तर

  •  अक्षय शिंपी, मुंबई

नुकताच मी कणा 

काढून फेकलाय

कोपरं, फासळ्या, कवटी,

मांड्यांची हाडं, 

गुडघ्यांच्या वाट्या, 

हाता-पायांच्या बोटांमधली हाडं,

अगदी दातसुद्धा 

खेचून काढलेत 

आणि 

फेकाटून दिलेत दूरवर.

आता अगदी बोनलेस 

झालोय मी.

बारीकसारीक हाडांचं 

मनावर घेऊ नका.

आता तुम्हाला हवं तसं

मटण कापा, 

खिमा करा किंवा नॉर्मलच शिजवा

पिस ठेवून.

मला विचाराल, 

शेवटची इच्छा वगैरे औपचारिकता पाळून तर मी सुचवेन,

भेजा फ्राय करून खा

आणि सोबतीला रक्त उकळवून प्या

रगतीमुंडीसारखं- 

अतीव आनंद मिळेल. 

तसाही मेंदू फार तल्लख होता.

त्याच्यापायीच तर 

बोनलेस व्हायची पाळी आली!

असो.

दात उपटून काढताना

जीभही उपटली गेली नकळत 

आणि लिहून सांगण्याच्याही 

प्रश्न नाही.

बोटं खिळखिळी झालीत.

हे सगळं वांझ आत्मनिवेदनच!

आणि हो,

 महत्वाचं राहिलंच-

कलेजी रश्शात नका घालू,

तळा- कुरकुरीत चाखणा होईल.

डोळे-कान कापून बाजूला काढा.

त्याचा काही उपयोग नाही. 

बाकी मटण कसं करायचं 

ते तुमच्या हातात.

चांगलं शिजवा,

पोटभर खा, ​

आनंद घ्या. 

फक्त, शक्य झालंच तर-

हाडं जतन करा 

काय आहे, 

माझं मटण खाऊन 

तुमच्यात माझा संकर झाला-

तर माझ्याच हाडांच्या

कुबड्या तुम्हाला वापरणं

सोयीचं होईल,

इतकंच!