आकलनाचे युग – फ्रान्सिस आल्मेडा सर

आकलनाचे युग

  • फ्रान्सिस आल्मेडा सर, निर्मळ, वसई

मानव प्राणी विचार करायला लागला तेव्हापासून आकलनाचे युग सुरू झाले. सस्तन प्राण्यांपैकी एक असलेला प्राणी जेव्हा चार पायावर चालण्याऐवजी दोन पायावर चालायला लागला तेव्हा तो होमो इरेक्टस झाला आणि विचार करायला लागला तेव्हा तो झाला होमोसेपियन! येथूनच पुढे आकलनाचे युग सुरू झाले.

आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर विचार करून आजूबाजूचे जग समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मानवाच्या हातात फार मोठे सामर्थ्य आले. आत्तापर्यंत इतर प्राण्यांप्रमाणेच दोन डोळ्याने पाहणारा मानव प्राणी तिसऱ्या डोळ्याने पाहायला शिकला. हा बुद्धीमत्तेचा तिसरा डोळा जितका वापरला गेला तेवढा मानव प्रगत होत गेला.

मानवाच्या या तिसऱ्या डोळ्याने पहिले काम केले ते एकमेकाशी ध्वनीच्या सहाय्याने संपर्क साधण्याचे. प्राण्यांना नुसते आवाज काढता येतात आणि मानवाने त्या आवाजाचे रूपांतर शब्दात केले. एकेका आवाजाला वेगवेगळे अर्थ देऊन बोलीला जन्माला घातले. माणसाच्या एका मेंदूतील विचार दुसऱ्या मेंदूपर्यंत पोहचायला लागले. तिसऱ्या डोळ्याचे सामर्थ्य अधिकच वाढले. एकाला तिसऱ्या डोळ्याने कळलेली गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचली आणि त्याने आपल्या तिसऱ्या डोळ्याचा वापर करून आणखी पुढे पाहिले. या आकलनाच्या क्षमतेमधूनच मानवाने हत्यारे तयार करणे, शिकार करण्याऐवजी शेती करणे, अग्नीचा वापर करणे, घरे बांधणे व जलद हालचालीसाठी इतर प्राण्यांचा वापर करणे आणि चाकाचा उपयोग करून वाहने तयार करणे या गोष्टी साध्य केल्या. त्यातूनच गावे, नगरे व राज्ये वसवली गेली.

         अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर मानवाने बोलीचे रूपांतर लेखी भाषेत केले. बोलीमध्ये उच्चारलेले शब्द लगेच नाहीसे होत होते. आता मात्र ते टिकवून ठेवण्याची युक्ती मानवाला सापडली. बोली भाषा शिकवावी लागत नाही. परंतु भाषेचे लेखन आणि वाचन हे शिकवावे लागते त्यामुळे औपचारिक शिक्षणाला प्रारंभ झाला. साक्षर माणसाची क्षमता निरक्षर माणसापेक्षा शतपटीने वाढली. त्याला आपली अनुभवाची शिदोरी दुसर्‍यांपर्यंत पोहोचवता यायला लागली. आपण केलेल्या कामाची नोंद ठेवता यायला लागली. दूरच्या लोकांपर्यंत संदेश पाठवता यायला लागले. जीवंत माणसाचे नव्हे तर भूतकाळात होऊन गेलेल्या विचारवंतांचे विचार आणि अनुभव पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडू लागले. आपल्याला उपलब्ध असलेला इतिहास हा लेखन कला साध्य झाल्यानंतरचाच बहुतेक इतिहास आहे. त्यापूर्वीची माहिती इतिहास संशोधकांनी उत्खननात सापडलेल्या साहित्यावरून काढलेले अनुमान आहे त्यामुळे तेव्हा नेमके काय घडले ते कळू शकत नाही. लेखन कलेमुळे मात्र मानवी संस्कृती वेगाने विकसित होत गेली.

         तिसऱ्या डोळ्याने दिलेली आणखी एक देणगी म्हणजे विज्ञान. विज्ञानाचा पहिला भर निरीक्षणावर असतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही पाच इंद्रिये आपल्याला बाहेरच्या जगाचे ज्ञान देतात. त्यांच्या मदतीने आपण निरीक्षण करतो. दिवस-रात्र, वर्षाचे ऋतू, पावसाळ्यात कडाडणारी वीज, वाढणारी झाडे, मृत्यू पावणारे प्राणी, माणसे, सूक्ष्मजीव आणि अजस्त्र प्राणी यांची हालचाल हे सर्व जाणून घेतल्यानंतर माणसाच्या विचार करणाऱ्या मनाला प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरे त्याला कल्पनेने शोधावी लागतात. ही कल्पनेने मानलेली उत्तरे खरी आहेत का हे पाहण्यासाठी तिसरा डोळा वापरावा लागतो. तो आपल्या आकलनाचा डोळा आपल्याला विज्ञानाच्या मदतीने खरे काय ते दाखवतो.

         सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते. मला वाटते सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. लाखो वर्षे माणसाला असेच वाटत होते परंतु काही वर्षांपूर्वी एका माणसाने विवेकाचा डोळा उघडला. त्याला कळले पृथ्वी गोलाकार असून स्वतःभोवती फिरते त्यामुळे सूर्य तिच्या भोवती फिरताना दिसतो. गोलाकार असलेल्या पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे आता सर्वजण खरे मानतात. यालाच आकलन म्हणतात. पृथ्वीचे गोलाकार असणे आणि स्वत: भोवती फिरणे हे अगदीच प्राथमिक आकलन असले तरी ते होण्यासाठी मानवाला लाखो वर्षे लागली. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मानवाला कळले. अनेक वर्षे आकाशाचे केलेले निरीक्षण, त्यावरील विचारमंथन व मांडलेली गणिते यातून सूर्यकेंद्री विश्वाची रचना तयार झाली आणि विज्ञानाचा उदय झाला. येथूनच खरी आकलनाच्या युगाला सुरुवात झाली.

         आज आपण खऱ्याखुऱ्या आकलनाच्या जगात जगत आहोत. केवळ विज्ञानातच नव्हे तर साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, न्याय, अर्थव्यवस्था अशा मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आकलनाचे युग सुरू झाले आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की सर्व सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले नाही. त्यामुळेच बहुसंख्य समाज हा अंधश्रद्धा आणि कर्मकांडांमध्ये अडकलेला आहे. हे आकलनाचे युग सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या शैक्षणिक क्रांतीची गरज आहे. जेव्हा प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता येईल तेव्हाच ते सर्व दूर पसरेल आणि मानव समाज खऱ्या अर्थाने शहाणा माणूस होऊ शकेल.