- क्लेमेंट डिमेलो, नंदाखाल, वसई.
छाती दडपून जाईल अशा एका मोठ्या हवेलीचा सांगाडा आपल्याला दिसतो आहे. पडझड झालेल्या त्या हवेलीचे उरलेले अवशेष पाडण्याचे काम सुरू आहे. कधीकाळी सुंदर असलेली स्त्री, चेहर्याची रया गेल्यावर दिसते तशी दिसणारी ही हवेली, जुन्या काळातल्या सरंजामशाहीची प्रतिक आहे. (जी सरंजामशाही, जमीनदारी पद्धती आता रद्द झाली आहे.) गोरगरिबांचे शाप, तळतळाट गिळून एखाद्या अजगरासारखी स्वस्थ पडून असलेली कधीकाळची ही हवेली — ‘साहिब, बीबी और गुलाम ‘ ह्या चित्रपटातले एक पात्र आहे; जे संवाद बोलत नाही; परंतु न बोलताही तुम्हांला बरंच काही सांगून जाते.
या हवेलीचे उरलेसुरले अवशेषही आता थोड्यावेळात नामशेष होणार आहेत. हे सगळे भूतनाथच्या देखरेखेखाली सुरू आहे. कधीकाळी भूतनाथ ह्या हवेलीच्या आश्रयाला होता. त्या हवेलीकडे भूतनाथ अशा नजरेने पाहत आहे की, त्याचे काहीतरी त्या हवेलीत हरवले आहे. कोसळलेल्या घराच्या ढिगार्यात आपले हरवलेले खेळणे कुठे सापडते आहे का? अशा नजरेने ज्या प्रमाणे एखाद्या बालकाने पहावे अगदी त्याचप्रकारे!
भूतनाथची नजर भिरभिरत त्या हवेलीतल्या जिन्याकडे जाते. तो यांत्रिकपणे त्या जिन्याच्या दिशेने जाऊ लागतो. अन मग त्याला ते विरहगीत ऐकू येते. खोल अंधार्या विहिरीतून कोणीतरी गात असल्यासारखे. या जिन्यावरून तो अनेकदा छोट्या बहुच्या खोलीत गेला आहे. आताही त्याला ते विरह गीत ऐकू येते जे पूर्वी छोटी बहु त्या महालात गायची. ते गाणे आपल्या मनाचा ठाव घेते. मग गाण्यापाठोपाठ त्याला ऐकू येते छोट्या बहुची ती आर्त हाक. अन मग तिथेच बसून तो भूतकाळात हरवतो….
जीजाजीच्या ओळखीवरून तो ह्या हवेलीत राहायला येतो. ही प्रचंड हवेली व त्या हवेलीची श्रीमंती पाहून त्याची तर छातीच दडपून जाते. त्याचे जीजाजी त्याला हवेलीचे नियम समजावून सांगतात. जर इथे राहायचे असेल तर इथल्या कुठल्याही गोष्टीत लुडबुड करायची नाही. तो ही ते मान्य करतो. अन मग एके रात्री त्याला विरह गीत ऐकू येते. कुणाच्यातरी काळजाच्या खोल दरीतून आलेली विरहगीताच्या रुपातली ती आर्त हाक असते. भूतनाथची नजर त्या आवाजाचा शोध घेत असते. पण त्याला दिसते ती अंधारातली हवेली.
हवेली कसली ती! एक थडगेच आहे. सुशोभित केलेले थडगे. ज्यात हवेलीच्या ह्रदयाचे कुजलेले प्रेत आहे.
भूतनाथला दुसर्यादिवशी त्या हवेलीच्या नोकराकडून कळते — रात्री विरह गीत गाणारी ती स्त्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून, त्या हवेलीची मालकीण ‘छोटी बहुराणी’ आहे. काय आहे ह्या छोट्या बहुराणीचे दुःख! ती त्या पक्ष्यासारखी आहे. ज्याच्या विषयी अशी अख्यायिका सांगितली जाते की, तो पक्षी आयुष्यात एकदाच गातो. स्वतःच्या हृदयाला काटा टोचून घेतो अन मग त्या रक्तबंबाळ हृदयातून विरहाच्या भवसागरात बुडवून काढलेले ते विरहगीत बाहेर पडते. पण इथे प्रकार वेगळा आहे. इथे छोट्या बहुचे हृदय विदीर्ण झाले आहे. ते का? कशासाठी? तर त्या हवेलीच्या नोकराकडून कळते की, तिला तिच्या पतीचे प्रेम हवे आहे; परंतु ते तिला मिळत नाही. ती अस्सल भारतीय संस्कृतीच्या मूशीतून घडलेली स्री आहे. जीची डोली उठताना तिच्या आईवडिलांनी तिला सांगितलेले असते की, “तुझा पती हाच तुझा परमेश्वर आहे. त्याची सेवा कर.” परंतु तिला हवेलीचे नियम माहीत नाहीत. ह्या हवेलीत तुमच्या भावनेला किंमत नाही. तिथे किंमत आहे ती फक्त आणि फक्त ओरबाडून घेतलेल्या भौतीक सुखांना! तिथे छोट्या बहुच्या बावनकशी प्रेमाला कवडीचीही किंमत नाही.
