​​अजय आणि अनिता – प्रा. स्टीफन आय. परेरा

​​अजय आणि अनिता

  • प्रा. स्टीफन आय. परेरा

सांडोर, वसई, मोबाईल – 9850878189

         विरारच्या दवाखान्यासमोर अनिता उभी राहून विचार करीत होती. काय करावे तिला सुचत नव्हते. रस्त्याच्या पलीकडे एक तरुण उभा होता. तो तिच्याकडे टक लावून पहात होता. अचानक तो तिच्या दिशेने धावत येऊन दुरुनच ओरडला ‘अनिता​,​ तू येथे कुठे ?’ आवाज ओळखीचा वाटला परंतु सफेद शर्ट व पॅन्ट, सफेद बूट आणि गळ्याला रुमाल बांधलेला एक तरुण आपल्या ओळखीचा असणे व तेही विरारसारख्या नवख्या ठिकाणी, तिला अशक्यच वाटत होते. त्यामुळे ती थोडी संभ्रमात पडलेली पाहून त्या तरुणाने तिच्याजवळ येताच डोळ्यावरील गॉगल काढून विचारले “अनिता मला ओळखले नाही ?” ‘अजयऽऽ’ अनिता जोराने ओरडली. त्याला पाहून अक्षरश: मिठीच मारावी असे तिला वाटले पण ती दोघं रस्त्यावर उभी होती याचे भान ती विसरली नव्हती.

         अगदी लहानपणापासून अजय व अनिता एकत्र वाढले होते. के.जी. ला असताना हातात हात घालून शाळेत जात होते. आज बऱ्याच वर्षांनी त्यांची भेट झाली होती. अजय विक्रोळीच्या एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा. त्याच्या वडिलांची बेलापुरला लहानशी फॅक्टरी होती. परंतु वडील अतिशय रागीट व शिस्तप्रिय होते. आई मात्र फार प्रेमळ व परोपकारी स्त्री होती. त्यांच्या घरात भांडी व कपडे धुण्यासाठी एक गरीब बाई रोज येत असे. ती कधी कधी आपल्या सोनुल्या बेबीलाही बरोबर घेऊन येत असे. हीच ती अनिता. अजयच्याच वयाची होती ती. अजय पावणेचार वर्षांचा झाला तेव्हा शेजारच्या इंग्रजी माध्यमाच्या कॉन्वेंट स्कूलमध्ये त्याला प्रवेश घेताना अजयच्या आईच्या शिफारशीने अनितालाही प्रवेश मिळाला होता. अजय आपला एकुलता मुलगा आहे. दुसरं मूल होण्याची आशा नव्हती. त्यामुळे अनिताच्या शिक्षणाची जबाबदारी अजयच्या आईने स्वत:हून स्वीकारली होती. अशाप्रकारे अनिता व अजय अगदी के.जी. पासून एकत्र शाळेत जात असत. शाळा सुटल्यावर अजयला शिकविण्यासाठी एक बाई येत असे. अनितालाही त्याच्याबरोबर शिकवणीस बसविले जाई व संध्याकाळी अनिताची आई तिला घरी घेऊन जाई.

         अजय व अनिता एकाच वर्गात शिकत होते. अनिता मात्र अभ्यासात हुशार होती. दरवर्षी पहिला दुसरा क्रमांक कधीच चुकला नाही तर अजय जेमतेम पास होत असे. इयत्ता सातवीपासून त्याला वाईट संगत लागली. वडिलांच्या अतिकडक स्वभावामुळे तो घरातून पैसे चोरून मित्रांना चहापाणी करीत असे. त्याच्याविषयी ​​पुष्कळ शिक्षकांच्या तक्रारी येऊ लागल्या. एकदा तर दुसऱ्या मुलांच्या दप्तरातून पैसे चोरताना अजय व त्याच्या साथीदाराना रंगे हात पकडले. सगळ्यांच्या पालकांना शाळेत बोलावले. पण ही गोष्ट अजयच्या आईने त्याच्या वडिलांपासून लपवून ठेवली. ती स्वतः शाळेत जाऊन मुख्याध्यापकांजवळ रडली आणि प्रकरण तेथेच मिटविले.

         इयत्ता नववीत जाईपर्यंत अजयचे प्रताप वाढतच गेले. काही गोष्टी अजयच्या वडिलांच्या कानावर गेल्या. त्यातच फॅक्टरीतील कामगारांमधील असंतोष, व्यवसायात आलेली मंदी आणि आपल्या चिरंजीवाचे एकेक प्रताप यामुळे त्यांना खूप मनःस्ताप झाला. आईने मात्र पुष्कळ गोष्टी त्यांच्यापासून लपवून ठेवल्या.

         इयत्ता नववी व दहावीच्या मुलांची सहल एस्सेलवर्ल्डच्या वॉटर किंगडमला जाणार होती. सर्व मुलांनी प्रत्येकी सव्वादोनशे रुपये आपल्या वर्गशिक्षकांकडे दिले. अजय व अनिताचे पैसे अजयच्या आईने स्वतः येऊन वर्गशिक्षकाकडे दिले. सहलीचा दिवस उजाडला. ठरल्याप्रमाणे कंत्राटदार बसेस घेऊन आला. त्याला पैसे देण्यासाठी वर्गशिक्षक स्टाफ रुमकडे गेले आणि पहातात तर लॉकर्स मधील सर्व पैसे गायब झाले होते व त्याचबरोबर इयत्ता नववीमधील तीन मुलेही गायब होती. त्यात अजयचा समावेश होता.

