संपादकीय …
प्रिय वाचक मित्र-मैत्रिणींनो, सर्वप्रथम नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
ख्रिस्ती धर्मीयांचा हर्षोल्लासाने भरलेला एकमेव सण म्हणजे नाताळचा सण. मी प्रत्येक वर्षी संपादकीयमध्ये या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतो आणि करत राहीन की दिवाळी सण आणि दिवाळी अंक हे जसे अतूट नाते आहे तसेच नाताळ सण व नाताळ अंक यांचे नाते व्हावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते आम्ही २० वर्षाअगोदर प्रथम छापील स्वरुपात अंक प्रकाशित करून प्रत्यक्षात आणि गेली बारा वर्षे हा अंक ऑनलाइन प्रकाशित करून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
मंडळी, नाताळ सणावेळी साहित्यिक फराळ असावा असे एक स्वप्न बघितले होते, आज त्या गोष्टीला २० वर्षे पूर्ण होत आहेत त्याचबरोबर ऑनलाइन अंकाला १२ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा अंक सुरू करण्यामागची थोडी पार्श्वभूमी इथे उधृत करायला नक्कीच आवडेल.
१९९५ साली गावातील क्रॉसच्या रौप्यमहोत्सवानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती. बारावीची परीक्षा नुकतीच संपलेली असल्याने भरपूर वेळ होता, त्यावेळी चुलतभाऊ सालोमन रिबेलो ह्यांनी स्मरणिका समितीमध्ये काम करण्यासाठी उद्युक्त केले. त्यांना मदत करताना लिहायची प्रेरणा मिळाली. त्याचबरोबर प्रूफे तपासणे, अंकाची मांडणी करणे या सारख्या कामांचा जवळून अनुभव घेता आला. पुढच्याच वर्षी १९९६ मध्ये स्व. मिल्टन दोडती यांच्या प्रेरणेने त्यांच्यासोबत ‘निर्मल समाचार’ या होली क्रॉस चर्चच्या व ‘युवदर्शन’ या वसई पातळीवरील युवा संघटनेच्या मुखपत्रात संपादन सहाय्याची भूमिका निभावण्याची संधी मिळाली. त्यानंतर २००१ मध्ये तत्कालीन नवीन होऊ घातलेल्या होली ट्रिनिटी चर्चच्या मुखपत्राचा कार्यकारी संपादक म्हणून अनपेक्षितपणे धुरा खांद्यावर आली. पुढे ५ वर्षे ते पद सांभाळले व नंतर संपादक मंडळात राहून कार्य केले. ह्या मुखपत्राची धुरा वाहत असताना पहिल्या दोन जंबो अंकांसाठी फा. एलायस रॉड्रिग्ज ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य लाभले ज्याद्वारे संपादन क्षेत्र काय ह्याची बारकाईने ओळख झाली.
संपादन क्षेत्रातील आवडीने एक नवीन विचार मनात आला, ज्याप्रमाणे मराठी साहित्यात दिवाळी अंकाचे एक वेगळे स्थान आहे तसे मराठी भाषिक ख्रिस्ती समाजात नाताळ अंक रुजवले तर.. त्यातूनच ‘ख्रिस्तायन’ नाताळ अंकाचे २००२ रोजी प्रथम छापील स्वरूपात संपादन केले. गरजेपोटी जाहिराती घेतल्याने आणि मुख्य पुरस्कर्त्याच्या माघारीमुळे आर्थिक फटका बसला. दरम्यानच्या काळात व्यावसायिक घडी बसवण्याच्या मागे लागल्यामुळे लेखन-संपादन ठप्प झाले. २०१० साली सॉफ्टवेअर इंजीनियर भाऊ, स्वप्निलच्या कल्पनेनुसार ऑनलाइन प्रकाशन सुरू करण्याचा विचार पुढे आला आणि तेव्हापासून गेली १२ वर्षे अव्याहतपणे ही सफर आजतागायत सुरू आहे. ‘ख्रिस्तायन’ हा पहिला आणि एकमेव ऑनलाईन नाताळ अंक आहे हे अभिमानाने नमूद करावेसे वाटते. हा विविध वर्तमानपत्रांकडून अभिनव उपक्रम म्हणून गौरविण्यातही आला आहे.
