घरजावई – लेस्ली से. डायस

घरजावई

– लेस्ली से. डायस ‘गीत’

       माझ्यासाठी तेथे भारी थाटमाट सुरू होता. समोरची ताटे नानाविध प्रकारच्या मिठायांनी खचाखच भरली होती. नैसर्गिक रंगातील त्या मिठाईचे विविध प्रकार कुणालाही आकर्षित करतील असेच होते. शुद्ध देशी तुपाचा घमघमाट तेथे सर्वत्र पसरला होता. अनेक प्रकारच्या तामिळी पंचपक्वान्ना बरोबर गुलाबजाम, म्हेसूर पाक, काजूबर्फी, जिलेबी या सर्व पदार्थांसाठी अगदी असली देशी तूपाचा भरपूर वापर केलेला दिसत होता. त्या चकित करणाऱ्या स्वागताने भारावून जाऊन प्रत्येक पदार्थाचा थोडा थोडा आस्वाद मी घेत होतो.

          “डॉक्टर, लाजायचं नाही हं. ही सर्व आपल्या घरीच बनवलेली मिठाई आहे. कितीही आस्वाद घेतला तरी कोणताही त्रास होणार नाही तुम्हाला. थोड्या वेळाने दिव्याचे पप्पा तुम्हाला शेतीवर फेरफटका मारायला घेऊन जाणार आहेत. तेथे फिरताना दुपार होऊन जाईल. खूप भूक लागेल तेथे.”

          समोर रसमलाईची भली मोठी प्लेट ठेवून माझ्या भावी सासूबाई मला खाण्याचा आग्रह करीत समोर उभ्या होत्या. मी नको नको म्हणत असताना वेगवेगळी मिठाई उचलून मोठ्या प्रेमाने त्या माझ्या हाती देत होत्या. त्यांना नकार देणं मलाही अवघड जात होतं.

          माझे चाललेले आदरातिथ्य पाहून दिव्यासुद्धा खूप चकित झालेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरील तणाव आता बर्‍यापैकी निवळलेला दिसत होता. गालातल्या गालात हसत ती दारात उभी होती. तिनं माझ्या मदतीला यावं व आपल्या कुटुंबियांच्या तावडीतून माझी ‘सहीसलामत’ सुटका करावी म्हणून मी तिच्याकडे मोठ्या आशेने पहात होतो.

          पण कसलं काय?

          गालावर हात ठेवून माझं होणारं ‘अनोखं’ स्वागत पहाण्यात ती चांगलीच रमली होती. बाहेर पडावं तर दिव्याचे पिताश्री समोर बसलेले. धडकी भरवणारी उंच आणि भरदार शरीरयष्टी त्यांना लाभली होती. यथायोग्य कारणाशिवाय उठून उभा राहिलो असतो तर त्यांचा अपमान होईल ही भीती माझ्या मनाला वाटत होती. चेहऱ्यावरील स्मित कायम ठेवत ते माझे निरीक्षण करीत असावेत. बऱ्याच वेळाने अतिशय हळूवारपणे त्यांनी माझ्याशी बोलायला सुरूवात केली.

          “डॉक्टर, तुमचं नाव काय? घरी कोण कोण असते? वडील काय करतात?”

          अशा सामान्य प्रश्नांपासून त्यांनी माझ्यावर सुरू केलेली प्रश्नांची सरबत्ती नॉनस्टॉप ‘चेन्नई एक्सप्रेस’ सारखी आता धावू लागली होती. मोठ्या अदबीने मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरे देत होतो.

हळूच उठावं आणि काहीतरी निमित्ताने दिव्याच्या दोन आज्याही माझ्या समोर बसल्या होत्या. त्यासुद्धा मोठ्या उत्साहाने माझे आदरातिथ्य करण्यात आघाडीवर होत्या. तामीळ बोलीभाषेतून त्या दोन्ही आजीबाई मोठ्या मायेने माझ्याशी संवाद साधण्यासाठी धडपड होत्या. “तम्बी इद सांपडं, तम्बी ईद सांपडं.”

