स्ट्रॅटेजी – स्टॅन्ली गोन्सालविस

स्ट्रॅटेजी

  •  स्टॅन्ली गोन्सालविस, वसई


          “मला चहा वगैरे काहीही नकोय रे, रॉबी. तू आपला दोस्त म्हणून हक्काने तुझ्याकडे आलोय ते तुमच्या फॅमिलीची मतं मागण्यासाठी !” विकी रॉबर्टचा हात हातात घेऊन घट्ट धरीत म्हणाला.

          “आमची मतं तुलाच रे. पण बस तरी. तू इलेक्शनला उभा आहेस म्हणजे सतत उभंच राहायला हवं असं काही नाही ना?” रॉबर्टने स्वतःच्या विनोदावर हसत विकीला विचारले.
          सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून बरेच उमेदवार रॉबर्टच्या घरी पाय धूळ झाडून गेले होते. विकी व रॉबर्ट हे वर्गमित्र. त्यांचा दोस्ताना अजून टिकून होता. विकास परेरा तसा स्वभावतःच धडपड्या वृत्तीचा. कोणत्याही धडपड्या माणसाप्रमाणे त्याची पाच-पंचवीस ठिकाणी ऊठबस होती. त्याची कनेक्शन्स बऱ्यापैकी असल्याने तो तसा कामाचा माणूस होता. त्यामुळे जो तो त्याला आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करीत असे.

          साहजिकच परिसरातील अनेक संस्थांवर त्याची सेक्रेटरी, संचालक, अमुकतमुक अशी वर्णी लागलेली होती. त्यात त्याची सुखाची सरकारी नोकरी असल्याने तो ‘सोशल वर्क’ वगैरे करायला मोकळा असायचा. त्यामुळे पंचक्रोशीतील कुठल्याही कार्यक्रमात ‘मान्यवर’ म्हणून त्याला आमंत्रण असायचे आणि मान्यवर म्हणून व्यासपीठावर स्थान असेल तरच तो अशा कार्यक्रमांना हजेरी लावायचा. केवळ श्रोता म्हणून सभागृहातील खुर्चीवर बसून टाळ्या कुटायच्या, असा वेळेचा अपव्यय करणे त्याला मान्य नव्हते.

          त्यात विकी अतिशय ‘फोटो कॉन्शस’ माणूस होता. दीप प्रज्वलनापासून हार-तुरे वगैरे प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी आपली छबी कॅमेऱ्याच्या फोकसमध्ये कशी येईल याची तो दक्षता घ्यायचा. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात दादा, अप्पा, नाना, भाऊ किंवा सेलिब्रिटींबरोबरच्या फोटोत तो दृश्यमान व्हायचा. शिवाय फेसबुक, व्हाट्सअप ग्रुपवरही ते टाकून  सर्वत्र व्हायरल करायचा. अशा पद्धतशीर सेल्फ मार्केटिंगमुळे विकीची इमेज भलतीच वधारली होती. त्या आधारे त्याने बँकेची पहिली टर्म सहज खिशात टाकली होती. आता तो दुसऱ्या टर्मसाठी उभा होता.
          तसे विकीचे गावकरी परंपरेने समाजवादी. त्या परंपरेला साजेसे त्यांच्यामध्ये तीन-चार गटही होते. प्रत्येक गट स्वतःला तत्वनिष्ठ समजत असल्यामुळे त्यांच्यात मतभेद उर्फ भांडणे अमाप आणि पर्यायाने रस्सीखेचही भरपूर. त्यात विकीची तरुण तडफदार ब्रिगेड व जॅकी डिमेलो उर्फ ड उर्फ दामले सरांचा जुना-जाणत्यांचा ग्रुप होता. कन्झ्युमर सोसायटी व खताच्या सोसायटीवर दामले सर गेली वीस वर्षे ठाण मांडून होते. सहकारी बँकेचे इलेक्शन लागले तेव्हा दामले सरांनी बँकेवर जायचे ठरवले. अनुभवी व बुजूर्ग म्हणून आपली तिथे आवश्यकता आहे असे त्यांना स्वतःलाच वाटत होते.

