देवाचिया दारी दानांच्या नाना परी !
- स्टॅन्ली गोन्सालविस
दूरभाष : 8390706013
ई-मेल : stanleyg2013@gmail.com
देऊळ म्हटले की तिथे देव असतोच. देवळात देव नसेल, तर त्याला देऊळ कोण म्हणेल? कोणी काही म्हणोत, पण देवळात तरी देव असतो व देवाजवळ दानपेटीही असते. देव तिथे दानपेटी! पुजारी व भक्तांपेक्षा दानपेटी देवाशी अधिक जवळीक साधून व ठाण मांडून बसलेली असते, असे आपल्याला दिसते.
सर्वसाधारणपणे माणसाचं कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी असतं. देवाला मात्र कोटी कोन असलेला ‘अवघाचि संसार’ अनुदिनी, अनुतापे सांभाळायचा असतो. त्यात भर म्हणून क्षमाशील, दयावंत, उदार, प्रेमळ, संकटविमोचक, सुखकर्ता, दु:खहर्ता, भाग्यविधाता अशी माणसांना लावता येत नाहीत, ती यच्चयावत गुणवैशिष्ट्ये आपण एकट्या देवाच्या गळयात मारली आहेत. त्यामुळे त्याच्या पायाशी माथा टेकवणार्या प्रत्येक साधू, सज्जन, संत, सभ्य तसेच लबाड, ढोंगी, काळाबाजारु, माथेफिरु, दरोडेखोर व राजकारणी अशा सार्या भक्तगणांवर कृपावंत होऊन त्यांना कृपाप्रसाद देणे, ही देवाची 24 x 7 डयुटीच बनलेली आहे.
देव हा विश्वनिर्माता असला तरी पैसा व त्या जोडीने येणारे खाणे, कमावणे, जोडणे, दडवणे, लंपास करणे, लुटणे असे पैशाचे कृष्ण-धवल खेळ त्याला अजिबात जमत नाहीत. माणूस उत्क्रांत झाला तसा देव काही झाला नाही. तो आपला तसाच युगानुयुगे ‘भोळा सांब’ राहिला आहे. त्यामुळे बहुमिती माणसांशी वागताना त्याची विश्वमती फारशी काम देत नाही. त्याची सारी भिस्त असते ती दानपेटीवर व त्या पेटीचा सांभाळ करणार्या विश्वस्त ऊर्फ पुजार्यांवर. म्हणूनच देवळात देव, त्याच्या पुढयात दानपेटी व त्या पेटीवर ‘तृतीय नेत्र’ रोखून मंत्रपठण करीत बसलेला पुजारी असे दृश्य सर्व देवळांतून (‘प्रार्थनास्थळ’ म्हणणं अधिक सर्वसमावेशक!) दिसून येते.
अवघ्या चराचराची निर्मिती देवाने केलेली असल्याने त्याला प्राण्यांप्रमाणे चरावे लागत नाही. साहजिकच माणसांसारखी दिवसरात्र खायचीच चिंताही त्याच्या पोटाला चिमटे घेत नाही. म्हणूनच तो आपल्या ट्रस्टींवर ट्रस्ट ठेवून सदा स्वस्थ, ध्यानस्थ बसलेला असतो. देवाची ध्यानसमाधी भंगू नये म्हणून पुजारी देवाचा डोळा चुकवून देवाच्या त्या तिजोरीतून स्वत:च्या गरजा परस्पर भागवून टाकतो. मात्र देवाजवळ अंतर्दृष्टी नामक सी.सी. कॅमेरा असतो, ह्याची डोळे उघडे ठेवून मलई चाखणार्या पुरोहिताला काहीच कल्पना नसते. एकतर देव आपल्या माणसाच्या ह्या हातचलाखीकडे डोळेझाक करतो किंवा (बे) ईमानी चाकराला क्षमा करणे, हे त्याचे कर्तव्यच असल्याने तो मूग (ऊर्फ प्रसाद) गिळून गप्प बसतो. त्यामुळे प्रमाद घडला तरी क्षमादान आहेच, ह्या खात्रीने पुजारी दानपात्र हलके हलके रिक्त करीत राहतो.