          “खा रे पुता … खा … , खा रे पुता … खा … ” असे त्यांच्या गोड बोलीभाषेतून मला त्या सांगत असाव्यात. माणसे तालेवार होती. खानदानी होती. तेवढीच प्रेमळसुद्धा! ही मंडळी चांगली समजूतदार दिसत असूनही एवढ्या तातडीनं त्यांनी आम्हा दोघांना येथे का बोलावून घ्यावं हा मला प्रश्न पडला होता.

          चेन्नईतल्या ‘मद्रास मेडिकल कॉलेज’ मध्ये एकत्र शिकत होतो. दिव्या एम.डी. करत होती आणि मी एम.एस. डॉक्टरकी शिकता शिकता गेली चार पाच वर्षे कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांचे खास मित्र होतो. पुढे पी.जी. करताना आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची वचने देऊन मोकळेही झालो.

          “विवेक, आपल्या प्रेमाबद्दल माझ्या घरी कळलंय. काही दिवसांपूर्वी मी माझ्या अम्माला आपल्या दोघांच्या प्रेमाची कल्पना दिली होती. तिने पुढे ते पप्पांना सांगितले. त्यांना कळताच आमच्या घरी मोठे वादळ निर्माण झाले आहे.

          या घरातील लेक दिव्या आणि मी कोण तो मुलगा? कोणत्या राज्यातून तो येथे शिकायला आलाय? या प्रश्नांनी घरात खळबळ माजलीय. अखेर बरीच उलटपालट चर्चा होऊन अखेर त्यांनी तुझ्याशी बोलायचं ठरवलंय. गावी जाऊन आपल्याला त्यांना भेटावं लागेल. तेही लवकरात लवकर. तसा त्यांचा निरोप आहे. कधी निधायचं रे आपण?

          आमच्या प्रेमाबद्दल घरी उमटलेली वादळे दिव्यापर्यंत रोज येऊन पोहचत असावीत. त्यामुळे गेले काही दिवस ती मला खूप तणावग्रस्त दिसत होती. अधूनमधून तिच्या मनातली भीती ती माझ्याकडे व्यक्त करायची. सुरूवातीला मला त्याबद्दल विशेष काही वाटलं नाही. पण तिच्या स्त्री मनाची होत असलेली फरपट लक्षात येताच समजूत घालून मी तिला दिलासा देत राहिलो.

          आपल्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला पप्पा तयार तरी झालेत हे समाधान तिच्या चेहऱ्यावर आता झळकत होते. ही बातमी कॉलेज कॅम्पसमध्ये सकाळी मॉर्निंग वॉक घेताना तिने मला दिली. आमच्या कॉलेजमध्ये आपल्या लेकीला भेटायला येणाऱ्या तिच्या वडिलांना मी दोन-तीन वेळा पाहिलं होतं. या पेहलवान व्यक्तीला त्यांच्या गावा जाऊन भेटायचे म्हणजे? रागाच्या भरात त्यांच्याकडून काही अघटित घडलं तर?

          मी घाबरत होतो असं नाही पण यदाकदाचित तेथे मला कुणी अपमानास्पद वागणूक दिली तर दिव्याला ते अजिबात सहन होणार नाही ही भीती मला सतावत होती. म्हणून काहीतरी सबबी सांगून ही भेट मी बरेच दिवस टाळत राहिलो. कारण अतिसंवेदनशील दिव्याला मी अगदी जवळून ओळखत होतो.

          “अगं, पुढील महिन्यात आलेल्या आपल्या परीक्षा तरी होऊन जाऊ देत. मग भेटू तुझ्या वडिलांना. त्यांना भेटण्याआधी मला माझ्या आईबाबांशीही थोडं बोलायला हवं.”

          “मला खात्री आहे विवेक, तुझे आईबाबा आपल्या प्रेमाला नक्कीच संमती देतील. ते तुझ्यावर रागावणार नाहीत. पण माझे पप्पा? आपण गेलो नाहीतर त्यांच्या रागात आणखी भर पडेल. ते बोलावतायेत तर आपण जाऊन भेटू. तू काही बोलू नकोस.”

