- सायमन मार्टिन, वसई
9421549666
ख्रिस्ती धर्म पहिल्या शतकात भारतात आल्याचे पुरावे आहेत मात्र वसईत सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्म आणला. तशी वसई प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. भगवान परशुरामाने निर्माण केलेल्या अपरांत म्हणजे कोकण प्रांताची शुर्पारक म्हणजे सोपारा ही राजधानी होती. भारतामध्ये होऊन गेलेल्या मौर्य, चालुक्य, राष्ट्रकूट, सिलहार व देवगिरीचे यादव अशा प्रमुख राजघराण्यांनी वसईवर राज्य केलेले आहे .बायबल मध्ये सोपारा बंदराचा उल्लेख असून त्याला ओफीर म्हटलेले आहे.एकेकाळी हीच भूमी बौद्ध धर्माचे महत्त्वाचे केंद्र होते. इथल्या मूळ हिंदु असणाऱ्या सामवेदी ब्राह्मण व पानमाळी या दोन मोठ्या समाजाबरोबरच मूळ भूमिपुत्र असणारे विणकर, कोळी, कुंभार, परीट, सुतार, न्हावी, भंडारी, आगरी, कुणबी इत्यादी समाजातील लोकही ख्रिस्ती झाले.
एकदा येशूच्या नावाने प्रवेश घेतला की तुमची जात-पात संपून जाते असं बायबल सांगते मात्र जात हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे त्यामुळे प्रत्येक जातींनी आपली सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आपल्या नवीन धर्मात कायम ठेवल्या त्यामुळे वसईच्या ख्रिस्तीधर्मियांच्या सांस्कृतिक परंपरेला अनेक पदर आणि वैशिष्ट्य आहेत. तो तो समाज त्यांच्या जन्म ते मृत्यूपर्यंतच्या रीतीरीवाजात आपल्या प्रथा परंपरा नेटाने पाळत आलेला आहे.
आशिया खंडात जन्मलेला ख्रिस्ती धर्म युरोपातल्या राष्ट्रांनी येथे आणला. भारतात पोर्तुगीज प्रथम आले. त्यांनी धर्म दिल्यामुळे त्यांच्या संस्कृतीच्या खुणा येथल्या समाजात आढळतात. १९६४ पर्यंत जगभर लॅटिन ही ख्रिस्ती धर्मियांची उपासनेची भाषा होती मात्र दुसऱ्या व्हॅटिकन विश्व परिषदेने सांस्कृतिकरण व देशीकरणाचा जो क्रांतीकारी निर्णय घेतला त्यामुळे स्थानिकांच्या भाषेत उपासना आली. त्याचबरोबर धर्म जरी बदलला तरीही इथल्या समाजाने आपली मूळ मराठी भाषा जतन करून ठेवली. धर्माच्या प्रभावामुळे संस्कृती जशी घडली तशीच मराठी भाषा व महाराष्ट्रीय संस्कृती या संज्ञाने ओळखल्या जाणाऱ्या रीतीरीवाजाचे धागेदोरे इतके घट्ट जोडले गेले आहेत की एक सुंदर इंद्रधनुष्य साकार झालेले आहे. जन्माने ब्रिटिश असलेल्या फादर थॉमस स्टिफन्स यांच्या क्रिस्त पुराणातील भाषा गौरव
जैसी पुस्पा माजि पुस्प मोगरी
की परिमळा माजि कस्तुरी
तैसी भासा माजि साजिरी मराठीया
हीच येथल्या समस्त ख्रिस्तीजनाची भावना असल्यामुळे हा समाज माती आणि संस्कृतीशी घट्ट जोडला गेला. आमचा साधना धर्म जरी ख्रिस्ती असला तरी समाजधर्म भारतीयच राहिला. इथल्या कुठल्याही ख्रिस्ती माणसाच्या मनात आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी भावना कधीच निर्माण झाली नाही. नारायण वामन टिळक ते फादर हिलरी फर्नांडिस यांच्या भजन व भक्ती गीतांबरोबरच कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंत बापट, साने गुरुजींच्या अजरामर गीतांमधून मराठमोळ्या चर्चने येशूला साद घातली ही खरं म्हणजे सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातली अपूर्व अशी घटना होती. म्हणूनच हा समाज तुकाराम नावाच्या सेतूवरून येशू चरणी येऊ शकला. ऐंशीच्या दशकात जगभरात अलगतावादाचे व धार्मिक उन्मादाचे धुमारे फुटत असताना संत साहित्याचे अभ्यासक बिशप (डॉ.) थॉमस डाबरे व फादर दिब्रिटो सारख्यांनी सुवार्ता मासिक व इथल्या सांस्कृतिक, साहित्यिक चळवळी द्वारे हा समाज भारतीयत्वाने जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे केवळ नावच ख्रिस्ती बाकी सारं शंभर टक्के भारतीयत्व जिवंत राहिले.
