अनंत ध्येयासक्ती…!!

  •  जॉन कोलासो, गिरीज, वसई

 (ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक जनपरिवारचे संपादक तसेच फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूलचे संस्थापक श्री. अ‍ॅन्ड्र्यू कोलासो यांचा जीवनपट)

ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक जनपरिवारचे संपादक तसेच फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूलचे संस्थापक श्री. अ‍ॅन्ड्र्यू कोलासो म्हणजेच आमचा मोठा बंधू, याचा जीवनप्रवास ‘अनंत ध्येयासक्ती’ने झपाटलेला आहे. अशा ध्येयासक्तीने त्याने आपल्या कर्तबगारीने अनेक यशाची बंदरे सर करून आपल्या कर्तृत्वाचे झेंडे तेथे रोवलेले आहेत.

भावाने नुकतीच वयाची ८२ वर्षे पूर्ण केली आहेत तर साप्ताहिक जनपरिवारचे ४८ वे वर्षे चालू आहे. सुमारे ४५० वर्षापूर्वी म्हणजे २४ ऑक्टोबर १५७९ रोजी ब्रिटनहून भारतात आलेले आणि गोव्यात व वसई किल्ल्यात मुक्काम करून क्रिस्तपुराण सारखे महाकाव्य लिहिणारे फादर थॉमस स्टीफन्स यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या फादर स्टीफन्स अकॅडमी स्कूलचा रौप्यमहोत्सव गतवर्षी साजरा करण्यात आला.

भावाने जीवनात व्यक्तिगत व कौटुंबिक अशी अनेक संकटे झेलली परंतु, अशा अनेक अरिष्टांना न डगमगता, त्याची जाहीर वाच्यता न करता त्याचा साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतील सव्यासी जीवनक्रम चालू असतो.

आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी मिळून सहा भावंडं. वडील नोकरी व व्यवसायानिमित्त कल्याणला मुक्कामाला असायचे. साधारणत: दर महिन्याला घरी यायचे. तेही तीनचार दिवसासाठी…! आमच्या संगोपनाची, आम्हाला वळण लावण्याची, शिकविण्याची जबाबदारी आईवर. आई अशिक्षित. पण चर्चमध्ये ऐकलेल्या बायबल बोधकथा आम्हाला सांगून सन्मार्गावर ठेवण्याची जबाबदारी तिने चोख पार पाडली.

त्यावेळी तीन चुलत्यांसह एकाच मोठ्या घरात आम्ही राहत होतो. चुलत भावंडांसह घर भरलेलं होतं. परंतु ही भावंडं शालेय शिक्षणात मागे राहिली, आमच्या मोठ्या भावाने, मात्र प्राथमिक शाळेपासूनच आपली शैक्षणिक प्रगती साधली, इतकंच नव्हे तर माध्यमिक शाळेत गेल्यावर कविता करण्यासही सुरुवात केली. ‘सुवार्ता’मध्ये त्या प्रसिद्धही होऊ लागल्या. त्यावेळी वसईत घरोघरी सुवार्ता हेच एकमेव नियतिकालिक येत असे. मुंबईतील वृत्तपत्रे क्वचित कधी वाचायला मिळत. पण पुढे अशा वृत्तपत्रांच्या रविवारच्या आवृत्तीतही भावाचे लेख, कथा प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यावेळी आम्हा भावंडांना मोठ्या भावाबद्दल वेगळाच आदर वाटायला लागला आणि आम्हाला आमच्या शालेय जीवनात भावाबद्दल, त्याच्या लेखनाबद्दल, साहित्यिक वाटचालीसंबंधी ऐकायला मिळू लागले. कोणीतरी सांगायचे, भावाचा लेख वा कविता वाचल्याचे. इतर व्यक्ती त्याच्या प्रती आदराने बोलताना जाणवू लागले. लवकरच तो त्यावेळचे तरुण साहित्यिक रॉक कार्व्हालो यांच्या संपर्कात आला, त्याच्या साहित्यिक गुणांना पैलू पडू लागले.

