तरीही वसंत फुलतो….

  •  मॅक्सवेल लोपीस, नंदाखाल, वसई.

नेहमीप्रमाणे आश्रमात मनःशांतीसाठी आलेल्या समुदायापुढे मी बसलो होतो. गायत्री मंत्राचे धीरगंभीर स्वरांत पठण चाललेले होते माझ्या वाणीतून निघणारे ते संस्कृत उच्चार टिपण्यासाठी प्रत्येक जण गात गातच मोठ्या आदरयुक्त जिज्ञासेने माझ्याकडे पाहत होते. एरव्ही डोळे मिटून दोन भृकुटींच्या मध्यभागी कुंडलिनी जागृतीचा शोध घेणारा मी, आज न जाणे का, परंतु डोळे मिटू शकत नव्हतो. समाधीअवस्थेतील परमानंदापेक्षा आज त्या समुदायात बसलेल्या १६-१७ वर्षाच्या एका सुकुमार मुलाकडे माझे लक्ष खिळले गेले होते. भोळ्या, निखळ नजरेने त्याचे ते पाहणे… ती ​गौरकांती… निष्पाप असे ते डोळे… आणि आणि ते रूप… अगदी तिच्यासारखे !

मी स्वामी प्रेमानंद. जो या सर्व लोकांना आपल्या जगतापेक्षा अन्य अशा जगतातला भासतो… संसारी जीवनाच्या धुमश्चक्रीतून दूर पळणारा एक तपस्वी… एक ब्रह्मचारी आणि ती ! हो, पारमार्थिकतेच्या शोधजगतात एकरूप होऊन आज किती वर्षे भरली ! पण आजदेखील हृदयाच्या कपाटात ती बंदिस्त आहे. अगदी प्राणज्योत म्हणावी तशी ! किंबहुना हृदयातील तीचे अस्तित्व आणि प्रत्यक्ष आयुष्यातील तीचे अनस्तित्व या भावनेतच जीवन, दुःख आणि परमानंद त्या तिहेरी नात्यातला अर्थ मला गवसला. आणि आज जसजसा मी त्या मुलाकडे पाहत आहे, भूतकाळाच्या काही सुखर आलापी मला आपल्याकडे खेचत आहेत. गायत्री मंत्राचे स्वर हळूहळू पुसट होत आहेत आणि कित्येक वर्षांअगोदर ऐकलेले ते गीत आज स्मृतीपटलातून पुन्हा ऐकू येत आहे. नव्या जीवनातील मंगलमय आत्म्याचा हात धरत मी आज पुन्हा त्या संसारी जगतात शिरकाव करीत आहे.

अहाहा! व्योमसरींच्या संततधारांचे भूमातेवरील नृत्य आठवावे अशा त्या संतूराच्या लयकारी त्यानंतर बासरीची ती हृदयभेदक धून संपता संपता महेन्द्र कपूरच्या मखमली आवाजातील त्यावेळी ऐकलेले ते गीत.

‘मैं अकेला बहुत देर चलता रहा,

अब सफर जींदगानी का करना नहीं..

जब तलक कोई रंगीन सहारा न हो

वक्त काफीर जवानी का कटना नही..

तुम अगर…’

‘सौंदर्या आणि मी, म्हणजे त्यावेळचे माझे नाव वसंत. आम्ही एका वर्गात शिकत होतो. अभ्यासात दोघेही हुशार, कधी तिचा प्रथम क्रमांक तर कधी माझा.. त्या अर्थाने आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धीच ! तिचे दिसणे अगदी नाजूक, कोमल नीरजाप्रमाणे आणि मी त्याच्या शुम्रतेला जणू आव्हान देणार्‍या हंसाप्रमाणे. त्यामुळे वर्गातील सर्व मुले आम्हाला एक-दुसयांची नावे ठेवत. स्पर्धेच्या त्या रिंगणात मला मात्र तिच्यावर प्रेम किंवा आकर्षण काय ते जडले नाही. एस.एस. सी  झालो. ती प्रथम आणि मी द्वितीय. काही पॉइंट्सचाच फरक पडला होता. सुरवातीपासूनच कलेची आवड असल्याने मी गेलो कला शाखेत आणि ती विज्ञान शाखेत.

