- अनिलराज रोकडे,
अध्यक्ष : वसई विरार महानगर पत्रकार संघ
वयाच्या नव्वदी नंतरही सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत राहून, अडलेल्या-नडलेल्या नागरिकांस जमेल ती मदत करणे, तथा नागरी समस्या व विकासाच्या प्रश्नांवर संबंधित विभागाकडे आपल्यापरीने पाठपुरावा करून सामाजिक बांधिलकीशी आपली नाळ वार्धक्यातही खंडित होऊ न देणाऱ्या माजी आमदार श्री. डॉमनिक घोन्सालवीस साहेब यांनी दि.१४ डिसेंबर रोजी वयाच्या ९३व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांना यानिमित्त शुभेच्छा देतांनाच, त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊया…….!
परवा, रविवारी वसई विरार महापालिका मॅरेथॉन स्पर्धेच्या शुभारंभास अतिथी म्हणून आलेल्या घोन्सालवीस साहेबांची व्यासपीठावर भेट झाली. साहेब थकलेले जाणवले, पण तरीही आपल्या शहरातील या एका मोठया उपक्रमात स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी भल्या पहाटे साडेपाच वाजता येऊन प्रयत्नपूर्वक त्यांनी हजेरी लावली. माणसांमध्ये मिसळून सुखदुःख जाणून घेणे, विचारपूस करणे, वेळ प्रसंगी अनुभवातून आलेल्या शहाणपणाच्या चार गोष्टी नवकार्यकर्त्यांना सांगणे असा जनसंपर्काचा त्यांचा हा प्रवास आजही निरंतर सुरु ठेवण्यामागील त्यांची उर्मी प्रेरणादायी वाटली…!!
श्री. घोन्सालवीस साहेबांनी चर्नीरोड येथील शासकीय मुद्रणालयातील प्लानींग ऑफिसर पदावरील नोकरीचा १९७०च्या सुमारास राजीनामा देऊन, त्यांनी स्वतःचा प्रेस वसईत सुरु केला. सहकार महर्षी स्व.म. वि. कुलकर्णी आणि ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार स्व. स. गो. वर्टी यांच्या विचारांच्या प्रभावातून घोन्सालवीस साहेबांचा सहकारातून जाणारा राजकीय प्रवास रुंदावत गेला. त्यातूनच १९७२ साली ते ठाणे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले. ही संधी त्यांनी दोन वेळा मिळवली. 1985 साली वसई विधान सभा निवडणुकीत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून, त्यांनी काँग्रेस उमेदवार, तात्कालीन राज्यमंत्री स्व. तारामाई वर्तक यांचा पराभव करून विधान सभेत कूच केले. या त्यांच्या प्रतिकूल राजकीय वातावरणात मिळवलेल्या विजयाची राज्यभर चर्चा झाली.
अनेक मात्तबर आणि प्रस्थापित सदस्यांचा समावेश असलेल्या त्यावेळच्या विधान सभागृहात नवखे आमदार म्हणून गेलेल्या डॉमनिक साहेबांची अनेक अभ्यासू भाषणे गाजली. परिणामी त्यांना विधान सभा अध्यक्षांच्या तालीकेवर स्थान मिळाले. तसेच त्या काळात त्यांना विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वसईच्या तात्कालीन अनेक प्रश्न, समस्याना आपल्यापरीने त्यांनी न्याय दिला. आमदार झाल्यावर १९८५च्या सुमारास येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला पुनःरुजीवित करण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. आज नावारुपाला आलेली साधना सहकारी पतपेढी, वसई मध्यवर्ती सहकारी भांडार आणि महिला औद्योगिक सहकारी संस्थेचे ते संस्थापक आहेत. पान मार्केटिंग सहकारी सोसायटीवर सतत ३७ वर्षे चेअरमन म्हणून यशस्वी धुरा वाहतांनाच, कार्डिनल ग्रेशर्स हॉस्पिटल ट्रस्टचे ते सुरुवातीपासूनचे विश्वस्थ आहेत. तसेच बॅसीन कॅथॉलिक सहकारी बँकेवर दोन वेळा संचालक म्हणून ते निवडून गेले होते. या शिवाय त्यावेळी वसईत स्थापन झालेल्या लोकसेवा मंडळ आणि अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मौलिक योगदान लाभले आहे.
सन १९९० च्या विधानसभा निवडणूकीत मात्र युवकांच्या झंजावातासह वादळ बनून आलेल्या काँग्रेसचे नवतरुण उमेदवार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून डॉमनिक साहेबांना पराभव पचवावा लागला. त्यावेळी अतिशय धक्कादायक मानल्या गेलेल्या या निकालानंतर काही वर्षातच घोन्सालवीस साहेबांनी स्वतःला सवारले. मोठया मनाने समाजकारण आणि राजकारणतला आ. ठाकुरांचा लोकानुनय उदारपणे मान्य करून, त्यांच्या बद्दलची मनातील कटुता काढून टाकली. स्वभावाप्रमाणे आ. ठाकूर यांनीही घोन्सालवीस साहेबांशी नम्रतेने आदरयुक्त संबंध प्रस्थापित केले. आज हे दोघे अतिशय जवळचे मित्र असून, या संबंधाचा लाभ डॉमनिक साहेब अनेक सामाजिक कामांसाठी करून घेतात. आज विश्रांतीची वेळ असतांनाही घोन्सालवीस साहेब छोटया-मोठया नागरी आणि सामाजिक प्रश्नांचा संबंधित खात्याचे अधिकारी, विद्यमान लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांच्या माध्यमातून पाठपुरावा करीत असून, यासाठी ते सामाज माध्यमाचाही कल्पक वापर करीत आहेत. समाजाप्रतीची ऋणत्वाची त्यांची जाणीव आणि शक्य तसे, जमेल तितके सहाय्य करण्याची त्यांची भावना राजकारण आणि समाजकारणात नव्याने येणाऱ्या कारकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरावी. अश्या श्री. घोन्सालवीस साहेबांना त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊया!!!