मॅनेजर – सुनिल सायमन डिमेलो

मॅनेजर

  • सुनिल सायमन डिमेलो, गास

       गोल्डन स्टार ह्या हवाई वाहतूक कंपनीच्या काऊंटरवर आज खूपच गर्दी दिसत होती. त्याला कारणही तसेच होते. ह्या कंपनीच्या मॅनेजर वनिता मॅडम आज रिटायर्ड होणार होत्या. आज त्यांच्या कामाचा शेवटचा दिवस होता.

          सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सुरु झाला तसतश्या वनिता मॅडम भूतकाळात गेल्या… त्यांना तो दिवस अजूनही आठवत होता. २९ फेब्रुवारी १९८४, बुधवार होता. माहीमच्या संत मायकल चर्चला सकाळी जाऊन प्रार्थना करून त्या या गोल्डन स्टार या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीत रुजू झाल्या होत्या. कार्यालयात शिरताबरोबर त्यांना दरदरून घाम फुटला. तेथील प्रशस्त ऑफिस, डिझायनर फर्निचर, विमानाची भलीमोठी प्रतिकृती आणि भिंतीवर लावलेला जगाचा भौगोलिक नकाशा त्यावर रेखाटलेले विमान वाहतुकीचे ते मार्ग आणि डोळे दिपवणारे ते लख्ख प्रकाश सारंसारं स्वप्नवत होते. कंपनीचे मालक श्री. परेश खटमलानी यांनी वनिता मॅडमचे हसून स्वागत केले.

          शून्यातून विश्व निर्माण करण्याचीं धमक असणारे खटमलानी साहेब हे एक मेहनती, प्रचंड आत्मविश्वास असणारे मालक होते. हाताच्या बोटावर ते मोठमोठया बेरजा सहज करीत.  कामाचा दिवस छान गेला. बोरिवली ते दादर हा प्रवास तसा फार दूरचा नसला तरी जवळचाही नव्हता. तरी वनिता मॅडमला आता या प्रवासाची सवय झाली होती.

          वनिता मॅडम दिसायला सावळ्या असल्या तरी आकर्षक होत्या. गारे डोळे लांबसडक काळे दाट केस चेहऱ्यावर नेहमी स्माईल आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, नवीन काम शिकण्याची इच्छा, कोणत्याही कामाला नाही शब्द न वापरता त्या इमाने इतबारे आपलं काम करू लागल्या होत्या. या सर्व गुणामुळे परेश सर त्यांच्यावर आणि त्यांच्या कामावर खूप खूष होते.

          लवकरच खटमलानी सरांनी बिझनेसमध्ये जम बसवला होता. बुकिंग काउंटरवर ललिता आणि हेतल ह्या दोन नवीन मुली रुजू झाल्या होत्या. व्हिसा पासपोर्ट वगैरे पाहण्यासाठी वरद आणि प्रभूदेव, इतर कार्यालयीन काम करण्यासाठी भास्कर, दिनकर आणि अकाउंटसाठी गिरीधर व आर्या अशी सगळी फौज होती. हवाई वाहतूक कंपन्यांचे प्रतिनिधी नेहमी येत असत. येताना खास करून दिवाळी आणि ख्रिसमसच्या सिझनमध्ये पेन, केक अश्या पुष्कळ  भेटवस्तू घेऊन येत. कारण त्यांना त्यांच्या विमान कंपन्यांचा सेल वाढवायचा होता.

          अश्या आलेल्या भेटवस्तू एकत्र करून वनिता मॅडम जवळजवळ सर्व सहकार्‍याना वाटत असे. अल्पावधीतच त्या सर्वाना आवडू लागल्या, नेतृत्व गुण तर त्यांच्या रक्तात होता असे म्हटले तरी वावगे होणार नव्हते. खाजगी कार्यालय असल्यामुळे तसं लंचटाईम नसायचे. पण वनिता मॅडम अगदी प्युन पासून तर सिनियर स्टाफ पासून सर्वाना एकत्र करीत. सगळे एकत्र जेवण करीत असत. हास्य विनोद करीत सर्वांचा वेळ मस्त जात असे…

          नेमके हेच परेश सरांना खटकले. मेहनत, जिद्द आणि कुठेही काम करण्याची प्रबळ इच्छा आणि असे काम करताना  कुठल्याही थराला जाण्याची त्यांची मानसिकता असल्यामुळे ते एक यशस्वी उद्योजक बनू लागले होते परंतु एक मालक म्हणून त्यांनी ऑफिस मध्ये कामाचा चाबूक ओढला होता. मुंबईतील बऱ्याच नामवंत कंपन्या त्यांचं क्लायंट बनल्या होत्या. लक्ष्मी दोन्ही हाताने पाणी भरत होती. सर्व स्टाफ अगदी ढोर मेहनत करीत होता.

