‘शालोम – येशू ख्रिस्त  आणि संबंधित मराठी कविता’  – कामिल पारखे

‘शालोम – येशू ख्रिस्त  आणि संबंधित मराठी कविता’  

(येशू ख्रिस्तावर नामवंतांच्या मराठी कवितांतून उमटलेले तरंग)

  •  कामिल पारखे, पिंपरी चिंचवड, पुणे

९९२२४१९२७४, camilparkhe@gmail.com

‘शालोम – येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी कविता’ या शीर्षकाचं पुस्तक कुणाला आणि मलाही एकदम आकर्षित करण्यासारखं नाही. एकतर कविता मी कधी लिहित नाही आणि वाचत तर नाहीच नाही. तरीसुद्धा मागच्याच आठवड्यात एका पुस्तकाच्या दुकानात या शीर्षकाचं  पुस्तक दिसलं आणि कुतूहल निर्माण होऊन ते पुस्तक हातात घेण्याचा मोह आवरला नाही. पुस्तक चाळलं, आतल्या कवींची नावं वाचली आणि पावणे दोनशे रुपयांचं ते पुस्तक मी चक्क विकत घेऊन बॅगेत टाकलं सुद्धा. त्याला कारणही  तसंच होतं. ते पुस्तक साहित्य अकादमीनं छापलं होतं आणि त्यातील बहुतांश कवी नामांकित तर होतेच आणि त्यापैकी अनेक बिगरख्रिस्ती होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पुस्तकाच्या संपादकानं – नारायण लाळे यांनी सतराव्या शतकात पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोव्यात ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणाऱ्या फादर थॉमस स्टीफन्स यांच्यापासून हल्ली लिहित असणाऱ्या अनेक कविंच्या रचना या पुस्तकात समाविष्ट केल्या आहेत.

या पुस्तकात मराठीतल्या अनेक नामवंत कविंच्या रचना आहेत हे साहित्य अकादमीसारख्या प्रतिष्ठित संस्थेनं हे पुस्तक स्वीकारण्यामागं एक प्रमुख कारण असणार. त्यापैकी काही कवींची नावं अशी : वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, लक्ष्मीबाई टिळक, नारायण वामन टिळक, कृष्णाजी रत्न सांगळे, गोपीनाथ तळवलकर, सुरेश भट, विंदा करंदीकर, वा. रा. कान्त, बाबा आमटे, सत्यवान नामदेव सूर्यवंशी, मंगेश पाडगावकर, अरुण कोलटकर, नीरजा, जयंतकुमार त्रिभुवन आणि निरंजन उजगरे, त्याशिवाय आजही लेखणी चालवणाऱ्या अनिल दहिवाडकर, नंदकुमार शेंडगे, फादर वेन्सी डिमेलो, अमित जयंतकुमार त्रिभुवन, लुईस कदम आणि सुधीर ब्रह्मे या साहित्यिकांच्या रचना या संग्रहात आहेत.

या पुस्तकात ८२ कविंच्या एकूण १४८ कविता आहेत. यापैकी  ४५ पुरुष ख्रिस्ती कवी आणि २३ बिगरख्रिस्ती आहेत. चौदा कवयित्री असून त्यापैकी ११ ख्रिस्ती आणि तीन इतरधर्मीय आहेत.

उल्लेखणीय म्हणजे या संग्रहात ज्यांच्या कवितांचा समावेश केला आहे त्या कविंचा अल्प परिचय परिशिष्टात देण्यात आला आहे, काहींची माहिती मिळाली नाही असं स्पष्ट केलं आहे. संपादक लाळे यांच्या इतर प्रकाशित पुस्तकांमध्ये ‘गर्भ’ हा कथासंग्रह आणि ‘शंखध्वनी’,  ‘अस्तोदय’ या कवितासंग्रहांचा समावेश आहे.

