सिस्टर शुभदा
- फादर मायकल जी, वसई.
सिस्टर शुभदा यांचं घर मिळणं काही कठीण नव्हतं, ते मिळालं; परंतु त्या चाळीवजा घरातल्या नक्की कोणत्या खोलीत त्या राहत होत्या त्याचा मात्र शोध घ्यावा लागला. जुन्या पध्दतीचा बंगला नव्हे घरंदाज राजवाडाच तो. दगडी भिंती आणि उंचच उंच मंगळूरू कौलारू छप्पर. पन्नास-साठ वर्षांपूर्वी चार आजोबांना त्यांच्या नातवंडांसह एकत्र नांदू देणारे ते घर! आता ओस पडलंय! सिस्टरांची खोली ओटीवरून लायनीत अगदी शेवटची, किचनला लागून होती! अर्थात त्या अंधाऱ्या माजघरात शोधून पण मिळाली. दारावर नाव होते पण अंधारात वाचावे लागले. बेल मारताच सिस्टर शुभदा बाहेर आल्या, त्याबरोबर खोलीतला लख्ख प्रकाशदेखील आमच्या चेहऱ्यावर पडला. सिस्टर आमची वाटच पहात होत्या. खोलीत भरपूर जागा होती. आमच्यासाठी खुर्च्या नि टेबल तयार होते. टेबलावर पाण्याच्या बाटल्यादेखील तयार होत्या.
आम्ही त्यांना म्हणालो, “सिस्टर, मुलाखत घेण्यासाठी आपण परवानगी दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. परवा आपण आयोजित केलेल्या भिकाऱ्यांच्या सहलीच्या खूप बातम्या पेपरात झळकल्या! वाचून आम्हाला तुमच्या विषयी थोडीशी कल्पना आली. ती अधिक यावी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद!”
“वेलकम!” फिक्कट सोनेरी रंगाच्या साडीतील सिस्टर हात जोडून स्मित करीत म्हणाल्या.
“मी सिनक्लेयर आणि हा माझा सोबती जोनस.”
“मी जोनस, आपल्याबरोबर संडेस्कूलमध्ये शिकवतो.”
“आम्ही तुमची मुलाखत ‘लोकसत्ता’वृत्तपत्रासाठी तयार करीत आहोत.
“छान! चांगल्या कामाची जाहिरात झालीच पाहिजे.”
“सिस्टर ,..” जोनस काही बोलणार तेवढ्यात त्याला अडवत सिटर उद्गारल्या, “एक रिक्वेस्ट! सारखं ‘सिस्टर, सिस्टर’ करू नका. मी कॉंन्व्हेन्ट सोडलं आहे. मला शुभदा म्हणा.”
“सॉरी! ताई..” मी म्हणालो, “सर्वप्रथम सांगा ही भिकाऱ्यांना मुंबई दाखवायची भन्नाट कल्पना कशी सुचली? आणि त्यांची जमवाजमव कशी जमली?”
“माझी ती कॉंन्व्हेन्टमध्ये असतानाच खूप वर्षाची इच्छा होती. विन्सेंट-द-पॉल सोसायटीमधून आपण केवळ सुखवस्तू अपंगांची सेवा करतो. जे दिन, दलित भीक मागतात अशांसाठी काहीतरी करावे. त्यांची सहल यंदा इथे झाली! अनेकांच्या मते काहीतरी ते विचित्र घडले. विचित्र? होय, तरी ज्या कार्यकर्त्यांनी माझी कल्पना उचलून धरली आणि ती प्रत्यक्षात उतरवली! त्यांचे मला विशेष आभार मानावयाचे आहेत.”
“वर्तमानपत्रात खूप प्रतिक्रिया आल्या. देशोदेशींच्या माधुकऱ्यांची चर्चा झाली. काही जातीयवाद्यांनी तर इस्लामच्या रमझानच्या काळात भारतातून काही लोक कसे विमानाने मक्केला जातात केवळ भीक मागण्यासाठी ह्यावरदेखील प्रकाश पाडला! वर्तमानपत्राने मात्र शंका उपस्थित केली की अशाने तुम्ही भीक मागण्यास प्रोत्साहन देता!”
