लेखकाचा जन्म
- दुर्गाप्रसाद खांडाळेकर, 99693 47106
रमेश व विनोद यांची सरस्वती विद्यालयातील जोडी प्रसिध्दच होती. थोडी मस्ती पण अभ्यासात हुशार असल्याने ते सर्व शिक्षकांचे आवडते होते. दोघेही उत्तम गुण मिळवून आठवीच्या वर्गात गेले होते. मे महिन्याची मोठी सुटी कशी घालवायची याचा दोघांनीही आपापल्या परीने बेत केला होता.
रमेशच्या बहिणीच्या लग्नाला अजून वर्ष देखील पुरे झाले नव्हते. तीचे सासर पुण्याचे असल्याने तीने आठवडाभर रमेशला आपल्याकडे आग्रहाने राहाण्यास बोलाविले होते. रमेशही ताईचे नवे घर पाहाण्यास उत्सुक होता. त्यामुळे रमेशचे पुण्याला जाण्याचे नक्की झाले होते.
विनोद दरवर्षी आजीकडे संगमेश्वरला जात असे. पण यावर्षी मे महिना संपत आला तरी बाबांना सुटी न मिळाल्याने विनोद मुंबईतच होता. आजी नातवाची आतुरतेने वाट बघत होती. विनूसाठी खास आंबे फणस बाजुला काढून ठेवले होते. गावाला कधी येणार याची विचारणा करणारे दोन तीन फोन देखील आजोबांनी विनूच्या आईला केले होते. विनूलाही आता अगदी धीर धरवत नव्हता. तो रोज बाबांना “तुमची रजा कधी पास होणार” असे विचारून सतावीत असे.
एके दिवशी बाबांनी रजा मंजूर झाल्याची त्याला खूश खबर दिली. अखेर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजीकडे संगमेश्वरला जाण्याचे नक्की झाले होते. शेवटी आईबाबांसह विनू संगमेश्वरला पोहोचला. आजी नातवाची वाट पहातच होती. आल्या आल्याच आजीने विनूला प्रेमाने जवळ घेतले व लटक्या रागाने लेकीला म्हणाली “त्याला काही करून घालतेस कि नाही ? पोरगा अगदी वाळून गेला आहे. आता या सुटीत त्याला खूप खायला घालून चांगला जाडजूड करून पाठवते.”
थोड्याच वेळात घरापुढील अंगणात मामेभाऊ व इतर दोस्तांसह नवे खेळ खेळण्यात विनू रंगून गेला. कारण येथे शाळा व अभ्यासापासून सुटका होती. बाबांची रजा दहा दिवसांची होती. आठ दिवस कसे गेले ते विनूला कळलेच नाही. बाबांची दहा दिवसांची रजा संपत आली होती. जाण्याचा दिवस जवळ आला तसे विनूला खूप वाईट वाटू लागले. आणखी काही दिवस आजीकडे रहावे असे त्याला मनापासून वाटत होते.
विनूची ही इच्छा थोड्या वेगळ्याच कारणाने पुरी झाली. विनू मुंबईला निघण्याच्या आदल्या दिवशी आजीला ताप आला. त्यामुळे विनूच्या आईला तेथून निघवेना. त्यामुळे विनूच्या बाबानी आपली रजा आठ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजीला तापामुळे अशक्तपणा आला होता.
विनूच्या मामाने त्यांच्या जवळच्या फॅमिली डॉक्टरकडून आजीकरता औषध आणले. हवामानातील बदलांमुळे आलेला साधाच ताप असल्याने औषधाचे दोन डोस पोटात गेल्यावर आजीला जरा बरे वाटू लागले.
दुसर्या दिवशी संध्याकाळी जोरदार वारा सुटला. पालापाचोळा गिरगिरत आकाशात जाऊ लागला.आकाशात काळे ढग जमू लागले व टपटप पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागले. विनू व त्याचे सगळे मित्र पहिल्या पावसात भिजण्यासाठी घरच्या अंगणात जमा झाले. त्यानी एकमेकांवर पाणी उडविले. अंगणात साचलेल्या पाण्यात खूप दंगामस्ती केली. कोकणातील पावसाचा विनूसाठी हा पहिलाच अनोखा अनुभव होता.
एखादी जादू व्हावी तसा घराबाहेरील देखावा बदलला होता. मातीच्या एका वेगळ्याच सुगंधाने आसमंत भारून गेला होता. असे वर्णन विनूने आतापर्यंत केवळ पुस्तकात वाचले होते त्याचा तो अनुभव घेत होता. आजुबाजुची झाडे आंघोळ केल्याप्रमाणे स्वच्छ झालेली दिसत होती व पावसाच्या स्वागतासाठी डुलत आहेत असे वाटत होते. प्रत्येक झाडाच्या हिरव्या रंगाच्या वेगवगळ्या छटा पावसाने अधिकच खुलुन आल्याने हिरव्या रंगाचे संम्मेलन भरल्या प्रमाणे वाटत होते. आकाशात मेघगर्जना होत होत्या व जोडीला विजाही चमकत होत्या तर जमिनीवर बेडूकरावांचे डरॅाव डरॅाव चालू झाले होते. सगळेच जणू पाऊसराजाचे स्वागत करीत होते. केवळ रात्र पडल्यानेच विनूला घरी यावे लागले. दुसर्या दिवशी मात्र पावसाचा जोर कमी झाला होता. ढगाआडून सूर्य डोकावू लागला होता व विनूला आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसले. जणू काही विनूला पावसाने दिलेली ती छान भेटच होती. घरातील सर्वांनाच विनू तो देखावा दाखवत सुटला. सायन्सच्या पुस्तकात वर्णन केलेले इंद्रधनुष्य विनूने प्रथमच आकाशात पाहिले होते. आजीच्या मागीलदारच्या शिवाराचा देखावाच बदलून गेला होता. तेथे अनेक छोटी रोपटी उगवली होती व त्यावर पिवळी, जांभळी फुले आली होती व त्यावर अनेक रंगीबेरंगी फूलपाखरे उडत होती. विनूने त्याना पकडायचा प्रयत्न केला व एकही त्याच्या हाती लागले नाही. एकंदरीत विनूने यावर्षी गावाकडच्या पावसाची खूपच मजा अनुभवली होती.
