पारंब्या – आयवन क्रास्टो

पारंब्या

  •  आयवन क्रास्टो, उमराळे, वसई


          या इकडे उभ्या चार मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर माझे बस्तान आहे. खिडक्यांना लोखंडी जाळ्या, त्या जाळ्यांवर पाणी निथळणाऱ्या कुंड्या, कुंड्यात काही खुरटलेली, काही बहरलेली, काही जिवंत, काही मृत होऊ घातलेली झुडपे. आम्ही त्या झुडपांना फुले यायची वाट बघतोय. मोठी झाडे या कुंड्यात जीव द्यायला येत नाहीत. त्या खिडक्यांमधून एका बाजूला छोटेसे आभाळ, एवढंच मिळालंय आम्हाला. त्याच बाजूला भला मोठा वड, अगणित पारंब्या घेऊन, निरनिराळ्या पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे सततचा जागा. त्या खालून वाहणारा रस्ता. तोही कायम जागाच. पण उत्तररात्री घटकाभर पेंगत असतो एखाद्या ‘जागते रहो’ गुरखासारखा.

          त्या तिकडे, इस्पितळाची इमारत. वडाआड दिसत नसली तरी सतत ऐकू येणारी. या पूर्ण गलक्यात, वेगवेगळ्या कहाण्या घेऊन  येणारी. प्रत्येकाला कधीना कधी कहाणी व्हायचे आहे . वड या सगळ्या कहाण्यांचा साक्षीदार आहे. येणाऱ्या कहाण्या दुःख घेऊन येतात. काही सुखी होऊन निघून जातात. काही वडाच्या पारंब्यांवर शाश्वत होऊन टांगल्या राहतात.

          कहाणी आली की इस्पितळ लगबग करतं. हीच ती जागा जिकडे जीवन देणाऱ्या ब्रह्माची वस्ती आहे अन यमाचा रेडा इकडे कधीच फिरकत नाही; या अशा दिखाव्याने कहाणीचे स्वागत होते. स्वागत सांत्वनाने केले जाते. कधी होतही नाही. किती वेळा आणि किती जणांचे करणार? काही मरणासाठी येतात, काही जिवंत राहण्यासाठी, काही तर उगाचच ! मग सांत्वन नेमकं कोणाचे करायचे ? सतत हसू.. हसूनंतर रडू…, पुन्हा हसू आणणे जमले असते तर नट नटी का झालो नसतो !

          कहाणी आली की बिलिंगचे काउंटर मात्र उजळून निघते. काउंटरच्या पलीकडे ऊर्जा असते अन अलीकडे निराशा अन काळजी.

          स्ट्रेचरचा खडखडात होतो. अजून एक जीव वाहून न्यायचा आहे. ते बराच वेळा ऑपरेशन थेटरकडे निघते किंवा एखाद्या खोलीत जाऊन थांबते. भार उतरला की परत निघते. अजून एक कॉल आलेला असतो. थोडा आराम हवा असतो या वर्दळीच्या कार्यात. पण तो मिळणे दुरापस्त आहे. जशी स्ट्रेचर मख्ख काम करतात तशीच कार्ये वार्डबॉय, मावश्या, डॉक्टर, नर्सेस या जिवंत माणसांकडूनही उरकली जातात. कहाणी आत आली, स्ट्रेचरने स्वागत केले, बिलींग काउंटरने ओवाळणी घातली की ही जिवंत माणसे त्या कहाणीला, पैसा, काळजी, हुरहूर, वेदना, अपमान, निराशा या योनीतुन परत जगात पाठवतात आणि हे जमलेच नाही तर वडाच्या पारंब्या आहेतच.

          गेटवरला वॉचमन मात्र स्थितप्रज्ञ असतो. कोणाला या जीवन मरणाच्या फॅक्टरीत प्रवेश द्यायचा. कोणास द्यावयाचा नाही. याचे सूतोवाच तोच करणार. कहाणीच्या नातलगांना बाहेरचा रस्ता कसा दाखवावा यासाठी बहुदा काही ट्रेनिंग होतच असणार. कधी कधी हातावर मलाई चढते याच्या आणि मग याची प्रज्ञा लोप पावते अन वॉचमनचा वॉचिंग डॉग होतो.

          इस्पितळ अनेक मजली, अनेक खोल्यांचे, अनेक खिडक्यांनी वेढलेले. इतकी हवा खेळत असते तरी इथे जीव गुदमरावा हे खरे गमक.

          तळघरात इस्पितळ चालवणारे बसतात अन पाताळलोकांसारखे गूढ वागतात. हे तळघर म्हणे, ऊर्ध्व मजल्यावरच्या कहाण्यांच्या जीवन मरणाचे निर्णय घेत असते. या पूर्ण फॅक्टरीचे पाताळ यंत्र या तळघरात आहे. इथेच पैशाचा धूर निघतो; पण जमिनीखालून निघून तो आसमंतात कोणास नजर होण्याअगोदर नळांतून या चालव- णाऱ्यांच्या घरापर्यंत सोडला जातो.

          वर लगबग चालूच आहे, बिलिंग काउंटर चलन मोजणाऱ्या यंत्राच्या आवाजाने गजबजलेले आहे. स्ट्रेचर कहाण्या इकडे तिकडे नेत आहे. वॉचमन हजर आहे, नातलग द्विधा आहेत. खोल्या भरल्या जाताहेत. ऑपेरेशन थेटरबाहेर रांग आहे. कहाणी सुखी असेल तर सफल संपूर्ण, दुःखी असेल तर बाहेर वडाच्या पारंब्या वाट पाहत आहेतच.

माझ्या खिडक्या ऐकत आहेत. कुंड्यांतून पाणी वाहते आहे. मला मिळालेले आभाळ निरभ्र आहे.