          ही कुणकुण विकीच्या कानावर गेली तेव्हा त्याने आपल्या युथ ब्रिगेडकरवी पक्ष श्रेष्ठींवर इतके प्रेशर आणले की दामले सरांना डावलून विकीला उमेदवारी देण्यात आली. २५ लाखांच्या मरतुकड्या सोसायटीपेक्षा ५००० कोटींची उलाढाल असलेली बँक विकीला खुणावत होती. पक्षाच्या मीटिंगमध्ये त्याने अगदी छातीवर हात ठेवून आश्वासन दिले, “मला एकदाच संधी द्या. पुढची टर्म तुम्हांला!”

          सत्तरीकडे झुकलेले दामले सर नाराज झाले. आपली नाराजी त्यांनी उघड केली नाही. मात्र काँग्रेसवाल्या जॉनच्या पारड्यात आपले वजन टाकले तर विकीला कसे पाडता येईल याचा ते मनातून विचार करू लागले. एकदा खुर्चीवर बसलेला कोणीही खेचल्याशिवाय पायउतार व्हायचे नाव घेत नाही, हे त्यांना पक्के ठाऊक होते. पुढच्या टर्मचे आश्वासन पाच वर्षात हवेत विरून जाईल, हे ते समजून होते.

          ‘आपली बँक’ ही तशी जिल्ह्यातील अग्रणी वगैरे बँक. हजारो कोटींचा व्यवसाय. त्यामुळे साहजिकच (ज्याची त्याची) कमाई सुद्धा बऱ्यापैकी होती. बँकेच्या बरोबरीने काही उद्यमशील संचालकांचीसुद्धा अर्थप्रगती होत होती. दामले सर हे पाहत होते. खताच्या सोसायटीच्या चेअरमनला कोणी झेंडावंदनालाही बोलावीत नसत. बँकेच्या चेअरमनची, संचालकांची काय ती प्रत्येक कार्यक्रमात बडदास्त राखली जाते! हार-तुरे, भाषणं, ग्लॅमर आहे ते तिकडे… त्यामुळे  जन्मा यावे तर एकदा तरी संचालकपद भूषवावे, जमल्यास वर्षभरासाठी तरी चेअरमनपद मिळवावे. पण विकीने बाजी मारली होती. पार्टी बदलून तो व्हाईस चेअरमनही झाला. आता पुढील टर्मसाठी मतांचा जोगवा मागत दारोदारी फिरत होता.

          “बस रे विकी घडीभर… डायरेक्टर झाल्यावर तुला कुठे कोणाच्या घरी जायला वेळ मिळणार आहे? तुम्ही लोक एकत्र मीटिंगमध्ये नाहीतर कुठल्यातरी स्टेजवर… आपली भेट पाच वर्षांनी! हा! हा! हा!!”

          विकी वरमला. तो सोफ्यावर बसत म्हणाला, “होय  रे! वेळच मिळत नाही बघ. त्यात मी आपल्या गावकीत सेक्रेटरी, चर्चमध्ये सेवक नेता, सोसायटी आहेच. त्यात कुठे घरादारांच्या वाटण्या, नवरा-बायकोची भांडणं सोडवणं, कोणाची स्ट्रीट लाईट लागत नाही, कुठे गटार तुंबलं आहे, रेशन कार्डांची कामं… लोक काय काय कामं घेऊन येतात सांगू? पण करतो आम्ही जमेल तितकं. बोर्डाच्या मीटिंग तर काय बोलूच नको. आठ-आठ तास चालतात! काय ते प्रस्ताव, त्यावरची न संपणारी चर्चा… जाऊ दे! तुला कंटाळा येईल.”

          “पण विकी, हेच ऐकून आहे मी बरं का… तुम्हाला तिथे काही बोलू देतात का रे? किंवा तुमचे काही ऐकते का ती ‘डी’ गॅंग? तुमच्यात म्हणे दोन-तीन गट आहेत? त्यात त्या पोटल्या सीईओची मुजोरी… तो तर…”

          “रॉबी!” विकी त्याला मध्येच तोडीत  म्हणाला,”हे सर्व तू ते व्हाट्सअप मेसेज वाचून बोलतोय! तसं काहीही नाही रे! मी तोंडावर बोलणारा माणूस आहे, ठाऊक आहे ना तुला? आपलं  कोणाला देणं देणं नाही की कोणाचं घेणं नाही. आपण सत्याची बाजू घेतो!”