साधी जीवनपद्धती

शिक्षण आणि साहित्यप्रांगणात त्याची प्रगती होत असली तरी, घरात त्याने आपण कोणी वेगळे आहोत, साहित्यिक आहोत, असे कधीच भासवून दिले नाही. उलट आम्हा चौघा लहान भावंडांच्या द़ृष्टीने तोच आमच्यासाठी पालकाची भूमिका बजावत होता. कारण वडील कल्याणहून महिन्याभरात कधीतरी येत असल्याने आमच्या शिक्षणाची जबाबदारी भावानेच पार पाडली. आमच्या सर्वांच्या प्रगतीपुस्तकांवर भावाच्याच सह्या असायच्या. त्यामुळे आमच्या शैक्षणिक ‘प्रगती’वर त्याचे नेहमीच लक्ष असायचे. आम्हा सर्व छोट्या भावंडाचा शिक्षणाच्या द़ृष्टीने भाऊ दीपस्तंभ ठरला. त्याच्या मार्गदर्शनाखाली आमचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला.

वडिलांना कल्याणहून यायला विलंब झाला की, आईजवळचे घरखर्चाचे पैसे संपत असत. तेव्हा आई भावाला सांगत असे, ‘शावेर, माझ्याजवळचे पैसे संपले आहेत’ आईचे वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच भाऊ आईला धीर देत सांगत असे, ‘ठीक आहे, लोकसत्तेत प्रसिद्ध झालेल्या माझ्या लेखाचे मानधन म्हणून आजउद्या मनिऑर्डर येईल, त्यातून आपण भागवू…!’ आईवडील आणि घरातील चुलते भावाला शावेर याच नावाने हाक मारीत असत. शावेर म्हणजे झेविअरचं मराठी रुपांतर, भावाचं ते टोपण नाव आहे. मात्र आमच्या कुटुंबाबाहेर इतर कोणालाच ते माहीत नाही…!

लेख व कथेच्या मानधनाची मनिऑर्डर दहा रुपयांची असे. पण त्यावेळी दहा रुपयांने काही दिवसाचा घरखर्च सहज भागत असे. त्यावेळी आम्ही लहान असलो तरी भाऊ ज्या पद्धतीने आईला धीर देत असे, ते आम्हा छोट्या भावंडांना खूपच भावत असे. तो कॉलेजला असतानाच नोकरीस लागला. आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये उपसंपादक म्हणून त्यास नोकरी मिळाली. सकाळी लवकर उठून रुपारेल कॉलेजला जायचा आणि तेथून वरळीला मराठाच्या कार्यालयातून रात्री उशिरा घरी परतायचा. त्यामुळे आम्हा भावंडाशी त्याची दिवसा भेट होणे दुर्मिळ होत गेलं.

आईला आर्थिक मदत करीत असतानाच पुढे वडिलांना कल्याणला मदत करण्यास त्यास वारंवार जावे लागले. वडिलांनी कल्याणला जमीन खरेदी करून तेथे शेतीबागायत सुरू केली होती. जमीनजुमला म्हणजे अतिक्रमण, नोकरांचे प्रश्न अशा अनेक समस्या पुढे येतातच. अशावेळी  मदतीसाठी वडील त्याला कल्याणला बोलावून घेत, पण भावाने कधी, ‘मला वेळ नाही,’ असे सांगून टाळाटाळ केलेली नाही. आजही कल्याणच्या जमिनीविषयीची जुनी कागदपत्रे शोधताना दादाच्या हस्ताक्षरातील खूप मोठा दस्तावेज सापडतो. कारण त्यावेळी सर्वप्रकारचे अर्ज हाताने लिहून काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते, आणि ते काम दादाच करीत असे. त्यासाठी मग त्यास वडिलांसोबत कल्याणला मुक्कामाला राहावे लागत असे. पण त्यामुळे त्याच्या शिक्षणात व लिखाणात खंड पडला नाही.

