्ताच्या विश्वासाची पेरणी करण्यासाठी. त्या ७ महिन्यात ‘पवित्र आत्म्याची आराधना’ प्रार्थना संघ सुरू केला, त्यांचे शास्त्र निरूपण, प्रबोधन याची ख्याती परीसरात पसरली व गुरुवारच्या प्रार्थना सभेस मुळगाव, पापडी व कोळी समाज हयांची उपस्थिती वाढली. नवोदित धर्मगुरूंच्या पवित्र हाताच्या स्पर्शाने पवित्र आत्म्याचे दान स्विकारण्यास लांबलचक लाईन असायची ते होते फा. एलायस !
पुढे वसई धर्मप्रांत स्वतंत्र झाल्यावर सुमारे २० वर्षे त्यांनी कॅरीजमॅटिक चळवळीचे नेतृत्व केले. ‘बायबलचे मराठी अवतार’ हयावर त्यांनी डॉक्टरेट केली होती. त्याचा लाभ वसईच्या श्रद्धावंताना दिला. स्तुती आराधनेसाठी विविध प्रार्थना पुस्तके प्रकाशित केली. प्रत्यक्ष अनुकरणही केले. ‘आधी केले मग सांगितले’ हया उक्तीप्रमाणे जीवन जगून अनेकांच्या जीवनाला नवी दिशा दिली ते हे फा. एलायस!
हया साहित्यीक तत्वज्ञानी धर्मगुरूने आठ वर्षे सुवार्तेची संपादक म्हणून धूरा सांभाळली. मी लीजन ऑफ मेरी संस्थेचा वसईचा अध्यक्ष होतो त्या संस्थेच्या कार्यक्रमाच्या बातम्यांना ते प्रसिद्धी देत. माझे पाच ललीत लेख त्यांनी संपादकीय संस्कार करून छापले व मला लेखक झाल्याचा गर्व झाला. १५ ऑगस्ट १९८२ फक्त सुवार्ता वितरकांचा मेळावा गिरीज चर्च हॉलमध्ये भरवला. मला प्रमुख वक्ता म्हणून बोलावले ‘सुवार्ता वितरण हे माझे प्रेषित कार्य आहे’ हया विषयावर मी वितरकांना प्रबोधन केले. माझी वितरक प्रमुख म्हणून नेमणूक केली. सप्टेंबरच्या अंकात माझे भाषण फोटो सहित छापून आले, ज्याचे कात्रण मी अजूनही जपून ठेवलंय. मला सुवार्ते मधून प्रसिद्धी देणारे हेच ते फा. एलायस !
भारतीय कॅथोलिक पत्रकार परिषदेचे ते बोर्ड सदस्य व खजिनदार झाले व प्रोटेस्टंट पंथीयांना पचित्र मरियेचे महत्व पटविणे त्यांना एकत्र आणणे यासाठी त्यांनी ज्ञानोदय हया प्रोटेस्टंट मासिकातून केलेले प्रबोधन त्यांच्यासाठी लिहिलेले ‘नव्या करारातील खिस्ती समाज’ हे पुस्तक अवर्णीय. फा. एलायसचे !
१३वी ‘महाराष्ट्र मराठी खिस्ती साहित्य परिषद २९ व ३० डिसेंबर १९८४ ला मुंबईला भरली होती. त्याचे अध्यक्षपद फा. एलायस ना दिले. त्या संमेलनाचा आयोजनाचा भाग म्हणून मलाही फादरांनी सहभागी केले. त्यामुळेच आज मी वसई मराठी खिस्ती साहित्य मंडळाचा खजिनदार आहे त्याचे श्रेय फा. एलायसना !