         त्यादिवसापासून अजय जो गायब झाला, तो आज सुमारे दहा वर्षांनंतर अनिताला भेटत होता. अधूनमधून तो घरी फोन करुन सांगत असे, “मी सुखरुप आहे, माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका.’ “

         अनिता चांगल्या गुणांनी एस. एस. सी पास झाली. तिला कॉलेजमध्ये पाठविण्याची अजयच्या आईची इच्छा होती. परंतु अनिताच्या आईने आपल्या चुलत बहिणीच्या मुलाशी तिचे लग्न जमविले. लग्न होऊन अनिता सासरी गेली. तिचे मिस्टर तारापूर येथे नोकरीला असल्याने त्यांनी विरारला घर घेतले होते.

         ​​अनिताला अतिशय प्रेमळ अशी सासू मिळाली होती. घरात दुसरे कुणीच नव्हते. निर्व्यसनी व सुस्वभावी पती व प्रेमळ सासू यामुळे अनिता सुखात होती. पण दैवी योजना काही वेगळ्याच असतात. कंपनीत झालेल्या स्फोटामुळे अनिताच्या नशीबी अचानक वैधव्य आले. त्यानंतर तिने दुसरे लग्न करावे म्हणून सासू आग्रह करीत होती पण ‘हा उंबरठा ओलांडून मी जाणार नाही’ असे अनिताने ठामपणे सांगितले. आपली सासू ही आपली आईच आहे व तिला शेवटपर्यंत साथ देण्याचा तिने निश्चय केला..

         अनिताची कहाणी ऐकून अजयला खूप वाईट वाटले; मग तो म्हणाला ‘अनिता, तू माझ्याबरोबर असे रस्त्यावर बोलत राहणे ठीक होणार नाही. चल, आपण तुझ्या घरी जाऊ. माझी तुझ्या सासूशी ओळखही होईल.

         “माझी सासू घरी नाही, इथे दवाखान्यात आहे. काल विरारच्या आठवड्याच्या बाजारात ती गेली होती. मी तिच्याकडे एक हजार रुपये दिले होते. कुणीतरी भामट्याने तिचे पाकीट मारले. दुकानातून सामान खरेदी करुन पैसे देण्यासाठी तिने हातातली बॅग उघडली तर ती खालून फाटलेली होती व पैशाचे पाकीट गायब झालेले होते. ते पाहून तिला इतका धक्का बसला की, ती खालीच कोसळली. सध्या ती इथे दवाखान्यात आहे. मी तिला मुंबईच्या दवाखान्यात हलविण्याचा विचार करते आहे. मला कुणाचीतरी मदत हवी आहे. “

         अजयचा चेहरा कावराबावरा झाला. त्याला काल रात्रभर मित्रांबरोबर हॉटेल सम्राट मधली पार्टी आठवली. ‘चिअर्स, वन थाऊझंड’ ची आठवण झाली. कसेबसे स्वतःला सावरीत तो म्हणाला, ‘चल अनिता, मी तुला मदत करतो आपण तिला मुंबईला घेऊन जाऊ.” दोघंही दवाखान्यात गेले. पहातात तो डॉक्टरांची धावपळ चालली होती. अनिताच्या सासूला आय.सी.यू. मध्ये नेले होते. अजय व अनिता आय.सी.यू. च्या बाहेर उभे असताना डॉक्टर बाहेर आले व म्हणाले, “आय अॅम सॉरी अनिता, तुझ्या सासूला आम्ही वाचवू शकलो नाहीत.” हे शब्द ऐकताच अजयने भिंतीवर डोके आपटायला सुरुवात केली.

         अंत्यविधी आटपून सुन्न मनाने घरी परतल्यावर अजयने अनिताचे पाय धरून पुन्हा तो खूप रडला व म्हणाला अनिता मला क्षमा कर, मीच तुझ्या सासूचा​ खून केला. मीच तिच्या मृत्यूला कारणीभूत आहे. यापुढे मी हा कुमार्ग सोडून द्यायचे ठरविले आहे.” क्षणभर थांबून तो स्वतःशीच बोलला, ‘पण वाघाच्या गुहेत शिरलेला माणूस माघारी फिरू शकत नाही. मग मला येथून कुठेतरी दूर दूर जायला हवं. अनितासाठी मला जगायला हवं, तिचं आयुष्य फुलविण्यासाठी मला जगायला हवं.” मग तो अनिताला म्हणाला “चल अनिता आताच निघायचं.”

         “कुठे जायचे?” तिने विचारले. त्यावर निश्चयी मनाने तो म्हणाला, “मी तुला घेऊन माझ्या बापाकडे जाईन व त्यांना सांगेन बाबा मी देवाचा, तुमचा आणि या अनिताचा फार मोठा अपराध केला आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याची माझी लायकी राहिली नाही. या अनिताला तुमची मुलगी म्हणून स्वीकारा; आणि मला तुमचा मुलगा नव्हे तर नोकर म्हणून तुमची व या अनिताची मरेपर्यंत सेवा करण्याची संधी द्या.