येशू ख्रिस्त हा विषय निवडण्यामागची भूमिका स्पष्ट करताना संपादक म्हणतात : मराठी काव्यक्षेत्रात अशा अनेक कविता आहेत कि, ज्यामध्ये येशू ख्रिस्त या प्रतिमेचे प्रयोजन सातत्याने दिसून येते. ते वेगवेगळ्या स्वरूपात असले तरी, येशू ख्रिस्त या प्रतिमेचे मराठी कवितेत निर्माण झालेले स्थान नाकारता येणार नाही. मराठी कवितेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ही जडणघडण तपासून बघणे, मला महत्त्वाचे वाटते. एकाच वेळी धर्मप्रसार आणि मानवी मूल्यांचे जतन करणारी ही कविता माझ्या संपादनकृतीला प्रवृत्त करणारी ठरली.

संपादक नारायण लाळे यांनी आपल्या दीर्घ प्रस्तावनेत येशू आणि मराठी ख्रिस्ती कविता या संदर्भात विचार  मांडले आहेत. या प्रस्तावनेमुळे पुस्तकातल्या सर्वच कविता वाचण्याची उत्सुकता निर्माण तर होतेच,  त्याशिवाय गेल्या चारशे वर्षांच्या कालखंडातील मराठी साहित्यातील ख्रिस्ती कवितांचे एकुण स्थान ठळक होते.

लाळे लिहितात : ‘शालोम’ मधील कवितांच्या संपादनाचा मुख्य उद्देश ‘येशू ख्रिस्त आणि संबधित मराठी कविता’चे केवळ संकलन असा नसून एकूण मराठी साहित्यातील काव्य विभागात पडलेली समृद्ध भर आणि साहित्यातून (कवितेतून) होणारी संस्कृतीची, भाषेची जपणूक या उद्देशांना समोर  ठेवले आहे.

मराठी साहित्यावर ख्रिस्ती साहित्याचे फार मोठे ऋण आहे कारण आधुनिक मराठी साहित्याचा उदय आणि उगम ख्रिस्ती साहित्यातून झालेला आहे, असे सांगून लाळे लिहितात:  ”तंत्र आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने स्पष्ट करायचे झाल्यास, पहिला मराठी ‘टाईप’ मिशनरींनीं पाडला, पहिला छापखाना त्यांनीच मांडला. पहिल्यांदा मराठीत पुस्तके त्यांनीच काढली”

संपादित कवितांचे विषय पाहू गेल्यास, येशू ख्रिस्त, ख्रिस्तजन्म, येशूची शिकवण, क्रुसिफिकेशन, पुनरुत्थान, नाताळाच्या शुभेच्छा, सेवाधर्म, उद्धारकर्ता, दीनदयाळू, कैवारी, भक्तिरसप्रधान, धार्मिक अशा अनेक विषयांना जवळ करणाऱ्या आहेत. आणि त्याचवेळी शाश्वत मूल्यांचे जतन करणाऱ्या अनेक कवितांमधून येशू ख्रिस्त किंवा त्याच्यासंबंधी घडलेल्या घटनांचा उल्लेख संदर्भ म्हणून आलेला आहे.

मिलान येथील चर्चमधील लिओनार्दी दा व्हिन्शी या चित्रकाराचे ‘द लास्ट सपर’ हे चित्र, फ्लोरेन्स येथले मायकल अँजेलो याचे क्रुसावर खिळलेल्या येशूचे काष्टशिल्प आणि ब्राझील इथला फ्रेंच शिल्पकार पॉल लँडोवस्कीने साकारलेला ‘द रिडीमर’ हा  येशूचा अतिभव्य पुतळा यांचे उदाहरण देत लाळे म्हणतात कि येशू ख्रिस्त या वैश्विक व्यक्तिरेखेचा कलाकृतींवर झालेला परिणाम दाखवतो आणि संपादनाच्या मूळ संकल्पनेला त्यामुळे पुष्टीच मिळते आणि ‘येशू ख्रिस्तच का?’ या प्रश्नाचे उत्तर मिळते.