          “सत्य? असेल तसं, तू सांगतोस तर! आम्ही भागधारक, बोर्डातलं आतलं आम्हांला काय कळतं? एकदा मत दिलं की संपलं आमचं काम… काय त्याला म्हणतात, पवित्र कर्तव्य! मग  येजीएम मध्ये येऊन खाऊची पुडी घेऊन सटकायचं… झालं! हा! हा!! हा!!!” रॉबी पुन्हा जोरजोरात हसत म्हणाला.

          “हसण्यावारी नेऊ नकोस, रॉबी! सीरियस जॉब आहे हा. जबाबदारी असते. आपल्या क्रेडिट सोसायटीत काय चाललंय बघतोस ना? बुडीत कर्जाची रक्कम डायरेक्टरांकडून वसुलीच्या कोर्ट नोटिसा आल्या आहेत! नुस्त्या सह्या ठोकल्या, झाला ठराव पास, असं नसतं काही.”

          “होय रे. तुझ्यासारखे खमके लोक आहेत म्हणून आपली बँक व्यवस्थित चालू आहे हे खरं. आजूबाजूला पाहतो रे आम्ही, आजकाल जो तो टक्केवारीच्या हिशोबात खिसे भरायच्या मागे लागलेला. बुडू देत बँक नाहीतर डुबू देत खातेदार. सरकार आणि सहकारातही ‘लाभार्थींची’ संख्या तेवढी वाढत चालली आहे. सर्वत्र घोटाळे आणि स्कॅम्स. विश्वासच उरला नाही कोणत्या बँकेवर की पतसंस्थेवर… काय काय येतं रे ग्रुपवर!”

          “सगळेच नसतात रे तसे. कामं करणारी प्रामाणिक माणसं खूप आहेत. हे बघ, आपली लगान आपल्या कामाशी. हार-तुरे पडतात आमच्या गळ्यात, पण मागाहून चिखलफेकही होते. बोलणारे बोलतात. मी कोणाचं बोलणं मनावर नाही घेत. सोशल फील्डमध्ये असं ऐकून घ्यायची तयारी ठेवावीच लागते.” विकी परेरा फारच गंभीर झाला होता. 

          “गंमत केली रे, सोडून दे ते.” रॉबी सावरून घेत म्हणाला, “अरे, लोकांना कळतं बरं का, कोण काम करतो आणि कोण नुसता होयबा बनून मीटिंग भत्ते उकळतो ते. टक्के घेणारे माहीत आहेत, तसेच काम करणारेही माहीत आहेत.”

          “हो! पण त्यामुळे सारेच बँकवाले बदनाम होतात. तुझ्यासारखे समजदार लोक थोडे आहेत. बाकी सारे गावभरची घाण हुंगणारे, अरे, माहिती करून घ्या ना, की आलं व्हाट्अॅपवर करा फॉरवर्ड, तिथे बोर्डात बसल्यावरच कळतं xxx काय जळतं ते!” विकी उद्वेगाने म्हणाला.

          “खरंच रे, आम्हांला काहीही कळत नाही, मला ना तुमचा तो एनपीए आकळत नाही की तुमची ती आकड्यांची करामत, काय म्हणतात त्याला? ताळेबंद! आमच्या मंद टाळक्यात काहीच शिरत नाही! मी तर तुमच्या अहवालातील ते कोट-टायवाले रंगीत फोटो व डिव्हिडंड किती देणार आहेत तितकच पाहतो. झालं अहवाल वाचन!” रॉबर्ट पुन्हा जोरात हसत म्हणाला. इतक्यात काहीतरी आठवून तो म्हणाला,”अरेच्चा! मी तुला चहाचं बोललो आणि विसरूनच गेलो बोलता बोलता” मग किचनकडे पाहत त्याने आवाज दिला,”रिटाss बाहेर तर ये! कोण पाहुणे आलेत बघ!”
          “अय्याss विकी भाऊजी! अहो, रोजच्या ह्यांच्या बँकेच्या चर्चा चालू. तेच दळण रोजचं. मी बाहेरच नाही येत. भाऊजींना काही चहापाणी?” तिने रॉबर्टकडे पाहत विचारले. “अग विचारतेस काय? सवय आहे त्याला चहापाण्याची. आणि तू…” विकीने चमकून रॉबर्टकडे पाहिले. तो पाठमोरा होऊन टीपॉय समोर ओढीत  होता. मग तो विक्रीच्या समोरच्या सोफ्यावर बसत म्हणाला,”विकी, तू आपला फ्रेंड म्हणून विचारतो, डोन्ट मिसअंडरस्टॅंड मी, तू ‘त्या’ मंडळींमध्ये कसा गेलास रे?” त्याने उत्तर दिशेकडे बोट दाखवत प्रश्न केला.

