जगावे का मरावे?

Die with dignity!

  • अतुल आल्मेडा, निर्मळ, वसई

एका रविवारी वर्तमानपत्र वाचत होतो. त्यावेळी एका नातेवाईकांचा फोन आला. आपला मित्र अचानक गेला. हा मित्र परिचित होता. वय जरी पंच्याहत्तरीच्या पलीकडे होते, तरी धडधाकट होता. म्हणून मी कळविण्याऱ्या मित्राला विचारले, असे  अचानक काय झाले? आत्महत्या केली. मी विचारात  गुरफटून गेलो. दोन प्रश्न समोर उभे ठाकले. माणूस आत्महत्या का करतो?  व्यक्तीला त्याचे जीवन संपविण्याचा हक्क असावा का? म्हणून हे चिंतन! 

आणि डेव्हिड म्हणाला : जोपर्यंत माझा मुलगा जिवंत होता, तोवर मी सारे उपासतापास केले, शोक केला. मला असे वाटत होते की, न जाणो, परमेश्वराच्या कृपेचा वर्षाव माझ्यावर होईल आणि माझा मुलगा जिवंत होईल. पण दुर्दैवाने माझा मुलगा जिवंत झाला नाही मग मी उपासतापास का करू? मी त्याला परत आणू शकेल का? मी त्याच्याकडे जाईन, पण तो… आता​ तो काही माझ्याकडे येणार नाही. (सॅम्युएल II १२: १९-२३) आयुष्यातील प्रसंग समजून घेण्यासाठी डेव्हिडचे वरील  भाष्य मदत करू शकते. तुम्ही धार्मिक असा वा नसा. सन १९००पर्यंत जागतिक सरासरी आयुष्यमान ४० वर्षापेक्षा जास्त नव्हते. तर त्यावेळी भारतीय सरासरी आयुष्यमान २७ वर्षाचं होतं.

आज सरासरी जागतिक आयुष्यमान त्यामानाने दुप्पटीपेक्षा जास्त आहे. तरीही माणूस आनंदी राहण्यासाठी धडपडत आहे. इपिक्युरिस या प्राचीन ग्रीस तत्त्वज्ञानीच्या म्हणण्यानुसार मृत्यूनंतर कुठलंच अस्तित्व नाही आणि आनंद मिळवणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश आहे.  जेरेमी बेंथम या ब्रिटिश तत्त्वज्ञानाने असे मत जाहीर केले कीं ‘जास्तीत जास्त व्यक्तीचं अधिकतम सुख’ हे मानवतेचे ध्येय असावे.  हे सुख दोन प्रकारचे आहे. एक शारीरिक आणि दुसरे मानसिक.

जैविक भाषेत सांगायचे झालं, तर आपल्या अपेक्षा आणि आपला आनंद या दोन्ही गोष्टी आपल्या शरीरातील जीवरसायनशास्त्र ठरवत असतं; आपली आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती नव्हे. नैसर्गिकरित्या आनंद किंवा दु:ख या भावना म्हणजेच आपल्या शरीरातील त्या त्या वेळच्या जैविक-रासायनिक क्रिया असतात.  ‘ सुख म्हणजे केवळ आनंददायक भावना आणि दु:खापासून सुटका’ आनंद आणि वेदना यांच्या पलीकडे काहीही चांगलं किंवा वाईट नाही. शरिरातील संप्रेरकांमुळे, मेंदूतील संदेशवहकामुळे आणि शरीरातल्या नसाच्या  पसरलेल्या जाळ्यामुळे या भावना आपल्याला जाणवत असतात. 

जैवरासायनिक प्रक्रियेत बदल करून आनंद मिळवता येतो. काही लोकांना प्रामाणिक मेहनत करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करून आनंद मिळतो. सुख लाभते. तर काही लोक मादक रासायनिक द्रव्यांचा डोस घेऊन फार सहजपणे हा आनंद लुटतात. पण इपिक्युरसनं हेही सांगितले आहे, कीं ‘आनंदाचा प्रमाणापेक्षा अधिक काळ पाठलाग केला, तर त्यामधून सुखापेक्षा दु:खंच हाती लागेल’.

आपल्या भारतीय गौतम बुद्धानं असे म्हटले आहे कीं ‘ सुखाचा शोध घेणे हेच दु:खाचं मूळ आहे’. माणसाने जीवनात सुखाची हाव धरलेली आहे. लोभ धरलेला आहे.  उदाहरणार्थ सायकलची  अपेक्षा पुर्ण झाली, की बाईक्सची अपेक्षा होते, ती झाली कीं चारचाकी अशी ही तृष्णा वाढतच जाते. बुद्धाने सांगितलेला हा आनंदाबाबतचा दृष्टीकोन जैवरसायनशास्त्राशी खुपसा जवळचा आहे. आनंद मिळवण्याचे मार्ग हे जगामध्ये गुन्हे घडण्याचे एक नंबरचे कारण आहे. आनंददायक संवेदना जितक्या चटकन निर्माण होतात, तितक्याच चटकन विरून जातात. 