“नाही. सहलीत माधुकऱ्यांचं खूप काही शाब्दिक प्रबोधन आम्ही केलं नाही; परंतु निदान त्यांना जाणीव दिली की हे उच्चभ्रू लोक आपल्यामध्ये बसतात, उठतात, आपल्याला समानतेने वागवतात! परिणामी त्यांच्या मनात जी अस्मिता निर्माण झाली, हेदेखील काही कमी नाही आणि ती अस्मिता त्यांच्या जीवनात बदल घडवून आणील.”
“माधुकरींमध्ये अनेक ढोंगी आहेत, पैसेवालेही आहेत!”
“कबूल. पण सगळेच तसे नाहीयत. त्या माधुकरी ग्रुपबरोबर बातचीत करताना अनेक गोष्टी आमच्या लक्षात आल्या. ते उगीच भीक मागत नाहीत. नाईलाजाने त्यांना ते करावे लागते. काहींना आपले आईवडील माहित नाहीत. जन्मापासूनच ते रस्त्यावर आहेत. आजही ते रस्त्यावरच झोपत आहेत. आलेल्या माधुकऱ्यांपैकी फक्त दोन व्यक्ती झोपडीत राहतात. बाकी सर्व रस्त्यावर व बाजाराच्या ठिकाणी रात्रीचा आश्रय घेतात. अशा लोकांना मग नोकरी कोण देणार? त्यातल्या एका बाईचा मात्र आम्ही त्यांच्यासमोर आदर्श उभा केला. तिने तिच्या दोन छोट्या नाती सोबत आणल्या होत्या. त्यांना तिने इंग्रजी शाळेत घातले होते! कमाल झाली! भाजी मार्केटमध्ये झोपते नि मुलींना इंग्रजी शाळेत!”
“कित्येक वर्षे ते चर्चच्या गेटवर बसतात पण चार आठ नाणी फेकण्यापलिकडे कोणी कधी चौकशी केली नाही. ‘पण तुम्ही हा सुंदर दिवस आम्हाला दाखवला! आम्हाला देव भेटला.”
“सहल झाली, पुढे काय?”
“सहलीनंतर कार्यकर्त्यांनी एकाला नोकरी दिली, एकाला तीन चाकी सायकल तर एकाला व्हीलचेअर. निराश्रितांना रेशनकार्ड, आधार कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू केले.”
“मी एक कॅथलिक ह्या नात्याने विचारतो, हे कार्य करण्यासाठी तुम्हाला कॉन्व्हेंट सोडायलाच हवे होते का?”
“ती खूप मोठी कथा आहे.”
“अगदी सविस्तर सांगा.”
“तर मग आधी चहा घ्या.” किटली टेबलावरच होती. चहा ओतत शुभदा म्हणाल्या, “मला कॉंन्वेंट सोडावयास निमित्त झाली ती माझी आई.”
“तुमच्या आईच्या अंत्यविधीला मी हजर होतो. जमाव मोठा होता, सिस्टरची आई म्हणून असेल.”
“तिच्या आजारात सेवा करण्यासाठी मला घरी यावं लागलं. त्या आठवड्यात कॉन्वेन्टमध्ये माझी रिसेप्शनिस्ट म्हणून पाळी लागली होती. त्या दिवशी सकाळी ६ वाजताच फोन खणखणला. फोन उचलून ज्याचा त्याला द्यायचं काम माझं होतं. पण माझा भाऊच फोनवर होता.
“हॅलो!” आवाज ओळखून मी आनंदले व म्हणाले, “अरे दादा! शुभदा बोलतेय. आज सकाळीच फोन? आई कशी आहे?”
“ताई, आई सीरियस आहे. कोमात आहे.”
“मी येण्याची गरज आहे का?”
“येशील तर एक महिन्याभराची सुट्टी घेऊनच ये.”