येशू ख्रिस्तासंबंधी मराठी कवितेचा उगम सतराव्या शतकात पौर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यात ‘क्रिस्तपुराण’ हे मराठी महाकाव्य लिहिणाऱ्या ब्रिटिश जेसुईट फादर थॉमस स्टीफन्स यांच्यापासून होतो. मराठी साहित्यात दिसणारे ओवी, अभंग, पाळणा, भूपाळी, प्रार्थना हे काव्यप्रकार ख्रिस्ती मराठी कवितेत उमटलेले दिसतात हे उदाहरणासह या पुस्तकात दाखवून दिले आहे.

लाळे म्हणतात या प्रस्तावनेच्या निमित्ताने धर्मप्रसारक किंवा धर्मप्रचार यांचे महत्त्व  सांगण्याचा उद्देश नसून भाषेचे महत्त्व आणि परिणाम दर्शवण्याचा आहे. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ याच अर्थाने ख्रिस्ती मराठी साहित्याबद्दल आणि कवितांबद्दल म्हणायचे झाल्यास ‘फादर स्टिफन्से रचिला पाया, टिळक झालासे कळस’ असे लाळे यांनी लिहिले आहे.

संपादन प्रक्रियेतील एक भाग संपादकाने वाचकांना सांगितला आहे. तो भाग म्हणजे  ‘येशू ख्रिस्त आणि संबंधित कविता’ मध्ये कालानुरूप झालेला बदल. येशू ख्रिस्त हे एकच अबाधित सूत्र असले तरी, धर्मप्रसार, येशूस्तुती, बायबल वचनांचा उल्लेख अशा आशयाच्या कविता संख्येने कमी होत गेल्या आणि येशू ख्रिस्त या व्यक्तिरेखेत दिसणारी जीवनमूल्ये, त्यातून प्रकट होणारे सामाजिक संदर्भ, अशा आशयसूत्रांना व्यक्त करणारी कविता सढळपणे दिसू लागली. दया, क्षमा, शांती, करून या मानवी मूल्यांना जोपासणारी कविता प्रकर्षाने सामोरी आली. धर्मप्रसारापलीकडे गेलेली कविता म्हणून तिला ओळख मिळाली. अशा कवितांचे संपादन हा माझा ध्यास झाला.’

मराठीत ख्रिस्ती कवितेला स्थानिक अवतार देण्याचं फार मोठं योगदान १८५३ साली भारतात आलेल्या अमेरिकन मिशनरी हेन्री बॅलेन्टाईन यांनी केलं आहे. मराठी आणि संस्कृत भाषांचा अभ्यास करून १८४५ साली त्यांनी ‘देवाचे भजन करणारी गीते’  हा ४५ पानांचा संग्रह काढला. रेव्ह बॅलेन्टाईन यांच्या कवितेचाही या पुस्तकात समावेश आहे.

‘ख्रिस्तायन’ हा ग्रंथ नारायण वामन आणि लक्ष्मीबाई टिळक या दाम्पत्यानं लिहिला. दहावा अध्याय लिहून झाल्यानंतर टिळकांचे निधन झाले आणि त्यानंतर बारा वर्षांनी रूढार्थानं अशिक्षित असलेल्या लक्ष्मीबाईनी नंतरचे ६४ अध्याय लिहिले. लाळे म्हणतात कि भाषेच्या अभ्यासकांनीं ‘ख्रिस्तायन’ मधल्या नारायण वामन टिळकांची भाषा आणि लक्ष्मीबाईंची भाषा यातील फरक नोंद घेण्यासारखा आहे. यासाठी लाळे यांनी भालचंद्र नेमाडे यांनी सांगितलेला ‘आर्या’ आणि ‘ओवी’ यामधला फरक उद्धृत केला आहे. नेमाडे यांच्यानुसार ‘आर्या म्हटली कि भरपूर पंगती झोडणाऱ्या, शब्दांशी खेळ करणाऱ्या वर्गाशी ती जोडलेली आहे, ‘अनेक शतकं जातं ओढणाऱ्या सर्व स्तरातल्या स्त्रियांच्या कष्टातली लय ओवीच्या छंदात एकजीव झाली आहे’. ‘ख्रिस्तायन’मधली ना. वा. टिळकांची भाषा नेमाडेंनी सांगितलेल्या ‘आर्या’ सारखी आणि लक्ष्मीबाईंची भाषा ‘ओवी’ सारखी आहे असं लाळे म्हणतात.