या अंकासाठी प्रत्येक वर्षी ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांचा फक्त लेखच मिळत नाही तर मार्गदर्शनपर आशीर्वाद मिळतात. असेच कायम प्रोत्साहन मिळत असते ते म्हणजे ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन, फा. (डॉ.) रॉबर्ट डिसोझा, प्रथितयश कवी वर्जेश सोलंकी, महेश लीलापंडित, म. टा. चे माजी उपसंपादक जॉन कोलासो, कवियत्री सबिना थॉमस फोस, वसई ख्रिस्ती साहित्य मंडळाचे अध्यक्ष रेमंड मच्याडो, ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे, ज्येष्ठ लेखक-संपादक प्रा. स्टीफन आय परेरा, गुरुवर्य फ्रान्सिस आल्मेडासर, ज्येष्ठ विचारवंत फा. मायकल जी, माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मार्गदर्शन आणि प्रेम करणार्या प्रा. नेहा सावंत, ज्येष्ठ लेखक स्टॅन्ली गोन्सालवीस, मी ज्यांना कुपारी पू. लं. म्हणतो ते मित्रवर्य सॅबी परेरा, प्रथितयश तरुण कविद्वय व जवळचे मित्र झालेले डॉ. फेलीक्स डिसोझा व इग्नेशियस डायस, ज्येष्ठ लेखक संपादक संदीप राऊत, गेल्याच वर्षी मित्र यादीत समाविष्ट झालेले पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे, पत्रकार सुहास बिऱ्हाडे, वैष्णवी राऊत ह्या सर्वांचे सतत मार्गदर्शन आणि मोलाच्या सूचना मिळत असतात, त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून ते नेहमी माझ्यासाठी वेळ काढतात, त्यामुळे मी सतत त्यांच्या ऋणात राहू इच्छितो.
ज्येष्ठ लेखिका डॉ.अनुपमा निरंजन उजगरे, ज्येष्ठ लेखक दीपक मच्याडो, अतुल काटदरे, ज्येष्ठ विचारवंत फा. वेन्सी डिमेलो, अल्फा ओमेगा महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे व ज्येष्ठ लेखक सिडनी मोरायस, प्रथितयश वकील अॅड. अतुल आल्मेडा, ज्येष्ठ लेखक जॉन गोन्सालवीस, ज्येष्ठ लेखक अँथनी परेरा, ज्येष्ठ नाटयकर्मी विलास पागार, अॅलेक्स मचाडो, बर्नर्ड लोपीस, आयवन क्रास्टो, संगीततज्ञ मेल्वीन डाबरे, डॉ. नेन्सी वि. डिमेलो, सुनिता ब. परेरा, आशा गोन्सालवीस, अमर म्हात्रे, करियर गुरु प्रकाश आल्मेडा, बॅप्टिस्ट वाझ, मॅक्सवेल लोपीस. जवळचे स्नेही एमेल आल्मेडा, मॅकेन्झी डाबरे, फा. असिस रॉड्रिग्ज, पौलस वाघमारे, पत्रकार रविंद्र माने, जॅक गोम्स, क्लेमेंट डिमेलो, शकुंतला नारायण पाटील, अॅड. जॉन रॉड्रिग्ज, अशोक बा. डिब्रिटो, कल्पना रॉड्रिग्ज, विजू वाझ, बॅन्सन कोरीया, जिम (फिलीप) रॉड्रीग्ज, मेल्सीना तुस्कानो परेरा, ब्रिनल कुडेल, ब्रायन मेंडिस तसेच चित्रकार पॉल डिमेलो, ऑस्टिन डाबरे, रॉयल बी. रॉड्रिग्ज, ऑल्विन कोरिया, ऑल्विन परेरा तसेच फोटोग्राफीमध्ये रुची असलेले लिओनार्ड रिबेलो आदी मान्यवर लेखक-कवी आणि चित्रकारांना मी दरवर्षी लिहायला सांगून त्रास देत असतो, पण आजपर्यंत एकाही व्यक्तीने नकार दर्शविला नाही. मानधनाची अपेक्षा न करता फक्त या उपक्रमाला साथ म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन या प्रवासात मला सोबत करतात, म्हणूनच हे सर्व सुहृद मला माझे कुटुंबियच वाटतात. मी हक्काने मागतो आणि ते देतात. मी या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो.
आम्ही हा अंक ‘पीडीएफ’ स्वरुपात देत आहोत, त्यामुळे आपणास अंक वाचण्यासाठी पूर्ण वेळ ऑनलाइन असण्याची गरज नाही. त्याचबरोबर या अंकाचे अँड्रॉईड अॅपही आहे. प्ले स्टोअर वरुन आपण हा अंक डाऊनलोड करून नंतर आपल्या सोयीप्रमाणे अगदी मोबाईलवरही वाचू शकता. आपण हा अंक वाचल्यानंतर इतरांनाही कळवा.. आणि आपल्या सूचना आणि अभिप्रायांची देखील आम्ही वाट पाहत आहोत.
नाताळ सणाच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Merry Christmas & Happy New Year.