​केव्हा तरी पहाटे ! – लेस्ली से. डायस

केव्हा तरी पहाटे !

  • लेस्ली से. डायस

सांडोर, वसई,

diasleslie@gmail.com , मोबाईल –  9923581757

“हॅलो, मी उमंग बोलतोय, आन्टी जरा माझ्या पप्पांना फोन देता?”

फोनवर कुणा लहानग्याचा आवाज ऐकताच, खांद्यानेच कानाशी धरून ठेवलेला रिसिव्हर, हातातील फाईल बाजूला ठेवून, सीमा सरीनने कानाशी नीट पकडला.

“बेटा, हे कंपनी​​चे ऑफीस आहे! तुला कोण हवंय?”

“होय आन्टी, मला माहित आहे. मला माझ्या पप्पांशी बोलायचंय.” 

“हो बेटा, पण त्यांचे नाव काय आहे?”

नाव सांगताच, सीमा सरीन गोंधळली व तिची नजर समोरच्या केबिनवरील नेमप्लेटवर जाऊन थबकली. अभिजीत फुर्ट्याडो, चीफ एक्झिक्यूटीव्ह ऑफीसर, दिशा टेक्सटाईल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग कं. लिमिटेड, मुंबई.

         फोन कुणाचाही असो, पण क्लायंटशी बोलताना मला डिस्टर्ब करायचे नाही अशी अभिजीत साहेबांची सक्त ऑर्डर होती.

         “सॉरी बेटा, ते फार महत्त्वाच्या कामात आहेत. मी त्यांना नंतर फोन करायला सांगते हं!”

         “नाही आन्टी. प्लीज. मला आताच पप्पांशी बोलायचं.”

         त्या लहानग्याचे आर्जव ऐकून सीमा सरीन गहिवरली. विचारात पडली. इतक्यात मार्केटींग मॅनेजर आय. एन. बासू कुठलीतरी फाईल घेण्यासाठी सरांच्या केबीनमधून बाहेर आले. त्यांच्या हातात फाईल देत सर, फुर्ट्याडो साहेबांच्या मुलाचा फोन आहे, त्याला त्याच्या पप्पांशी बोलायचं होतं.

         साहेबाच्या घरचा कलह बासूंना थोडाफार माहीत होता.

         ‘डोंट गेट इमोशनल मॅडम. साहेब डिस्टर्ब झाले तर सर्व खेळ खल्लास होईल. कस्टमरची बोलणी अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहेत. रात्री मी स्वतःच बोलेन साहेबांशी मुलाच्या फोनबद्दल.’ हळूच सुचना करीत बासू पुन्हा साहेबाच्या केबिनमध्ये शिरले. 

         काही वेळातच केबिनचा दरवाजा उघडला गेला. कस्टमर मंडळींना घेऊन प्रसन्न चेहऱ्याने फुर्ट्याडो साहेब बाहेर आले. गेस्ट मंडळींना घेवून ते डिनर पार्टीसाठी हॉटेल जे. डब्ल्यू. मेरिएटकडे रवाना झाले.

         हॉटेलमधील कॉन्फरन्स कम डिनर पार्टी सुरळीत पार पडली. तब्बल पंचवीसेक कोटींच्या ऑर्डर्स फायनल झाल्या. त्या बैठकीत अभिजीत फुर्ट्याडोंच्या वाक्चातुर्य व बुद्धीकौशल्यावर भिलवाडा स्पिनर लिमिटेडचे एम. डी. दिनेशभाई नौलखा आणि त्यांचे सर्व सहकारी खूप प्रभावित झाले.

         गेस्टना निरोप देऊन अभिजीत निघाला, तेव्हा रात्रीचा बराच उशीर झाला होता. हिरानंदानी पार्कमधील बाविसाव्या मजल्या वरील आपल्या आलिशान फ्लॅटमध्ये त्याने प्रवेश केला. अंगातील सूट काढून त्याने टाय मोकळा केला व व तो सोफ्यावर शांतपणे बसला, दिवसभरातील धावपळ, जबाबदाऱ्या, ताणतणावांतून आता तो मुक्त होत असतानाच त्याचा मोबाईल वाजला. बासूंचा फोन होता. “साहेब, संध्याकाळी क्लायंटबरोबर मीटिंग सुरू असताना तुमच्या मुलाचा फोन होता. नंतर पप्पांना फोन करायला सांगेन असे सांगून मिस सरीनने त्याची समजून घातली” आणि रात्रीच्या शुभेच्छा देऊन बासूंनी फोन ठेवला.

         उमंगचा ऑफिसमध्ये फोन? 