देवाचे भक्तगण मात्र दानपेटी कशी भरते, कधी व कशी खाली होते, ह्याकडे कानाडोळा करीत फूल ना फुलाची (फक्त) पाकळी त्या पेटीत भक्तिभावे टाकत असतात. दिल्याने वाढते, ह्या वचनावर (देवापेक्षा) गाढ श्रध्दा (व तशी आशा) असल्याने ते देत राहतात व दिल्याच्या (दस) पटीत आपल्या हाती पडावे म्हणून त्या जगन्नियंत्याकडे हात जोडून गार्हाणे घालतात! काहीजण तर दामदुप्पट परताव्यासाठी नवस बोलून त्याच्या पायाशी साकडेच घालतात. भगवंताच्या कृपेने धनिक बनलेले भाविक आपल्या पुरवणी मागण्यांच्या पूर्ततेसाठी देवादिकांचा पिच्छा करीत देश-परदेशांतील तीर्थस्थळांच्या हवाई यात्रा करतात. ‘भेटी लागे जीवा लागलीसे आस’ म्हणून गावोगावी पर्यटन करीत देवाचा शोध घ्यायचा व त्याच्याकडून रिटर्न भेटींचा वाढीव प्रसाद उकळायचा अशी असते त्यांची चलाख भक्तनीती! त्यामुळे देवाकडून पुण्यप्राप्ती व ‘डयुटी फ्री’ मधून ‘तीर्थ’प्राप्तीही करुन घेता येते!
माणसांची असली ‘अवनीती’ पाहून देवाला हसायला येत असले तरी माणसांसारखं खो-खो, फिदीफिदी किंवा खुदूखुदू वगैरे हसणं त्याच्या इमेजला धरुन नसल्याने तो फक्त गालातल्या गालात हसत भक्तांवर अनुग्रह करीत राहतो. खरेच, देव किती चांगले असतात!
सर्व चांगुलपणाचा ठेका (टेंडर न मागवता) आपण देवाला दिलेला असल्याने त्या बिचार्या जनार्दनाला जनतेच्या मनोकामना पूर्ण कराव्याच लागतात. तो कधी रुसत नाही, की क्रोधिष्ट होत नाही. खूप वर्षांपूर्वी म्हणे देव खूपच कोपिष्ट होते; ते माणसांना (माणसांसारखे) शापसुध्दा द्यायचे! कदाचित तेव्हाचे लोकच वाईट असावेत! आता माणसांचा ‘विकास’ झाला आहे. ते आपला वाईटपणा दडवतात व (वरकरणी) चांगले दिसतात. देवाला हार-तुरे घालताना, प्रसाद वाढवताना देवासह सेल्फी काढताना तर ते देवाहून अधिक सोज्ज्वळ भासतात. भोळा देव माणसांच्या ह्या वरलिया रंगांना भुलतो व त्यांच्या मनीषा पूर्ण करतो… त्यांना हवे ते देऊन टाकतो!
