स्वातंत्र्य दिन….
भयाण चिखलाडातून निघालीय
पर्भातफेरी
गल्ली बोळातून गिरामपंचायतीच्या आवराकडं
भारत माता की जय
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो
आकाशाच्या दिशेनं जात हायत आर्तघोषणा
कोणी वट्यावर कोणी छतावर येऊन पाहतंय
कोणी तोंड घाशीत कोणी बनेलीवर
सातवीलाच शाळा सोडायला लावलेली
पुढल्या साली हातं पिवळे करायचेत म्हणून
घरीच असणारी राधी
आन तिच्याच वयाची शितू तीची वहिनी
पाहताहेत फेरी डोळ्यात भरून आकाश
मोठ्या रस्त्यात आली फेरी
मळकट फाटक्या कपड्याची शेरी
हातात घेऊन मेनकापडायचे झेंडे
करतीय ती इनंती घ्या झेंडा
जात्यायेत्याला गाडीवाल्याला
पाहत तिच्या वयाच्या पोरायच्या फेरीला
पंच्यातीचा झेंडा फडकला आन फेरी गेली
शाळत
गेल्या गेल्या एका गुरूजीनं
चांगलच दटीलं बिनगणवेशवाल्यायला
रांगा झाल्या आन हाफिसाच्या कोपऱ्यात
सुरू झाला करकसा
झेंडा आमाला फडकवू द्या म्हणून
शाळाध्यक्ष आन सरपंच सौचे मालक
आखरीला शाळाध्यक्ष या नात्यानं
मुख्याध्यापकाच्या लवतीनं
फडकीला झेंडा
झेंडा झाला
तसा परतीनं निघालो तवा
वाटत दिसले हजार झेंडे
काई चिखलात खुपसून काई गाडीखाली
काई उकांड्यात
- अमोल विनायकराव देशमुख, महेंद्र नगर, परभणी.
संपर्क – 7620949985
सुंदर झालाय नाताळ अंक….