ख्रिस्मस : सोहळा पर्यावरणाचा – फा. (डॉ.) रॉबर्ट बी. डिसोझा

ख्रिस्मस : सोहळा पर्यावरणाचा

  •  फा. (डॉ.) रॉबर्ट बी. डिसोझा, ​​पसायदान, नाळा

नाताळच्या दिवशी अखिल जगभरचे तमाम ख्रिस्ती लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा करतात. त्यावेळी जो गोशाळेचा देखावा तयार केला जातो त्यावर एक नजर टाकली तर सहज लक्षात येईल की हा पर्यावरणाचा सोहळा आहे. त्यात आकाशातील तारा आहे. ख्रिस्मस ट्री आहे. गुरांचा गवताचा गोठा आहे. गाढव, गाई, मेंढरे आणि उंट यासारखे प्राणी आहेत. तसेच हा सोहळा सूर्याच्या उत्तरायणाची नांदी घोषित करणारा आहे. येशू बाळाला देण्यात आलेल्या भेटीमध्ये सोन्याच्या खाणीतले सोने, झाडांपासून तयार करण्यात आलेला गंधरस आणि सुगंधी वनस्पतीपासून तयार करण्यात आलेला धूप आहे. हवेतला गारवा आहे आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण जगाशी समेट करणारा, मानवाशी एकरूप होणारा देवपुत्र एका सुताराच्या कुटुंबात जन्माला आलेला आहे. देशोदेशीचे राजे, रानातील मेंढपाळ, स्वर्गातील देवदूत असे विविध स्तरातील  सजीव येशू बाळाच्या भेटीस आले.

थोडक्यात हा पर्यावरणाचा अनुपम सोहळा आहे यात शंका नाही. त्यातून येशूच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे दर्शन घडते. हे आठ पैलू आता चिंतनासाठी घेऊ या.

१. तारा, २. सूर्य, ३. प्राणी, ४. झाडे, ५. भेटवस्तू, ६. हवेतील गारवा, ७. सुताराचे कुटुंब, ८. विविध स्तरावरील सजीव.

. तारा : प्रभू येशूच्या जन्माच्या वेळी पूर्व दिशेला एक तारा दिसू लागला. कुठेतरी एखादा महापुरुष जन्माला आल्याची ती खूण होती. त्याचा मागोवा घेत तीन ज्ञानी पुरुष त्या महापुरुषाच्या शोधार्थ निघाले.

परमेश्वर निसर्गातून पुष्कळ गोष्टी आपल्याला प्रकट करीत असतो. आपण मात्र ही काळाची चिन्हे ओळखायला शिकले पाहिजे. निसर्गाची शिस्त, वक्तशीरपणा, दानशूरता, प्रसन्नता, स्थितीप्रज्ञता, नि:पक्षपातीपणा, उपलब्धता, उपयुक्तता, शांतता आणि धीरगंभीर वृत्ती, विविधता, अद्वितीयता असे कितीतरी सद्गुण निसर्गाकडून माणूस घेऊ शकतो. येशूबाळामध्ये ह्या आणि इतर सर्व सद्गुणांचा संयोग झालेला दिसून येतो.

चिंतन : मी निसर्गाकडून काय काय शिकत आहे?

. सूर्य : ख्रिस्मसची तारीख कशी निश्चित करण्यात आली त्याविषयी एक मजेदार ऐतिहासिक घटना सांगितली जाते. रोमन सम्राट कॉन्स्टंटाईन ह्याची आई महाराणी हेलेना हिचे परिवर्तन झाल्यानंतर रोमन साम्राज्यात ख्रिस्ती लोकांचा होणारा छळ थांबला. ख्रिस्ती धर्माला राजाश्रय मिळाला. तोपर्यंत लोक सूर्योपासना करीत होते. २१-२२ डिसेंबर ला सूर्याचे दक्षिणायन संपते आणि पुन्हा एकदा दिवस मोठे होऊ लागतात. तो जणू सूर्याचा नव्याने झालेला जन्म मानला जायचा. त्यासाठी सोलार नातालीस हा लॅटिन शब्द वापरला जायचा. आता लोक नीतिमत्तेचा सूर्य प्रभू येशू ख्रिस्त ह्याची उपासना करू लागल्याने २४ डिसेंबर च्या रात्रीपासून ते येशूचा जन्मोत्सव साजरा करू लागले.

 सहज विचार करा, जर सूर्य ह्या जगात नसता तर काय झाले असते? येशू ह्या जगात आला नसता तर काय झाले असते? आपले जीवन कसे असते? येशू हा नीतिमत्तेचा सूर्य आहे. थंडीच्या दिवसात आपल्याला सूर्याच्या प्रकाशात व ऊबेत राहावेसे वाटते त्याप्रमाणे पापाच्या निबीड काळोखातून नीतिमत्तेच्या लख्ख प्रकाशात न्हाऊन निघू या.

