माझे आजोबा
- मुक्ता अशोक टिळक, नाशिक
ॲडवोकेट देवदत्त नारायण टिळक
ख्यातनाम साहित्यिक आणि विधिज्ञ… दे.ना.टिळक, नाशिक – (१६:७:१८९१ – २७:१२:१९६५)
माझे प्रिय आजोबा देवदत्त नारायण टिळक हे रेव्हरंड नारायण वामन आणि लक्ष्मीबाई टिळक या सुप्रसिद्ध आणि महान दंपतीचे सुपुत्र. इतका मौल्यवान वारसा असल्यामुळे त्यांना आपोआपच प्रसिद्धी मिळाली असे म्हणणे साफ चूक आहे. दत्तोपंतांचे व्यक्तिमत्त्व अगदी त्यांचे, त्यांचेच आहे! १० फेब्रुवारी १८९५ रोजी पणजोबा, नारायण वामन टिळक यांनी मुंबईला बाप्तिस्मा घेतला तोपर्यंत हे कुटुंब वणी, राजनांदगाव, नागपूर वगैरे ठिकाणी राहत होते.
वडिलांचा सहवास दत्तूला साडेतीन वर्षे मिळाला. पणजोबांच्या धर्मांतरानंतर होत्याचे नव्हते झाले जणू. दत्तूच्या अंगी कसा कोण जाणे कमालीचा समजूतदारपणा आणि स्वाभिमान आला. पणजी-लक्ष्मीबाई दत्तूसह आपल्या भावाच्या घरी गेल्या. पतीच्या ख्रिस्ती होण्याच्या धक्क्याने त्या भ्रमिष्टासारख्या झाल्या. फार कठीण परिस्थिती होती ती. दत्तूला खेळता-खेळता मामेभावंडे ‘दत्तूकडे शेत, घर, बैल काहीच नाही म्हणून चिडवीत. एके दिवशी दत्तू उत्तरला, “ही पाटी माझे शेत, ही पेन्सिल माझा नांगर, ही बोटे माझे बैल आणि ही अक्षरे माझे दाणे आहेत.”
हे विखुरलेले कुटुंब काही वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. वडिलांचे प्रेम, सहवास दत्तूला मिळू लागले. व्यायाम, जादूचे खेळ, चित्रकला, अभ्यास, पशुपक्षी आणि झाडांबद्दल प्रेमभाव, बालबोधमेव्यासाठी छोटेखानी कविता लेखन ही त्याची आवड होती. माझ्या आजोबांना लहानपणापासून सायकलचे वेड होते ते अगदी वयाच्या सत्तरीपर्यंत. ‘Cycling is my second nature.’ असे ते म्हणत. आजोबांचे शारीरिक सामर्थ्य अचाट होते. एका हाताच्या मुठीत दोन अक्रोड काय, नी एका बुक्कीने नारळ काय, ते अगदी सहज फोडीत असत. जड सामानाने भरलेली कपाटे सरकविणे-उचलणे आणि महाबळेश्वरचे अंगावर येणारे उभे चढ सायकलीने सर करणे हे त्यांचे अगदी सोपे काम असे. त्यांच्या मनगटावर घड्याळ कधीही चालत नसे, बंदच पडे!
आपल्या ताकदीचे कारण त्यांनी सांगितले, “मला मांसाहार वर्ज्य आहे. स्वच्छता, कारुण्य आणि प्रकृतीस्वास्थ्य म्हणून शुद्ध शाकाहार. फोडण्या-मसाले नसलेला!” फळे-दूध ही त्यांची आवड. मद्याप्रमाणे ते तंबाखूचेही द्वेष्टे होते. पान-सुपारी-तपकीर यांचेही. चहा-कॉफीला तर वयाच्या वीस-पंचवीस वर्षापर्यंत त्यांनी स्पर्शही केला नव्हता. निर्व्यसनीपणा, नियमितपणा हे त्यांच्या सुदृढ प्रकृतीचे कारण होते. तसेच त्यांच्या मानसिक सामर्थ्यालाही तोड नव्हती. आई लक्ष्मीबाई आणि कालांतराने पत्नी रुथबाई अकाली देवाघरी गेल्या. त्याप्रसंगी हळव्या वृत्तीचे आजोबा कमालीचे शांत होते. अप्पा, म्हणजे माझे वडील एक आठवण सांगत, ‘एकदा बाबांनी घरात शिरलेला भला मोठा साप झुरळासारखा उचलून बाहेर फेकून दिला होता!’ भीती त्यांना माहितीच नव्हती. त्यांचा देवावर दृढ विश्वास आणि प्रार्थनेवर भाव होता. प्रार्थना ठराविक वेळेला, गाजावाजा करून केलेली बडबड त्यांना मान्य नसे. त्यांना अशी प्रार्थना येतही नसे.