मी मध्य प्रदेशात होते. पण मी आले. माझे तीन भाऊ; किल्लेवजा घरातल्या ह्याच खोलीत ती एकटी पडली होती. किल्ल्याभोवती तिघांचे आलिशान बंगले उभे आहेत, पण त्यापैकी कोणीही आईची नीट देखभाल करत नव्हता. शेवटी मी सुपिरियरना विनंती केली, मला थोडे दिवस आईची सेवा करण्यासाठी घरी राहू द्या.” मला परवानगी मिळाली. मी आईची सेवा करू लागले. पण एक वर्ष पूर्ण झालं तरी चौऱ्यांशी वर्षांची आई काही मरत नव्हती(!) शेवटी सुपिरियरने मला आज्ञा केली, “तू आता कॉन्वेंटमध्ये परत ये.” पण मी रिक्वेस्ट केली की आता तर खरी आईची सेवा करण्याची गरज आहे; कारण ती बेडरीडन झाली होती! मी सगळी सेवा खाटेतच करत होते. सुपिरीयरचे काहीच उत्तर आले नाही. मी जास्त अजिजी न करता चूप राहिले. आणखी एक वर्ष गेलं, तेव्हा कुठे आई देवाघरी गेली! मी त्वरीत सुपिरियरना कळवलं, ‘आता मी येऊ शकते. पण सुपिरियरनी मला काहीच प्रतिसाद दिला नाही. मला ‘सीमपंथीज’ देण्यासही त्या विसरल्या! मी वाट पहात घरीच राहिले. आईची ही रिकामी झालेली खोलीच मी वापरू लागले.
काही महिन्यांनी मी आमच्याच शाळेत एक छोटासा शिक्षकीचा जॉब पकडला. समाजात जी मिळेल ती सेवा करू लागली. अशी वर्षे भरू लागली आणि आज भिकाऱ्यांच्या सहलीपर्यंत घडामोडी घडल्या! मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का?”
शुभदा थांबल्या. त्यावर मला काय बोलावे ते कळेना; जोनस मात्र उत्स्फूर्त म्हणाला, “तो तुमच्या सदसदविवेकबुद्धीनुसार देवशब्दाच्या प्रकाशात घेतलेला निर्णय असणार! तो चुकीचा कसा ठरेल?” जोनसच्या त्या शब्दांनी मला आठवण करून दिली, तो एक एकससेमिनेरियन होता, त्याचे तीन वर्षे सेमिनरीत गुरूदिक्षेचे ट्रेनिंग झाले होते!
मी सहानुभूतीपूर्वक म्हणालो, “तुम्हाला व्रतस्थ जीवन सोडताना कठीण गेले असणार ना?”
शुभदांनी रूमाल डोळ्यांना लावला नि म्हणाल्या, “अर्थात!”
“ताई, सॉरी आपली बैठक व्यक्तिगत होत आहे. पण आम्हाला तशीच हवी. तुमची हरकत नसेल तर..”
“चालू द्या. त्यातूनच वाचक बोध घेतील. गुळमुळीत बोलून काही साधत नाही. ”
“मला वाटत होतं की प्रापंचिकांच्या मानाने फादर-सिस्टरांचे जीवन सुरळीत चालत असेल…”
“नाही. बायबलमधल्या जोबप्रमाणे परमेश्वर आम्हावरसुद्धा संकटे आणि कठीण परिस्थिती पाठवतो. त्यामध्ये आपल्याला परमेश्वराच्या इच्छेनुसार निर्णय घ्यायचा आहे.”
“शुभदाजी, एक प्रश्न विचारतो. मर्यादा ओलांडत असेन तर मला क्षमा करा; पण तुमच्याविषयी पॅरीशमध्ये असं बोललं जातं की तुम्ही नियमित चर्चला येत नाहीत.”
शुभदा खळखळून हसल्या. खरंय्. “कॉंन्व्हेन्टचा निरोप घेतल्यावर मला वेगळ्या अध्यात्माचा शोध लागला. मी लोणावळ्याला एका जेज्विट फादरांजवळ रिट्रीट केली. त्यांनी मला एक नवे अध्यात्म शिकवले: येशू का चर्चमध्ये बंदिस्त आहे? मुळीच नाही” आता प्रार्थनेच्या वेळी मी माझ्या देहाच्या मंदिरात शिरते. माझ्या फुप्पुसात श्वास घेणारा ईश्वर अनुभवते. माझ्या हृदयाची धडधड करणारा ईश्वर मी अनुभवते… अध्यात्मावर बोलू नं?”