चिंतन : ख्रिस्त माझ्या जीवनातील नीतिमत्तेचा सूर्य बनलेला आहे का?

. प्राणी : ख्रिस्मसच्या दिवशी आपल्याला सर्वत्र गुरांचा गवताचा गोठा दिसत असतोस. त्यामध्ये आपण गाढव, गाई, मेंढरे आणि उंट इत्यादी प्राणी पाहतो.

पवित्र मरिया गरोदर असताना संत जोसेफ ह्याने तिला नाझरेथ इथून बेथलेहेम येथे आणले. त्यासाठी त्यावेळी वापरले जाणारे प्रवासाचे साधन गाढव हे सोबत आणले असावे. हे गाढव येशूला मरिया मातेच्या उदरात असताना जसे वाहते तसेच ते येशूला जेरुसलेम येथे प्रवेश करतानाही आपल्या पाठीवर घेऊन जाते. ते शांतीचे व नम्रतेचे प्रतीक आहे. पुढे येशू गाईच्या गोठ्यात जन्मला म्हणून गोशाळेमध्ये गाई आणि गव्हाणीचा देखावा दिसतो. गाय हे सहकार्याचे, आदरातिथ्याचे प्रतीक आहे. गव्हाणीत ठेवलेले बालक हे नुसते त्या गुरांचेच नव्हे तर अखिल मानवजातीचे स्वर्गीय अन्न आहे. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू बनलेल्या येशूच्या निष्कलंक जीवनाचे प्रतीक म्हणून मेंढरे आपल्याला गोशालेत दिसतात. येशू ह्या उत्तम मेंढपाळाचे पूर्वचिन्ह असलेले मेंढपाळही आपल्याला तिथे पाहायला मिळतात. तीन राजांना गाईच्या गोठ्याकडे घेऊन येणारे उंट हे येशूठायी नम्रता आणि आत्मविश्वास ह्यांचा सुंदर संगम झाल्याचे दर्शवितात.

चिंतन : गाढव, गाई, मेंढरे आणि उंट ह्यांच्या कोणकोणत्या सदगुणांचे आपण अनुकरण करायला हवे असे मला वाटते?

. झाडे : ख्रिस्मसच्या गोठ्याजवळ एक ख्रिस्मस ट्री उभे असलेले आपण पाहतो. येशू हे जीवनाचे झाड आहे. खिस्मस ट्री हे इतर झाडाप्रमाणे सावली तर देतेच परंतु त्याच्यावर पडणारा सूर्यप्रकाश अगदी शेवटी जमिनी वर जाऊन पोहोचतो. इतरांना सावली द्यायचीच परंतु आपल्याला मिळणारा प्रकाश केवळ आपल्यापर्यंत मर्यादित ठेवायचा नाही तर तो इतरांपर्यंत नेण्यासाठी झटत राहावे असेच त्यातून सूचित केले जाते. कुटुंबात, समाजात गरजूना सावली कधी द्यायची आणि जगाला प्रकाश कधी द्यायचा ह्याचे तारतम्य आपण बाळगायला हवे.

चिंतन : ख्रिस्मस ट्री पासून मला कोणता संदेश मिळतो? तो  मला इतरांपर्यंत कसा घेऊन जाता येईल?

. भेटवस्तू : गाईच्या गोठ्यात आपल्याला तीन ज्ञानी पुरुष / मागी लोक / तीन राजे हातात भेटवस्तू घेऊन येशूला भेटायला आलेले दिसतात. येशू बाळाला देण्यात आलेल्या भेटीमध्ये सोन्याच्या खाणीतले सोने, झाडांपासून तयार करण्यात आलेला गंधरस आणि सुगंधी वनस्पतीपासून तयार करण्यात आलेला धूप आहे. सोने हे येशूच्या राजेपदाचे, धूप त्याच्या याजकपदाचे आणि गंधरस हे त्याच्या संदेष्टा पदाचे प्रतीक होय. आपले जीवन मौल्यवान आहे, ते देवाचरणी अर्पण केले जावे, समाजातील अनिष्ट गोष्टीविषयी आपण क्रांतिकारी भूमिका घ्यावी हा संदेश त्यातून मिळतो.

चिंतन : येशू बाळासाठी मी कोणती भेटवस्तू देणार आहे?