          तिच्या आग्रहामुळे एका भल्या सकाळी मला तिच्या गावी निघावंच लागलं. चेन्नईहून तामिळनाडूच्या तंजावर गावाच्या दिशेने आमची मोटार पळत होती. चेन्नईहून भाड्याने घेतलेली माझी आवडती कार टाटा सफारी. जोडीला दिव्या. शांत व सालस स्वभावाची माझी प्रिय सखी ती. वेळप्रसंगी रात्री-अपरात्रीही मोठ्या विश्वासाने माझ्या अवती भवती वावरणारी.

          आपल्या अंगच्या कला गुणांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रसिद्ध असलेली सर्वगुणसंपन्न मुलगी. उंच शेलाटी बांधा, काजळ नक्षी टपोरे डोळे, घनदाट गर्द काळाभोर केशसंभार, इतकेच नव्हे तर दक्षिणी गव्हाळ वर्णाबरोबर गालावरील गोड खळ्यांचे वरदान विधात्याकडून तिला लाभले होते. मजल दरमजल करीत आमचा प्रवास सुरू होता.

          “विवेक, माझ्या पप्पांना जरा समजून घे हं. प्लीज डोंट आर्ग्यु विथ हिम. स्वभावाने ते जरा रागीट वाटतील तुला, पण मनाने अगदी साफ आहेत ते.”

          “डोंट वरी दिव्या. मी तुझ्या वडिलांचा योग्य तो मान सन्मान राखूनच बोलेन.”

          ड्रायव्हिंग करताना समोरच्या धोकादायक वळणावर लक्ष ठेवत मी तिला शब्द दिला. तंजावर नजरेच्या टप्प्यात येता येता आम्ही उजव्या बाजूला वळालो. तामिळनाडूच्या अत्यंत सुंदर, निसर्गरम्य परिसरातून आमचा प्रवास सुरू होता. गावे तशी छान चित्रातील गावाप्रमाणे सुंदर दिसणारी. वळणावळणाचे सिमेंटचे रस्ते आणि बाजूला सुखवस्तू आणि सधन लोकांची टुमदार घरे रांगेत उभी होती. दिव्याचा बाप त्या परिसरातील खूप मोठी असामी असावी.

          गावाच्या बाहेर पडताच त्यांच्या भल्या मोठ्या फार्महाऊस समोर आम्ही पोहचलो होतो. घरासमोर वेगवेगळ्या बनावटीच्या आलिशान मोटारी, जीप्स, ट्रॅक्टर्स रांगेत उभी होते. आणि दूरवर पसरलेले भातशेतीचे विराट शिवार.

          काहीशी धाकधूक मनात ठेवूनच त्या मोठ्या घराची पायरी मी चढत होतो. दिव्या सावली सारखी माझ्या पाठीशी उभी असली तरी माझं पोरकट मन काहीसं टरकलं होतं. पण .. दिव्याच्या आईवडिलांनी केलेल्या शाही स्वागताने माझी भीती कुठल्या कुठे पळून जाऊन मी भारावून गेलो होतो.

          शिवारातून गेलेल्या पक्क्या रस्त्यावरून आमची ‘थार’ हळूवारपणे पुढे निघाली होती. महेंद्राच्या त्या नव्या करकरीत जीपचे सारथ्य करीत होते स्वतः दिव्याचे पिताश्री राजकुमारन्. आपल्या शेतीवाडीवरून फेरफटका मारण्यासाठी ते मला घेऊन निघाले होते.

          ते हरित साम्राज्य पाहून मी चकीत झालो. अधून मधून रस्त्याच्या बाजूला थांबत तेथे सुरू असलेल्या कामकाजांची ओळख ते मला करून देत होते. कुठे भात लागवड सुरू होती, तर कुठे भात कापणीची कामे. कुठे झोडणी तर कुठे पेरणी.

          ही सर्व तंजावरच्या कडेकडेने वाहत जाणाऱ्या ‘पोन्नी’ नदीची कृपा होती. नदीवर उभे राहिलेले ‘कल्लानाई’ धरणाचे पाणी या शिवाराला मुबलक प्रमाणात मिळत होते. त्यामुळेच तर येथे शेती-बागायतीला वैभवाने दिवस आले होते.