कॉलेजची वर्षे कशी अगदी भराभर भरत होती. अभ्यासाच्या आणि कलासंवर्धनाच्या त्या काळात कुणाच्या प्रेमात पडण्याचा प्रसंग काही आला नाही. ग्रॅज्युएट झालो. चांगले ८०% गुण मिळवून महाविदयालयात प्रथम आलो होतो. आता अर्थशास्त्रात एमए करून पीएचडी करण्याचा विचार होता.

एक दिवस बाजारातून फेरफटका मारत होतो. अचानक पुढे सौंदर्या ! पाच वर्षांनंतर आज तिला इतक्या जवळून पाहत होतो. आजही अगदी तशीच दिसत होती ती. मला पाहून स्मीत करीत म्हणाली, ‘वसंत’.

तिची ती हाक ! नव्हे एका प्रेमानेच मला पहिल्यांदा घातलेली साद होती ती. त्यात स्पर्धत्वाचा कुठलाही रंग नव्हता. हृदयाचे ठोके जलद पडू लागले. मी स्वतःला सावरले.

“सौंदर्या. कशी आहेस ? हल्ली काय चालू…”

एकमेकांची विचारपूस करून आम्ही निघालो. त्या रात्री झोप काही येईना. सारा वेळ कानात तिची तो हाकच घूमत होती. डोळे मिटले तर पुढे तिचेच चित्र. मी स्वतःलाच प्रश्न विचारू लागलो, हेच असते का प्रेम ? त्यानंतर कितीतरी प्रेमपट पाहिले. बरीच युगुलगीते ऐकली. माझ्या मनातील प्रत्येक भावाला कलाकृतींच्या साच्यात उतरवल्याचे मला तेव्हा वाटत असे आणि मग समजून येई ‘हेच प्रेम आहे.’ 

त्यानंतर वारंवार सौंदर्यांची भेट घडू लागली. या त्या विषयांवर बोलून आम्ही पुढे जात असू. बोलण्याच्या भरात मी नकळत तिच्या डोळ्यांत पाही आणि मग तिथे देखील मला प्रेमाचेच संकेत दिसत. परंतु त्याविषयी बोलण्यास मी कधीही धजावलो नाही. एकदा एक अजबच स्वप्न मी पाहिले. मी जीवनमृत्यूच्या अगदी मध्यभागी उभा होतो… एक परमपुरुष मला सांगत होता, “तुझी आता आत्म्यातून परमात्म्याकडे, विनाशातून चिरंतन जीवनाकडे वाटचाल होत आहे.” सुरलोकीच्या देवदूतांप्रमाणे संथ उडत मी निघालो. इतक्यात एका विचाराने मी पुन्हा मागे फिरत त्या मंगल पुरुषास विचारले, ‘हे दिव्य पुरुषा, मी आता विश्वाच्या परमोच्च शक्तीमधे विलीन होण्यास निघालो आहे. मात्र त्या अगोदर मानवी जन्मात अनुत्तरित राहिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर मला दे. ज्याप्रमाणे माझे सौंदर्यावर प्रेम होते त्याप्रमाणे तिचे माझ्यावर प्रेम होते का ?’

तो म्हणाला, “होय, तिचे देखील तुझ्यावर तितकेच प्रेम होते.” ‘त्याच्या त्या उत्तराने माझी उडणारी पंखं जड झाली. माझ्याने उडवेना, स्वर्गलोकीची ती सारी सुखे मला फिकी वाटू लागली… पुढे काय घडले हे कळण्याअगोदर स्वप्न संपले होते. शेवटी स्वप्नच ते ! अर्थशून्य आणि पोकळ आश्वासनांची दुनियाच ती ! वास्तव नाही.