          बँकेची मागची निवडणूक अटीतटीची झाली होती. दोन्ही पॅनलमधून समसमान उमेदवार निवडून आले होते. विकीला गळाला लावण्यासाठी बडी धेंडं भेटायला येऊ लागली. कुठून कुठून त्याला फोन येऊ लागले. विकीने आपली मूठ उघड केली नाही. तो डोळे उघडे ठेवून व सगळीकडे कान लावून होता. अनेक प्रपोजल आली. व्हाईस चेअरमनपदाची ऑफर आली तेव्हा त्याने थम्स अप केले. झाले! प्रगती पॅनलचा विकी विकास पॅनलला जाऊन मिळाला! डिसोझा चेअरमन, विकी व्हाईस चेअरमन! विकी गाईच्या चिन्हावर निवडून आला होता, आता तो ‘तुतारी’ वाल्यांची पुंगी वाजू लागला.

          विकीला रॉबर्टच्या प्रश्नाचा रोख समजला. तो मुरलेल्या राजकारण्याचा आव आणत मोठ्या मानभावीपणे म्हणाला, “खरं सांगू? माझी तिथे घुसमट होत होती. ‘प्रगती’ चा तो आलेक्स स्वतःला जणू किंग समजतो. असेल तो मोठा बिल्डर… अरे, कालचा पोरगा… त्या  झ्याटूपुढे आम्ही नंदीबैलासारखी मान डोलवायची का? तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर मी ह्यांना साथ दिली आहे. पुढेमागे चेअरमनपदाचे चान्सेस आहेत. आम्हां समविचारी मंडळींचे गटबंधन आहे हे. ह्यात राजकारण काहीच नाही.”

          “भारीच रे! तुमच्या ‘गट’ बाजीचा अर्थ मला कळत नाही. लोक वार्ता काढतात ना जेवणावळीवर, फ्युनरलच्यावेळी. आम्ही ह्याला निवडून दिले कोणासाठी आणि हा आता गेला कुणीकडे” रॉबर्ट पुन्हा उत्तरेकडे बोट दाखवत म्हणाला.

          “बस् का रॉबी! अरे, ती मंडळी तेवढी वाईट आणि आपली माणसं, काय म्हणतात ना आजकाल, तशी त्या वॉशिंग मशीनमधून धुऊन काढलेली वाटतात का तुम्हाला? अरे, चांगल्या कामाचा सत्यानाश करणारी मंडळी आमच्या बोर्डात आहेत! विश्वास बसणार नाही तुझा, एकेकाचे कारनामे आम्ही सांगितले तर… जाऊ दे! आपल्या तोंडात कशाला ती घाण? ज्याचं त्याला, काय? आपलं उद्दिष्ट एकच – प्रगतीचा प्रकाश पसरला पाहिजे. विकास झाला पाहिजे.”

          “अं?  विकास? कोणाचा रे?”

          “अर्थातच, बँकेचा!” विकी घाईघाईत म्हणाला, “तुला एक उदाहरण सांगतो. मागे एक बऱ्यापैकी लोन प्रपोजल आलं होतं… 30 कोटींचं! या मंदीच्या काळात एक तर कर्जांना उठाव नाही, त्यात ठेवी वाढतायत. बोर्डापुढे प्रस्ताव आला तर समाजवाद्यांनी चक्क विरोध केला! कर्जे गेली तर तरच कमाई आहे ना रे?”

          “होय  रे बऱ्यापैकी कमाई बुडाली म्हणायची!” रॉबर्ट गंभीर मुद्रेने तिरकस स्वरात म्हणाला.