कल्याणहून वसईला आल्यावर त्याच्या श्री. रॉक कार्व्हालो, श्री. जोजेफ डिकुन्हा, श्री. पीटर कर्नेल, श्री. ऑगस्तीन गोन्सालवीस, श्री. राफायल परेरा प्रभृती साहित्यिक आणि साहित्यप्रेमींशी दर रविवारी मैफली जमू लागल्या. त्याचवेळी गिरीज येथे चर्चच्या आवारात सांस्कृतिक कार्य करणार्‍या नूतन मंडळाचे अध्यक्षपदही त्याने सांभाळून या मंडळाच्या युवकांसमवेत सणाच्या दिवशी अनेक नाटके सादर करण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

दरम्यान, त्याने एम.ए. पूर्ण केले. त्यास त्यावेळच्या पूर्व जर्मनीच्या म्हणजेच जर्मन लोकशाही प्रजासत्ताक देशाच्या मुंबई कार्यालयात माहिती अधिकारी म्हणून नोकरी मिळाली. त्यामुळे ‘मराठा’मध्ये असताना रात्री उशिरापर्यंत घरी यावे लागायचे ते थांबले. शनिवार रविवार सुटी मिळाली, त्याचा उपयोग लिखाणासाठी होऊ लागला.

जर्मनी व रशियाच्या दौर्‍यावर

पूर्व जर्मनीच्या कार्यालयात नोकरीस असतानाच पत्रकारितेचे शिक्षण घेण्यासाठी त्यास पूर्व बर्लिनला जाण्याची संधी मिळाली. त्याकाळात अशा शिक्षणासाठी परदेशात जाणे म्हणजे फार मोठा गौरव समजण्यात येत असे. अनेक वृत्तपत्रांत त्याच्या परदेशगमनाची बातमी झळकली होती.

जर्मनीमधून परत आल्यावर त्याच्या लिखाणास अधिक गती मिळाली. या परदेशदौर्‍याच्या निमित्ताने खूप लिखाण झाले. जर्मन कथाकादंबर्‍या मराठी वाचकांपर्यंत पोचविण्याचा विडा त्याने उचलला. ‘सुझान’ ही त्याची पहिली अनुवादित कादंबरी प्रसिद्ध झाली. त्यापाठोपाठ, इतर अनेक पुस्तके प्रकाशित झाली.

पूर्व जर्मनीच्या कार्यालयातील नोकरी करीत असतानाच त्यास सोविएत युनियनच्या मुंबई वाणिज्य कार्यालयात ‘सोविएत देश’ या मराठी पाक्षिकाचे संपादक म्हणून नेमणूक करण्यात आली. अनेक वर्ष तेथे नोकरी करीत असताना आपले स्वतंत्र लिखाणही दादाने चालूच ठेवले होते. दरम्यानच्या काळात रशियाचा दौराही केला.

छापखाना, प्रकाशन व साप्ताहिक

आपल्या लिखाणासाठी व इतर वसईतील होतकरू तरुण लेखकाचे साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी भावाने ’शब्दपीठ प्रकाशन’ सुरू केले, सोबत कल्याणच्या आमच्या जागेत ‘सरोज प्रिंटिंग प्रेस’ नावाने छापखाना सुरू केला. आमच्या कुटुंबात आजपर्यंत प्रेसचे काम कोणी कधी केलं नव्हतं. भावालाच, पत्रकारिता व पूर्व जर्मनी आणि सोविएत देशच्या माहिती कार्यालयातील नोकरीनिमित्ताने प्रेसविषयीची माहिती होती. परंतु कामगारांना घेऊन प्रेस चालविण्याचा व्यवसाय नवीनच होता. पण त्याने या व्यवसायातील सर्व तांत्रिक माहिती शिकून घेतली आणि मलाही ती शिकविली. त्यावेळी मीही कॉलेजच्या शिक्षणासाठी कल्याणला मुक्कामाला होतो.