बुद्धाच्या मते  माणसाने सुखद संवेदनासाठी असणारी आपली तहान नियंत्रित करून समाधानी जीवन जगणे हे उद्दिष्ट ठेवले पाहिजे. जन्माला उद्दिष्ट असेल/नसेल, पण जीवनाला उद्दिष्ट हवे. जीवनाचे उद्दिष्ट समोर असेल, तर मृत्यूची वेळ ठरविता येते. 

गेल्या काही काळांत जीवनविषयक अभ्यासाअंती, हे स्पष्ट झालेले आहे कीं मनुष्याच्या भावना ही दैवी किंवा आध्यात्मिक बाब नसून एक जैव-रासायानिक सूचनांचा क्रम (अल्गोरिदम) आहे. अल्गोरिदम म्हणजे विशिष्ट गणित नव्हे, तर ते गणित सोडवण्यासाठी लागणारी पद्धत आहे. एक उदाहरण पाहू. दोन संख्याची सरासरी हवी असेल, तर सोपी पद्धत त्या दोन संख्यांची बेरीज ही पहिली पायरी. दुसरी पायरी आलेल्या संख्येला दोनने भागा. ही प्रक्रिया म्हणजे अल्गोरिदम. 

जीवंत माणूस (प्राणी) एक प्रोग्राम आहे. भावना हा सस्तन प्राण्यांच्या जगण्यासाठी व पुनरुत्पादनासाठी एक जैव-रासायानिक आहे. माणसाचं जीवनाचे नियंत्रण करणारे अल्गोरिदम्स म्हणजेच माणसाच्या संवेदना, भावना आणि विचार. अल्गोरिदम्समुळे सर्व सस्तन प्राण्यांचं आणि पक्षांचे जीवन नियंत्रित केले जाते. माणसाचं घाबरणं, आनंदी होणं, दु:खी होणं, या सर्व संवेदना म्हणजे माणसाच्या मेंदूमधल्या चेतापेशींच्या प्रक्रिया आहेत.

थोडक्यात व्यक्तीचे जीवन म्हणजे अनेक अल्गोरिदम्सचा एक प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम योग्य वेळी बंद करण्याचा किंवा थांबविण्याचा हक्क व्यक्तीला असावा कीं नसावा? मला वाटते असावा. आपल्या मनातली खरीखुरी इच्छा ओळखणे सोपे नाही. जेव्हा आपण स्वतःलाच ऐकायचा प्रयत्न करतो, तेव्हा विचारांचा डोक्यात गोंधळ माजतो. कारण आपण करतो, तो विचार आपल्या दृष्टीने योग्य की अयोग्य एवढया पुरता संकुचित न ठेवता मानवतेच्या दृष्टीने योग्य की अयोग्य हे तपासणे आवश्यक असते. 

चांगलं व्यक्तीमत्व होण्यासाठी ‘स्वत:च़’ ऐकलं पाहिजे. माझ्या आतला खोलवरचा खराखुरा स्वत:चा आवाज आकलन होणे, क्रमप्राप्त आहे. हा आवाज ऐकून, त्याचे आकलन झाले, तर तसे वागणे मानवतेच्या दृष्टीने  हितकारक ठरू शकते. हा आवाज मग तो आपला जैविक रसायनिक प्रोग्राम बंद करण्याचा ही असु शकतो. 

भौतिक जीवन संपविण्याचा निर्णय. “Swarajya is not rule of the self, but rule on the self! स्वत:वर, स्वत:च्या इच्छांवर, स्वत:च्या वासनांवर, स्वत:च्या वर्तनावर मला नियंत्रण करता आलं पाहिजे. असे मा. गांधीजी म्हणत.” प्रायोपवेशन करून विनोबांनी १९८२ मध्ये देहत्याग केला. ज्ञानेश्वरांनी तरूण वयात, कार्य पुर्ण झाले आहे असे म्हणत समाधी घेतली. सावरकरांनी सुद्धा पंचाहत्तरी पुर्ण केल्यावर आत्मसमर्पन केले. ‘विचारी माणसाने मरणाची सवय करायला हवी’ असे प्लेटोचे मत होते. आध्यात्मिक साधनेची ती एक पायरी असू शकते. मृत्यूचा विचार, माणसाला जगण्याचे भान देते. आयुष्याचा प्रत्येक क्षण जाणिवपूर्वक जगायला शिकविते. एवढेच नाही तर मृत्यू स्विकारण्याची मानसिक तयारी होते. 

आत्महत्या गुन्हा नाही. आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न गुन्हा ठरतो. मृत्यू ही आत्महत्या, आत्मसमर्पण, दयामरण, प्रायोपवेशन की आणखीन काही; हे मृत्यूस्विकारणाऱ्याच्या मानसिक परिस्थितीवर ठरू शकते. मला या चिंतनातून असे वाटते कीं आमच्या मित्राने मृत्यूला स्विकारले. आनंदाने व चांगल्या उद्देशाने जीवन जगावे हे जीवनाचे सुत्र आहे. या दोन्हीपैकी  एकही  समोर नसेल, शिवाय जगण्यांत परावलंबित्व असेल, तर  मृत्यू स्विकारणे योग्य वाटतं. तुम्हाला काय वाटते?