- रेमंड मच्याडो, होळी – ८६६८६३९९८९
लेखक व कवी यांच्या सृजनशीलतेला निसर्गातील सुष्टीसौंदर्य, बरेवाईट प्रसंग, व्यक्तिगत नातेसंबंध, परिसरातील व पर्यावरणातील घडामोडी, इत्यादी गोष्टी साहित्यनिर्मितीसाठी सतत खतपाणी पुरवत असतात. कोणतीही कला कलाकाराच्या प्रतिभावंत हृदयातून प्रसवते व ती संवेदनशील प्रेक्षकांच्या, रसिक-श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडते. उत्तम प्रभावी साहित्य उदात्त विचारमंथनातून निपजलेले असते. सामान्य वाचकांच्या ज्ञानामध्ये ते प्रचंड भर घालते. आणि त्यातील अनेकांना ते त्यांच्या आयुष्याला दिशा देणा-या दीपस्तंभासारखे ठरते. साहित्याद्वारे आपण आपले हक्क जाणू शकतो व ते गाजवू शकतो.
समाज घडविण्यासाठी साहित्याचा उपयोग अपरिहार्य आहे. प्रसार माध्यमातून सहिष्णू व सर्वसमावेशक जनहितार्थ जनमत तयार करण्यासाठी साहित्य अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावते. शिक्षण आणि साहित्यातून माणसांच्या जाणिवा जागृत होतात व त्यामुळे त्यांचे परिवर्तन होऊन त्यांतील शक्तिकेंद्रे विकसित होतात. अशाप्रकारे साहित्याद्वारे विकसित झालेल्या व्यक्ती पुढे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतात. साहित्यिक आपल्या प्रतिभावंत निर्मितीद्वारे सामान्य नागरिकांसाठी एक आदर्श बनतात. त्यातून सुशिक्षित झालेल्या व्यक्ती स्वत:च्या, समाजाच्या, पर्यावरणाच्या, देशाच्या व निसर्गाच्या संवर्धनाविषयी कार्यशील बनतात.
महाराष्ट्रातील मुंबई शहराच्या कुशीत वसलेल्या वसई तालुक्यातील लोकांची मातृभाषा मराठी असून तिच्या उदरातून जन्मलेल्या भूमीपुत्रांना तिने आपल्या छातीवर पेलून बाळकडू पाजले. त्यातून निपजलेल्या साहित्यिकांची किर्ती आज देशात व जगातही गाजत आहे. अनेक प्रतिभावंत ख्रिस्ती साहित्यिक आपल्या लेखणीतून सकस साहित्याची निर्मिती करत आहेत. वसईतील अनेक सामाजिक चळवळींमध्ये जनमत तयार करण्यासाठी ह्या साहित्यिकांचे भरपूर योगदान लाभले आहे.
आज वसईमध्ये कादंबरी, कथा, ललित, आत्मचरित्रे व कविता संग्रह या साहित्य प्रकारांद्वारे भरपूर साहित्य निर्मिती होत आहे. त्याचप्रमाणे वसईत प्रसिद्ध होणारी अनेक खिस्ती नियतकालिके नवोदित कवी-लेखकांना आपली सृजनशीलता प्रकट करण्यासाठी वाव व व्यासपीठ देत आहेत. त्यात ‘सुवार्ता’ मासिक अग्रक्रमावर असून, ‘जनपरिवार’, ‘निर्भय आंदोलन’, ‘वसई टाइम्स’ व ‘कॅथलिक’ ही नियतकालिके गेली अनेक वर्षे वसईतील मराठी भाषक आम जनतेला साहित्यसेवा पुरवत आली आहेत. तसेच ‘गीत’, ‘खिस्तायन’, ‘संक्रमण’, ‘निर्मिती’ इत्यादी नाताळ वर्षांक आणि वसईतील प्रत्येक धर्मग्रामातून वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने प्रसिद्ध होणारे वर्षांक यांमधून पुष्कळ नवीन तरुण कवी-लेखकांना लिहिण्याची संधी उपलब्ध होत असते.
वसई मराठी खिस्ती साहित्य मंडळाच्या नावावरूनच काही जिज्ञासू व्यक्तिंच्या मनात वादळ उठू लागते की, साहित्य शुद्ध व प्रांजळ का असू नये, त्याला जात, धर्म व प्रांत असे निकष लागू द्यावे का? त्याला आमचे उत्तर आहे की, मराठी खिस्ती साहित्य ही संज्ञा ख्रिस्ती धर्मीय मराठमोळ्या साहित्यिकांनी लिहिलेल्या मराठी साहित्यास उद्देशून वापरलेली गेली आहे. इंग्रजी ही जागतिक भाषा असल्यामुळे आणि त्याला जाती धर्माचा किंवा वर्णाचा संदर्भ नसल्यामुळे तेथे खिस्ती इंग्रजी, हिंदू इंग्रजी किंवा आदिवासी इंग्रजी अशी वर्गवारी होत नाही. कारण प्रमाणभाषा म्हणून इंग्रजीचा सगळीकडे एकच दर्जा राखला जातो. काही देशांतील बोली इंग्रजी भाषेच्या उच्चारामुळे त्यास विशेषणे लावली जातात परंतु व्याकरणबद्ध लिखित इंग्रजी सगळीकडे एकच परिमाण वापरते. भारतात भाषेचा हा प्रश्न जसा गंभीर तसा संवेदनशीलही आहे, म्हणून त्यास सोपे कामचलावू उत्तर देणे रास्त होणार नाही.