. हवेतील गारवा : नाताळच्या सणाला हवेत छान गारवा असतो. रात्रीच्या मिस्सेला ऊबदार स्वेटर घालून जायला खूप बरे वाटते. रात्री शेकोटीभोवती आणि दिवसा कोवळ्या उन्हात शेकायला भारी मौज वाटते. बेथलेहेमाच्या माळरानात तर यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. मेंढपाळ रात्रीच्या वेळी आपली मेंढरं राखीत होते. कदाचित तेही शेकोटीभोवती शेकत असावेत. मात्र हवेतील गारठा सोसण्यासाठी ती शेकोटी जशी आवश्यक होती तसा जीवनातील पापाचा थंडावा घालविण्यासाठी प्रभुच्या ऊबदार मायेची व क्षमाशिलतेची गरज असते हे दर्शविण्यासाठी स्वर्गातून एक देवदूत तिथे अवतरतो. त्याच्या तेजाने, त्याने दिलेल्या शुभ वार्तेने आणि त्याहीनंतर तिथे अवतरलेल्या दुतांच्या सुमधुर गायनाने मेंढपाळ हरखून गेले. ते घाईघाईने बेथलेहेमाच्या गोठ्याकडे गेले. तिथे त्यांना जगाचा प्रकाश प्रभू येशू बाळाच्या रूपात दिसला.

चिंतन : माझ्या जीवनात कोणकोणत्या बाबतीत पापांचा गारठा आलेला आहे? तो घालविण्यासाठी मी ह्या जगातील कोणकोणत्या प्रकारच्या शेकोटीचा आधार घेतो? ती शेकोटी सोडल्याशिवाय मला ऊबदार अश्या येशू बाळाचा दिव्य प्रकाश दिसणार नाही हे मला पटलेले आहे का?

. सुताराचे कुटुंब : येशू एका सुताराच्या कुटुंबात जन्माला आला. हा सुताराचा मुलगा ना? अशा शब्दात त्याला हिणवले गेले. स्वतः सुतारकाम करीत असल्याचे चित्र आपण कधी कधी पाहतो. सुतारांनी तयार केलेल्या बोटीत येशू फिरला. जे जू बैलाच्या मानेवर ठेवले जाते त्या जुवाचा तो उल्लेख करतो. ते जू सोयीचे आहे असे म्हणतो. माझे जू आपणावर घ्या असे म्हणतो. सुताराचं नातं लाकडाशी आणि खिळ्याशी असते. पुढे अशाच सुतारांनी तयार केलेल्या क्रूसावर येशूने जगाच्या तारणासाठी बलिदान केले. 

चिंतन : कोणताही व्यवसाय कमी दर्जाचा नसतो, हे मला पटलेले आहे का? हलक्या दर्जाची कामे करणाऱ्या लोकांकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन कसा असतो?

. विविध स्तरावरील सजीव : देशोदेशीचे राजे, रानातील मेंढपाळ, स्वर्गातील देवदूत असे विविध स्तरातील  सजीव येशू बाळाच्या भेटीस आले. स्वर्गातील देवदूतांच्या आगमनाने आसमंत उजळून निघाला. मेंढपालांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून सर्व जण आश्चर्यचकित झाले. राजांच्या भेटीने सर्व जगाला परमेश्वराचे प्रकटीकरण झाल्याचे सिद्ध झाले. बाळाच्या रूपात साक्षात देव आपल्या घरी अवतरल्याने योसेफ आणि मरिया धन्य झाले. येशूच्या पृथ्वीतलावरील आयुष्यात त्याने हजारो लोकांना दिव्य स्पर्श केला. त्यांचे विश्व बदलले. देवदूत वगळता हे सर्व जण मातीपासून बनवले गेलेले होते. मातीच्या मडक्यात स्वर्गीय संपत्ती साठवून ठेवावी तसा आपल्या मृण्मयी देहातील नश्वर काळजाच्या कुपीत देहधारी ईश्वर वास करू लागला.

चिंतन : येशूबाळाच्या आगमनाने माझ्या जीवनात कोणता फरक पडलेला आहे? 

समारोप :

एकंदरीत बाळ येशूच्या गोठ्याजवळ उभे असताना आपल्याला जाणवते की, येशू मानव होऊन केवळ मानवाशी एकरूप झाला नाही. तो संपूर्ण चराचर सृष्टीशी एकजीव झाला. आपल्या पृथ्वीवरील त्याच्या कार्यात त्याने निसर्गावर चिंतन केलं. तो डोंगरावर चढला, तिथे त्याने रात्रीच्या रात्री प्रार्थनेत घालवल्या. अरण्यात त्याने सैतानाशी झुंज दिली. त्याने समुद्रातून प्रवास केला. आपल्या शिकवणुकीत त्याने बी, निंदण, मोहरीचा दाणा, तुतीचे झाड, रानातील गवत, शेतातील फुले, आकाशातील पक्षी, अंजीरचे झाड, द्राक्षवेल ह्यांचा उल्लेख केला.

‘लावदातो सी’ ह्या आपल्या विश्वपत्रकामध्ये पोप फ्रान्सिस ह्यांनी आपल्याला पर्यावरण रक्षणाची हाक दिलेली आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे आपल्या मायभूमीतल्या संतांनी आपल्याला शिकविले आहे. आपापल्यापरीने अन्नाचा, पाण्याचा, विजेचा आणि इतर नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपण योग्य तो वापर करून परमेश्वर पित्याचा गौरव करू या.