          त्या विराट शिवारात पसरलेले त्यांचे शेतीच्या बांधावर नारळीची असंख्य झाडे उभी होती. मलबारी लोकांची एक मोठी टीम झाडावरील नारळ काढण्यात गुंतली होती. या शेती-बागायतीबरोबर तेथे दूरवर पसरलेले गाई म्हशींचे तबेले लक्ष वेधून घेत होते. त्या सर्व तबेल्यांची छान रचना केलेली दिसत होती. शेणापासून तयार होणारा बायोगॅस, सेंद्रिय खते आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्मितीही तेथे होत होती. दूरवर ‘दिव्या डेअरी’चा भव्य दूध प्रकल्प कार्यरत असलेला दिसत होता. शेती-बागायत, दूध डेअरीज, कोकनट ऑईल, राईस मील असे दिव्यांच्या वडिलांचे सुरू असलेले वेगवेगळे उद्योग पाहून मी चकीत झालो. आपल्या घरच्या एवढ्या मोठ्या उद्योग व्यवसायाचा मितभाषी स्वभावाच्या दिव्याने कॉलेजमध्ये कधी बडेजाव मिरवला नव्हता.

          आता दुपार टळून जात होती. झाडांच्या गर्द सावलीत आमची जीप थांबली. ‘डॉक्टर, येथे आपण थोडे थांबू या’ राजकुमारनी मला विनंती केली. आम्ही दोघे जीप बाहेर पडलो आणि झाडाच्या त्या गार सावलीत विसावलो. दूध प्रकल्पाच्या ऑफिसर कैंटीनमध्ये नुकतंच आम्ही दुपारचे लंच उरकलं होतं. तो आधुनिक प्रकल्प पहाताना दोन-अडीच तासांची वेळ निघून जाऊन दुपार झाली हे कळलेही नव्हते. हा दुध प्रकल्प म्हणजे दक्षिण भारतातलं एक मोठं नावाजलेलं नाव होतं. माझ्या बरोबर निघताना त्यांनी सर्व मॅनेजरना फोन करून सांगून ठेवलं, आज मला कुणीही डिस्टर्ब करायचे नाही. त्यांनी आजचा दिवस केवळ माझ्यासाठीच राखून ठेवला असावा.

          “तुमच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचंय डॉक्टर. खूप महत्त्वाचे. त्यासाठीच आपण येथे आलो आहोत.” राजकुमारनी बोलायला सुरूवात केली. माझी मुलगी दिव्या. तिचा जन्म झाला आणि लक्ष्मी माझ्या घरी चालत आली. या पोरीच्या जन्माच्या वर्षीच हे धरणाचं पाणी या शेतीवाडीला मिळालं आणि या सर्व जमिनीचे सोने झाले. दिव्या मोठी झाली. शाळा-कॉलेजात खूप हुशार असलेल्या माझ्या पोरीने व्यावसायिक शिक्षण घ्यावे व ही शेती बागायतीबरोबर हे सर्व व्यवसाय सांभाळावेत ही माझी इच्छा. पण मेडिकल प्रवेश परीक्षेत खूप चांगले गुण मिळवून माझ्या मुलीने सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. मी तिच्या आड आलो नाही. तिला डॉक्टर होऊ दिलं. पण तिचे पुढील शिक्षण सुरू असताना मला कळले ती कॉलेजमधील कुणा एका मुलावर प्रेम करतेय. हा माझ्यासाठी मोठा धक्काच होता. कारण तो मुलगा दूर राज्यातून येथे आलेला होता. लग्न करून माझी मुलगी दूर सासरी गेली तर येथे हे माझे व्याप कोण सांभाळणार? माझ्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. मी चिडलो. वैतागलो. तो मुलगा म्हणजे तुम्हीच होता…

          मग आम्ही विचारांती ठरवलं तुमच्याशी बोलायचं. माइया अटी आणि शर्ती तुम्हाला सांगायच्या. म्हणूनच चेन्नईहून आम्ही तुम्हाला बोलावून घेतलं आहे. आम्हाला आमच्या मुलीसाठी मुलगा येथे ‘घरजावई’ म्हणून येणाराच हवा. तुम्हाला हे शक्य आहे? स्पष्ट आणि प्रामाणिकपणे काय ते सांगा. मला आताच या वेळी तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. शेती शिवारातील या पवित्र जागी तुम्हाला तसे वचन मला द्यावे लागेल.“

          बापरे …

          मी आणि घरजावई? त्यांची ही अपेक्षा ऐकून मी गोंधळून गेलो. वेगात दौडणाऱ्या चेन्नई एक्सप्रेस सारखी त्यांची ही अट माझ्या अंगावर धावून आली. मला कालच्या प्रवासातले दिव्याचे बोल आठवले.