देणारा देव देतच राहतो. त्यामुळे घेणार्याला हजार हात फुटतात. ‘हेचि दान (परत-परत) देगा देवा’ म्हणत ते सतत देवाच्या मागे लकडा लावतात. मागणार्यांच्या हातातील कटोरी कधीच भरत नाही. माणूस हाती लागलेलं सफाईदारपणे गुडूप करतो व पुन्हा हात पुढे करीत देव, अजून देव म्हणतो! गंमत म्हणजे, जे मिळालं आहे, त्यातनं चतकोर काढून इतरांना देताना मात्र हात आखडता घेतो. असं असलं तरी आपल्या झोळीतील काहीतरी इतरांच्या झोळीत टाकण्याइतका देवभोळेपणा बर्याच माणसांमध्ये असतो. भिक्षापात्र असो की दानपात्र, त्यात काही नाणी टाकली की (वर) कमाईची हमखास गॅरन्टी असल्याने खिशात खुळखुळणारी नाणी (तेवढी) टाकण्याचे औदार्य ते दाखवतात. जो हात पुढे येतो, त्याला रिक्तहस्ते पाठवायचे नाही, ही तर आपली कर्णसंस्कृती आहे. सरकारी कचेरीत ह्याचे प्रत्यंतर टेबलोटेबली येतेच ना? म्हणूनच देत जावे, दाते व्हावे; मग ते दान सत्पात्री असो नसो, जो देगा उसका(च) भला!
देवादारी रांगा लावून दानपेटीत किडूक-मिडूक टाकून करोडपती होण्यासाठी देवाला गळ घालणारे बरेच असतात; पण काही कर्णावतारी भक्त चक्क किलोवारी सोन्याचे दागिने अन् नोटांचे गठ्ठे दानपेटीत टाकतात. ते त्यांचे (गुप्तपणे कमावलेले) गुप्तदान असते. डाव्या हाताने दिलेले उजव्या हाताला (किंवा सरकारलाही) कळू नये ह्याची दक्षता घेत हे भले दानशूर ‘अनामिक’ राहात दानाचा धर्म करतात. त्यांना पुण्यही तसेच मिळणार ना, डब्बल टिब्बल? मग ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून देवसुध्दा त्यांच्या संपत्तीत भरभरुन भर घालतो! देणारा भक्त ‘भरुन’ पावतो. जशी करणी तशी भरणी!
देव भावाचा भुकेला, असे संतांनी लिहून ठेवले आहे. पण देव धनाचा भुकेला समजून आपले सधन सज्जन त्याच्यापुढे धनाच्या व मौल्यवान धातूच्या राशी ओततात. त्यामुळे होते काय की, काही देव श्रीमंत अमूक तमूक म्हणून सेलिब्रेटींसारखे मीडियातून चमकत राहतात; तर जुन्या, पडक्या मंदिरांतील देव जीर्णोध्दाराची वाट पहात युगानुयुगे ताटकळत उभे असतात… गावकुसाबाहेरच्या सदा जीर्णविदीर्ण फाटक्या माणसांसारखी असते हो त्यांची अवस्था! दया येते अशा देवांची! अर्थात, झोपडी आणि महालांमध्ये राहणार्यांत फरक हा असतोच ना?
ब्रह्मांडस्वरुप देवाला मात्र झोपडीसुध्दा महालासारखीच वाटते. माणसाने त्याला जिथे ठेविले तिथे तो सुखाने वसत असतो. कुठेही असला तरी तो आपला देण्याचा वसा सोडीत नाही. धनवान भाग्यवान मात्र, अहो, चमत्कार! चमत्कार!! हाच तो नवसाला पावणारा इच्छापूर्ती देव, असा एखाद्या देवस्थानाचा गवगवा करतात. मी देवाला सोन्याचा मुकूट दिला, देवाने मला पुत्ररत्न दिले; मी त्याला हिर्यांचा रत्नहार दिला, त्याने माझ्या मुलाला अमेरिकेचे ग्रीनकार्ड मिळवून दिले; मी त्याच्या पेटीत नोटांची थप्पी ओतली, त्याने मला सरकारी कंत्राट मिळवून देऊन मालामाल बनवले… देव आणि घेव!
