कविता – डॉ. सौ. उज्ज्वला देवरे

दिसतं तसं नसतं

फारच अवघड असतं मनाला समजावणं

जे आपलं नसतं ते सहजी स्वीकारणं

गर्दीत राहून एकट्यानं आत्ममग्न व्हायचं

मनातलं दुःख दाबून चेहऱ्यावर हसू फुलवायचं

ग्रीष्माच्या उन्हाने तगमगून तगमगून पोळायचं

हवेच्या एका शीतल झुळुकेनं फुलून उमलायचं

पावसाच्या मुसळधार धारांनी सतत कोसळायचं

आपल्या गळणार्‍या घराला प्लास्टिकने सावरायचं

शिशीरातील गोठवणार्‍या थंडीत हुडहुडायचं

गोधडी पांघरूण शेकोटीच्या उबेला बसायचं 

आयुष्यातील घटनांना सामोरे जायचं असतं

सहज चाललंय वाटतं पण दिसतं तसं नसतं

छंद मला

छंद मला माणसांतील माणूस शोधण्याचा

पापण्यांच्या आड त्याचा अश्रू एक शोधण्याचा

छंद मला जीवनाच्या वाटेवरील धुके दूर करण्याचा 

अडखळणार्‍या पावलांसाठी प्रकाश एक पेरण्याचा

छंद मला गर्दीतील चेहरे निस्तेज टिपण्याचा

दूर करावी चिंता दुःखे हसू एक फुलविण्याचा

छंद मला छळणार्‍या आठवणींना विसरण्याचा

मंद झुळूक अलवार तेवढी एक स्मृती जागण्याचा

छंद मला आवडीने निसर्गात नित रमण्याचा

हिमशिखराच्या पर्वतराजीत एक मेघ होण्याचा

छंद मला सखे सोयरे गणगोतात रमण्याचा

मुखवट्यांच्या गर्दीत खरा एक हमदर्द निवडण्याचा

छंद मला मंदिरे, यात्रा, जत्रांतून देवदर्शन करण्याचा

दूर तिथे एकांतात मजला ‘तो’ नेमका दिसण्याचा

छंद मला गप्पा,गोष्टी अखंड बडबडत बसण्याचा

शांतपणे समजून घ्यावे अन् तूच सर्वस्व असण्याचा

  • डॉ. सौ. उज्ज्वला देवरे, मालेगाव, नाशिक