‘सोडीन जितुक्या श्वासाते l
तितुक्या वेळा स्तुती अर्पितो l
मानुन घे ती ते ll ‘
असे त्यांचे जीवन प्रार्थनामय होते. ते कट्टर ख्रिस्ती होते. आपल्या धर्माबद्दल त्यांना अभिमान आणि परधर्माबद्दल सहिष्णुता वाटत असे. प्रभु ख्रिस्ताविषयी ते म्हणतात “गदरेकरांच्या देशातला वेडा, जक्कय जकातदार, विहिरीवर भेटलेली शोमरोनी स्त्री, ख्रिस्ताच्या पायाला अत्तर लावून केसांनी ते पुसणारी पापिणी ही सर्व उदाहरणे ‘त्याच्या’ हृदयाला स्पर्श करू शकली याची आहेत. ‘त्याचा’ निषेध करणाऱ्यांची किंवा त्यांच्यातील दोष चिवडीत बसणाऱ्या कावळ्यांची भूमिका ‘त्याने’ घेतली नव्हती.”
आजोबांची परमपित्यावर पराकोटीची श्रद्धा होती. ते आपला भार परमेश्वरावर टाकीत आणि खरोखर परमेश्वर त्यांना कधीही कमी पडू देत नसे. त्यांची निकडीची गरज अकस्मात भागत असे. ‘आयुष्यातल्या घटना, त्या पिता परमेश्वराच्या प्रेरणेने, अनुज्ञेने घडतात. आपण आपला भाग चोखपणे उचलला पाहिजे’ या वृत्तीने त्यांच्या मनात अथांग शांती असे.
१८९९ मध्ये पणजीबाई पणजोबांकडे परतल्या. तेव्हापासून त्या आणि दत्तू घरी रोज सकाळ संध्याकाळ होणाऱ्या प्रार्थना, पवित्र शास्त्र वाचन- पणजोबांचे विवेचन, भजने यासाठी नियमित हजर असत. दत्तू दर रविवारी वडिलांबरोबर चर्चमध्ये जाई. पणजीबाईंना प्रार्थना आवडू लागली. ‘आपल्या हृदयस्थ परमेश्वराशी बोलणे’ हा अनुभव फार आल्हाददायक आहे हे त्यांना समजले. बायबलचीही त्यांना हळूहळू ओळख होऊ लागली. आणि रविवार दिनांक ८ जुलै १९०२ रोजी राहुरी येथे उभयता माय-लेकरांनी बाप्तिस्मा घेतला. सात आठ वर्षाच्या दत्तूच्या मनात घरातील या वातावरणामुळे ही धर्मसहिष्णुता रुजून वाढत गेली असावी. नेहमी त्यांचे स्नेही सर्व प्रकारच्या स्वभावधर्माचे होते. ह. भ. प. लक्ष्मणबुवा पांगारकर, खासदार भाऊराव गायकवाड, केशव सिताराम म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, रावसाहेब पिंगळे, प्रिं.भा.ल. पाटणकर, सोपानदेव चौधरी, देवराम भाऊ वाघ, बनेमिया शेख वगैरे.