छोट्या बहुचा पती रंगीन मिजाज असलेला, दारूच्या नशेत धूत, नाचणारीच्या कोठीवर दिवसरात्र पडून असणारा जमीनदार आहे. छोटी बहु अहिल्येसारखी आहे. जिची काहीच चूक नसताना तिच्या नशीबी ‘शीळा’ होऊन एका जागी निपचित पडून राहणे आले आहे. घरात सुंदर, शुद्ध प्रेमाचा देव्हारा असताना, आपला पतीदेव त्या कलावंतीणीच्या नादात स्वतःला का विटाळून घेतो हेच तिला समजत नाही. अहिल्या वाट पाहते आहे, प्रभू रामाची. ज्याच्या पवित्र पदस्पर्शाने तिची सुटका होणार असते. तर इथे छोटी बहु वाट पाहते आहे. आपल्या पतीच्या स्नेहाळ मिठीची. पण हाय रे दैवा! प्रयत्नांची पराकाष्ठा करूनसुद्धा ते सुख तिच्या दृष्टीच्या टप्य्यातही येत नाही.
त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून ती एकेदिवशी आपल्या नोकराकरवी भूतनाथला तिच्या खोलीत बोलावते. भूतनाथ जरी त्या हवेलीत राहत असला तरी तो मोहिनीसिंदूर ह्या स्रियांच्या भाळी सौभाग्याची खुण म्हणून मिरवणार्या सिंदुर बनवणार्या कंपनीत काम करत असतो. छोट्या बहुराणीचे वेडे मन मोहिनी सिंदुरच्या त्या जाहिरातीला भुलते. ती भूतनाथकडून तो सिंदूर मागवते अन मग तो सिंदुर कपाळी लावून शृंगार करून पतीची वाट पाहत बसते. मोठ्या मिनतवारीने त्याला बोलावून तो येतो. पण तिच्याशी बोलताना तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. ती त्याला फक्त एकदा तिच्याकडे पहायला सांगते. तिची मोहिनीसिंदूरभरी माँग पाहण्यासाठी! पण तो तिला “हे काय फालतू नाटक आहे.” असे बोलून तिथून निघून जातो. अन जाता जाता त्याचा ढोपर लागून तिच्या कपाळीचे ते कुंकू पुसले जाते. ती वेडीपिशी होते. एकेदिवशी ती पतीला विचारते, त्या नाचणार्या स्रीकडे अशी काय जादू आहे की, तुम्ही तिच्याकडे ओढले जाता?” तेव्हा तो कुचेष्टेने हसतो अन तिला म्हणतो, “ती नाचणारी बाई माझ्यासोबत रात्ररात्रभर दारू पिते. तुझी तयारी आहे का दारू प्यायची?” सहस्र विंचवाच्या दंशाची वेदना उमटते तिच्या हृदयी. हे ऐकून ती हादरते. ज्या पतीसाठी पहिल्या रात्री दुधाचा प्याला भरून घेऊन आले तो पती तिला, हाती दारूचा प्याला घ्यायला सांगत होता. ती मन घट्ट करते. आपल्याला सावित्रीची आठवण येते. यमाकडे आपल्या पतीचा प्राण मागणारी सावित्री, जी पती हाच माझा प्राण आहे. त्याच्याशिवाय मी जीवंत राहूच शकत नाही! मग त्यासाठी वाट्टेल ते करेन! छोटी बहु दारूच्या रुपातला हा विषाचा प्याला प्राशन करायला तयार होते. अन भूतनाथला तिच्यासाठी दारू आणायला सांगते. तिच्या हुकूमाचे पालन करणारा तो ‘ग़ुलाम’ ह्या गोष्टीला मात्र विरोध करतो. पण शेवटी साहीबच्या बीबीच्या प्रेमापुढे त्याची हार होते.
छोटी बहु आपल्या पतीच्या आग्रहाखातर त्या रात्री दारू पिते. तिला वाटते आता तरी तो आपल्या प्रेमाला लाथाडणार नाही.
