- अशोक बाप्टीस्टा डिब्रिटो, उंगणभाट, नंदाखाल
सर्व काही ठीकठाक चाललेलं असताना, आपण आहोत त्या ठिकाणी, आहोत त्या परिस्थितीत, आपल्या शेतीवाडीत आणि आपल्या नात्या-गोत्यात रमलेलो असताना,आपल्या स्वप्नातही कधी विचार केलेला नसताना, आतंकवाद, युध्द तथा राजकीय डावपेचामुळे, ज्यांना असुरक्षिततेच्या भावनेतून आपल्या भावना, आपले स्वप्न आणि आपलं सर्वस्व सोडून पलायन करावे लागते, त्यावेळी त्यांच्या जीवनाची घडी पूर्णपणे विस्कटून जाते व त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक स्वप्नांची राखरांगोळी होत असते.
धनदांडग्या उद्योजकांच्या प्रकल्पासाठी, मागचा पुढचा विचार न करता जबरदस्तीने हटविलेली वस्तीतील गरीब जनता असो, आतंकवादाने भयभीत होवून स्वताचे घरदार आणि शेतीवाडी सोडून जावे लागणारी लोकं असोत वा युध्दजन्य परिस्थितीत आण्विक अस्त्राच्या भितीने आपल्या मुलाबाळांसह सुरक्षित आश्रयासाठी पळणारी माणसं असोत, आपलं अस्तित्व गमावल्याचे दु:ख आणि वेदना त्यांच्या हृदयाला रक्तबंबाळ करत असतात. भावी आयुष्याची चिंता त्यांना अस्वस्थ करत असते आणि आपल्या मुलाबाळांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची भिती त्यांना पोखरत असते. पुर्नप्रस्थापित होण्यासाठी असंख्य तडजोडीची अग्निदिव्ये पार करण्याची आव्हानं त्यांच्यापुढे उभी असतात. ते विस्थापित होत असल्याची खबर आपण पाहतो, ऐकतो मात्र त्यानंतर त्यांचे पुढे काय होते ? हा प्रश्न आपल्या व्यस्त जीवनात आपणास कधीच स्पर्श करीत नाही.
ज्ञानी आणि बुध्दीमान मानवाच्या जीवनातील ह्या अधपतनाला जबाबदार कोण ? त्याला ह्या सुजलाम सुफलाम वसुंधरेत पाठवणारा निर्माता की मानवाचा स्वार्थ आणि अहंकार ?
विधात्याने प्रत्येक जीवजंतुला आपले जीवन सुखी समाधानी आणि समृद्ध बनविण्यासाठी ही वसुंधरा सजवली फुलविली आहे, त्याला आपण देव म्हणून संबोधतो, त्या नावात प्रेम आहे, क्षमा, शांती आणि त्याग आहे, मात्र त्याच देवाला आपण गटागटाने वेगवेगळी नावं देवून त्याने निर्मिलेल्या माणसा माणसात भेदभाव निर्माण केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या बहुसंख्य गटाने, अल्पसंख्य गटाच्या लोकांच्या जीवनात देव धर्माच्या नावाने अस्वस्थ आणि असुरक्षिततेची काडी पेटविली, त्या काडीने आज जगभर वणवा पेटविला आहे. त्यात लाखो निरपराध आणि निरागस सानथोरांच्या जीवाची राखरांगोळी होत आहे.
मानवाचा ह्या स्वार्थी आणि अहंकारी स्वभावाने केवळ मनुष्यप्राणीच नाही तर वसुंधरेतील असंख्य घटक प्रभावित झाले आहेत व वसुंधरेतील पशू पक्षी, आपल्या पाण्याचे स्त्रोत, हवामान, ऋतू आणि अगदी आपली आपसातील नाती आपणापासून दूर जात आहेत, आपल्या कर्मामुळे निर्सग घटकाचे आपण करत असलेलो हे विस्थापनचं आहे, त्याचे परिणामही आपण अनुभवत आहोत आणि ह्यासाठी कुठे ना कुठे आपण प्रत्येक जण जबाबदार आहोत.
आजच्या घडीला संपूर्ण जग वातावरणातील प्रतिकूल बदल अनुभवत आहे. ह्या बदलाच्या गंभीर परिणामास जग सामोरे जात आहे आणि ह्या समस्येची दखल घेवून सर्व राष्टातील प्रमुख गेली अनेक वर्षे ग्लोबल वाँर्मीगच्या नावाखाली चर्चासत्र घेत आहेत, मात्र त्यात ग्लोबल वाँर्मीगसाठी कारणीभूत ठरणारी जी कारणं अधोरेखीत होत आहेत आणि त्यावर ज्या उपाययोजना सुचविल्या जात आहेत, त्या उपाययोजना राबविण्यात अखिल मानव जात कमी पडत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण वाढविण्यात कुठे ना कुठे माझाही हातभार लागत आहे, मात्र माझ्या एका गोष्टीने काय फरक पडतो ? ह्या प्रश्नाने मी माझी जबाबदारी झटकत असतो.