मुळामध्ये हा समाज कृषी संस्कृतीतून आलेला आहे. आता जरी शेती व्यवसाय मागे पडलेला असला तरीही कृषी संस्कृतीची सर्व वैशिष्ट्ये या समाजात आजही आढळतात. काल परवा पर्यंत गावातल्या क्षेत्रपालाला नारळ फोडून कार्याचा शुभारंभ व्हायचा. गावातल्या हिंदू मंदिरामध्ये आजही ख्रिस्ती समाजाची वार्षिक उत्सवा निमित्ताने उपस्थिती असते कारण ते गाव दैवत असते. चर्चच्या उपासना पद्धतीमध्ये सुद्धा भारतीय चिन्ह आणि प्रतिकांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. येथील धुरीणांनी धार्मिक व सामाजिक सख्य सलोख्याला महत्व दिल्यामुळे व त्यासाठी चर्चने खास प्रयत्न केल्यामुळे सामाजिक ऐक्य अबाधित राहिलं.
येथे सर्वच दिवाळी साजरी करतात व नाताळ सर्वांचाच असतो. सर्व धर्मस्नेहभाव ही वसईने संपूर्ण भारत वर्षाला दिलेली देणगी आहे. संत ज्ञानेश्वर ते तुकारामादी मराठी संत परंपरेवर ख्रिस्ती अभ्यासकांनी संशोधन केलं तर संत फ्रान्सिस आसिसी, इग्नेशस लोयोला, फ्रान्सिस झेविअर, संत अंतोनी, गोन्सालो गार्सिया या संtतांना ख्रिस्ती अभ्यासकांनी मराठमोळं रुपडं दिल. संस्कृती भाषेतून उजागर होते. आज वसईकर जगभरात गेलेले आहेत पण त्यांनी आपली बोली आणि मराठी भाषेला अंतर दिलं नाही. येथे संपन्न होत असलेले सामवेदी, वाडवळ, इस्ट इंडियन महोत्सव म्हणजे आपल्या संस्कृतिला दिलेली सलामीच असते. या महोत्सवात पारंपरिक वेशभूषा, लोककला व खाद्य संस्कृतिचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. त्यासाठी तरुणाई पुढे आलेली आहे.
ब्रास बँड पथकं ही वसईच्या ख्रिस्ती समाजाची खास देन आहे. ताल आणि नादाचा इतका सुंदर मिलाफ अन्यत्र पहायला मिळणार नाही. इथला सामवेदी ब्राह्मण समाज सामवेदातील अनेक शाखापैकी एक आहे. सामवेदी हा शब्द संस्कृत शब्द शामनीद्रेश पासून घेतला गेला असला तरीही या शब्दाचा अर्थ पद्यबद्ध मंत्राच्या गान विद्येशी अनुप्रणीत केला गेल्याने सामवेद असा तो झाला. त्यामुळे या समाजातील लोकांना पूर्वी राज दरबारी गायक म्हणून नेमले जात असे त्या गायकांना शामेडी असेही म्हणत तर पानमाळी समाज अर्थात सोमवंशी क्षत्रिय समाज या समाजासंबंधी महिकावतीची बखर, बिंबाख्यान, शास्तीची बखर आदी ग्रंथातून माहिती मिळते. या समाजास पानमाळी समाज किंवा वाडवळ समाज असेही म्हटले जाते. वाडवळ हा जातीवाचक शब्द नसून तो फुला पानांच्या वाड्यांचा व्यवसाय करणाऱ्या माळी समाजाशी जोडला गेलेला व्यवसाय वाचक शब्द आहे. सामवेदी व वाडवळी या इथल्या मुख्य बोलीभाषा असल्या तरीही वसईत थोड्या थोड्या अंतरावर बोलीभाषा व संस्कृतीत फरक जाणवतो. यातील सामवेदी ख्रिस्ती समाजाची भाषा सामवेदी किंवा कुपारी बोलीभाषा जी कादोडी नावाने देखील ओळखली जाते तर पानमाळी किंवा वाडवळ समाजाची बोलीभाषा वाडवळी नावाने ओळखली जाते. दोन्ही भाषेतील शब्दोच्चारांना विशिष्ट हेल आणि नाद आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे कादोडी भाषेवर कोकणी, गुजराती, मारवाडी भाषांचा एकत्रित प्रभाव दिसून येतो तर वाडवळी बोली भाषेतील अनेक शब्द हे ज्ञानेश्वरी व एकनाथी वाडःमयात आढळतात.