साहित्यिक व साहित्यप्रेमी वाचक व श्रोते सोडले तर प्रचंड संख्येने सामान्य जनतेला मुळात साहित्य संमेलने कशासाठी भरवली जातात हा प्रश्न पडलेला असतो. अलीकडे आपण अनुभवले आहे की साहित्य संमेलनात साहित्य संकल्पनांबाबत चर्चा करण्याचे सोडून, साहित्यिक व्यक्तिगत वाद-विवादात गुंतलेले असतात. अशा संमेलनांमध्ये सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडून चिंतनात्मक मंथन करण्याऐवजी, मंडळाचे अधिकारी व आयोजक, ज्येष्ठ साहित्यिक व इच्छुक उमेदवारांचे अतिउत्साही कार्यकर्ते यांच्या दरम्यान् संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीतील एक ना अनेक कारणांमुळे वाद-विवाद होत असतात व एकमेकांची उणीदुणी चव्हाट्यावर आणली जातात. कार्यक्रमाच्या वेळी प्रत्यक्षात व्यासपीठावर नसले तरी पडद्यामागे काय महाभारत घडते त्याचा वृत्तांत आजच्या जासूसी पत्रकारितेद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचत असतो.
आज सर्वसाधारण प्रेक्षक व वाचकाला वाटते की ज्या उद्देशासाठी आद्य भाषिक संमेलने सुरू झाली त्याचे आजच्या आयोजकांना भान राहिलेले नाही. संमेलनामध्ये अनेक भाषतज्ज्ञ व विद्वान साहित्यिकांचा समावेश असतो आणि त्यांच्या योगदानाने भाषेचा विकास व विस्तार होण्यास मदत होते; त्यांचे मार्गदर्शन भाषेच्या पुढील वाटचालीची दिशा नक्की करण्यासाठी उपयोगी पडते. पंरतु अगोदरच संमेलन कुठे भरवायचे, कोणत्या उमेदवाराला पसंती द्यायची, मतदारांनी नवीन संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीबाबत जातीवर्णावरून व अलीकडे राजकारणावरून कोणत्या लॉबीशी संलग्न राहायचे, अशा अन्य कारणांवरून संमेलनाचे वातावरण अगोदरच गढूळ झालेले दिसते.
आज बहुतांश कवी-लेखक स्वतःच्या साहित्यिक यशप्राप्तीसाठी इतके मग्न व स्वकेंद्रित झालेले असतात की मान वर करून इतर नवोदितांना साहाय्य करण्यासाठी त्यांच्याकडे अवसर नसतो. प्रतिभेची देणगी कमीजास्त प्रमाणात सर्वानाच मिळालेली असते परंतु तिला जोपासणे, तिचा विकास करणे आणि त्यातून प्रसवलेल्या निर्मितीचे समाजापुढे सादरीकरण होणे व तिचे रसग्रहण होऊन तिला दाद व प्रसिद्धी मिळणे तितकेच महत्त्वाचे असते. या सर्व कारणांमुळे आज असा प्रश्न पडतो की संमेलनामुळे साहित्याला मिळालेली सामाजिक प्रतिष्ठा, साहित्य निर्मितीसाठी मिळणारे पुरस्कार, मान-सन्मान आणि त्यामुळे निर्माण झालेल्या साहित्यिक चढाओढी व स्पर्धा खरोखरच साहित्याच्या सर्वांगीण उद्धारासाठी पोषक ठरतात का? की त्या मारक ठरत आहेत, हे जाणून घेणे व त्यावर उपाययोजना करणे आज आवश्यक झाले आहे!
साहित्य संमेलनांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहाताना आपोआपच नजरेसमोर येते की प्रेक्षकांमध्ये अधिकतम साहित्यप्रेमी, पोक्त वाचक व श्रोते, पूर्णसिद्धी किंवा अर्थसिद्धी पावलेले कवी-लेखक हजेरी लावतात. अनेक निवृत्ती पावलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन दिवसीय साहित्य संमेलनाला हजर राहिल्याचे मित्रमंडळीला अभिमानाने सांगण्याची संधी प्राप्त होते म्हणून विरंगुळ्यासाठी येथे आलेले असतात.