चार दिवसात आजीची प्रकृती देखील सुधारली होती व विनूलाही आता मुंबईचे वेध लागले होते. नवा वर्ग, नवे शिक्षक कसे असतील याचे विचार विनूच्या मनात येऊ लागले. अखेर जायचा दिवस आलाच. आजीने विनूला मायेने जवळ घेतले. घरचे आंबे दिलेच व फणस पोळीही दिली.
अखेर विनू मुंबईत पोहोचला. मुंबईत देखील पाऊस सुरू झाला होता. येथे सर्वत्र चिखल दिसत होता. रस्त्यात खड्डे पडले होते, तर ट्राफिक जाम झाला होता. विनूला गावचे स्वच्छंद जीवन आठवले.
दुसर्या दिवशी विनू शाळेत गेला. गावचा मुक्काम वाढल्याने विनूची २ दिवसाची शाळा बुडाली होती. मराठीच्या तासाला यावर्षी नव्यानेच रूजु झालेल्या रेगे मॅडम वर्गात आल्या. सुरवातीला ओळख गप्पागाणी वगैरे झाल्यावर बाईनी “पाऊस” या विषयावर २ दिवसात निबंध लिहून आणण्यास सांगितले. नव्या बाईना आवडेल असा निबंध कसा लिहावा याची विद्यार्थ्याना थोडी काळजी वाटत होती. विनूच्या मित्रांनी आपापल्या ताई दादांना विचारून निबंध पूरा केला. पण विनूने मात्र कोणाचीही मदत न घेता नुकत्याच आजीकडे अनुभवलेल्या पावसाचे वर्णन आपल्या शब्दात मांडले होते.
दोन दिवसानी बाईनी सर्व मुलांच्या निबंधाच्या वह्या तपासणीसाठी मागितल्या. विनोदचा निबंध वाचून बाईनी त्याचे खूप कौतुक केले. मांडणीमधे थोड्या सुधारणा सुचविल्या व सर्व वर्गाला त्याचा निबंध वाचून दाखवला, कारण विनोद सोडून सर्व मुलांच्या निबंधात साधारणपणे सारखेच मुद्दे होते. विनोदचा निबंध मात्र इतर सर्वांपेक्षा वेगळा व उत्तम होता. आलेले अनुभव उत्तम रीतीने शब्दबध्द करण्याची कला त्याच्यापाशी होती.
बाईनी त्याला निबंध कोणाच्या मदतीने लिहीलास का? असे विचारल्यावर आजीच्या गावी अनुभवलेल्या पावसाचे वर्णन बाईना ऐकवले व आपण स्वतःच निबंध लिहील्याचे सांगितले. तेव्हा बाईना अधिकच आनंद झाला. बाई त्याला म्हणाल्या “तुझ्याकडे लेखनाची दैवजात कला आहे. उत्तम लेखनासाठी उत्तम साहित्य वाचनाची आवड जोपासली पाहिजे. वाचन लेखनाचा सराव चालू ठेव. भविष्यात तू मोठा लेखक होशील. लेखक आपल्या अनुभवांना किवा कल्पनेला शब्दरूप देतो.”
विनोदने या सर्वाचा अशा दृष्टीने विचारच केला नव्हता. शिवाय बाईनी त्याला एक छान पेन व वही बक्षिस म्हणून दिली. शाळेतील मित्रांनीही त्याचे अभिनंदन केले. हे सर्व पाहून त्याला खूपच आनंद झाला व कधी एकदा घरी जाऊन आई बाबांना सांगतो असे झाले.
रमेशला मित्राच्या कौतुकाचा आनंद झाला पण त्याची दखल न घेतल्याचे थोडे वाईटही वाटले नंतर त्याबद्दल बाईना विचारल्यावर बाई त्यास म्हणाल्या तुला गणित विषयात गती आहे ती विनोदला नाही. प्रत्येकाला देवाने वेगवेगळे गुण दिलेले असतात त्याचा त्याने विकास करावयास हवा.
घरी आल्यावर आई बाबांनी त्याचे खूप कौतुक केले. त्याने मामा मामीलाही वॉटसअपवर लिहीलेला निबंध पाठवला त्यांचाही लगेच कौतुकाचा मेसेज त्याला मिळाला. सगळ्यांनाच आनंद झाला होता.
पावसाचे पाणी धरतीवर पडले कि नवे पिक येते म्हणजेच नव निर्माण होते. मात्र गावाकडच्या पावसाने विनोद मधल्या लेखकाला जन्म दिला होता.