- फ्रान्सिस आल्मेडा सर, निर्मळ, वसई
सगळे धर्म आपल्या धर्मग्रंथातील लिखित शब्द हे देवाचे शब्द आहेत असे म्हणतात. बायबल, कुराण आणि इतर सर्व धर्म ग्रंथांची भाषा अशीच असते की, तिच्यात कोणताही बदल होऊ शकत नाही. त्यामधील सर्व शब्द हे देवाकडून किंवा देवाच्या प्रेरणेने आलेले आहेत असे मानल्यामुळे ते पवित्र असून त्यामध्ये कोणतीही चूक असू शकत नाही म्हणून कोणताही बदल देखील करता येत नाही. प्रत्येक धर्मग्रंथांची भाषा मात्र ज्या ठिकाणी आणि ज्या काळात धर्माची स्थापना झाली त्या स्थळ काळातील भाषाच असते. देव एकच असला तरीही तो तेथील लोकांना समजावे म्हणून वेगवेगळ्या भाषेत बोलत असेल हे शक्य आहे परंतु त्यातील विचार मात्र वेगवेगळे का असावेत हा प्रश्न आहे.
धर्मग्रंथांमध्ये ज्या गोष्टींची चर्चा केलेली असते त्यामध्ये मानवाला पडणाऱ्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे असतात. हे विश्व कसे निर्माण झाले? सृष्टीची रचना कशी व कोणी केली? सृष्टीतील वेगवेगळ्या घटना कशा घडतात? सजीव सृष्टी आणि मानवाची निर्मिती कशी आणि का झाली? या प्रश्नांच्या उत्तरात देव हा कर्ता असतो. मानव ही त्याची सर्वश्रेष्ठ कृती असते. अर्थात देव जरी कर्ता असला तरी, या प्रश्नांची उत्तरे ही त्यावेळी प्रचलित असलेली माहिती आणि मानवी कल्पना यांच्या आधारे दिलेली दिसतात. काही धर्मग्रंथ सृष्टीमधील जीवन चक्र एका योनीतून दुसऱ्या योनीमध्ये जाण्याचे वर्णन करतात. त्यामुळे सर्व सजीव सृष्टी ही एक आहे हे दाखवले जाते आणि आज मानव असलेला प्राणी उद्या दुसऱ्या प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे सर्व सृष्टीबद्दल आत्मीयता निर्माण होऊ शकते. यातूनच पूर्व जन्माच्या पाप-पुण्याच्या कल्पना मांडता येतात. अर्थात सृष्टीची निर्मिती किंवा पूर्वजन्माची कल्पना या सर्व आधार नसलेल्या काल्पनिक गोष्टी आहेत.
देवाचा शब्द म्हणून धर्मग्रंथामध्ये काही नीतीतत्वे देखील दिलेली असतात. यामधील काही नीतितत्वे सर्व मानवजातीला उपयोगी पडतील अशी असतात, उदाहरणार्थ एकमेकांवर प्रेम करणे, शेजाऱ्यावर प्रेम करणे, अडचणीत असलेल्यांना मदत करणे वगैरे. काही नीतितत्वे मात्र स्थळकाळाशी संबंधित असतात. एका पुरुषांनी अनेक स्त्रियांशी लग्न करणे किंवा एका स्त्रीने अनेक पुरुषांशी लग्न करणे काही ठिकाणी प्रचलित आहे. काय खावे प्यावे, कसे कपडे परिधान करावेत याविषयी वेगवेगळी नितीतत्वे वेगवेगळ्या धर्मात आहेत. ही सर्व नितीतत्वे लोकांना एकमेकांशी बांधून ठेवण्यासाठी व समाजाची धारणा घडवून आणण्यासाठी त्या त्या काळात उपयोगी ठरली असावीत. ही भाषादेखील त्यावेळच्या जाणत्या लोकांची भाषा होती, ती देखील देवाची भाषा नव्हे.
