‘स्वर्गीय संगीत‘
- पास्कोल लोबो, मुंबई, 9821675747
शहराजवळच्या एका गावात नाताळचा सण वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात साजरा होत असे. नाताळ म्हणजे आनंद म्हणून प्रत्येक वर्षी मध्यरात्रीची मिस्सा-प्रार्थना झाल्यानंतर गावकरी चर्चच्या आवारात एकत्रीत जमत. प्रथेनुसार नाताळनिमित्त तयार केलेला फराळ सर्व लोक घेऊन येत. एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा देत जमविलेले फराळ-पदार्थ फस्त करीत. उल्हासित वातावरणात गावकरी नाताळ सणाची मजा लुटत. गावचे धर्मगुरुही त्यात सहभागी होत.
विशेष नमूद करण्यायोग्य मुद्दा म्हणजे याप्रसंगी एक वेगळेच सुमधुर संगीत ऐकू येत असे. स्वर्गीय संगीत समजलं जात असे. गावकरी या संगीताचा आस्वाद घेत नाचत असत. लहानथोर मंडळी, बाया-पुरुष, तरुण-वृद्ध सगळे सहभागी होत. “आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे” असंच वातावरण निर्माण होत असे. हे सुमधुर संगीत गावकऱ्याचा आनंद द्विगुणित करीत असे. आणि काही वेळानंतर जेव्हा चर्चचे दरवाजे बंद केले जात तेव्हा आपोआप सदर संगीतही थांबत असे तद्नंतर गांवकरी सर्वांचा निरोप घेत उत्साहाने आपल्या घरी जात असत.
त्या वर्षी कडाक्याची थंडी पडली होती. सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरला होता. रातकिडे आपल अस्तित्व जाणवीत होते. मध्यरात्रीची मिस्सा-प्रार्थना संपल्यानंतर प्रथेनुसार जेव्हा सर्व लोक चर्चबाहेरील पटांगणात एकमेकांना भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी, अल्पोपहाराकरिता एकत्रित आले तेव्हा ते सुमधुर संगीत ऐकू आले नाही. गावकरी अचंबित झाले. आपापसात कुजबूजू लागले. संगीत सुरू व्हायची वाट पाहू लागले. परंतु व्यर्थ… उत्साही वातावरण गढूळ झाले. लोक नाराज झाले. धर्मगुरुही आश्वर्यचकित झाले. या वर्षी देवाची अवकृपा झाली असेल असं समजून सर्वजण गप्प बसले. मागच्या वर्षीच्या आठवणीने सुखावले. एकमेकांना शुभेच्छा दिल्या. अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. परंतु ते ‘सुमधुर संगीत’ न ऐकताच धर्मगुरूंचा निरोप घेऊन गावकरी आपापल्या घरी निघून गेले.
फादरही चर्चना लागून असलेल्या, त्यांच्या निवासस्थानाकडे जायला वळले तोच कोणीतरी धावत येत असल्याची चाहूल लागली. पाहतात तो समोरून एक मुलगा धापा टाकीत चर्च आवारात येत होता.
‘अरे हा तर जॉन.’ “काय झाले जॉन?’ धर्मगुरु,
“काही नाही फादर” मुलगा,
“काही नाही कसं, बाळ जॉन? प्रत्येक वर्षी मिस्सा-प्रार्थनेपूर्वी अर्धाएक तास यायचास शिवाय आम्हा धर्मगुरूंना पूर्वतयारीत मदत करायचास आज कुठे होतास? आज तू प्रार्थना-मिस्सानंतर नव्हे नाताळ-आनंद मेळावा उरकल्यानंतर हजर झालास.”