आणि आमचं नातं दृढ़ झालं : ‘अजून वेळ टळली नाही’ हा माझा हृदयस्पर्शी लेख. मी सुवार्तेला पाठविला. फादरांनी वाचून मला बोलावले. माझ्या बहिणीवर विवाहाच्या काही वर्षातच घडलेला प्रसंग सांगितला. ज्यामुळे ती विधवा झाली, तिच्या दोन लहान मुली माझ्या पदरात आल्या. आता माझं लग्न कसं होणार? मी चिंताग्रस्त झालो! फादर म्हणाले, “सिडनी, हया लेखातून तुझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. धीर धर, हे ही दिवस जातील.” असे धीराचे शब्द सांगणारे होते फा. एलायस !
‘लीजन ऑफ मेरी’ हया संस्थेतून कार्य करताना गासातील फादरांचे भाचे आलेक्स घोन्सालविस हयांच्याशी माझी मेत्री झाली. आम्ही एकमेकांच्या घरी येऊ जाऊ लागलो. माझ्या पदरात असलेल्या दोन भाच्या मीना, विना माइया घरी येऊन राहणाप्या हया माझ्या मित्रालाही ‘मामा’ हाक मारू लागल्या. पुढे मित्र आलेक्स सेमनरीत दाखल झाले. धर्मगुरू झाले. पण मैत्री अबाधित ठेवली अगदी घरापर्यत! माझ्या भाच्यांना दोन मामा मिळाले. आमचे नातेसंबंध घट्ट झाले. माझ्या लेखनाला प्रसिद्धी देणारे दूरदष्टीचे फा. एलायस !
९ फेब्रुवारी १९८६ चा तो सोनियाचा दिवस उजाडला ! भाबोळा येथील सेंट अगस्टीन हायस्कूलच्या भव्य पटांगणात एक पहाडी आवाज आसमंतात दुमदमला! “पहा तो येत आहे! सिंहासनावर आरूढ़ होऊन येत आहे! तुमच्या भेटीला येत आहे! … !! आणि पोप जॉन पॉल दूसरे याचे वसई भूमीवर आगमन झाले. वक्तृत्वाचं दान दिलेल्या हया निवडलेल्या प्रेषिताची त्या दिवशी सुत्रसंचालन करण्यास निवड झाली होती. हा बहुमान मिळाला ते होते फा. एलायस !
फा. एलायस तुमचं संपूर्ण समर्पित जीवन वेदीवरून, रिट्रिट मधून, विविध प्रार्थना संघातून, भव्य अशा पवित्र आत्म्याच्या ठायी नवजीवन प्रार्थना मेळाव्यातून, उपवास काळीन प्रवचनातून, खिस्ताची सुवार्ता ‘पेरण्यातच’ गेले. तुम्ही बोलत रहावं आम्ही ते ग्रहण करावं. सुरेल सुरेख शब्दात तुम्ही खिस्ताच्या सुवार्तेची ‘पेरणी’ केलीत ज्यामुळे अनेक तरूण तरुणी खिस्ताच्या मळयात कार्य करण्यास गेल्या. तुमचा भाचा आलेक्स ही तुमच्या पाऊलावर पाऊल टाकूनच चालत आहे. अनेक शिक्षण संस्थाना वरदान ठरला आहे. असे हे वकृत्वाचे, नेतृत्वाचे वरदान लाभलेले फा. एलायस !
१४ फेबुवारी २०२१, रोजी ३४वा ‘दिव्यांग मेळावा’ माफी ट्रस्ट वाघोली येथील श्री. पीटर फर्नाडिस याच्या प्रांगणात पार पडला. त्याच्या घराचे कंपाऊंड मर्देस चर्च रोडला समांतर होते आणि त्या वर्षी आपण मर्देस चर्चचे पॅरिश प्रिस्ट होता. म्हणून मेळाव्यास सहाय्य होण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. तुम्ही खुर्चीवरून उठून उभे राहिलात. “सिडनी हया मेळाव्यासाठी चर्चचे पटांगणच नव्हे तर चर्चही पूर्ण दिवस खुले राहील मला ऐकूणच आनंद झाला. आम्ही दिव्यांगाचे मैदानी खेळ चर्चच्या पटांगणावर घेतले. तुम्ही पॅरीशच्या युवक संघटनेकडे हया खेळाचे नेतृत्व दिले. समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्रबोधन करताना ‘दिव्यांग’ माता पित्याची हृदय हेलावून टाकणारे शब्द ‘पेरले’. त्यांच्या पंखाना शब्दातून बळ देणारे, त्या दिवशी प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेतून ‘दुखितांचे तिमिर जावो’ हा लेख लिहून दिव्यांगाना जिद्द देणारे आपण अद्वितीय फा. एलायस !