“बोलाच. मला तर माझे सेमिनरीचे दिवस आठवतात.” जोनस उत्स्फूर्तपणे उद्गारला.
“का कुणास ठाऊक, तुम्ही मला बोलतं करताहात. माझी मतं थोडी बोल्ड झाली आहेत. परमेश्वराला आपण दगडधोंड्याच्या मंदिरात बंदिस्त केला आहे; नव्हे तर आणखीन सुरक्षा म्हणून त्याला वेदीवरच्या पेटीमध्ये आणि पेटीमधल्या सोनेरी पेल्यामध्ये बंदिस्त करून ठेवला आहे! पण परमेश्वर बंदिस्त राहत नाही तो सर्वत्र आहे.”
“बरोबर आहे. तरूण पिढीला तसंच काहीसं वाटते. परवा तुम्ही असेच काही आंतरिक धर्माबद्दल बोललात म्हणून तुम्हाला पॅरीशच्या संडेस्कूलमधून बाहेर पायउतार व्हावं लागलं ना?”
“खरंय. तुम्ही विचारता म्हणून सांगते, ‘तोच तो परमेश्वर’ माझा श्वास चालवतो, तोच माझे हृदय चालवतो. ध्यानामध्ये मी त्या ईश्वराशी, जो श्वासात आहे, ध्यानात आहे त्याच्याशी एकरूप होऊ पाहते आणि जसजशी ती एकरूपता मी अनुभवते, तसतसे एक वेगळं बळ, उत्साह, ऊर्जा मला जीवनामध्ये मिळते. मी रविवारच्या मिसाला जाते ते अर्थात येशूची परिवारामध्ये भेट घेण्यासाठी. त्या मिस्सा बलिदानाच्या निमित्ताने आधी आणि नंतर भाविकांना भेटते संपर्क वाढवते…”
“आता पुढे काय?”
“माधुकरी बांधवांच्या सद्द्याच्या जीवनासाठी नि पुनर्वासासाठी अनेक प्रकल्पदेखील तयार आहेत. तुमचं कार्यकर्ते म्हणून स्वागत आहे… सॉरी, आपली मुलाखत लांबली.”
“होय, आता आपण आवरतं घेऊ या.” मी खुर्चीत सावरत म्हणालो.
जोनसने माझी री ओढत म्हटले, “तर मग शेवटी सांगा, तुम्ही कॉन्व्हेंटमधून बाहेर पडलात म्हणूनच तुम्ही हे वादळी विचार करू शकल्या, हे खरं ना?”
“आणि जणू काही तुमच्या आईने तुम्हाला ही जीवन भरारी घेण्यासाठी मदत केली!’ अशी आम्ही विधाने केली तर आमचे चुकेल का?”
“नाही. मला तर लूक १३.१० आठवतो. त्यामध्ये येशूने एक कुबडी बाई दाखवली आहे, वाकलेली.. प्रभू येशू तिला विकारमुक्त करतो तेव्हा ती सरळ होते, सरळ पाहू लागते! मला वाटतं की तसंच काहीतरी माझ्या जीवनात झालं आहे!”
“तरी जाता वाटतं, तुम्ही ह्या भयाण किल्ल्यात एकट्या राहू नये.”
“मी एकटी नाही. माधुकऱ्यांच्या सहलीतील ती एक छोटी मुलगी माझ्या सोबत राहाते, शाळा शिकते. शिवाय भावांच्या तिन्ही बंगल्यात माझी ये-जा असते.”
जोनसने मुलाखतीवर शिक्कामोर्तब करीत म्हटले, “सुपर्ब! शुभदाजी, तुम्ही पूर्वी ‘रिलीजस’ होतात पण आता ‘रिलीजसली’ जगत आहात!”
“प्रेज्ड बी द लॉर्ड!”
“पुन्हा भेटू!”