प्रेसचा जम बसत नाही, तोच भावाने मे १९७६मध्ये ‘जनपरिवार’ सुरू केले. आरंभी पाक्षिक स्वरूपात असलेले हे जनपरिवार, १७ वर्षांनंतर साप्ताहिकमध्ये रुपांतरित करण्यात आले. आमचा सर्वांचा मुक्काम कल्याणला, प्रेस कल्याणला, मात्र पाक्षिक वा साप्ताहिक वसईसाठी प्रकाशित करण्यात येऊ लागले. त्यावेळी कल्याण-वसई संपर्काची सुविधा चांगली नव्हती. त्यामुळे भाऊ दर शनिवारी-रविवारी कल्याणहून वसईला येऊन वसईतील आपल्या साहित्यिक मित्रांशी संपर्क साधून साहित्य जमा करीत असे. नोकरी, संसार सांभाळून हे कामही तो सहजपणे करीत असे.

साप्ताहिक जनपरिवार, आज ४६ वर्षे झाली, नियमितपणे प्रसिद्ध होत आहे. पहिल्या पानावर स्वत: संपादकीय लिहिण्याची परंपरा अखंडपणे कायम ठेवली आहे. येथे अभिमानाने सांगावयाचे वाटते ते म्हणजे राज्य सरकारने जाहीर केलेल्या सर्वोत्तम अग्रलेखाचा पहिला पुरस्कार सा. जनपरिवारला मिळालेला आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते हा पुरस्कार दादाला मंत्रालयात झालेल्या खास समारंभात प्रदान करण्यात आला होता.

वसईविरारमधील अनेक होतकरू तरुण लेखक या साप्ताहिकात लिहीत आले असून त्यापैकी काहीजण आज नामवंत लेखक बनले आहेत. त्यामध्ये माझाही समावेश आहे. मलाही सा. जनपरिवारमध्ये लिखाण करण्याचा सराव झाल्यामुळे प्रथम ‘नवशक्ती’ आणि नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये उपसंपादक म्हणून व पुढे मुख्य उपसंपादकपदापर्यंत जाण्याची संधी मिळाली.

अशाप्रकारे जनपरिवार साप्ताहिक लेखक, कवी आणि पत्रकार घडविण्याची कामगिरी पार पाडत आहेच पण त्याच सोबत सामाजिक, सहकार,  शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांतील घडामोडींना व उपक्रमांना ठळक प्रसिद्धी देण्याचीही कामगिरी पार पाडत आहे. साप्ताहिकाच्या दरवर्षी होणार्‍या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतले अनेक मान्यवर साहित्यिकांना बोलावून मिनी साहित्य संमेलनाचा कार्यक्रम वसईत तो आयोजित करीत असे. आज वसईत अनेक साहित्यिक उपक्रम अनेक संस्थांमार्फत आयोजित केले जातात. परंतु, वसईत ही प्रथा रुजविण्याचे काम सा. जनपरिवारमार्फत दादांनेच पार पाडले. अर्थात या कामी श्री. रॉक कार्व्हालो, श्री. जोजेफ डिकुन्हा, पीटर कर्नेल, ऑगस्तीन गोन्सालवीस प्रभृतींचे फार मोठे साहाय्य त्यास लाभले.

या उपक्रमाचे पुढचं पाऊल म्हणजे डिंपल प्रकाशनचे श्री. अशोक मुळे यांच्यासमवेत ‘साहित्य जल्लोष प्रतिष्ठान’ची स्थापना करून वसईत गेली २० वर्षे साहित्य उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या प्रतिष्ठानचा भाऊ अध्यक्ष आहे. साहित्य जल्लोष प्रतिष्ठानतर्फे १७ सप्टेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमलेनाचे उद्घाटन ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले.