आज विकासाच्या आणि आर्थिक प्रगतीच्या नावाने मोठमोठया जंगलाच्या मुळावर कुऱ्हाडी चालविल्या जात आहेत. गावागावातही आर्थिक लाभासाठी झाडांची कत्तल होवून टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. आपल्या जीवाला प्राणवायू देणाऱ्या अशा झाडाझुडुपांनाच आपण संपवत आहोत, त्यावर बसणाऱ्या, चिऊ कावूचं संगीत ऐकवणाऱ्या आणि आपल्या बाळगोपाळांना रमवणाऱ्या चिमण्या कावळ्यांना आपण आपल्या गावातून विस्थापित केलेलं आहे. यावर दुर्लक्ष होत आहे.
ज्या गोष्टीवरून तिसरे महायुद्ध भडकेल असे भाकीत केले गेले आहे, त्या पाण्याचा प्रचंड प्रमाणात अपव्यय होत आहे. आपणास पिण्याचे पाणी देणारे नैर्सगिक स्त्रोत नदी, नाले आणि बावखालं भरावाखाली गाडली जात आहेत. जी काही थोडीफार उरली आहेत, ती कचराकुंडी बनलेली आहेत.आपली तहान भागविणाऱ्या ह्या नैर्सगिक स्त्रोतांना आपल्या कर्माने विस्थापित करून आपण आपल्याच अडचणी वाढवत नाही का?जे निर्मळ पाणी आपणास निर्सग मुक्त हाताने देत होते,त्याच पाण्यासाठी आज आपल्याला वाट पहावी लागते तथा रांगा लावायला लागत आहेत.विधाता खुल्या हाताने आपणास देत गेला मात्र आपणास ते सांभाळता आले नाही.
स्वच्छ आणि सुंदर वातावरण,आपल्या प्रदूषणामुळे काळवंडले आहे.अनेक उद्योगधंदे सर्रासपणे पाण्यात आणि हवेत प्रदूषणाचे मोठमोठे गरळ ओकत आहेत. असंख्य जुन्या आणि जिर्ण गाड्या प्रदूषित धुरांचे जाळे वातावरणाचा श्वास कोंडत आहेत,मी सुध्दा माझ्या सण सभारंभात फटाक्याच्या आतषबाजीने वातावरणातील सुरक्षा कवचाला कुरतडत आहे. डी.जे. च्या कर्णकर्कश आवाजात दिवस रात्र ध्वनीप्रदूषणात भर टाकत आहे, मात्र ह्याच्या दूरगामी परिणामाकडे दुर्लक्ष करून चालेल का ?
आज सुलभ आर्थिक नियोजन करून, विनाकष्ट आणि जलद पैसा कमावण्याच्या नादात आपण सर्वच आपल्या शेतीवाडीच्या पोटात क्राँक्रीटचे विष पेरून भाड्याची घरं उभारत आहोत आणि आपल्या शेतीला, आपणास सकस अन्न देणाऱ्या काळ्या आईस विस्थापित करत आहोत आणि प्रदूषित व भेसळ अन्न आपल्या शरीराला पुरवत आहोत.
आज आपण विसाव्या शतकात घुसलेलो असताना कुत्रीम विकास आणि आर्थिक गणितं सोडवत असताना नकळत आपली कौटोंबिक नाती विस्थापित झालेली आहेत. आपण सुखसमृद्धी आणि भरभराटीच्या चक्रव्युहात वसुंधरेला ओरबाडत आहोत आणि विसरत आहोत की हीच वसुंधरा आणि हा निर्सगचं खरा आनंद, स्वास्थ आणि मनशांतीचे उगमस्थान आहेत. करोनाने आपणास आपल्या जीवनाचे मूल्य दाखवून दिले आहे आणि वातावरणातील बदल, सुनामी,ऐकामागून एक येत असलेली वादळं आणि अवकाळी पावसाचे अनिश्चित संकटं आपल्या मर्यादा स्पष्ट करत असताना,आपण वसुंधरेची हेळसांड थांबविली पाहीजे.ज्या वसुंधरेने आपल्याला भरभरून दिलेले आहे,देत आहे तिच्याशी कृतज्ञ राहून तीला जपले पाहीजे,सबळ ठेवले पाहीजे नाहीतर ह्या वसुंधरेनेच आपणा सर्वांस विस्थापित करण्याचे ठरवले तर आपला विकास आणि आपली आर्थिक गणितं कामी येणार नाहीत.