ख्रिस्ती लेखकांनी आपल्या लेखनाद्वारे सांस्कृतिक धागा बळकट करण्याचं काम केलं त्यामुळे ख्रिस्ती समाज सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा पडला नाही. फादर फ्रान्सिस दिब्रिटो, सिसिलिया कर्व्हालो, फादर कोरिया, मार्कुस डाबरे, रेमंड मच्याडो, स्टीफन परेरा, जोसेफ तुस्कानो, स्टॅन्ली गोन्सालविस, फादर अँण्ड्रयू रॉड्रिग्ज, फादर मायकल जी असे अनेक ख्रिस्ती साहित्यिक मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या अनोख्या लिखाणाच्या शैलीमुळे आपला ठसा उमटवून आहेत. अनेक स्थानिक ख्रिस्ती संगीतकारांनी बोलीभाषेतील गीतं स्वरबद्ध करून संगीत क्षेत्रात नाव कमावलेले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिकल्पकार रॉबी डिसिल्वा तर सर्वांनाच परिचयाचे आहेत. याशिवाय फिलीप डिमेलो, जो डिसोजा यासारखे काही नामवंत चित्रकार राष्ट्रीय पातळीवर ओळखले जातात. येथील काष्ठ शिल्पकार सिक्वेरा बंधू तर देशभरात प्रसिद्ध आहेत. कित्येक दशके वसईतील शिक्षक मुंबईतल्या मराठी शाळांमध्ये मराठी शिकवत आहेत.
ख्रिस्ती सणांना भारतीय साज
नाताळ सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिस्ती समाजासाठी हा दिवस अध्यात्म व उत्साहाच्या दृष्टीने मोलाचा दिवस. या सणात ख्रिसमस ट्री, मेणबत्त्यांचे अगणित प्रकार, चांदण्याच्या आकाराचे विविध रंगी आकाश दिवे, सांताक्लॉजचे मुखवटे हे इथल्या ख्रिस्ती समाजाच्या घराघरात दिसतील त्याखेरीज येथे नाताळ निमित्ताने नाताळ अंक प्रकाशित केले जातात. काही घराच्या ओट्यावर व अंगणात पणत्यांची रोषणाई सुद्धा दिसते शिवाय चिवडा, चकली, करंजी, लाडू यासारखे पदार्थ करण्याची पद्धत देखील आहे. नाताळ बरोबरच गुड फ्रायडे, ईस्टर, फातिमा मातेचा सण, रमेदी मातेची यात्रा, आगेराचा सण, क्रुसाचा सण, राजपिठाचा सण आणि बायबलचा सण असे अनेक सण येथील ख्रिस्ती समाज आपापल्या संस्कृतीच्या थोड्याफार फरकाने उत्साहाने साजरे करीत असतो .
वसंत ऋतुच्या सुरुवातीस जगभरात ख्रिस्ती लोक उपवास करतात .या काळात रविवार वगळता सलग 40 दिवस म्हणजे सहा आठवडे उपवास पाळला जातो. वसईतील कॅथलिक व प्रॉटेस्टंट हे ख्रिस्ती धर्मातील दोन्ही पंथ या चाळीस दिवसाच्या उपवासाचे पालन करतात. या उपवासाचे स्वरूप थोड्याफार फरकाने हिंदू उपवास संकल्पनेशी मिळते जुळते आहे. या उपवास काळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथील ख्रिस्ती समाजात उपवासकालीन व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. कारण पश्चाताप व आत्मसमर्पण याद्वारे अध्यात्मिक वाटचालीतून परमेश्वर प्राप्तीचा अवलंब करणे हाच उपवासा मागील हेतू असतो.