एकंदरीत कल्पनाविश्वात रंगवलेल्या त्या प्रेमसागरात मी चिंब चिंब झालो होतो. मात्र तरीही कळत नव्हते की हे काय होत आहे? हे नक्की परिपूर्ण प्रेमाच्या अस्तित्वाचे सूचक आहेत की क्रूर नियतीने आपल्यासोबत चालवलेला एकतर्फी प्रेमाचा खेळ आहे. परंतु काहीही असो ते दिवस सुखाच्या अनंत छटांनी, असंख्य रंगानी रंगलेले होते.

दरम्यान एक घटना घडली. एका फार मोठ्या संकटाचे सावट माझ्या कुटूंबावर आले. माझ्याहून सात वर्षे छोटा असलेला माझा भाऊ तेजस यास फुप्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. आजार इतका दुर्धर होता की त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता, ‘मृत्यू’. सर्व डॉक्टर्सनीदेखील या केसमधून हात काढून घेतले. कुटूंबात प्रचंड तणाव, दुःख, नैराश्य होते. विज्ञानाच्या शोधांची प्रत्येक दारे जेव्हा आमच्यासाठी बंद झाली, त्यावेळी माझ्या भावाचे जीवन घेऊन मी भक्तिच्या दारावर थाप दिली, कितीतरी तिर्थक्षेत्री मी फिरलो. प्रत्येक ठिकाणी मी पाही की विनंती घेऊन येणारा भाराक्रांती मनुष्य परमेश्वराकडे समर्पणाची भावना व्यक्त करतो आणि त्याची मनोकामना पूर्ण होते.

एकदिवस तेजस वेदनेने विव्हळत होता. त्याच्या त्या बालजीवाची ती स्थिती पाहून मला दुःखावेग आवरेना. मी घराच्या छताकडे धाव घेतली. त्या मुक्त वातावरणात विश्व व्यापलेल्या आणि तरीही नजरेपलिकडे वसलेल्या परमेश्वरापुढे मी पूर्णतः शरण गेलो. मनाच्या अगदी खोल खोल गाभार्‍यातून मी त्याच्याकडे आर्जव करू लागलो.

“हे ईश्वरा, जशी वाघास मासांची, एखाद्या माथेफिरूस रक्ताची आणि कुणा व्यसनी इसमास एखादया नशेची चटक असावी, तशी तुला माणसाच्या अश्रूंची, त्याला दुःख पीडेत पाहण्याची, त्याच्या वेदनेच्या किंकाळ्या पत्थराप्रमाणे ऐकत बसण्याची चटक लागली आहे. माझ्या या धारणेमुळे तू मला अल्लड, अज्ञानी, असमंजस, आगाऊ काहीही समज. परंतु तेजसच्या प्रत्येक वेदनेबरोबर माझी ही धारणा अधिकच दृढ होत चाललेली आहे. मात्र तरीही मूर्खाप्रमाणे मी तुझ्याच आश्रयाला आलो आहे. प्रभो, या आमच्या असहाय्यतेचा किती रे फायदा घेशील ? आजवर तुझ्याकडे मी कितीतरी नवस बोलले आणि आज माझ्या जीवनाचा एक हिस्सा, नव्हे हे जीवनच मी तुला दान करतो. माझ्या भावाला या आजारातून बाहेर आण. शारिरिक वेदनांच्या य मालिकेतून त्याची मुक्तता कर. शपथ माझ्या प्रेमाची, सौंदर्या… तिच्या संबंधाने रंगविलेल्या साऱ्या स्वप्नांना तिलांजली देऊन आयुष्यभर एक ब्रह्मचारी बनून तुझी सेवा करीन यापेक्षा अजून मी तुला काय देऊ?”… कितीतरी वेळ, अगदी अंधार पडेपर्यंत मी त्या एकांतात रडत होतो.

