एक शोकांतिका
- सुहास बिर्हाडे, पत्रकार
(मीरा रोड मध्ये राहणार्या मनोज साने या विकृत इसमाने त्याची ‘लिव्ह इन पार्टनर’ सरस्वती वैद्य हिची हत्या केल्याचे प्रकऱण देशभर गाजले. कारण साने हा सरस्वतीची हत्या करून थांबला नाही तर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे करवतीने तुकडे केले आणि ते कुकरमध्ये शिजवले होते… सरस्वती वैद्य ही अनाथ होती आणि विकृत सानेमुळे तिचे आयुष्य एक शोकांतिका बनून गेले.)
२०१४ ची घटना. मनोज साने नावाचा एक इसम बोरीवली येथील रेशन दुकानात नेहमीप्रमाणे बसला होता. तो या दुकानात काम करत होता. दुपारच्या वेळी एक मुलगी पत्ता विचारत आली. ती कामाच्या शोधात होती. त्या मुलीचे नाव होते सरस्वती वैद्य. तेव्हा ती २२ वर्षांची होती. सानेने तिला पाणी दिलं आणि तिची विचारपूस केली. वडिलधारी व्यक्ती आपुलकी दाखवतोय यावर तिचा विश्वास बसला. सरस्वती अनाथ होती. तिचे बालपण अहमदनगरच्या एका अनाथाश्रमात गेले. तिच्या ४ बहिणी होत्या. त्या देखील अनाथाश्रमातच मोठ्या झाल्या. सरस्वती सर्वात धाकटी. मोठ्या बहिणींची लग्न झाले ती देखील जेमतेम साधारण घरात. शिक्षणही पूर्ण झाले नाही. त्यातच एका बहिणीने परिस्थितीमुळे आत्महत्या केली. अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय हा सरस्वतीपुढे प्रश्न होता. काही वर्ष आळीपाळीने बहिणींकडे काढली. त्या तरी किती दिवस ठेवणार. पोटापाण्यासाठी नोकरी हवी होती. नोकरीच्या शोधात ती आली होती.
सानेने तिला सहानभूती दर्शवली. मी एकटा राहतो, तू माझ्या सोबत रहा असे तिला सांगितले. साने मोठा असल्याने सरस्वती त्याला मामा म्हणत होती. सानेने तिचा विश्वास संपादन केला होता. कामाची गरज होती आणि राहण्यासाठी घर हवं होतं. त्यामुळे मग काही दिवसांनी सरस्वतीने सानेसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
मनोज साने (५६) हा मुळचा बोरिवली येथे राहणारा. बोरीवलीच्या बाभई नाका येथील वडिलोपार्जित घरात तो भावंडासह रहात होता. त्याने लग्न केलं नव्हतं. त्या जागेवर २००८ मध्ये त्याच्या कुटुंबियांनी ‘साने रेसिडेन्सी’ नावाची इमारत बांधली होती. प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट मिळाले. तेथे त्याचे भाऊ राहू लागले. मात्र अविवाहित असणार्या मनोज सानेने आपली सदनिका भाड्याने दिली. नंतर तो मीरा रोड येथे रहायला गेला. बोरीवली येथील घराचे त्याला मासिक ३५ हजार रुपये भाडे येत होते. साने बोरीवली येथील एक शिधावाटप केंद्रात काम करू लागला. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालत होता. त्याला सरस्वती भेटली. मग ते दोघे मीरा रोडच्या गीत नगर मधील गीता दिप इमारतीच्या ७व्या मजल्यावर भाड्याच्या सदनिकेत राहू लागले.
पण एक दिवशी व्हायचं तेच झालं… ज्याला मामा म्हणाययी त्या सानेचं वेगळं रुप दिसलं… सरस्वती सानेच्या वासनेची ती शिकार ठरली. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. पण ती ठरली अनाथ. जाणार तरी कुठे. तिचा नाईलाज झाला. ज्याला वडीलधारी समजून आश्रयाला गेली त्यानेच तिला वासनेचं शिकार बनवलं होतं. सानेने मग पुढची खेळी केली. आपल्यात वयाचं अंतर असलं तरी आपण लग्न करून पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहू असं सानेने सरस्वतीला सांगितलं. तिची समजूत काढण्यासाठी सानेने तिला तुंगारेश्वर येथील मंदिरात नेऊन लग्न केलं. अर्थात त्या बेकायदेशीर लग्नाला काही अर्थ नव्हता. सरस्वतीपुढे पर्याय नव्हता. एका थोराड वयस्कर व्यक्तीसोबत तिला पत्नी बनून रहावं लागलं.