         बरोबर! आपण मीटिंग दरम्यान मोबाईल स्वीच ऑफ ठेवला होता. फोनवरून आपल्या पोराशी बोलावं असं त्याला वाटलेही पण…..! छोट्या उमंगला घेऊन नीता घर सोडून रागाने माहेरी गेली होती. काही महिन्यांपासून त्या दोघांत धुसफूस सुरू होती.

         करिअरचा ग्राफ उंचावताना त्यांच्या संसारात विघ्न निर्माण झालं होतं. त्यात आपल्या आठ-नऊ वर्षाच्या चिमुकल्याचे बालपण हरवून गेले आहे या विचाराने तो कष्टी होऊन गेला. अभिजीतचे शांत झालेले चित्त पुन्हा सैरभैर झाले.

         कंपनीची जबाबदारी वाढल्यापासून छोट्या उमंगलासुद्धा फोनवरून आपल्याशी बोलायला आर्जवे करावी लागतात. आपला सहवास तर त्याला मैलोदूर…. पण मीच का कारणीभूत याला. नीताने मला समजून घेतले असते तर संसाराची अशी फरफट झाली नसती….

         कामगार, प्रॉडक्शन, मार्केटींग, कस्टमर सपोर्ट, एक्झीबिशन्स, नवीन टेक्नॉलॉजी, कंपनीचे कितीतरी व्याप. दिवस उजाडतो कधी आणि मावळतो कधी तेसुद्धा मला कळत नाही. मुंबई आणि वसईतील स्वतःच्या घरांपेक्षा तिला माहेरचे घर जवळचे का वाटावे? या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये चहा-कॉफीशिवाय अन्नाचा एक कणही शिजत नाही. तेथे वसईत व येथे मुंबईत दोन्ही घरे काळोखात ठेवून तिने माहेरी जायला नको होतं. कंपनीचा चीफ एक्झिक्यूटिव्ह झाल्यापासून मला घरी वेळ देता येत नाही यामध्ये माझा काय दोष? पण……

         मुलासाठी तरी आम्ही एकमेकांना समजून घ्यायला हवं होतं…. मी जमेल तसा निताला वेळ द्यायला हवा होता. मी तिच्याकडे नोकरी सोडायचा हट्ट धरून बसलो. गावातील चांगली शाळा सोडून ती घरी बसून काय करील, हा विचार मी केला नाही. आपले सततचे दौरे, मुंबईत असलो तरी रात्री अपरात्रीनंतर माझं घरी येणं, बायको-मुलाचा विचार न करता सतत फक्त कंपनी आणि कंपनी. कंपनीबाहेरचं जग मी विसरून गेलो होतो. विचारांची आवर्तने त्याच्या मनात रात्रभर घोंघावत राहिली.

         इकडे वसईत सुरू असलेला बिनमौसमी पाऊस सरीवर सरी कोसळून एकदाचा थांबला. ढगाळ वातावरण म्हणून रात्र उत्तरोत्तर वाढत चालली होती. रात्रभर विजेचा लंपडाव सुरू असल्याने इन्व्हर्टरवर चालणारा सिलींगचा पंखा धापा टाकत कधीच बंद झालेला. छपरावर अडकलेल्या पाण्याच्या थेंबाचा हळूहळू होणारा टपटपाट रात्रीच्या नीरव शांततेचा भंग करीत होता.

‘मम्मी माझ्या फर्स्ट कम्युनियनच्या कार्यक्रमाची तयारी कधी होणार?’ काल संध्याकाळपासून उमंगने एकच घोशा लावलेला. त्याच्या मित्रांच्या घरी त्यांच्या फर्स्ट कम्युनियनची सुरू झालेली तयारी तो पहात होता. पण आपल्या घरी काहीच नाही. म्हणून तो उदास होत होता. मी काही बोलू शकत नव्हते म्हणून त्याने पप्पांना फोन लावला. तेथेही पोराची घोर निराशा झाली. शेवटी रडत रडत झोपला तो.

         नीता विचार करत होती. त्याचा बाप तेथे मुंबईत कंपन्यावर कंपन्या उभ्या करतो शेठच्या. कंपनीचा सीईओ झाल्यापासून तो घर विसरला, बायको विसरला. पोटच्या पोरालाही विसरला. सारखे दौरे आणि दौरे. त्याने कुटुंबाला थोडा वेळ दिला असता तर….. उमंग असा बापाच्या प्रेमाला वंचित राहिला नसता.