त्यादिवशी हृदयाला सतार बनवून जीवनदुःखाच्या प्रत्येक करांनी छेडलेल्या भावनांच्या तारांचे ते करुण स्वर अखेर त्या परमेश्वराच्या कानी गेले, माझी प्रार्थना ऐकली गेली. असाध्य रोगाच्या त्या विळख्यातून तेजस बाहेर आला. मोठमोठाले डॉक्टर्सदेखील नियतीचा तो दुर्मिळ चमत्कार पाहून स्तंभित झाले.

आता माझी अग्निपरिक्षा होती… दिलेल्या वचनास जागण्याची… फक्त अग्निची एक दाहक चिता पार करायची नव्हे तर सारे आयुष्य त्यावरुन मार्गक्रमण करायची. मी ‘ध्यानसाधना’ आश्रमाचे नाव ऐकून होतो. अशांततेच्या भोवर्‍यात अडकलेल्यांचा जीवनोद्धार करणाऱ्या या आश्रमात मी रुजू झालो, माझ्यासारख्या हुशार, तरुण, देखण्या मुलाने निवडलेला तो मार्ग पाहून समाजाने, कुटूंबाने अगदी तेजसनेदेखील मला वेड्यात काढले हो! इच्छाप्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा तो निर्णय वेडेपणाचाच नव्हता का? मात्र त्या वेडेपणाचे खरे कारण मला आणि त्या ईश्वराला तितके ठाऊक होते. परिस्थितीच्या दबावाखाली त्यानेच तर माझ्या मुखातून ती शपथ वदवून घेतली होती! खूप कठिण होते हे सर्व· कुटूंबाच्या उबदार छायेतून बाहेर येणे आणि या विश्वाला आपले कुटूंब समजून पिडीतांना आपल्या मायेची ऊब देणे… मनोरंजनाच्या आणि सुखोपभोगाच्या सार्‍या साधनांचा एकाएकी त्याग करून दिवसरात्र ‘सोहम्’ चा नाद ऐकणे… स्वतःच्या अंतःकरणातील स्पंदनांचा डाव चुकवून दुसऱ्यांच्या जीवनाम हसू पेरणे… आपल्या भाग्यात जे नाही त्यास भाग्य बनवणे… खरेच हे सर्व खूपच कठिण होते. आणि सौंदर्या। फक्त एक प्रेमप्रस्ताव टाकण्याइतपत अंतिम पायरीवर पोहोचलेल्या प्रेमापासून मी दूर जात होतो. चांदण्या रातीच्या तिसर्‍या प्रहरी मालकंस रागाच्या साक्षीने पडलेले एखादे स्वप्न म्हणावे तसेच सौंदयाचे माझ्या जीवनात येणे झाले. ले स्वप्न अखेर तुटूनच गेले…..’

अचानक मी भानावर आलो. गायत्रीचा जप संपून सर्वजण आपापल्या निवासकक्षाकडे निघालेले होते. त्या मुलाला मी खुणेनेच जवळ बोलावले.

“कुठून आलास बाळा?”

“रत्नागिरीहून” अत्यंत शुक शब्दात तो बोलला.

“नाव काय तुझे?”

‘माधव!

“अरे माधव, तुला माहित नाही, मी देखील मुळचा रत्नागिरीचाच !”

“माहित आहे. तुमचा भाऊ तेजसनेच मला येथे येण्याचे सुचवले. कॉलेजच्या एका प्रोजेक्टसाठी त्यांच्या बँकेत गेलो असता त्यांच्याशी ओळख झाली.”

‘अरे वा ! म्हणजे आमच्याच भागातला दिसतोस तू, नाव काय तुझ्या वडिलांचे !”

“मला वडील नाहीत”. त्याचा आवाज कठोर होता.

“मग तुझ्या आईचे नाव ?’

“सौंदर्या, ती देखील माझ्या जन्मावेळी गेली.” त्याचा आवाज काहिसा थरथरला.

