- संगीता वाझ, वसई.
तुम्ही तुपाशी
आम्ही सदा उपाशी
आम्ही समाधानी
तुम्ही कायम अधाशी
घरात तुमच्या शॉवर
आमचं गळकं छप्पर
आमची धडुतं लज्जेपुरती
तुम्ही लाजच सोडलेली
शंका येतेय म्हणून विचारतेय्…
तुमचा आमचा सूर्य एकच ना…?
तुमच्या महाली बारमाही दिवाळी
आमच्या भाळी फाटकीच झोळी
जगण्यापुरती खातो मीठभाकरी
पोटभर जेवून औषधं ढोसूनही
झुरता झोपेसाठी मऊ शय्येवरी
शंका येतेय म्हणून विचारतेय्…
तुमचा आमचा सूर्य एकच ना…?
तुम्ही जाल तेव्हा…
पोरं व्हिडिओकॉल करतील
आमची पोरं आज्जी हरवली म्हणून
हंबरत शोधत फिरतील
पोट आमचं हातावर
कमावतो कष्टाने खातो सुखाने
तुमची आयुष्यभराची कमाई
नेणार सोबत शवपेटीसह…?
शंका येतेय म्हणून विचारतेय्…
तुमचा आमचा सूर्य एकच ना…?
कोंबडं आरवती पक्षी गाती
फुटे तांबडं क्षितिजावरती
तुमचं उजाडणं डोअरबेलवरती
तुमचं आमचं घड्याळ वेगळं…
जगणं वेगळं…मरणं वेगळं…
शंका येतेय म्हणून विचारतेय्…
तुमचा आमचा सुर्य एकच ना…?