अरुण कोल्हटकर यांच्या ‘भिजकी वही’ या काव्यसंग्रहातल्या तीन कवितांचा या पुस्तकात समावेश झाला आहे. त्यातील एक दीर्घ कवितेतील मदर मेरी हिच्या स्वगताचा हा भाग हृदयस्पर्शी आहे.

तुझा छिन्नविछिन्न देह

क्रूसावरून उतरवण्यात आल्यानंतर

वाट पहावी लागली मला

पंधराशे वर्षे

तेव्हा कुठं डोळाभर पाहू शकले मी तुला

दुःख मोकळं करू शकले

तुला माझ्या संगमरवरी मांडीवर घेऊन

मायकल अँजेलोच्या सौजन्यानं

मायकल अँजेलोच्या व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिका इथं असलेल्या ‘ला पिएता’ या शिल्पाचा या कवितेला संदर्भ आहे, रोमच्या भेटीत हे जगप्रसिद्ध शिल्प कितीतरी वेळ निशब्द राहून मी पाहिलं आहे. बायबलमध्ये वर्णन करण्यात आलेले येशू ख्रिस्ताचे आणि त्याची आई मेरी यांचे संपूर्ण जीवन कोल्हटकरांची ही कविता  वाचकांच्या नजरेसमोर उभे करते.

ख्रिस्तांविषयीची कविता लिहिण्यासाठी कवी ख्रिस्तीच असला पाहिजे असं नाही, असं सांगत संपादक लाळे लिहितात : शेवटी कविता ही धर्म, भाषा, पंथ. प्रांत यांच्या भेदापलिकडे असते, तिला कुठल्याही मर्यादा नसतात.” हे पुस्तक वाचताना याची प्रतिती येते.

येशू ख्रिस्त आणि क्रूस एकमेकांपासून वेगळे काढणे अशक्य. या पुस्तकात क्रूसाविषयाच्या अनेक कविता आहेत.

कुसुमाग्रज यांची ही कविता संग्रहात आहे.

मृत्युंजय शब्द त्याचे
प्रभो, त्यांना क्षमा कर
काय करतो हे त्यास
नाही देवा कळलेले

बाबा आमटे  `समर्पण’ या  दीर्घ कवितेत लिहितात

धाराशायी ख्रिस्त !
मेरीच्या मांडीवर त्याचे रक्तलांछित मस्तक
आणि त्याचे शिष्य
गोलगाथाच्या डोंगराकडे पाठ करून उभे

सदानंद रेगे यांच्या ‘सोहळा’ कवितेतील या पहिल्या आणि शेवटच्या दोन ओळी आहेत.

गोलगाथाच्या टेकाडावर
जय्यत सारे तयार आहे

बाकी सगळे तयार आहे
उणीव केवळ त्याची आहे.

आपल्या कवितेत नीरजा म्हणतात

चर्चमध्ये घुमणाऱ्या

सगळ्या प्रार्थना

रडून दमल्या

तसे त्याने

क्रूसावरचे हात वर करुन

एक कडकडून जांभई दिली

फादर फ्रान्सिस जे. नुनीस यांची रचना अशी आहे

कॅन्सर म्हणजे एक क्रूस

एकट्यानेच वाहायचा असतो

मदत करायला येणार नसतो

कुणी सिरेनीकर

सायमन मार्टिन `क्रूसाचं काय? या कवितेत म्हणतात

तो अजमावून पाहातोय शक्यता

क्रूसाशिवाय मरण्याची

प्रश्न इतकाच आहे शिक्षेत सूट मिळाल्यास

परिश्रमपूर्वक बनवलेल्या क्रूसाचं काय?