माझ्या पायाखालील जमीनच सरकली. एव्हाना त्याच्या चेहरेपट्टीवरून मला पूर्णत: खात्री पटली होती की हा त्याच सौंदर्याचा, माझ्या सौंदर्याचा मुलगा. नशिबाच्या ज्या सुवर्णकिरणापासून मी स्वतःला लपवून घेतले होते, ते किरण तर माझ्या मागे कधीच विरून गेले होते आणि आज त्याचे एक प्रतिकिरण जणू साऱ्या जून्या कटूगोड आठवणींना उजाळा देण्यासाठी माझ्यापुढे उभे होते. माझा तोल जाऊ लागला. शरीराची सारी शक्ति एकटवून स्वतःला मी सावरले.

“बरे बाळ. आज रात्री जेवणानंतर मला येऊन भेट”

दुपारच्या त्या भेटीनंतर रात्रीपर्यंतची ती वेळ ! सार्‍या आयुष्याचा टप्पा एकीकडे तर दुसरीकडे ते सात आठ तास ! डोळ्यातून अविरतपणे वाहणारे अश्रू थांबवण्यासाठी ध्यानाला बसण्याचादेखील प्रयत्न केला मात्र विचलित गर्तेत ते देखील जमले नाही. काय घडले असेल माझ्या मागे ! माधवचे आईवडील दोघेही नाहीत, मी आईचे नाव त्याने सांगितले पण वडिलांचे मात्र…. आईच्या नावाने त्याच्या शब्दांचे ते थरथरणे परंतु वडिलांविषयी बोलताना त्याच्यातील ती कठोरता ! काय रहस्य असावे हे ! कसा मी माधवला यातून बाहेर आणणार ?

रात्री माधव मला भेटावयास आला. त्याला पाहताच माझ्या आत काहीतरी होत असल्याचा भास मला झाला. मातेच्या ममतेचा आणि पित्याच्या वात्सल्याचा झरा एकाचवेळी माझ्यात पाझरला होता. खूप मायेने मी त्याला म्हणालो,

“बाळ, तूला कुठले तरी फार मोठे दुःख सलत आहे असे मी मघापासून अनुभवत आहे. हे बघ, मला अगदी आपला समज आणि ज्या ज्या गोष्टींनी तू त्रस्त आहेस, आयुष्याच्या या प्रवासात ज्या ज्या घटनांनी तुझ्या या पुष्पासमान मनाला मोठ्या निर्घुणतेने छळले आहे, सर्व काही मला सांग. मी तुला वचन देतो, माझे सर्वस्व पणाला लावून तूझ्या जीवनात सुख पेरण्याचा मी प्रयत्न करीन. तुला अजून खूप जगायचे आहे, खूप मोठे व्हायचे आहे. जीवनातील अशांतीच्या या साम्राज्यावर जी शांती राज्य करू शकते, तिला तिथपर्यंत येण्यास अडवू नकोस ! मायेने भरलेल्या त्या शब्दांमुळे असेल अथवा रात्रीच्या त्या नीरव शांततेमुळे असेल, तो आता अगदी मोकळा होऊन बोलू लागला.

“’स्वामीजी, मला मुक्ती हवी आहे. जगण्याच्या या बंधनातून… आपले कुणी नातलग आहेत या भासातून मला मुक्ती हवी आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला दुःखाची सोबत मिळालेली आहे. अगदी माझ्या जन्मानंतर चार-पाच दिवसांत माझ्या आईने या जगाचा निरोप घेतला. एकीकडे जीवन तर दुसरीकडे एका काळोखी नशिबाची साथ देऊन गेली ती मला. मृत्यूशय्येवर असताना म्हणे तिच्या मुखी एकच नाव होते- ‘वसंत’.

बांध मोकळा केल्यावर पाण्याचा एकदम ओघ सुटावा त्याप्रमाणे माधवच्या त्या बोलण्याने माझ्या डोळ्यातून भरदिशी पाणी खळले, खिशातून जाड भिंगांचा चष्मा काढून डोळ्यावर चढवत मी ले लपवले. म्हणजे त्या रात्री स्वप्नातील त्या दिव्य पुरुषाचे उत्तर लौकीक अ लौकीकतेचा तो नजारा… सारे काही वास्तवाशी निगडीत होते. शून्य नजरेने माधव बोलत होता.