“माफ करा फादर” जॉन उद्गारला. “मी वेळेवर घरातून निघालो होतो परंतु अर्ध्या वाटेत एक वयस्कर माणूस रस्त्यालगत पडलेला दिसला. तो थंडीमुळे कुडकुडत होता. जवळ जाऊन पाहतो तो त्याच्या पायाला ठेच लागून, जखम झाली होती. भळभळ रक्तही वाहत होते. व्हिवळत होता बिचारा. वेदना असह्य होऊन त्याला चालता येत नव्हते. त्याला माझ्या मदतीची गरज आहे हे समजून थांबलो. त्याची विचारपूस केली. सर्वप्रथम पायाची जखम रुमालाने बांधली. त्याला धीर दिला. मी असताना तुम्ही का घाबरता अस म्हणत त्याना चालण्यासाठी आधार देऊन माझ्या घरी घेऊन गेलो. घरी कोणच नव्हते. घरांतील सर्व मंडळी रात्रीच्या मिस्सा- प्रार्थनेसाठी निघून गेली होती. त्याला खुर्चीवर बसविले. नंतर पाणी गरम करून कोमट पाण्याने जखम स्वच्छ केली आणि मलमपट्टी बांधली. आलंमिश्रित गरमागरम चहा करून दिला, उबदार कपडे दिले. विश्रांती घ्यायला सांगितले.
“मग ?”
मला पाहून तो किंचित हसला, मला बरं वाटलं. त्यानंतर मला धन्यवाद देऊन झोपी गेला. फादर चक्रावलेच…
तद्नंतर घराची दारे बंद केली. दिवे मालवले. “पाहुणा झोपल्याची खात्री करून घेतली नि घाईघाईने इकडे आलो. फादर, मला माफ करा. रात्रीची प्रार्थन चुकली. वार्षिक आनंदोत्सवातही सहभागी होऊ शकलो नाही. नाताळाच्या शुभेच्छा, फादर”
‘तुलाही शुभेच्छा, जॉन माझ्या बाळा, तू धन्य आहेस, तू प्रार्थना चुकवलेली नाहीस. त्या वृद्ध सद्गृहस्थाला मदत केलीस, त्याची सेवा करून प्रत्यक्ष ख्रिस्ताचीच सेवा केलीस.
‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, तू आधुनिक गुड सेमेरिटन शोभतोस. दुबळ्यांची, दुर्बलांची सेवा करणे ही ख्रिस्ती धर्माची शिकवणच आहे. बालवयात तू आम्हाला माणूसकीचा धडा शिकविलास.”
फादर पुढे म्हणाले, “माणूसकीची खरी व्याख्या करायला मला कुणी सांगितले तर मी फक्त एका शब्दात करीन. तो शब्द आहे ‘कृतज्ञता’. आपलं अंतःकरण सदैव कृतज्ञतेने भरलेलं असलं पाहिजे. परस्परावर, चराचरावर प्रेम करायला हवं, अनाथ, दू:खीकष्टी अशा सर्वांवर दया दाखवायला हवी. सहानुभूती हवी. त्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे प्रार्थना जरूर करावी शिवाय त्यांच्या मदतीसाठी आपले हात सदैव पुढे केले पाहिजेत. नेमक तेच तू करून दाखवलंस. धन्य तू जॉन !”
त्यानंतर जॉन वेदीसमोर गेला, गुडघे टेकवले, नतमस्तक होऊन परमेश्वराची क्षमा मागितली. देवाची स्तुती केली. मूकप्रार्थनेव्दारे देवाचा जयजयकार केला. म्हणाला,
“परमेश्वरा, मला माफ कर, तुझा जयजयकार असो. यावर्षीचा ख्रिस्तजयंतीचा सण सर्वांना सुखशांतीचा आणि भरभराटीचा जावो.”
फादरांचा निरोप घेऊन जॉन घरी जायला निघाला. त्यावेळी अकस्मात वीज कडाडल्याचा आवाज आला, नी सर्व दिवे प्रकाशमय आले. वातावरण ढवळून निघाले. काळोख दूर झाला. प्रकाशाचे साम्राज्य पसरले. सगळीकडे प्रकाश/ उजेडाची नवकिरणे उदयास आली आणि अचानकपणे ते सुमधुर ‘स्वर्गीय संगीत’ सुरु झाले.