धर्मग्रंथ हे आपल्याला आजाराच्या आणि संकटांच्या भीतीपासून मुक्त करण्याचे आश्वासन देतात. पूर्ण विश्वास ठेवला असता श्रद्धेमुळे तुम्ही बरे व्हाल किंवा संकटमुक्त व्हाल असे सांगितले जाते. अर्थात ह्या आश्वासनावर शंका घेतली तर त्यांचा परिणाम होत नाही ही अट असते. त्यामुळे खरेखोटे काहीच तपासता येत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे धर्मग्रंथ आत्म्याचे अमरत्व किंवा पुनर्जन्म आणि शेवटी मोक्ष याबद्दलही आश्वासन देतात. या सर्व गोष्टी लोकांना सभोवतालच्या अस्थीर परिस्थितीमध्ये धीर देतात. मृत्यूची भीती कमी करतात. परंतु त्यांच्यातील सत्यता पडताळून पाहता येत नाही. तसेच सगळ्या धर्मांमध्ये या आश्वासनांविषयी एक वाक्यता आढळत नाही. त्यामुळे धर्मग्रंथ हे देवाची भाषा असे समजणे तर्काला पटत नाही.
देवाचा शब्द किंवा देवाची खरी भाषा कोणती? एखाद्या चित्रकाराला त्याच्या चित्रावरून, संगीतकाराला त्याच्या संगीतावरून आणि शिल्पकाराला त्याच्या शिल्पकृतीवरून आपण ओळखतो आणि समजून घेऊ शकतो. तसेच देवाला समजण्यासाठी त्याने निर्माण केलेली चराचर सृष्टी समजून घेणे आवश्यक आहे. ही ईश्वरनिर्मित सृष्टी समजून घेण्याचे काम विज्ञान करते त्यामुळे विज्ञानाची भाषा हीच खरी देवाची भाषा होय. ती भाषा जगभरातील विज्ञान जाणणाऱ्या सगळ्यांना समजते. तसेच त्या भाषेचा उपयोग करून मानवाच्या सुखात भर घालता येते. पाण्यात पदार्थ का तरंगतो हे आर्किमिडीजने समजून घेतले आणि तरंगणाऱ्या पदार्थाचा नियम तयार केला, त्यामुळे आपल्याला समुद्रावरून प्रवास करता येणे शक्य झाले. झाडावरून खाली पडणारे फळ, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र आणि सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी या सगळ्यांना जोडणारे गुरुत्वीय बळ न्यूटनने समजून घेतले. त्या गुरुत्वाकर्षणाचा नियम वापरून आपण पृथ्वीच्या बाहेर अवकाशात जाऊ शकलो. सूर्यमालेचे रहस्य समजून घेऊ शकलो. सूक्ष्म जीवजंतूच्या संशोधनातून पाश्चर व जेन्नर सारख्या शास्त्रज्ञांनी रोगावरील उपाय आणि प्रतिबंधक लसी शोधल्या. देवाची भाषा समजून घेण्यातील सामर्थ्य विज्ञानामुळे आपल्याला कळले.
निसर्गातील विविध गोष्टीचा अभ्यास करून देवाची भाषा समजून घेणारे आणि त्याचा उपयोग करायला शिकवणारे शास्त्रज्ञ ही खरंच देवाची माणसे आहेत. जगात पाण्याची वाफ होत होती परंतु त्या वाफेवर चालणारे इंजिन तयार करून त्याला माणसाच्या सेवेसाठी वापरणे ही गोष्ट विज्ञानाने शक्य केली. विज्ञानपूर्व काळात माणसे इतर प्राण्यांचा उपयोग आपली कामे करून घेण्यासाठी करीत होती. शेती करण्यासाठी बैल, दुधासाठी गाय-म्हैस, प्रवासासाठी घोडा इत्यादी प्राणी वापरले जात होते. विज्ञानाने निर्जीव वाफेचे इंजिन कामाला लावले. नंतर पेट्रोलवर चालणारे इंजिन आले. विजेचा शोध लागल्यावर विजेवर चालणारी मोटार आली. विजेचे दिवे आले. विविध प्रकारची यंत्रे विजेच्या साह्याने चालवता येऊ लागली. वैज्ञानिकांनी अखंड अभ्यास करून देवाची भाषा अधिकाधिक समजून घेतली, सृष्टी वाचली आणि त्या भाषेचा उपयोग करून मानवाचे सामर्थ्य कैक पटीने वाढवले. म्हणून वैज्ञानिक हेच खरे तपश्चर्या करणारे ऋषी व संत आहेत.