          “तेव्हा पार्टीने सुधारित प्रपोजल दिले… 20 कोटींचे. पुन्हा तेच!”

          “अरे, पण काही कारणं नमूद केली असतील ना त्यामागे?”

          “तांत्रिक कारणं  रे! म्हणे मशिनरी सेकंड हॅन्ड आहे. कर्जदाराचा मागील रेकॉर्ड चांगला नाही, वगैरे वगैरे. खुसपटं काढायची तरी किती? त्यामुळे आमच्या पॅनेलला यावेळी फुल्ल मेजॉरीटीने निवडून यायला हवं…”

          “अहो, हे काय? कधीकाळी भावजी आले आहेत तर तुमची आपली नेहमीची बडबड चाललेली आहे!” रिटा चहाचा ट्रे घेऊन आली होती. मग ती विकीकडे वळून म्हणाली, “अहो, रोज घरात पण यांचं हेच… प्रवचन चालूच… किस पडतील नुसता!”

          “रिटा, मी किस पाडतो, पण घेत नाही ना?” रॉबर्ट ओठांचा चंबू करीत तिला डिवचत म्हणाला. “गप्प बसा हो! काहीतरीच पांचट विनोद करताय!” रिटा लाजून उद्गारली.

          “बघा वहिनी”, विकी हसत म्हणाला. “बँकेचा विकास व्हावा, पर्यायाने समाजाची उन्नती व्हावी म्हणून मी धडपडतोय  तर हा रॉबी मला सारखे चिमटे काढतोय! समजतं रे  मला तुझं बोलणं…”

          “तुम्ही चहा घ्या, भाऊजी. यांना सवयच आहे…”

          “काय हा तुम्हालासुद्धा चिमटे काढतो? ती किस काय, चिमटे काय! अजून रोमान्स टिकवून आहात रे तुम्ही!” विकी हसत म्हणाला. रिटा  चिक्कार लाजली. ती आत पळाली.

          “रॉबी, आज आम्ही बँकेसाठी रक्ताचे पाणी करतोय, पण अपोजिटवाले काय काय छापून आणतात. थेट आरबीआयपर्यंत तक्रारी? पण प्रोग्रेस आहेच ना? दिसतो तो आकड्यांत… १५% डिव्हीडंड देतोय यंदा! आहेस कुठे! एनपीए पण आटोक्यात आहे. केळी खाऊन नाही येत तो.” विकी केळ्यांचे वेफर्स तोंडात टाकीत म्हणाला.

          “खाणारे खातात. ज्याला पचेल ते. पण कर्माचं फळ मिळतंच बघ. ज्याला त्याला बरं-वाईट. मी ओळखतो ना तुला! माझे मत तुलाच विकी! घे चहा.” रॉबर्टने आपला कप उचलला.

          “होय ना? मला खात्री होतीच. तू आपला माणूस म्हणून सांगतोय, कुठे बोलू नकोस. यावेळी आपल्या पॅनलला फुल मेजॉरिटी मिळणारच! आम्ही फील्डिंगच तशी लावली आहे…”

          “फिल्डिंग? म्हणजे मॅचबिच घेणार काय? फ्रेंडली!” रॉबर्ट खोचकपणे म्हणाला.
          “चेष्टा नको… ऐक तर,” विकी पुढे वाकून समजावून सांगू लागला, “या वेळची आमची स्ट्रॅटेजीच अशी आहे की समाजवाद्यांमध्ये फूट पाडायची. सोप्पय  ते. आधीच त्यांच्यात पन्नास गट. दोघा-तिघा नाराजांना पटवायचं. म्हणजे त्यांचे एकापेक्षा अधिक उमेदवार उभे राहतील. डमी रे! त्यांचीच मत खाण्यासाठी! त्यांच्यातील तो बंडखोर विकेश? त्याला नंतर तज्ञ संचालक म्हणून आॉप्ट करायची ऑफर दिली आहे आम्ही.”
          “विकेश? तो तज्ञ संचालक? काय त्याची पात्रता?” रॉबर्ट खो-खो हसत म्हणाला. “अरे, तो तर साधा बँक कारकून होता आणि आता त्याचा वराह मांस विक्रीचा धंदा आहे ना?”