क्रूसाबाबत संतापलेले जोसेफ तुस्कानो लिहितात

एकदा मी खूप संतापलो

आणि क्रूस उचलून चक्क चुलीत घातला

म्हटलं, तुझा माझा संबंध मिटला

पण तो जळलाच नाही

चूल मात्र विझली       

विंदा करंदीकर `कलंदर’ कवितेत लिहितात

क्रूसावरती जगतो त्याचा

क्रूसावरती नसतो घात

चालायचे ते चालतील पाय

करायचे ते करतील हात  


काव्यसंग्रहाचे संपादक नारायण लाळे यांची `चर्चच्या गर्भात’ ही कविता या संग्रहात आहे

मंद अंधारात
क्रूसावर  लटकवलेला येशू
त्याच्या मनात प्रश्नांचे काहूर
माझ्या शरीरात खिळे ठोकले

तेव्हा ही माणसं कुठे होती  ?  


सदानंद रेगे यांच्या `सोहळा’  कवितेतील या पहिल्या आणि शेवटच्या दोन  ओळी आहेत.

गोलगाथाच्या टेकाडावर
जय्यत सारे तयार आहे

बाकी सगळे तयार आहे
उणीव केवळ त्याची आहे.

नंदकुमार शेंडगे यांची ही पुढील  कविता आहे.

त्यांनी बाराब्बसला  सोडून दिले…!
तेव्हापासून  बाराब्बस,  
येशूला शोधत फिरतोय…
अजून त्याला येशू सापडत नाहीय


अनुपमा उजगरे यांच्या `उत्सव’ कवितेतील या पुढील ओळी आहेत


मी फादरना विचारले,

आता येशू अवतरले तर…?
फादर गंभीरपणे उद्गारले
आता येशू अवतरले तर
म्हणतील पुन्हा एकदा
हे बापा, ह्यांना क्षमा कर

जयंतकुमार त्रिभुवन यांची अत्यंत सुंदर चाल असलेली ही कविता संगीतसुरांत अनेक चर्चमध्ये गायली जाते. विशेष म्हणजे अगदी अलिकडेच  हे गायन जयंतकुमार त्रिभुवन यांनी रचलं आहे असं मला कळालं आणि यांच्याविषयीच्या माझ्या मनात असलेल्या आदरात भर पाडली   


मी कुठेही कसाही असो
ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो  

सिसिलिया कार्व्हालो यांची `कोलाहल’ ही कविता अंतर्मुख करणारी आहे

अंतर्बाह्य सर्वत्र कोलाहल
गावात आणि देवळातही
चर्चबेलचा नाद विरत चाललाय  
विरत चाल्लेय स्वर्गीय संगीत
पक्ष्यांच्या चोचीतलेही
हिरावून घेतलंय गीत ….

अमित जयंतकुमार त्रिभुवन यांच्या कवितेतील या पुढील ओळी आहेत.


तमसो मा ज्योतिर्गमयाचा मंत्र देवूनी गेला
अंतरातल्या अंधाराला ‘तो’ ख्रिस्त भेदूनी गेला    

या पुस्तकातली एक रचना रेवगावचे अंध कवी  बार्तिमय बाबांची आहे. (बायबलच्या नव्या करारात बार्तिमय या दृष्टीहिनाला  येशूने दृष्टिदान दिलं अशी एक कथा आहे.)   सखुबाई भिकू गायकवाड या कवयित्रिची जात्यावरची मौखिक स्वरूपातली एक रचनासुद्धा या संग्रहात आहे. ती अशी:  

दळण संपविलं पीठ भरून ठेवियलं

प्रभूचं गोड नाव माझ्या हृदयात साठविलं

सुरेश भट त्यांची `येशू’ ही गझल या पुस्तकात आहे.

झुळझुळ शीतल वारा येशू

रिमझिम अमृतधारा येशू

येथे पोचत नाही वादळ

अमुचा शांत किनारा येशू   

क्रूस हे दुःखसहन, करुणा, त्याग आणि क्षमाशीलतेचं प्रतीक तर येशूचा गाईगुरांच्या गोठयातला जन्म हा आनंदाचा सोहोळा. ख्रिस्तजन्माविषयी  अनेक कविंनी लिहिले आहे.

लक्ष्मीबाई टिळकांचा हा  ख्रिस्तजन्माचा पाळणा या पुस्तकात आहे.