काही लोक, विशेषकरून ‘संमेलन-टू-संमेलन’ यामध्ये नेहमी भेटणारे व परिचय झालेले नवे मित्र-मैत्रिणी सदर संमेलनात हमखास भेटतील या इर्षेने आलेले असतात. हे आम्ही जबाबदारीने व्यक्त करतो, कारण अनेक ठिकाणी अनेक सत्रे चालू असतात व बरेच अभ्यागत इतस्ततः फिरत असतात. किंवा पाठीमागे घोळक्याने गप्पागोष्टी करत उभे असतात. अगदी थोडेच लोक किंवा एखाद्या सत्रात पूर्णवेळ बसून सहभागी होतात. प्रेक्षकांवरून नजर फिरवताना किंवा बुक-स्टॉलमध्ये फेरफटका मारताना किंवा भोजनालयाच्या ठिकाणी युवा पिढीचे दर्शन बिलकुल घडत नाही.
ज्या प्रमाणात मराठी संख्या वाढते आहे त्या प्रमाणात मराठी कवी-लेखक व साहित्यप्रेमी यांची वाढ होतेय का यासंबंधी साहित्य व संस्कृती मंडळाने सर्वेक्षण करणे अगत्याचे ठरले आहे. आजचा तरुणवर्ग साहित्य संमेलनांकडे का आकर्षित होत नाही याची कारणे शोधणे गरजेचे आहे. त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसा वाव दिला जातो का? युवा साहित्यिकांना साहित्य निर्मितीबद्दल पुरेशी प्रेरणा व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यांच्यातील नवनवीन साहित्य प्रवाहांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घेतले गेले पाहिजे. साहित्याव्यतिरिक्त इतर प्रलोभने त्यांना अधिक आकर्षित करतात आणि सोशल मिडियामुळे त्यांचे जीवन अधिक गतिमान झाले आहे आणि त्यामुळे त्यांना साहित्याकडे लक्ष देण्यास रस वाटत नाही.
ही प्रसारमाध्यमे आजच्या युवापिढीला क्षणभंगुर सुखप्राप्तीकडे ओढतात. त्याचबरोबर पारंपरिक साहित्याद्वारे मिळणारी मूल्याधिष्ठित सांस्कृतिक व सामाजिक गुणवत्तेची पकड ढिली होत गेल्यामुळे सामाजिक व नैतिक मूल्ये एकदमच निसटून रसातळाला जात आहेत. युवापिढीच्या इत्यादी प्रश्नांवर संमेलनाच्या एकातरी सत्रात चर्चा घडवून त्यावर उपाय शोधणे काळाची गरज आहे. आजच्या तरुण वगनि सहित्य संवर्धनाची धुरा सांभाळण्याची तयारी सुरू केली नाही तर मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता वाटणे क्रमप्राप्त ठरते!
आधुनिक जीवनशैलीमध्ये वाढणा-या युवापिढीचा मातृभाषानिष्ठेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे. त्यालासुद्धा अनेक कारणे आहेत. इंग्रजी ही जागतिक ज्ञानभाषा असल्यामुळे मराठी शाळा बंद पडत आहेत आणि इंग्रजी शाळांचे भरपूर पीक उगवले आहे. गेल्याच आठवड्यात वृत्तपत्रात बातमी वाचली की मुंबईमधील शाळांचे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्यात येणार, म्हणजे मराठीची अधिकृत गळचेपी होणार!
त्यात राजकारण्यांनी व भांडवलशहांनी आपल्या राजकीय व आर्थिक शक्तीचा फायदा उठवून परदेशांतील ब्रँडेड शिक्षणसंस्थांच्या शाखा आपल्या शहरात व नगरात आयात केल्या आहेत. मध्यम व उच्चमध्यम वर्गातील कटुंबीय आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी अशा इंपोर्टेड शाळांसमोरही ‘अॅडमिशन’साठी रांगा लावत आहेत. आंतरधर्मीय किंवा आंतरभाषिक पालक असलेल्या कुटुंबातील पाल्याचा जेव्हा भाषानिष्ठेचा प्रश्न उद्भवतो, तेव्हा तोडगा म्हणून पती-पत्नी दोघांना अवगत असलेल्या इंग्रजी भाषेला प्राधान्य दिले जाते. घरातील वातावरण इंग्रजाळते व पाल्यदेखील आंतरराष्ट्रीय रिंगणात उतरण्यास तयार होते. परंतु अशा परिस्थितीत मातापित्याच्या दोन्ही मातृभाषांची अखंडता तुटली जाते. आजचे तरुण-तरुणी अशा साहित्यिक व सामाजिक सद्यःपरिस्थितीत अडकलेले असताना, त्यांना साहित्य संमेलनापासून काही मिळण्याची आशा किंवा गरज नसेल तर ते तिकडे कशासाठी फिरकतील?
भावी मराठी साहित्य संमेलनांमधून भाषेविषयी उपरोल्लिखित समस्या आणि अडचणी यांवर रास्त चर्चा व परिसंवाद घडवून उपाय शोधले गेले नाहीत आणि सद्य:परिस्थितित सुधार केला नाही तर विविध प्रकारच्या व ठिकाणच्या साहित्य संमेलनावर करदात्यांची शासनाद्वारे केली जाणारी लाखो रुपयांची रक्कम नक्कीच इतर लोकोपयोगी उपक्रमांसाठी वापरता येईल यात दुमत नसावे!