          तो काळ हवाई वाहतूक कंपन्यांचा सुवर्णकाळ होता. विमान कंपन्या भरभरून प्रवाशी भाड्यात कमिशन देत होत्या. आंतरराषट्रीय  भाड्यात तर कुठे ९% तर कुठे ३५% पर्यंत कमिशन द्यायला सुरुवात झाली होती. यात विमान कंपन्या एक युक्ती करीत असत. हवाई प्रवास करणारे प्रवासी जेव्हा आपलं तिकीट पाहत तेव्हा त्यांच्या तिकिटावर पूर्ण भाडे लिहलेले असे मात्र अश्या एंजट कंपन्याना अश्या प्रवासी तिकिटाचे पेमेंट करताना मात्र आपले कमिशन कापून नेट पेमेंट करन्याची मुभा होती.

          हळूहळू वनिता मॅडम मॅनेजरपदावर पोहोचल्या. ऑफीसची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. तरुण वयातच अशी जबाबदारी आल्यामुळे त्यांनी सर्व लक्ष कामावर केंद्रित केले. हिरीरीने त्या काम करु लागल्या. ऑफिसला १०.:३० पर्यंत येत होत्या परंतु सकाळी सकाळी घरीच क्लायंटचे कॉल येऊ लागल्यामुळे त्यांना घरची कामं, ऑफीसचे कॉल अशी तारेवरची कसरत करताना त्यांना ऑफिसला यायला उशीर होऊ लागला. १०:३० ते ११ – ११.:३० आणि हातात तर त्या १ वाजता येऊ लागल्या. परेश सरांची काही हरकत नव्ह्ती कारण जे क्लायंट त्यांना सकाळी कॉल करीत असत त्या सर्वाना ते वनिता मॅडमचा नंबर देत त्यामुळे सकाळी क्लायंटच्या सेक्रेटरी तर कधी स्वतः मालक लोक वनिता मॅडमना कॉल करू लागले.

          हळूहळू त्यांचे कॉल घेताना आणि त्याना बुकिंगची माहिती देता देता घरीच दुपारचे १२ वाजू लागले. शेवटी वनिता मॅडमचा पण संयम सुटला. त्यांनी परेश सरांना स्पष्ट सांगितले की, “सर एकतर तुम्ही माझा पर्सनल नंबर आपल्या सर्व क्लायंट्ना देऊ नका कारण ते सकाळी ७ वाजल्यापासून फोनवर चौकशी करायला सुरुवात करतात त्यामुळे माझी घरची सगळं काम राहतात आणि त्यांना उत्तर देता देता घरीच १२ – १२:३० वाजतात. मग मला ऑफिसला यायला उशीर होतो. किंवा मला घरून कामं करण्याचीं परवानगी दया.

          पक्का धंदेवाइकपणा रक्तात  मुरलेले खटमलानी यांनी हे सर्व शांतपणे ऐकून घेतले. वनिता मॅनेजर आहे, मेहनती आहे, तिने जर कामातून अंग काढून घेतले तर कठीण होईल म्ह्णून त्यांनी तिला घरूनच काम करण्याची मुभा दिली. आठवड्यातून फक्त १ किंवा २ दिवस तिने ऑफिसला यावं, बाकीं दिवस घरूनच ऑफीस सांभाळावं असं ठरलं.

          आणि तिथून वनिता मॅडम, परेश सरांचे ऑफिस या सर्वांची भरभराट सूरू झाली. पण… नकळत वनिता मॅडम आपल्या कुटुंबियांकडून दुरावू लागल्या, आईवडील, भाऊ यांना वेळ मिळेनासा झाला… भाऊ कॉलेजला जायचा. सुरुवातीला दोघे एकत्र जेवण करीत, एकत्र गप्पा करायचे, मौज मस्ती करायचे, घरात एकमेकांना मारण्यासाठी धावू लागले कि त्यांची आई रागावे पण वडील मात्र हसत आणि आपल्या मुलांना कौतुकाने पाहत असत.