….. न जाणे कुणाचे नाव होते ते.. मुळात संशयी स्वभावाच्या माझ्या वडीलांनी त्या शब्दावरून आणि अखेरच्या क्षणी वडील पुढे असताना त्यांना देखील आईने ‘वसंत’ अशी हाक मारणे या गोष्टीवरून तिला सरळ व्यभिचारिणी ठरविले. मला आपला मुलगा मानण्यास आणि माझे संगोपन करण्यास नकार दिला, आईचे शेवटचे तोंडदेखील पाहिले नाही त्यांनी. आईबद्दल त्यांच्यात निर्माण झालेली कटूता इतक्या प्रचंड थराला गेली की अवघ्या महिन्याभरात त्यांनी दुसरे लग्न केले.

आप्तेष्ट असे माझे कुणीच नव्हते त्यामुळे ज्या हॉस्पीटलमधे आई डॉक्टरची सेवा देत होती त्याच संस्थेच्या अनाथालयात मला ठेवले गेले. मी वाढत होतो, वडील जीवंत असूनदेखील एखादया अनाथासारखा… निष्कलंक असूनदेखील एखाद्या कलंकाचा शिक्का माथी मारल्यासारखा आणि जेव्हा आईच्या एका सहकारी डॉक्टर मैत्रीणीकडून मला हे सत्य समजले त्या दिवसापासून एखादया जिवंत प्रेतासारखा…

काहीक क्षण अबोल्यातच गेले.

‘स्वामीजी मी नाही जाणत तो वसंत कोण होता ? आईच्या आयुष्यात त्याचे असे कोणते स्थान होते की मरणशय्येवर असता तिच्या तोंडी त्याचेच नाव होते ? मात्र अंतःकरणातील एक आवाज मला पुन्हा पुन्हा सांगतो की त्याचे आणि आईचे नाते अगदी आकाश धरतीच्या नात्याइतके पवित्र होते. हल्लीच मला समजले की माधव या नावाचा अर्थ देखील वसंत म्हणजे आपल्या मुलास हे नाव सुचविताना आईला कुठल्यातरी तुटलेल्या स्वप्नांची स्मृती माझ्यारुपात कायम जिवंत ठेवायची होती. परंतु जगाच्या व्यभिचारी नजरेला त्यात काय दिसले ? बघा ना या पंधरा वर्षात माझ्या जन्मदात्या बापाने तोंड देखील पाहिले नाही माझे. यालाच का म्हणतात रक्ताचे घट्ट नाते ? कधीही न तुटणारे अतूट नाते! कुठलीही अपेक्षा न ठेवणारे निःस्वार्थी नाते ! या सर्वांचा शोध घेण्यासाठी मी एकदिवस वडीलांना भेटावयास गेलो होतो. आपल्या मुलांबरोबर कुठे निघाले होते ते. माझी ओळख देताच कारचा दरवाजा धाडदिशी बंद करून निघून गेले.

जगण्यातील माझा रसच निघून गेला. कधीकधी उंच टेकडीवर हिंडायला जाई. खालील खोल दरी मग मला साद देई की ‘ये, मी तुला आपल्यात सामावून घेते.’ मात्र त्यावेळीच सायंकाळच्या प्रहरी शहरातील घरात लागलेले दिवे मला दिसत आणि वाटे की नाही, मी एकाकी नाही, विश्वाच्या या विशाल पसाऱ्यात कुणीतरी असेल माझे !