देवाच्या मंदिरात हे असले देण्या-घेण्याचे व्यवहार? तेही प्रत्यक्ष देवाला साक्षी ठेवून? निस्सीम देवभक्तांना हे सगळं वाचताना ठसका लागल्यासारखं होतंय ना? देवावर अशी कोणी शंका घेतली वा कुशंकेची शिंक काढली की भक्तांच्या नाकपुडया लालीलाल होणारच… पण मग असे चमत्कार वजा केले तर देव आणि माणसांत फरक तो काय राहिला? चमत्काराशिवाय देव नसतोच! म्हणूनच चमत्कारांना ‘चमत्कारिक’ म्हणून हिणवणार्या अंधश्रध्दावंतांना चांगलाच ‘प्रसाद’ द्यायला हवा! जाऊ द्या. भक्तगण काय ते (त्यांना) बघून घेतील!
एकमात्र खरे की, एकजात सारे देव चमत्कार करतात, हे जरी चमत्कारिक वाटले तरी ते खोटे मानू नये. कारण देव जसा माणसांत काळा-गोरा भेद करत नाही, तसाच धनांतही करत नाही. त्याच्या चरणी वाहिलेले काळे धनही पांढरेफटक पडते! काळयाचे पांढरे बनण्याचा हा चमत्कारी अनुभव सामान्य पामरांना कधीच येणार नाही. नोकरदार माणसे त्या अर्थी कफल्लक. तिथे पाहिजेत अस्सल, अट्टल व जातवान भक्त. म्हणजेच उदाहरणार्थ, बनचुके बनिये, व्यापारउदीम करणारे ‘उद्योगी’ लोक, डिजिटल तंत्रज्ञान अवगत नसल्याने रोखीने व्यवहार करणारे व्यावसायिक, ‘सर्जन’शील शल्यविशारद, छोटया-मोठया पडद्यावरील बडे कलाकार, टेबलाखालून देवघेव करणारे ठेकेदार, खंडणी नावाची देणगी वसूल करणारे कार्यकर्ते, जनतेने ‘निवडलेले’ लोकसेवक इ. …
दानपात्रात कवडया टाकणारे किंवा (मोजून मापून) घडी करुन नोटा टाकणारे पगारदार भाविक तसे कवडीमोल. त्यांनी देवापुढे डोके टेकवून कितीही माथेफोड केली, तरी त्यांच्या जीवनात चमत्कार घडत नाहीत. श्रध्दा व विश्वासाचे जे आंधळे डबोले त्यांच्यापाशी असते, त्यावरच ते जगतात. अशा अंधभक्तीमुळे रेशनच्या रांगेत अर्धा दिवस उभे राहिल्यानंतर जे काही किडकं, सडकं धान्य धोपटीत पडतं त्यामुळे पोराबाळांना दोन घास खायला मिळतायेत हाच ते देवाचा चमत्कार समजतात. मरण येत नाही तोवर जगणं अटळ असलेल्या अनेक अभागी भक्तांच्या दृष्टीने तर ते (अजून) जिवंत आहेत, हाच मोठा चमत्कार असतो.
आँ? इथे पुन्हा भावना वगैरे नाजूक अवयव दुखावल्यासारखं वाटतंय का? देवसुध्दा माणसांच्या वळणावर जातोय का? म्हणजे जो जितकं देईल, तितकंच त्याच्या ताटात वाढायचं? अरेच्चा! म्हणून का काही भक्तांच्या ताटात पक्वान्नांच्या ऊतू जाणार्या राशी आणि काहींच्या ताटात चार शितंही दिसत नाहीत? खरे तर देवापाशी न्याय-अन्याय नसतो. दगड-मातीची मूर्ती ती. माणसानेच घडवलेली व त्या मूर्तीत देवत्व लादलेली. माणूस, त्याचं माणूसपण आणि त्याची विवेकबुध्दी एवढंच खरं. विवेक-अविवेकानेच न्याय होतो; अन्याय घडतो. सच्चे भक्त आपल्या मनोदेवतेस स्मरुन जगतात. त्यांना न मागता मिळते समाधान आणि शांती. म्हणूनच निष्काम हेतूने देत राहायचे, हात मोकळे सोडून देत राहायचे; म्हणजे न मागता मिळत राहाते…
*****