          “विवेक माझे वडील जे काही सांगतील ते ऐकून घे. त्यांना नाही बोलू नकोस. पुढे जे होईल ते मी बघून घेईन.”

          “ठीक आहे दिव्या. तू म्हणशील तसे” असे मी तिला वचनही देऊन बसलो होतो.

          पण आता? आता खोटं कसं बोलावं?

          अन्नधान्याचे कोठार असलेल्या या पवित्र जागेचे नाव घेऊन मी खोटे बोलण्याची चूक करणार नव्हतो. कारण या आईसमान असलेल्या काळयाभोर मातीशी बेईमान मला व्हायचं नव्हतं. तात्काळ मला माझे बाबाही आठवले. लहानपणापासून आजपर्यंत माझ्यामागे सावलीसारखे उभे राहणारे बाबा. शाळा-कॉलेज, सर्व परीक्षांच वेळी मला धीर देऊन माझा आत्मविश्वास वाढविणारे माझे बाबा. आयुष्यभर त्यांनी माझ्यासाठी कितीतरी स्वप्न पाहिली असतील. मी मोठा डॉक्टर होऊन घरी परतण्याची ते वाट पहातायत. चांगली डॉक्टरी करून आजूबाजूच्या परिसरातील लोकांची मी सेवा करावी म्हणून माझ्या वाटेकडे डोळे लावून बसलेत ते. त्यांना विसरून येथे कोणता शब्द देऊ मी? नाही मला ते शक्यच नाही! शब्द ओठावर आले पण ..

          ‘माझी अट मान्य नसेल तर आता या क्षणी तुमचा आमचा संबंध संपला’ हे उत्तर समोर तयारच होतं हे  राजकुमारन् यांच्या देहबोलीवरून मला स्पष्ट दिसत होतं. त्यांचा हा निर्णय मी बिनबोभाट स्वीकारलाही असता.

पण दिव्या? या पोरीला हा प्रेमभंग सहन होणारा नव्हताच. तिचं संवेदनशील मन माझ्या चांगलंच परिचयाचं होतं. या दुःखात ती काय करून बसेल नेम नव्हता. अचानक मोठी गुंतागुंतीची वेळ माझ्यावर येऊन ठेपली होती. समोर दक्षिणेकडील मोठा जमिनदार माझया समोर उभा ठाकला होता. पहिलवान शोभावा असा बलवान. पैशाने तर तालेवार.

          पण त्याक्षणी …

          त्यांच्यातील त्या दुबळ्या बापालाही समजून घेणेही गरजेचे वाटले मला. आता घाई गडबड कामाची नाही हे मला समजून चुकले. आजवर मी वाचलेले पुस्तकी ज्ञान माझ्या मदतीसाठी धावून आले. नेहमीच स्पष्ट आणि रोखठोक बोलणं मी बाजूला ठेवलं. ‘मौन सर्वार्थ साधनम्’ हे धोरण अवलंबवित मी म्हटले.

          “सर जरा थांबाल, प्लीज. मला जरा तुमच्या या मातीशी बोलायचे आहे” अशी विनंती मी करीत मी उठलो व मागे वळून न पाहता समोर भात लागवड सुरू असलेल्या शेतीच्या बांधावर जाऊन उभा राहिलो. शक्य होईल तेवढे कपडे सांभाळत सरळ शेतीत उतरून आवणी करणाऱ्या मजूर लोकांत मिसळून गेलो.

          मला बघून तेथे काम करणाऱ्या मजुरांना भलताच हुरूप आलेला दिसला. आवणी करता करता त्यातील म्हाताऱ्या कोतार्‍या स्त्रिया आणि पुरूष तामीळ बोलीभाषेतून गाणी गात होते. त्यामधीलच एक होऊन मी भात लावणीला हात घातला.