आजोबा धर्म-जातीभेदाचे कट्टर विरोधक होते त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला होता, हिंदी संस्कृतीचा नाही. भारताबद्दल त्यांना जाज्वल्य अभिमान होता. त्यांचे स्वदेश प्रेम अवर्णनीय होते. पहिल्या महायुद्धात ‘आपल्या तरुणांनी सैन्यात भरती व्हावे’ असे पुढाऱ्यांनी प्रसिद्ध करताच त्यांनी आपले नाव सैनिक म्हणून नोंदविले होते. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना विद्यार्थ्यांना बायबल शिकविण्याची कामगिरी नागपूरच्या प्रिन्सिपल साहेबांनी त्यांच्यावर सोपविली होती. कित्येकदा ते चर्चमध्ये उपदेश करीत. या बरोबर त्यांचे ख्रिस्ती समाजात कार्य-सेवा सुरूच असे. नंतरच्या काळात उपासना संगीत संपादन, ट्रॅक्ट सोसायटी, मराठी बायबल रिविजन, अमेरिकन मराठी मिशनची लिटरेचर कमिटी अशा अनेक कमिटीतून त्यांनी कामे केली.
अनेक सदस्यांचे ते ‘फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड’ होते. वेळोवेळी ते त्यांना स्नेह, प्रेम देऊन साहाय्य करीत. यांच्या ख्रिस्ती समाज विषयक लिखाणात तीव्र जाणीव, सेतुबंधन, कृष्णा, पाऊल वाट, ठिणग्या ही पुस्तके ख्रिस्ती कौटुंबिक जीवनाचे चित्रण करणारी आहेत. तसेच तीन प्रकाशझोत आणि ‘बायबलची तोंडओळख’ हे बायबल विषयी सर्वांगीण माहिती देणारे पुस्तक आहे. मुंबई-पुणे रेडिओ, केसरी, सकाळ, बातमीदार, लोकसत्ता, गावकरी या वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे उत्तम अभिप्राय प्रसिद्ध केले जात. या सर्व पुस्तकांचे शिखर म्हणजे ‘महाराष्ट्राची तेजस्विनी पंडिता रमाबाई.’ एका कैसर-ए-हिंद ने दुसऱ्या कैसर-ए-हिंद चे लिहिलेले हे चरित्र आहे. रमाबाई मेधावी यांचे चरित्र आजोबांनी अपार कष्ट घेऊन लिहिले. १९६० साली ते प्रसिद्ध झाले, सहा महिन्यातच महाराष्ट्र शासनाचे एक हजार रुपयाचे अनुदान त्याला मिळाले. उत्तम सुबोध भाषा, समतोल भाव, इतिहासाचे सत्य कथन, रसाळ भाषाशैली आणि विवेचन पद्धती, मनोरंजन आणि कुतूहल वाढविणारे मथळे, बोलकी छायाचित्रे हे सारे उल्लेखनीय. या कर्तबगार समाज सेविकेचे विस्तृत चरित्र आजोबांनी अनेक संदर्भांसह परिश्रमपूर्वक लिहिले.
कवी सोपानदेव चौधरी म्हणतात, “हा ग्रंथ लिहिताना यातील प्रकरणांचे टंकलेखन करताना भाऊंनी अक्षरश: रात्रीचे दिवस केले. त्यांच्या पुढ्यातला कामाचा ढिगारा पाहून मी तर हबकून जात असे. एकदा त्यांना सहज म्हणालो, ‘भाऊ, अशाने तुम्ही आजारी पडाल.’ त्यावर हसत हसत भाऊ म्हणाले, ‘माझ्या आवडीचे आणि जिव्हाळ्याचे हे काम मला लाभले आहे, लाभलेल्या कामाने माणूस आजारी पडत नाही. लादलेल्या कामाने माणूस आजारी पडू शकतो.’ खरे पाहिले तर लाभलेले असो किंवा लादलेले असो दोन्ही कामे भाऊ हसत हसत उरकून टाकतात.”
गोखले आजोबा म्हणतात, “लक्ष्मी व सरस्वती सख्ख्या बहिणी असल्या तरी त्यांचे आपसात कधी पटत नाही असे म्हणतात. पण या ग्रंथाच्या बाबतीत या बहिणींचे सत्य भाऊंना सहाय्य करण्यात दिसून येते. पुस्तकाला खर्च झालेली अवाढव्य रक्कम लक्ष्मीने जवळजवळ त्यांच्या पुढ्यात आणून टाकली. मराठी वाङ्मयाचा हा एक अनमोल ठेवा आहे.”