सरस्वतीने सानेसोबत लग्न केलं ही बाब जेव्हा सरस्वतीच्या बहिणींना समजली तेव्हा त्यांनी या नातेसंबंधाला विरोध केला होता. मात्र अनाथ सरस्वतीकडे शिक्षण, नोकरी किंवा आधार देणारे कुणी नसल्याने तिला नाईलाजाने सानेसोबत रहावे लागले होते. पण दोघांमध्ये असलेलं वयाचं अंतर आणि ज्याला मामा हाक मारते त्याला पती कसं दाखवणार? त्यामुळे हे नातं घराच्या चार भिंतीतच राहिलं आणि लोकांसाठी ते मामा-भाची ठरले. तिने स्वखुशीने हे ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चे नाते स्विकारले नव्हते. तिला असे काही नाते असते याची कल्पना देखील नव्हती.
——-
अनाथाश्रमात वाढलेल्या सरस्वतीचे ऋणानुबंध अनाथाश्रमातील मुलांशी जुळलेले होते. अनेकदा ती या आश्रमात जाऊन मुलांना खाऊ वस्तू द्यायची. अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं आणि अनाथाश्रमातील मुलांना आधार देण्याचं काम करायचं हे तिचं स्वप्न. पण सानेकडून तिला कसलाच आधार मिळाला नाही. ना नात्याला नाव मिळालं, ना आर्थिक स्थैर्य. लग्न करून सुखाचा संसार फुलवावा हे प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असलेले स्वप्नही तिला पूर्ण झालं नाही. तेथूनच दोघांचे मतभेद आणि वाद होऊ लागले. सरस्वती वैद्य एकाकी आयुष्य जगत होती. सरस्वतीला घरातून बाहेर पडण्यास बंदी होती. ती कुणाच्याच संपर्कात नसायची. ती साने व्यतिरिक्त कुणाला ओळखत नव्हती की तिला कुणी ओळखत नव्हतं. तिच्या बहिणींना साने संपर्क करू देत नव्हता. ती दिवसभर घरातच असायची. या काळात ती ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाली होती. तिचा मोबाईल सानेच वापरायचा.
मनोज साने ‘हॅजल’, ‘ओके क्युपिड’ अशा डेटिंग ॲप वर सक्रिय होता आणि त्यातून तो अनेक मुलींच्या तो संपर्कात होता. हे समजल्यामुळेच सरस्वती आणि मनोज साने यांच्यात भांडण झाले होते. मनोज साने हा सेक्सच्या आहारी गेला होता. तो सतत अश्लील संकेतस्थळांना भेटी देत असायचा. त्याच्या मोबाईल मध्ये अनेक अश्लील छायाचित्रे जतन केल्याचे आढळून आले होते.
माणुसकीला काळीमा फासणारे क्रूर कृत्य
सतत होत असलेली भांडणं यामुळे सानेने तिची हत्या करण्याची योजना बनवली होती. आदल्या दिवशी दुकानातून विद्युत करवत आणि किटनाशक आणून ठेवले होते. त्यानंतर गुगलवर जाऊन दुर्गंधी येण्यासाठी किती वेळ लागेल याची माहिती घेतली होती. ३ जून २०२३ रोजी ताकातून तिला किटकनाशक प्यायला दिले. काही वेळातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर सानेने तिच्या मृतदेहाची छायाचित्रे काढली. यानंतर त्याच्या कौर्याला सुरवात झाली. सानेने विद्युत करवतीने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. मृतदेहाचे हाडं आणि मांस वेगळे करण्यासाठी तो कुकर मध्ये शिजवत होता. त्यानंतर सलग 4 दिवस तो मृतदेहाची विल्हेवाट लावत होता. जेवणासाठी बाहेर जाताना तो शिजवून वेगळे केलेले मांस नाल्यात टाकत होता. ४ थ्या दिवशी जेव्हा तो कुकरमध्ये मृतदेहाचे तुकडे शिजवत होता तेव्हा शेजाऱ्यांना जेव्हा दुर्गंधी आली. त्यांनी पोलिसांना बोलावले…
पोलीस आले तेव्हा साने इमारतीच्या खालीच होता. त्याला घेऊन पोलीस घरात गेले आणि थरकाप उडवणारे दृश्य दिसले. पोलिसांना घरात सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे सापडले. ते तुकडे कुकर, ३ पातेले आणि २ बादल्या भरून होते. नया नगर पोलिसांनी घटनास्थळावरूनच आरोपी मनोज साने याला अटक केली होती.
परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे आणि नया नगरचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी या प्रकरणाचा सखोल तपास करू लागले. चौकशीमध्ये साने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत होता. कधी मला दुर्धर आजार आहे त्यामुळे आमचे शारिरीक संबंध येत नव्हते तर मी नपुंसक झाल्याचेही पोलिसांना सांगत होता. साने बोरिवली येथील एका शिधावाटप दुकानात अर्धवेळ काम करत होता. तिथे त्याला पाच हजार रुपये पगार मिळत होता. बोरिवली येथील घराचे त्याला 35 हजार रुपयांचे घर भाडे मिळत होते. मात्र तो कर्जबाजारी झाला होता. सोसायटीचे थकीत मेंटेनन्स भरण्यासाठी त्याने कर्जही काढले होते.
पोलिसांनी मग सरस्वती वैद्य ज्या आश्रमात होती तिथून माहिती काढली. पोलिसांना घटनास्थळावरून पुरावे तर सापडले होते. पण हत्या कशी झाली ते उलगडत नव्हतं. यासंदर्भात सानेने केलेले दावे तपासण्यासाठी तसेच हत्या कशी केली ते शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक वैद्यकीय चाचण्या केल्या. नेमकी कशी केली याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यासाठी न्यायवैद्यक चाचण्या करून पुरावे गोळा करायचे आहेत. मात्र ती सोय महाराष्ट्रात कुठेही नसल्याने पोलिसांनी आता परराज्यातून तज्ञांचे पथक मागवले होते.
सरस्वतीची अशा प्रकारे हत्या झाली हे तिच्या बहिणींना वृत्तवाहिन्यांमधील बातम्यांतून समजले. तिच्या तीन बहिणींनी पोलिसांना संपर्क केला होता. पोलिसांनी त्यांचे जबाब घेतले आणि या प्रकरणात अनेक गोष्टी समोर आल्या. जेजे रुग्णालयात सरस्वतीच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले आणि शरीराचे तुकडे जुळविण्यात आले होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मृतदेह बहिणींच्या ताब्यात दिला होता. जेजे रुग्णालयातून मृतदेह मिळाल्यानंतर लगेचच रे रोड येथील स्मशानभूमीत तिच्या बहिणी, मोजके नातेवाईक आणि पंचांच्या उपस्थितीत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१२०० पानांचे दोषारोपपत्र
या प्रकऱणी नया नगर पोलिसांनी तब्बल १२०० पानांचे दोषारोप पत्र तयार करून ठाणे सत्र न्यायालयात सादर केले आहे. त्यामध्ये एकूण ६८ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यात विष, कटर, प्लास्टीक ज्या दुकानातून घेतले त्या दुकानदारांचे जबाब आहेत. शेजार्यांपासून न्यायवैद्यक कर्मचार्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. आरोपी मनोज साने याचे हत्येपूर्वी ६ महिन्यांपासून सरस्वती वैद्य बरोबर भांडण सुरू होते. त्यामुळे त्याने सरस्वतीला मारण्याची योजना बनवली होती. ताकामधून विष देऊन तिला मारले आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून विल्हेवाट लावली असे या दोषारोप पत्रात (चार्जशीट) म्हटले आहे. हत्या केल्यानंतर साने याने मृतदेहासोबत ३५ छायाचित्रे काढली होती. त्याचा मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून पोलिसांनी ती छायाचित्रे पुन्हा मिळवली आहेत.
मनोज साने याची पोलिसांनी मानसिक स्वास्थ तपासण्याची चाचणी केली होती. त्यात तो तंदुरुस्त होता. त्याला कसलाही मानसिक आजार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. साने याला एचआयव्हीची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. सुरुवातीला त्याने नपुंसक असल्याचा दावा केला होता. मात्र त्याची चाचणी करण्यास त्याने संमती दिली नव्हती.
साने सध्या तुरूंगात आहे. अनाथ आश्रमातून बाहेरच्या जगात आलेली सरस्वती एक सर्वसाधारण आयुष्य जगण्याचे स्वप्न बघत होती. पण तिच्या आयुष्याच्या एका वळणावर मनोज साने आला आणि तिचे आयुष्य शोकांतिका बनून गेले.
———————————–