आव्हानात्मक जीवन जगणारा प्राप्त परीस्थितीचा स्विकार करणारा हा ‘स्वामी’ भुईगाव पॅरिशच्या लोकांसाठी नव्या चर्चचे आव्हान करतो. अर्थाजनाचा पाया रचितो मात्र वरीष्ठाची आज्ञा ग्राह्य मानून आपली रिकामी झोळी घेऊन वेलंकणी मातेच्या विसाव्याला मर्देस चर्चला जातो. मात्र भुईगावकर आजही नव्या चर्चच्या पायाभरणीचे शिल्पकार तुम्हाला मानतात त्याचे श्रेय देतात फा. एलायसना !
६ फेब्रुवारी २०२० रोजी बॅसीन कॅथोलिक बँक मुख्य कार्यालयाचा भूमीपूजन म्हणजे आशिर्वाद विधी तुमच्या पवित्र हातांनी व्हावा. हे तुमचे भाग्यच म्हणावे. लवकरच मुख्य कार्यालय अस्तित्वात येईल त्या कार्यालयाच्या अग्रस्थानी लागलेल्या मार्बलवर जागेचा आशिर्वाद विधी करणारे म्हणून नाव अजरामर राहील तुमचं फा. एलायस रॉड्रीग्ज !
२९ जून २०१४ रमेदी चर्चच्या प्रांगणात संपन्न झालेला ‘पेरणी’ पुस्तकांच्या पहील्या खंडाचा विमोचन सोहळा आमच्या डोळयाचे पारणे दिपूनच गेला. संपूर्ण भुईगांव पॅरीश फुलांची उधळण नी स्तुती सुमनांची पेरणी करत उभा केलेला तो प्रकाशन सोहळा म्हणजे तुमच्या नेतृत्वाची खरी झलक होती. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ख्रिस्ताचा प्रकाश पेरणारा अद्वितिय असा फा. एलायस !
गुरुवार ६ नोव्हेंबर २०१४ रोजी तुम्ही पेरणी पुस्तकाचा दूसरा खंड समाजासाठी प्रकाशीत केलात तुमच्या जन्मदिवसाची साक्ष देणारी ही पेरणी होती. वधस्तंभावर शेवटचे क्षण मोजताना ख्रिस्त उजव्या हातावरील चोराला उद्गारले, “तू आज माझ्यासोबत स्वर्ग लोकात असशील.” खिस्ती प्रणालीची ‘पेरणी’ करणार्याने ही हाक ऐकली ७ नोव्हेंबर २०२३ रोजी स्वर्गाच्या वाटेवर निघाले. पेरलेलं उगवले आहे ते पाहण्यासाठी फा. एलायस !
प्रिय फादर एलायस, आयुष्य हे प्रेम करण्यासाठी असते. हेच सांगत तुम्ही अखंड प्रवास केलात तुम्ही धर्मगुरू होऊन यशस्वीपणे पेरणी केलीत. थांबावंसं वाटलं तेव्हा थांबलात त्या क्लर्जी होममध्ये हे असं थांबण म्हणजे मृत्यू नव्हे. कारण तुमच्या जीवनातील विचारांच्या ‘पेरण्या’ ने हजार पट पीक आले आहे. तुमच्या अमरत्वाची साक्ष देत आहे.