‘स्मृतिचित्रे’ तीन भाग संपूर्ण आणि चौथ्या भागाची अकरा प्रकरणे पणजीबाईंनी लिहिली आहेत. चौथ्या भागाची पुढची पाच प्रकरणे आजोबांनी लिहून स्मृतिचित्रे पूर्ण केले. पणजोबांनी ख्रिस्तचरित्राचे ‘ख्रिस्तायन’ हे खंडकाव्य लिहायला घेतले. ११ अध्यायातील काही ओव्या झाल्यानंतर काम थांबले. त्याच्या पुढच्या ओव्या पणजीबाईंनी लिहिल्या आहेत. सत्तराव्या वर्षी काहीही लेखन न करता, तहान भूक विसरून पणजीबाईंनी ६४ अध्याय लिहिले. ‘ख्रिस्ताचे पुनरूत्थान’ हा तो शेवटचा अध्याय. त्यानंतर आजोबांनी ‘प्रभूदर्शन’ हा ७६वा अध्याय लिहून ‘लक्ष्मीनारायणाचे ख्रिस्तायन’ पूर्ण केले. या खंडकाव्याचा उल्लेख कवी गिरीश यांनी ‘टिळकत्रयींच्या रस वाहिनीचा त्रिवेणी संगम’ असा केला आहे.
पणजोबांची राहून गेलेली सारी कामे आजोबांनी पूर्ण केली. ख्रिस्तानुवर्तनाची दोन प्रकरणे भाषांतरित केली. अभंगांजली मध्ये १११ अभंगांची भर घातली. उपासना संगीताची १८ वी आवृत्ती, मराठी बायबल रिविजनचे काम पूर्ण केले. नवीन इसापनीती आणि मराठीत प्रचारात असलेल्या संस्कृत म्हणींचे पुस्तक ही पूर्णत्वास नेले. आणि मातृ-पितृ ऋण फेडून कर्तव्य पार पाडले.
‘नारायण वामन टिळक – व्यक्तिदर्शन व काव्यविवेचन’ या आजोबांच्या ग्रंथाविषयी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “भाऊसाहेब, बहार केलीत बुवा! आपल्या दिवंगत संत पित्याची इतकी कोरीव-रेखीव मूर्ती घडविणारा शिल्पकार सुपुत्र ही सुद्धा महाराष्ट्रातील एक अभिनंदनीय घटनाच म्हटली पाहिजे. अशा कामाला जातीचे तर लागतेच पण जिव्हाळ्याचेही लागते.”
ज्ञानोदय आणि बालबोधमेव्याचे आजोबांचे काम सर्वश्रुत आहे. त्यांना मुलांच्या स्वभावाची उत्तम जाण होती. मुलांच्या भाषेत, त्यांना अनुरूप, रुचेल, आवडेल असेच ते लिहीत. वेणू वेडगावात – म्हणजे ऍलिस इन वंडरलॅंड, बाबूबाळाचा ग्रंथराज, बोधसुधा, आपले मुके मित्र, विनोद मूर्तींची पुण्यावर स्वारी आणि जातक कथा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठरली.
आजोबा नेहमी नव्या-जुन्या लिहिणाऱ्यांना प्रोत्साहन आणि संधी देत. तात्यासाहेब शिरवाडकर म्हणतात, ‘श्री. दे.ना. टिळक आणि त्यांचा बालबोधमेवा यांना माझ्या वाङ्मयीन जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचे ऋण अविस्मरणीय आहे. देवदत्तांचे प्रोत्साहन मला न मागता मिळाले. यांनी मला आपल्या घरी बोलावले. माझी फारशी प्रशंसा किंवा चौकशीही केली नाही. माझ्या लेखणी वरील विश्वास त्यांनी अन्य मार्गांनी व्यक्त केला. पुढे हा संपादक-लेखक संबंध दृढ झाला त्यांच्या बाजूने प्रेमाचा-वात्सल्याचा आणि माझ्या बाजूने आदराचा-तीर्थरूप भावनेचा.’ असाच अनुभव कवी कृ. ब. निकुंब यांनाही आला.