          “तो आणि त्याचा खासगी व्यवसाय. आपल्याला त्याच्याशी देणंघेणं नाही. एसबीआय मध्ये थर्टी इयर्स सर्विस केली आहे त्याने.” “पण मी ऐकलंय की एका फ्रॉडकेसमध्ये त्याला सस्पेंड केलं होत, काही काळासाठी.”

          “विरोधकांची कारस्थानं रे! निर्दोष सुटला तो. पास्ट इज ओवर नाऊ.” त्याला क्लीन चीट देत  विकी पुढे सांगू लागला, “तर तो माझ्या शब्दाबाहेर नाही. हाताचा पंजा? काँग्रेसचा ऑल्विन आमच्याच  हातात आहे. त्याला एडलीन मॅडमच्या घड्याळाचे काटे कसे उलटे फिरवायचे तेही आम्ही निश्चित केले आहे. बाकी इंडिपेंडेंट उमेदवार तळ्यात-मळ्यात. त्यांना कसे खेचायचे ते आम्हांला ठाऊक आहे. हेरून ठेवली आहे सगळी माणसं. करतील ते बरोबर मॅनेज.” विकी मोठ्या खुशीत येऊन सांगत होता.

          इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवरील नंबर पाहून विकी उठला व खिडकीजवळ जाऊन बोलू लागला. “निघालोच रे जॉनी. तू त्या किसनला भेटलास का? काय? ताणून धरतोय अजून! दिसतो बावळट पण पक्का पोहोचलेला आहे तो. पण पटण्यासारखा आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ना ? मालामाल करून टाकू त्याला. कसंही करून मासा गळाला लागला पाहिजे. आलोच मी पाच मिनिटांत…”

          विकी मान डोलवत सोफ्यावर येऊन बसला. फोनमधील मेसेज तपासू लागला. त्याचं संभाषण ऐकून रॉबर्ट अवाक् झाला होता. तो हातातील चहाचा कप खाली ठेवत म्हणाला, “विकी, अरे हे राजकारण्यांचे खेळ. ते आपल्याला खेळवतात आणि कमावतात. पण लोकांनी जिथे विश्वासाने आपली कष्टाची कमाई ठेवली आहे त्या सहकारी बँकेत कशाला रे ही नाटकं? याला स्ट्रॅटेजी म्हणतात? की  सत्तेसाठी चाललेला मनी पॉवरचा गेम? तुमचा होईल रे खेळ, पण गरीब नोकरदार खातेदारांचं काय? बड्या कर्जदारांची कर्जे तुम्ही काय  ती निर्लेखित करता आणि दोन-चार लाखांसाठी गरिबांच्या घरावर टाच आणता! आरबीआयच्या एका आदेशसरशी टाळं लागेल बँकेला. गेल्या आमच्या एफडी मग गाढवाच्या xxx! वाटोळं होईल ह्या तुमच्या साठेमारीने बँकेचं. कसला आलाय ह्यात विकास? स्ट्रॅटेजीच्या नावाखाली कसलं फोडाफोडीचं राजकारण खेळताय  तुम्ही? तुम्हांला नाचवणारे तुमचे ते सूत्रधार आणि त्यांचे उद्योगधंदे. लावतील बँकेला देशोधडीला! ही आपली बँक यापुढे आपली राहील याची खात्री वाटत नाहीय  मला…”

          रॉबर्टने केलेली प्रश्नांची सरबत्ती ऐकून विकी एकदम गार पडला. तो आवाज खाली आणून म्हणाला, “तुझा काहीतरी गैरसमज होतोय रॉबी…” तो अस्वस्थ होत उभा राहिला. हातावरील घड्याळात पाहत म्हणाला, “मला महत्त्वाची मीटिंग आहे आता. उशीर होईल. भेटू पुन्हा आपण. त्या वेळी सविस्तर बोलूया. पण आपली निशाणी लक्षात ठेव. तुतारी!” तो हाताची मूठ वर नेत म्हणाला.

          “होय रे, इलेक्शनचे ढोल-ताशे वाजायला लागले ना. आता सगळीकडे असंच व  हेच असणार आहे.” रॉबर्ट उजव्या हाताचा अंगठा तोंडाकडे नेत प्याल्याचा अभिनय करीत म्हणाला.