          घरून काम, दिवसभर कॉम्पुटरवर टकटक, क्लायंटचे फोन त्यात ऑफीस स्टाफचे फोन, परेश सरांचे तर दिवसाला १०-१० फोन येऊ लागले. वनिता मॅडम अक्षरश वैतागू लागल्या. जेवणाच्या वेळा बदलू लागल्या. बँकेत बॅलन्स वाढू लागला पण आरोग्याचा बॅलन्स कमी होऊ लागलेला.. लहान भाऊ सौरभशी बोलायलाही वनिता मॅडमना वेळ मिळेनासा झाला… पण आता काहीच करता येत नव्हते. 

          मॅनेजरच्या वेशात त्या गोल्डन स्टारच्या विमानात बसल्या होत्या. आता Departure झाले होते पण Arrival खूप दूर होते… हे सर्व आठवून वनिता मॅडमचे डोळे पाण्याने भरले…!! परेश सर तर २४ तास घोड्यावर स्वार झालेलं असत त्यांना सर्व काम आत्ताच्या आत्ता तेही कोणतीही चूक नसताना हवी होती. एक काम सांगताना दुसरी ४ काम त्याच वेळेला सांगत आणि सर्व स्टाफ Confuse होत असत. तसे परेशसर प्रेमळही होते. कारण दुर्दैवाने त्यांना मुलबाळ नव्हते. नेहमी म्हणायचे सर्व स्टाफना की हे सगळं मी तुमच्यासाठी करतो.  मी आणि माझी पत्नी, आम्हा दोघांना खायला किती हवं. पण तुम्ही तुमची मुलबाळ यांना दोन घास मिळावे म्हणून हा सगळा आटापिटा, बरोबर ना ? अशी भावनिक साद घालून सर्वाकडून गोडीगुलाबीने काम करून घायचे, पगारवाढ वगैरे त्यांनी मागू नये यासाठी हे त्यांचे हत्यार असे असा सर्व बंदोबस्त ते करायचे. पगार फक्त वनिता मॅडमचा वाढत असे.

          गोल्डन स्टार कंपनीचा एक चांगला नियम होता. दरवर्षी ते न चुकता संपूर्ण स्टाफची एक पिकनिक नेत असत. ते देखील ऑफिसच्या खर्चाने. अशीच एक पिकनिक त्यांची अलिबागला गेली होती. सर्वजण आले होते परंतु अप्रत्यक्षरीत्या युनियन लीडर सारखं काम करणारे प्रभुदेवा मात्र त्या वेळेला तिथे उपस्थित नव्हते. प्रभुदेवा असल्याशिवाय ऑफिसचा कोणताच काम ठीक होत नव्हतं. वनिता मॅडम तर कोणतीच रिस्क घ्यायला तयार नव्हत्या. सर्वजण तयार होते परंतु प्रभुदेवांचा फोनच लागत नव्हता तेव्हा ऑफिस मधून सर्वजण प्रभुदेवांच्या घरी गेले. तिथून त्यांना पिकअप केलं आणि मगच ते पिकनिकसाठी रवाना झाले. अंगात ताप असून देखील प्रभुदेव यायला तयार झाले कारण ऑफिस मध्ये त्यांची एक फॅमिली झाली होती. तो पूर्ण दिवस गोल्डन स्टार कंपनीचे सर्व कर्मचारी घरी असल्यासारखे वागत होते. सर्वांनी खूप खूप एन्जॉय केली.

          वनिता मॅडमना हे सर्व अगदी कालपरवा झाल्यासारखे आठवत होते… एकदाचा सर्व कार्यक्रम संपला आता गोल्डन स्टार कंपनीत नव्या दमाचा सर्व तरुण स्टाफ रुजू झाला होता. हार, पुष्पगुच्च वगैरे घेऊन झाल्यावर सर्वाना थँक्स इतकंच त्या बोलू शकल्या. सर्वांचा निरोप घेऊन त्या निघाल्या. कारमध्ये विचार करत होत्या. काय मिळवलं मी.? आई वडील गेले, भाऊ लग्न करून अलग फ्लॅट घेऊन राहू लागला. त्याची पत्नी  मुंबईच्या मोठया शाळेत प्रिंसिपल होती. तिने वनिता मॅडमशी सारे संबध तोडले होते. आता त्या प्रशस्त फ्लॅटमध्ये २४ तास असणारी नोकरानी प्रमिला हिच्या सोबत राहणार होती. पैसा होता, कार होती, फ्लॅट होता सर्व सुखं हात जोडून उभी होती पण नव्हते ते मानसिक समाधान, शारीरिक आरोग्य. कोणी हक्काचं माणूस नव्हता. मॅनेजर असूनही आपलं उर्वरित आयुष्य मॅनेज करायला त्या एकट्या पडल्या होत्या.