वसईतील ख्रिस्ती समाजातील विवाह विधीमध्येही खूपसे हिंदू धर्माशी साधर्म्य असणाऱ्या प्रथा पद्धती असतात. साधारण नोव्हेंबर ते मे या दरम्यान वसईत ख्रिस्ती विवाह संपन्न होतात. चर्चमधील मुख्य विधी समान असला तरीही गावागावात काही प्रथा आणि पद्धती वेगवेगळ्या पाहायला मिळतात. घराबाहेर शोभिवंत केलेला मांडव, प्रवेशद्वारावर केळीचे उंच खांब, लग्नाआधी वधूवरांना हळद लावणे, मंगळसूत्र, हिरवा चुडा हे स्री लेणेही असतेच. लग्नविधी तीन दिवस चालतो. तांदूळ, नारळ, सूप, आंब्याचा टाळ, केळी व इतर फळे झेंडूची फुले ही सामग्री दिसते.
चर्चमध्ये लग्नविधी पार पडण्याआधी दोन दिवस वधू-वरांना लग्नविषयक शिबिर करणे बंधनकारक असते. तसेच कन्फेशन पाप निवेदन संस्कार सारखे संस्कार आधी दिले जातात. लग्नाआधी चर्चमध्ये जाऊन विवाह विषयक अर्ज भरावा लागतो त्यावर नवरा नवरी बरोबरच त्यांच्या पालकांच्या सह्या अत्यावश्यक असतात. लग्नाच्या तीन आठवडे अगोदर चर्चमध्ये त्या लग्नाची घोषणा केली जाते त्यामध्ये कुठला अडथळा असल्यास ते लग्न रद्दबादल होऊ शकते. लग्नाच्या दिवशी वधू आणि वर चर्चमध्ये मिस्सा विधीसाठी एकत्र येतात तेव्हा सुखदुःख, आजार व आरोग्यात साथ देण्याची आजन्म एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याचं वचन दिलं घेतल्यावर अंगठी व मंगळसुत्रावर आशीर्वाद दिला जातो. चर्चमधील रजिस्टरवर नवरा नवरीबरोबरच दोन साक्षीदारांची सही घेतली जाते. त्यानंतर वाजत गाजत वरात वधूच्या घरी जाते. सून सासरी आल्यावर थट्टा मस्करी असलेले बोलीभाषेतील लोकगीते गायली जातात. लोकनृत्य केले जाते जेवणामध्ये खास महाराष्ट्रीयन आणि पाश्चात्त्य संगम असलेला विविध पदार्थाची रेलचेल असते. शेवटी विवाह सोहळ्यात मदत केलेल्या नातेवाईक व मित्र यांना कृतज्ञते पोटी मेजवानी दिली जाते.
अन्य धार्मिक संस्कार देतेवेळी छोटे मोठे उत्सव साजरे केले जातात. मृत्यूनंतर गाव पातळीवर प्रार्थना सभेचं आयोजन केलं जाते. सात दिवसानंतर मृतात्म्यासाठी खास मिस्सा अर्पण केला जातो.
या समाजात वाचनाची फार मोठी परंपरा आहे. चर्च तेथे लायब्ररी असल्यामुळे घराघरात पुस्तकाबद्दल आदर आणि आस्था आहे. समाजवादी विचारसरणी बद्दल आस्था ही या समाजाची खास ओळख. चळवळ आणि आंदोलनातल्या सहभागाने या समाजाने आपली संवेदनशीलता व सहभागिता सिद्ध केलेली आहे. धर्मांतरामुळे इथल्या समाजाच्या जीवनशैलीत व राहणीमानात निश्चित फरक जरी पडला तरी वसईतील ख्रिस्ती समाजाने आपल्या मूळ भारतीय व खास करून मराठी संस्कृतीशी असणारी नाळ व मूळ बैठक कायम ठेवतच आपल्या समाजाची परंपरा जपली. आपल्या धर्माचं तत्त्वज्ञान माणूस निश्चितच जपतो, दैवते व उपासना मार्ग पाळतो धर्माने घालून दिलेले लोक व्यवस्थेचे नियम लक्षात ठेवून वागतो शिवाय धर्माने आपल्या अनुयायासाठी काही संस्काराची योजना केलेली असते तीही पाळतो तरीही वसईचा ख्रिस्ती समाज आपल्या मूळ परंपरेच्या मूल्याशी नैसर्गिकरीत्या जोडला गेला असल्याने त्याची नाळ कधीच तुटली नाही हेच येथल्या ख्रिस्ती समाजाचं वास्तव आहे.