शाळेची स्थापना

साप्ताहिक जनपरिवारचे कार्य अखंडपणे चालू असतानाच वसई परिसरातील गरीब कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकता यावे म्हणून फादर स्टीफन्स अॅकॅडमी नावाने शाळा सुरू करून ती नावारूपाला आणली आहे. केजी व इयत्ता पहिलीपासून सुरू करून दहावी इयत्तापर्यंत असलेल्या या शाळेने वसईतील एक अग्रेसर व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी शाळा म्हणून नावलौकीक संपादन केलेला आहे. गेली दहा वर्षे सलग शालांत परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या शाळेतून शालांत परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले काही विद्यार्थी पुढील शिक्षण पूर्ण करून डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए. झाले आहेत. तर अनेक विद्यार्थी परदेशांत नोकरीनिमित्त वास्तव्य करीत आहेत.

वर्षाचे ३६५ दिवस सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहा शाळेत राहून आपले जीवन शालेय जीवनास अखंडपणे वाहून घेण्याचे व्रतच जणू भावाने घेतलेले आहे.

हा सर्व व्याप सांभाळून बॅसीन कॅथोलिक बँकेचे सलग दोन टर्म, म्हणजे एकूण दहा वर्षे संचालक म्हणूनही कार्य त्याने केलेले आहे.

भावाच्या संसाराचे एक चाक कधीच निखळून पडलेले आहे. आमच्या वहिनीला कर्करोग झाल्याचे निदान झाले. आमचे सर्व कुटुंबच एकदम खचले, पण भावाने ते अत्यंत धीराने घेतले. अशा दुर्धर रोगात तिची शेवटपर्यंत काळजी घेण्याचे एकहाती काम भावानेच अनेक वर्षे पार पाडले.

वहिनीला उपचारासाठी मुंबईतील माहिमच्या डॉक्टर बावडेकर यांच्याकडे घेऊन जाणे, हिंदुजा हॉस्पिटलमध्ये केमो देण्यासाठी घेऊन जाणे, उपचारासाठी वहिनीसोबत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये राहणे, हे सर्व भावाने एकट्याने केलं. तेही नोकरी सांभाळून. त्यावेळी त्याची तिन्ही मुलं लहान होती. त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा नव्हतीच. आपल्या दु:खाचा क्रूस आपणच आपल्या खांद्यावर घेऊन वाहिला पाहिजे, भावाने वहिनीची याच भावनेने शुश्रूषा केली. हा काळात तो एखाद्या स्थितप्रज्ञासारखे जीवन जगत आला.

अशाप्रकारे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आमच्या भावाने शाळाकॉलेजात असतानाच वाङ्मयीन प्रांतात प्रवेश केला, असंख्य कविता व कथा लिहिल्या. अनेक विषयांवर वृत्तपत्रीय लिखाण केले. पत्रकार म्हणून नोकरी, त्यानंतर स्वत:ची प्रिंटिंग प्रेस सुरू करून प्रकाशन व्यवसायास आरंभ. पाठोपाठ वसई परिसरासाठी साप्ताहिक सुरू केले व ते गेली ४६ वर्षे नियमित प्रकाशित करण्यात येत आहे. त्यानंतर केजी व पहिल्या इयत्तेपासून दहावीपर्यंत स्वत:च्या इमारतीत सुसज्ज शाळा सुरू केली. याशिवाय वसईच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रांत सक्रिय भाग घेणे त्याचे चालूच असते. भावाची, अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा… या ध्येयाने झपाटून  विभिन्न क्षेत्रांत केलेली देदीप्यमान कामगिरी पाहता, आमच्या पुढील पिढीसाठी भावाची ही कामगिरी दंतकथा नक्कीच बनणार आहे, याबद्दल शंका नाही. त्यास हे कार्य करण्यासाठी सुदृढ आरोग्य  लाभो ही सदिच्छा.