          मीही एका शेतकरीच. माती आणि चिखल मला नवीन नव्हता. गावी असताना आई-वडिलांना शेती बागायतीत मदत करीतच मोठा झालो होतो. कामातील माझ्या सहभागाने त्या मजूर वर्गाचा उत्साह खूप वाढला होता. मी मालकाचा खास पाहुणा आहे हे दूरवरून त्यांनी पाहिले होते. माझ्याकडे पहात त्यातील स्त्रिया मिश्किलपणे हसत आपसात काहीतरी बोलत होत्या. हा आपल्या मालकाचा होणारा जावईच असावा हा तर्क त्यांनी केला असावा.

          काही वेळाने टी… टी… ओरडत एक तरतरीत पोरगा कामगारांसाठी संध्याकाळचा चहा घेऊन आला. बांधावरील एका विशिष्ट झाडाचे एकेक पान प्रत्येक माणसाच्या हातात दिले गेले. माझ्याही हातात ते पान आले.  सफाईदारपणे त्याचा कोन करून मी त्यातून गरम चहाचा आस्वाद घेतला. संध्याकाळ झाली. आता दिवसाचे काम संपले होते. माझ्या कामावर खूष होऊन शेतीबाहेर पडताना ते तामीळ कष्टकरी माझे तोंड भरून कौतुक करत होते.

          कालव्यातून शेतीत येणाऱ्या स्वच्छ पाण्याने हातपाय धुऊन मी पुन्हा बांधावर आलो. मला वाटले दिव्याचे वडील निघून गेले असावेत. पण नाही, ते जागेवरून जराही हलले नव्हते. माझ्याकडे ते अभिमानाने पहात उभे होते. एक बाप आपल्या मुलाकडे पहातो तसा.

          आता फार्महाऊसच्या दिशेने आमची जीप सुसाट पळत होती. दिव्याचे वडील “एन्नाआची, एन्नाआची. अरे काय राजकुमारन् आता भलतेच खुशीत दिसत होते. काही न बोलता आणि घरजावई होण्याचे कोणतेही वचन न देता मी त्यांचा प्रश्न छान टोलवला होता. अंगणात येऊन आमची जीप थांबली. दिव्या, तिची अम्मा आणि त्या दोन्ही आज्या माझ्या स्वागताला बाहेर धावत आल्या पण बराच वेळ मला कुणी ओळखलं नसावं. त्या सर्व जणी प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहात होत्या.

          झालं? काय झालं? या पोराला चिखलात बुडवून कोणी काढलं?” दोन्ही आज्या राजकुमारन्ना आता जाब विचारत होत्या. “तसं नाही मम्मा. खूप गोड आणि गुणवान आहे हा पोरगा. माझी पोर मी या पोराला दिली. जगाच्या कोफ्यात कुठेही जाऊन राहिला तरी हा पोरगा आपल्या पोरीला सुखी ठेवील हे नक्की. शेतीत काम करायला उतरले होते हे साहेब.” राजकुमारन्नी त्यांच्याकडे खुलासा केला आणि फार्म हाऊसवर बराच वेळ हास्याची कारंजीच उडत राहिली.

          राजकुमारन् यांच्या दिलखुलास खुलाशाने सासरी मंडपाच्या दाराशी उभे राहिलेल्या नवरदेवासारखी मी लाजून चूर होऊन गेलो. कारण त्या दोन्ही आज्या ओटीवर उभ्या राहून माझी थट्टा मस्करी करीत होत्या. पण पायऱ्या उतरून दिव्या माझ्या मदतीला खाली उतरली तिनेही माझ्या कपड्याकडे अभिमानाने पाहिलं व कानाशी येऊन म्हणाली, “चला साहेब आता आंघोळीला.”

घरात शिरून मी बाथरूमकडे वळालो. हाती सर्व जामानिमा घेऊन दिव्या माझ्यामागे धावत येत म्हणाली, “विवेक काय रे जादू केलीस माझ्या आप्पावर? एवढे कसे खूश झाले ते तुझ्यावर?”

“जादू वगैरे काही नाही गं. एका बापाने दुसऱ्या बापावर थोडीशी मात केली” एवढं बोलून मी बाथरूममध्ये शिरलो. पण तत्पूर्वी माझ्या कपड्यावरील चिखल मातीच्या खुणा दिव्याच्या कपड्यावरही छान उमटल्या होत्या.

diasleslie@gmail.com