हलवी मना, प्रभुपाळणा हा

त्यजुनी सुखाते वरी यातनांना

पराकारणे जो झिजवी तनूला

यशोगान त्याचे मुदें गात गाना

हलवी मना, प्रभुपाळणा


मंगेश पाडगावकर यांच्या  `जन्म’ या कवितेतील या ओळी आहेत

अलौकिक वरदान लाभे आकाशाचे
गव्हाणीला फूल आले दिव्य प्रकाशाचे


नाताळाच्या संदेशाविषयी वा. रा. कान्त लिहितात

करुणा -प्रज्ञेचा
वसंत फुलू द्या
शांतीने जगू द्या
मानवता

संदेश हाच
ख्रिस्ताचा प्रभूचा
सण नाताळाचा
देई जगा

विद्रोह आणि चीड या भावनासुद्धा मराठी ख्रिस्ती कवितेत दिसतात. शाहूराव  द. उजगरे यांच्या  ‘काळे ख्रिस्ती’ या कवितेनं एके काळी मोठी खळबळ उडवून दिली होती. ख्रिस्ती मिशनरींनीतर्फे प्रसिद्ध होणाऱ्या `ज्ञानोदय’ मासिकाच्या १९ ऑगस्ट १९२६च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या कवितेत हे बंडखोर कवी म्हणतात

मनुष्यतेला परके झालो आम्ही काळे ख्रिस्ती 

दैवाचे त्रैराशिक आमुच्या विराम पावे वस्ती

याच बंडखोरीच्या  पठडीतली नारायण वामन टिळकांची `मिशनरीस संदेश’  ही कविता. विदेशी मिशनरींना उद्देशून टिळक लिहितात

बांधा रे गाठोडी

व्हा रे चालते व्हा

ज्या नावडे हिंदू भूमी

या कवितेच्या शेवटी टिळक म्हणतात

दास म्हणे झाले काल ते वीसरा

नवी वृत्ती धरा आज आधी’

भारतीय मिथक परंपरेत नसलेली येशू ख्रिस्ताची प्रतिमा भारतीय विश्वात खरं पाहिलं तर आयात झाली. ख्रिस्ताची प्रतिमा भारतीय लोकजीवनात, भारतीय संस्कृतीमध्ये आणि भारतीय भाषांमध्ये मुरुन एकजीव झाली याचे कारण म्हणजे  ‘मुळातली प्रतिमा, त्या प्रतिमेची गुणवैशिष्ठये आणि त्या प्रतिमेचा संपूर्ण मानवजात कवेत घेण्याइतपत असलेला आवाका’ असं  संपादक नारायण लाळे यांनी म्हटलं आहे.

‘येशू ख्रिस्ताची प्रतिमा जी मराठी भाषेत आली ती केवळ प्रतिमाच नाही तर, जीवनप्रसंग, दया, क्षमा, शांती ही सनातन मूलयेदेखील इथल्या मातीत प्रस्थापित करणारी ही प्रतिमा आहे. ही प्रतिमा जगभरात वापरली जाते’ असं ते म्हणतात.

मात्र ‘शालोम’ मधील येशू ख्रिस्त आणि संबंधित मराठी ख्रिस्ती कविता’च्या संपादनाला या पुस्तकाद्वारे पूर्णविराम मिळाला असं लाळे मानत नाही. या प्रयत्नातून आणखी काही बीजे हाती लागतील आणि या संपादनात न उमटलेले मार्ग शोधले जातील असं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय भाषांमधून प्रतिबिंबित झालेला येशू ख्रिस्त किंवा जगातील अन्य भाषांतील कवितांमधून दिसणारा येशू ख्रिस्त आणि संबंधित घटनांचा कवितेच्या अंगातून घेतलेला शोध निश्चितच आव्हानात्मक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

‘शालोम – येशू ख्रिस्त  आणि संबंधित मराठी कविता’  

संपादक नारायण लाळे,

प्रकाशक साहित्य अकादेमी (२०१८)

पाने २०५, किंमत २७५  रुपये