माझ्याने राहवेना, ब्रहमचारी होण्याच्या माझ्या प्रतिज्ञेत एका बालजीवाची, माझ्या सौंदर्याच्या शरीरातील एका अवयवाचीच चाललेली ती हेळसांड माझ्यासाठी असह्य होती. त्या क्षणी माझ्यातील स्वामीची जागा एका अकल्पित पितृत्वाने घेतली. माधवला मी घट्ट मिठीत घेतले. “माधवा, माझ्या बाळा खुप दुःख सोसलेस तू. परंतु यापुढे नाही. यानंतर तू इथेच राहशील, माझा मुलगा बनून. जगाला जीवनपथ दाखवणारा मी एक जगद्गुरू असलो तरी तुझ्यासाठी फक्त तुझा पिता असेन. तुला ज्ञानाने, विद्येने, आदर्शांनी, संस्कारांनी मी सर्वस्वी मंडीत करीन. आणि त्याहीपलीकडे तुला इतके प्रेम देईन, इतके प्रेम देईन ज्याच्या विशालतेत जीवनाच्या या सार्‍या कटूता विरून जातील.

तुला आज एक सत्य सांगतो, अरे मीच तो वसंत. ज्याच्या नावाचादेखील तू तिरस्कार करावा तो वसंत. परंतु आज काहीच विचार करु नकोस. प्रश्नांची सरबत्ती करून त्याची उकल करण्याची वेळ तर कधीच सरली आहे. मी तुझ्याकडून क्षमा देखील मागणार नाही. त्यासाठी एखाद्या फार मोठ्या अपराधाचा शिक्का जरी माझ्या माथी असता तरीही मी स्वतःला भाग्यवान समजले असते. परंतु माझ्याकडे ते देखील नाही आज. दोष कुणाचाच नव्हता. तुझ्या वडीलांचादेखील नाही. निसर्गाने दिलेल्या संशयी स्वभावाला ते मात करू शकले नाहीत ही त्यांची दुर्बलता होती, दोष नव्हता. अक्राळविक्राळ नशिबाची जी महाकाय लाट आपल्या सर्वांच्या जीवनावर धडकली, त्यातून फक्त आपण दोघेच आज जिवंत बाहेर आलो आहोत. पोरके होऊन… एकाकी बनून… अर्थशून्य जीवनाचा उपहार घेऊन.

माधवदेखील घळाघळा रडू लागला. मला घट्ट मिठी मारत तो फक्त बोलला ‘बाबा’.

त्याच्या त्या हाकेने माझ्या सर्वांगातून रोमांच फुलले. सौंदर्याच्या त्या अकथ्य प्रेमाची आज माझ्यावर पुन्हा बरसात होत होती. ती साद पुन्हा त्याच बासरीच्या हृदयामेदक धूनीचे पार्श्वसंगीत घेऊन ऐकू आली. ‘वसंत’. परमेश्वरा तुझ्याकडून मला आता काहीच नको. जे जे माझ्याकडून नशिबाने हिरावून घेतले होते, ते सर्व सर्व आज तू शतपटींनी परत केले आहे. या पत्थराप्रमाणे असलेल्या रुक्ष, कठोर जीवनातून एका जगद्गुरु स्वामीचे माझ्या माधवच्या प्रेमळ पित्याचे शिल्प तू घडवलेय. आज माझे जीवन सार्थकी लागले. यापुढे मला जगायचे आहे. साऱ्या जगासाठी… माझ्या माधवसाठी. सात्विक सुखाचा प्रत्येक अनुभव त्याला देण्यासाठी मला जगायचे आहे. खरोखर क्षणभराच्या प्राप्तीहून आयुष्यभराच्या त्यागातच त्या अबोल प्रेमाचा सर्वार्थाने विजय झाला होता. उत्कट प्रेम, त्याग आणि त्यानंतरचा विरह यांच्या सुमनांनी केलेली ती मधुराभक्ती आज सफल झाली होती.

‘लाखों सितम सहे हैं, मुहब्बत की राह में,

इस राह पे मिटने का फक्र और कुछ है।’  – ईश्वरदास ‘चाँद’

(प्रेममार्गाची वाटचाल करताना मी लाखो प्रकारचा जुलूम सहन केला आहे. तरीही या मार्गाने जाताना होणाऱ्या बरबादीबद्दल वाटणारा अभिमान हा काही वेगळाच आहे.)