सकारात्मकता एक कल्पवृक्ष!
- अॅड. जॉन रॉड्रिग्ज, रांबाई
अनेक वेळा आपल्या वाचनात खालील वाक्ये येतात. उदा. A man is a Rational Animal. A man is social animal and A man is a human being.
अर्थात मनुष्य हा सुज्ञ (विवेकी) प्राणी आहे तसेच तो एक सामाजिक प्राणी आहे. परंतु तो अनेक सजीव प्राण्यांसारखा, एक सजीव माणूस आहे. जवळजवळ सर्व प्राण्यांना माणसाप्रमाणे हवा, अन्न-पाणी अशा मूलभूत गरजेप्रमाणे, शारीरिक व लैंगिक भुक तसेच राग, भीती, वात्सल्य वगैरे प्रकारच्या भावनासुद्धा असतात.
परंतु माणसाला निसर्गाने / देवाने एक निराळेपण दिलं आहे. ते म्हणजे त्याला मिळालेली सद्सदविवेकबुद्धी वापरण्याची देणगी. म्हणून त्याला A Rational Animal म्हटलं जातं. आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा तो साकल्याने विचार करू शकतो. कारण त्याच्यात निसर्गाने जन्मत:च क्षमता ठासून भरून ठेवली आहे.
पृथ्वीतलावरील जेवढया दृष्य स्वरुपात ज्या वस्तू दिसत आहेत, मग त्या वनस्पती असो किंवा कोणतेही सजीव जीवजिवाणू किडे-मुंग्या, सर्व श्वापदं, प्राणी, पशू-पक्षी, जलचर प्राणी व सर्वात श्रेष्ठ असा मनुष्य प्राणी, ह्या सगळ्यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जीवनात सदैव संघर्ष करावा लागतोच. कुणालाही ‘असेल माझा हरी तर देईल माझ्या खाटल्या वरी’ असे सहज मिळत नाही. संघर्ष हा अटळ आहे. वनस्पतींना वादळ-वार्याचा, उन-पावसाचा, दुषित हवामानाचा सामना करावा लागतोच. तसेच निसर्गात सर्वश्रेष्ठ प्राण्यामधला समजला जाणार्या माणसापासून सुद्धा सर्वात मोठा धोका हा आहेच. ती निसर्गातील आपत्तीना आपापल्या परीने तोंड देत असतातच. परंतु, स्वार्थी व हावरट माणसापासून त्यांना धोका असतो. कारण हा माणूस त्यांच्या मुळावरच आपली कुर्हाड चालवतो व त्यांचे अस्तित्वच नष्ट करतो. (पर्यावरण हा संवेदनशील विषय आहे, त्याविषयी आपण कधीतरी विचार करु, तूर्तास नको) तसेच पशू-पक्षी व इतर जलचर ह्यांनाही अशाच नैसर्गिक आपत्तीना तोंड द्यावं लागतं. असो… आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूया…
जगात सर्व सुखी असा कोण आहे ? अशी एक म्हण आहे. अर्थात कोणच नाही. देवाने एका दुःखी माणसाला तू सुखी माणसाचा सदरा घाल म्हणजे तू सुखी होशील असे सांगितले. तो दुखी माणूस, सुखी माणसाचा सदरा घातलेल्या माणसाच्या शोधात बाहेर पडला. परंतु सर्व ठिकाणी शोध घेता-घेता त्याला सगळी माणसं दुःखीच सापडली. सरतेशेवटी संध्याकाळी एक माणूस समुद्र किनारी बसलेला दिसला. तो आनंदाने किनार्यावर बसून स्वच्छंद मनाने आपल्या हाताने किनार्यावर आदळणार्या लाटांमध्ये एक-एक करुन मस्तपणे दगड फेकत होता. ह्या दुःखी माणसाला आनंद झाला व त्याला वाटले की हा खरंच सुखी आहे. आपल्याला देवाने सांगितलेल्या सुखी माणसाचा सदरा मिळेल हया आशेने त्या दुःखी माणसाने, समुद्रक्रिनारी बसलेल्या माणसाकडे धाव घेतली. परंतु जेव्हा तो त्या माणसाकडे पोहोचला, तेव्हा तो दुःखी माणूस अधिक दुःखी झाला. कारण त्याच्या अंगावर सदराच नव्हता. तात्पर्य : जगात कुणीच सुखी नाही. प्रत्येकाच्या जीवनात कसल्या न कसल्या रुपात दुःखे ही असतातच.