Y.M.C.A. चे सेक्रेटरी असताना आजोबांनी सोशल अपलिफ्ट हे केंद्र सुरू केले. नाशिकमध्ये आरोग्य मंडळ, वाङ्मय मंडळ, डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड या संस्थेत त्यांनी जीव ओतून कामे केली. जीवदया संस्थेचा जनावरांचा दवाखाना आणि रिमांड होम ही त्यांची संस्मरणीय कामे. ते पोलिस प्रॉसिक्युटर होते. मुलांसाठी विशेष कायदा आणि बाल गुन्हेगारांसाठी वेगळी न्यायालये नुकतीच स्थापन होत होती, त्याच्या पहिल्या पायऱ्या रचण्याचे काम आजोबांनी केले. बालगुन्हेगार सोडला की प्रोबेशन साठी आजोबांकडे येई. अशा अनेकांना त्यांनी आपल्या घरी ठेवून घेतले, त्यांना शिकवून शिस्त लावली, नोकरीला लावले, संसार सुद्धा थाटून दिले.
कुष्ठरोगी वसाहत-पुनर्वसन यासाठी विशेष सहकार्य केले. नाशिक नगरपालिकेचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते. त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली नगरपालिकेची इमारत आजही मेनरोडवर दिमाखात उभी आहे. शांत, सुस्वभावी, समतोल वृत्तीचे, सहकाऱ्यांसह हसत-खेळत काम करणारे म्हणून ओळखले जात. सत्यप्रियता, बुद्धिनिष्ठ कष्टाळूपणा, कायिक-वाचिक, आणि मानसिक मेहनत करण्याची तयारी, नि:स्वार्थ बुद्धीने कार्य करण्याची हौस हे त्यांचे स्थायीभाव होते.
गांधीजींचा बारडोलीचा सत्याग्रह सुरू होण्यापूर्वी आजोबा बापूंना भेटायला बारडोलीला गेले. दोन-अडीच तासांची भेट. बारडोलीतच आजोबांनी खादीची धोतरे विकत घेतली. तेव्हापासून त्यांचे अर्धेअधिक कपडे खादीचे असत.
बडोद्याला सहविचारिणी सभेमध्ये आजोबांचा सत्कार झाला. तेव्हापासून चि. वि. जोशी आणि आजोबा यांचा दांडगा पत्रव्यवहार सुरू झाला. आजोबांना पत्र लिहायला आवडे. त्यांचे पत्र म्हणजे प्रत्यक्ष गप्पा असे वाटे. रसिकता, समरसता आणि स्नेह यांनी ती ओथंबलेली असत. कोणत्याही प्रसंगाचे ते जिवंत चित्र उभे करीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठविणे हा त्यांचा आवडता छंद. ते पत्रांची उत्तरेही लगेच देत. मला आजोबांचा सहवास-प्रेम दहा-बारा वर्षेच लाभला. ते मला नेहमी चित्र-पत्रे लिहित. आजही ती माझ्या कडे जपलेली आहेत.
बारा मे एकोणीसशे अडतीस रोजी इंग्रज सरकारने आजोबांना “कैसर-ई-हिंद”ही सर्वोच्च पदवी देऊन गौरविले. आजच्या पद्मविभूषण या सर्वोच्च किताबाच्या तोडीचा हा तत्कालीन किताब. नाशिकचे सार्वजनिक वाचनालय आणि नागरिकांनी आजोबांच्या ७१ व्या वाढदिवशी भव्य सत्कार केला. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार अध्यक्षस्थानी होते. साहित्यिक आणि विविध क्षेत्रातले मान्यवर यांचा हा कुंभमेळाच होता असं म्हणायला हरकत नाही! एक श्रेष्ठ बालवाङ्मयकार, साक्षेपी संशोधक, परखड विचारांचे सामाजिक कार्यकर्ते, हळवे भाऊ, ख्रिस्तभक्त, व्यासंगी भाषा पंडित, मानवेतर सजिवांवर उदंड प्रेम करणारे, माणसांचे भुकेले त्यांना लळा लावणारे देवदत्त नारायण टिळक : ‘प्रौढांचे भाऊ, तरुणांचे बाबा, आणि बाल गोपाळांचे आजोबा’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना माझे नम्र अभिवादन.