         सकाळी उठून ती शाळेत गेली. कधी नव्हे पण त्यादिवशी शाळेच्या कामासाठी प्रिन्सिपल आणि व्हाईस प्रिन्सिपल पालघरला गेल्या होत्या. सिनियर शिक्षिका असल्याने शाळेची जबाबदारी आज तिच्यावर होती. स्वतःच्या वर्गाबरोबर दिवसभर शाळेची जबाबदारी निभावताना तिला कळून चुकले आज शाळेची जबाबदारी जेव्हा माझ्यावर आली तेव्हा किती वेळा मला घरची आठवण झाली? किती वेळा आपल्याला आपल्या लाडक्या उमंगची आठवण आली? दिवसभरात एकदाही नाही. मग मी अभिजीतला दोषी का ठरवतेय? कंपनीचा एवढा मोठा डोलारा सांभाळताना त्यालादेखील तारेवरची कसरत करावी लागत असेल. त्याला दोषी ठरवणे योग्य नाही. उलट आपण त्याच्या पाठिशी नेटाने उभे राहायला हवे होते. त्याची काळजी घ्यायला हवी होती. मी चुकले, त्याच्या अडचणींवर दुर्लक्षच करीत राहिले. विचारांची आवर्तने आज निताला देखील स्वस्थ झोपू देत नव्हती.

         सकाळी प्रभाकर आला. बरोबर आणलेल्या दुधाने गरमागरम कॉफी बनवून त्याने अभिजीतला दिली. काही दिवसांपासून रात्री व्यवस्थित झोप न लागल्यामुळे पेंगुळलेल्या अभिजीतला कॉफी प्यायल्यावर थोडं बरं वाटलं. तयारी करून तो निघाला. ‘आपल्याला वसईला जायचंय, प्रभाकर.’ त्याने ड्रायव्हरला आज्ञा केली.

         गाडी वसईला येताच वसई स्टेशनवरच त्याने प्रभाकरला रजा दिली व तो ड्रायव्हरच्या सीटवर बसला. गाडी सरळ उमंगच्या शाळेच्या दिशेने निघाली. शनिवारचा दिवस असल्याने शाळा अर्धा दिवसच होती. उमंगला भेटायला तो आतुरला होता. शाळा सुटल्यावर मलूल चेहऱ्याने वर्गाबाहेर पडणारा उमंग त्याने पाहिला. पप्पांना पाहताच तो पुढे झेपावला आणि त्याला बिलगला. त्याच्या गालावरून आसवं वाहू लागली.

         “पप्पा, त्या दिवशी तुम्ही माझ्याशी का नाही बोललात? रात्रभर मी तुमच्या फोनची वाट पहात होतो.”

         “पोरा, मी तुला फोन करणारच होतो, पण रात्रीचा उशीर झाला होता. तुम्ही सर्व झोपला असाल म्हणून नाही केला मी फोन.”

         “पप्पा, फोन केला असता तरी चालले असते. मम्मी त्या दिवशी झोपलीच नव्हती. मीसुद्धा जागाच होतो. मला सर्व प्रार्थना येतात पप्पा. माझी सर्व तयारी झालीय. मग तुम्ही मला फर्स्ट कम्युनियन का देत नाहीत?” उमंग बोलत होता. हुंदके देत होता.

         अभिजीत सुन्न झाला. मम्मी-पप्पांचा हात धरून चर्चमध्ये शिरणाऱ्या मुलांमध्ये माझ्या उमंगचा एक हात रिकामा राहू नये असे नीताला वाटत असेल. तर तिचे काय चुकले….? तो पुन्हा कष्टी होऊन गेला.

         “उमंग, मम्मीशी बोल, मी पप्पाबरोबर आहे. ते माझ्या शाळेत आले आहेत.”

         त्याने उमंगला नीताचा फोन लावून दिला. नीताला सुट्टी असल्याने ती आज घरीच होती. अभिजीत मुलाच्या शाळेत आला आहे, हे ऐकून तिला आश्चर्य वाटले. तिला वाटले, आता पोराला काही आवडीच्या गोष्टी व भरपूर खाऊ देऊन तो आपल्या गेटपर्यंत येईल. मग नेहमीप्रमाणे जड हाताने पप्पांना निरोप देऊन उमंग गेटमधून आत येईल. मग त्याचा बाप बाहेरच्या बाहेर गाडी फिरवून मुंबईच्या दिशेने सुसाट निघून जाईल. तिचे विचारचक्र सुरू होते.

         बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. भानावर येऊन ती ओटीवर येऊन उभी राहिली. गाडीतून उतरून उमंगला घेऊन अभिजीतने अंगणात प्रवेश केला तशी ती आनंदली, हर्षित झाली व आपल्या पतीच्या स्वागतासाठी तीसुद्धा एकेक पायऱ्या खाली उतरत अंगणात आली.

         केव्हा तरी पहाटे काळीकुट्ट रात्र उलटून गेली होती.