धर्म संस्थापक किंवा धर्माचे आचरण करणारे संत यांची आपण पूजा प्रार्थना करतो. त्यांच्याकडे सुखसमृद्धी आरोग्य मागतो. देवाचा कोप झाल्याने आजार येतात म्हणून त्याला बळी देणे, त्याची पूजा करणे, भजन पूजन करणे हे हजारो वर्षे आपण करीत आलो. परंतु त्यामुळे रोगराई नाहीशी झाली नाही, आपले आयुर्मान वाढले नाही, जीवनात सुखसमृद्धी आली नाही. परंतु वैज्ञानिकांनी सर्व चराचर सृष्टीचा अभ्यास सुरू केला आणि सर्व आजार व संकटे यावर मार्ग सापडू लागले, सुखसमृद्धीची साधने निर्माण झाली. हजारो वर्षाच्या पूजा-प्रार्थनेने ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत, त्या विज्ञानाने शक्य करून दाखवल्या. केवळ जमिनीवरूनच नव्हे, तर समुद्राच्या पाण्यावरून आणि समुद्राच्या पाण्याखालून प्रवास, आकाशातून प्रवास आणि आकाशापलीकडे प्रवास विज्ञानामुळे शक्य झाला. या सर्व गोष्टीसाठी देवाची विज्ञानाने शिकवलेली भाषाच समजून घ्यायला हवी. शास्त्रज्ञांची पूजा अर्चा किंवा भक्ती करायची गरज नाही तर त्यांनी शोधून काढलेली भाषा अभ्यासून आपल्याला सुखी होता येते. डॉक्टर विज्ञानाच्या भाषेचा अभ्यास करून आरोग्यासंबंधी ज्ञान मिळवतात आणि आपल्याला बरे करण्यासाठी वापरतात. तंत्रज्ञ विज्ञानाच्या अभ्यासातूनच वेगवेगळी यंत्रे उपकरणे तयार करतात आणि आपल्या सुखसमृद्धीत भर घालतात. विज्ञानाची भाषा शोधणारे शास्त्रज्ञ हे खरे संत आणि त्याचा अभ्यास करून मानवाला सुखी करणारे हेच आधुनिक काळातील ऋषीमुनी होय.
विज्ञानाने निर्जीव सृष्टीला देखील सजीव प्राण्यांप्रमाणे काम करायला लावले आहे. वाफेच्या इंजिनापासून विजेच्या यंत्रापर्यंत सर्व निर्जीव उपकरणे आपल्याला सजीवांसारखी मदत करतात. आता कम्प्युटरच्या रूपाने, केवळ आपली शारीरिक कामेच नव्हे तर मानसिक कामे देखील निर्जीव पदार्थाकडून होऊ लागली आहेत. लेखन-वाचन करणे, गणिते सोडवणे, चित्र काढणे व संगीत तयार करणे अशी कामे तर कम्प्युटर करतेच, परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपल्यासारखा विचारदेखील करायला कॉम्प्युटरला शिकवले आहे. सर्व चराचर सृष्टी हीच देवाचे रूप आहे. त्याची वेगळी भाषा नाही. त्यासाठी देवाची वेगळी आराधना करण्याची गरज नाही. सर्व सृष्टीचे, आपल्या मानवासह अस्तित्व म्हणजेच देव आहे. आपल्यामधील दैवी सामर्थ्याने देवाचे सर्वसृष्टीतील कर्तृत्व समजून घेणे हीच देवाची खरी आराधना होय!