प्रत्येक माणसाचे दुःख हे एक सारखे नसते. प्रत्येकाची दुःखे, समस्या, अडचणी, अरिष्टे, संकटे वगैरे वगेरे ही निरनिराळी अससात. ही यादी न संपणारी आहे. परंतु अशा संकटानी खचून न जाता त्यातुन मार्ग काढणे हे सुज्ञपणाचे ठरते. नैराशाचे शेवटचे टोक म्हणजे आत्महत्या.
निसर्गाने जन्मत:च माणसाला विचार करण्याची शक्ती दिलेली आहे. सकारात्मक व नकारात्मक विचार ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचा सदुपयोग कसा करायचा हे प्रत्येक माणसाच्या हाती आहे. थॉमस एडिसन ह्या शास्रज्ञानी सकारात्मक विचार आत्मसात केले नसते, तर आज आपण विजेचे दिवे किंवा विजेवर चालणारी अगणित यंत्रे पाहू शकलो नसतो, किंवा राईट बंधूनी आकाशात उडण्याचे स्वप्न बघितले नसते तर आज मानव सूर्यावर झेप घेताना दिसला नसता. अशा प्रगल्भ बुद्धिवान माणसांनी सकारात्मक विचारसरणीचा पाठपुरावा केला म्हणून ते यशस्वी झाले. त्यांना त्यांच्या प्रयत्नात असंख्य अडचणी / समस्या आल्या. परंतु त्या समस्यामुळे खचून न जाता त्या लोकांनी त्यावर मात करुन यश संपादन केलं, स्टॅन्ली अर्नोल्ड म्हणतात की Every problem contains the seeds of its own solutions. प्रत्येक समस्येच्या उदरी त्याचे उपायाचे बीज दडलेलं असते.
परंतु समस्या, संकटे व अडचणी जीवनात निर्माण झाल्या तर माणसांनी नैराश्यात न जाता सकारात्मक विचार करून त्यावर मात करणे गरजेचे आहे.
डॉ. अल्बर्ट एलिस म्हणतात की, आपले विचारच आपल्याला घडवत असतात. ते सकारात्मक आहेत की नकारात्मक यावर आपली त्यापुढील कृती आणि पर्यायाने आपलं आयुष्य ठरत असतं. हे विचार नेमके काय असतात, त्यांना तटस्थपणे पाहता येतं का किंवा कसं पाहिलं पाहिजे हे सांगून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक वळण देणारे ठरतात.
माझ्या वाचनात मला जास्त आवडलेला एक परिच्छेद आलेला, तो मी पुढे नमूद करतो.
आयुष्याचा मार्ग हा अनेक वळणे घेतच पुढे जात असतो. ज्यापर्यंत पोहोचायचे असते, ती ‘मंझील’ अनेकदा एकच नसते. अनेक व बदलत्या ध्येयांच्या क्षितिजाकडे आपण लक्ष केन्द्रित करत असेल तरच आपलीही वळणावरची कसरत तोल न जाऊ देता चालत राहायला हरकत नसते. प्रत्येकाचेच आयुष्य असे वळणवाटांनी भरलेले व भारलेले असते. त्यांच्याकडे मागे वळून पाहिल्यास सुखदु:खाची चढाओढ तर जाणवतेच परंतु त्यापल्याड आपली पावले धावत राहिल्याचे मोलही उमजते. एखाद्या वळणावर काही निसटलेले जाणवते तर तर काही वेळा एखादी झेप पहाड चढून जाणारी ठरली आहे, असे मिश्र संकेत मिळतात. या सार्यांचा आढावा घ्यायचा तो इतरांसाठीच नव्हे तर स्वत:साठीही, पुढचा मार्ग आखण्यासाठीही.
Be positive and prepare for worst. Success is in your favour !