ती त्याच्यासोबत दारू पिते. त्याच्या विकृत वासनेला चाळवण्यासाठी ती कोठेवाली जो काय प्रकार करते ते सारे छोटी बहु करू पाहते. पण इतके सारे करूनसुद्धा त्याचा ‘जी’ भरत नाही. तो पुन्हा नाचणारीकडे जाऊ लागतो. तेव्हा ती त्याला प्रश्न विचारते, पण त्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तो बांधील नसतो. तो फक्त तिला सांगतो की,”तुला कशाला हवा तुझा पती नजरेसमोर? तू तुझ्या जावांसारखी का राहत नाहीस?” ती विचारते, “म्हणजे कशी?” तो म्हणतो, “दागिने बनवायचे. मोडायचे. पुन्हा बनवायचे.. पुन्हा मोडायचे… कवड्यांचे खेळ खेळायचे…” ह्या त्याच्या उत्तराने ती पेटून उठते. कारण तिच्या जावांना भौतीक सुख हवे असते. जे त्या हवेलीत मिळते किंबहुना आपण ज्या हवेलीत नांदायला जात आहोत त्या हवेलीचे नियम त्या कोळून प्यालेल्या असतात. आपले पती जमीनदार आहेत. तेव्हा त्यांचे जीवन हे असेच रंगीन मिजाज असणार आहे. आपल्याला काय त्याचे? आपण मुलांना जन्म द्यायचा. उरलेला वेळ भौतीक सुखांना कवटाळायचे. इतके साधे, सोपे गणित असते त्यांचे. त्यांच्या हवेलीतल्या संसाराविषयीचे. “माझ्या प्रेमाची तुलना तुम्ही माझ्या जावांशी करता…. अन मग ती तिच्या मनातले सगळे दुःख त्याच्यासमोर उगाळते. अन शेवटी त्याच्या अहंकाराला डिवचते. “मी राहीन एकटी. मला एक बाळ द्या.” खरं होतं तिचं. स्त्रीच्या अंतरी जेव्हा वात्सल्याचा पान्हा फुटतो. तेव्हा तिची अवस्था पान्हा फुटलेल्या गोठ्यातल्या गाईसारखी होते. वात्सल्याच्या दुधाने भरलेले ते आचळ एकतर गोदोहन करून रिकामे केले पाहिजेत नाहीतर तिच्या वासराला तिच्या आचळाला लुचू दिले पाहिजे. त्याशिवाय तिला फुटलेला पान्हा तिला स्वस्थ बसू देत नाही. छोट्या बहुचा पती तिला मूल देऊ शकत नाही व तिच्यातली मायाही आपल्यावर रिक्त करू देत नाही. अशावेळेला तिने करायचं तरी काय? हे जीवन काय फक्त दागिने बनवण्यासाठी का खर्ची घालायचे आहे.
अहंकाराने डिवचलेला तिचा पती रागाच्या भरात, बग्गीला जुंपलेल्या घोड्यांच्या पाठीवर चाबूक ओढून नाचणारीकडे वाट वाकडी करतो. अन जेव्हा तो कोठीवर पोहचतो तेव्हा त्याला दिसते. त्याच्यासोबत दारू पिणारी, धिंगाना घालणारी अन नाचणारी ती कोठेवाली आज त्याच्या शत्रूसमोर नाचत असते. तो रागाने बेभान होतो. तिथे कज्जा होतो. अन त्यात तो जबर जखमी होऊन बेशुद्ध पडतो.
छोटी बहु आपल्या जखमी पतीची सेवा करू लागते. पण ती दारूच्या आहारी गेलेली असते. इतकी की, ती एकेदिवशी तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या भूतनाथकडे देऊन त्या बदल्यात ती त्याला दारू आणायला सांगते. ज्या सौभाग्यासाठी जीवाचे रान केले. त्या सौभाग्याची खुण म्हणून तिच्या मनगटातल्या बांगड्यादेखील ती विकायला मागे पुढे पाहत नाही. पण इतकी दारुच्या नशेत वाहत गेलेली छोटी बहु, जेव्हा तिचा नवरा तिला दारू सोडायला सांगतो तेव्हा एका क्षणात ती दारू सोडते. तिचा पती आता तिला परत मिळालेला असतो. हाय रे देवा. त्याग.. त्याग…. आणि त्याग…
आपला पती आता पूर्ण बरा व्हावा म्हणून औषध आणण्यासाठी, ती भूतनाथला घेऊन एका सिद्ध पुरुषाकडे जायला निघते. त्याचवेळेला तिचा थोरला दिर तिच्यामागोमाग मारेकरी पाठवतो. कारण भूतनाथचे तिच्यासोबत असण्याने त्याच्या मनात संशय निर्माण झालेला असतो. भूतनाथसोबत बसलेली छोटी बहु. रात्रीच्या शांततेत, निरव, निर्मनुष्य रस्त्यावरून अंधाराचे पांघरुण अंगावर घेऊन धावणारी ती घोडागाडी. त्या भयाण शांततेत ऐकू येणार्या घोड्यांच्या टापांचा आवाज अन ह्या सर्व पार्श्वभूमीवर आता सगळे काही संपले आहे. अशा नजरेने शुन्यात पाहणारी ती! भूतनाथ तिला विचारतो, “अब छोटे मालिक की तबियत कैसी है?” मग तिचे ते थांबत थांबत बोलणे. “उन्ही के लिए परेशान हूँ। भगवान करे….. मेरी उमर भी उन्हें लग जाएँ! अन मग भूतनाथकडे वळून पाहत बोलते, ” जब मै मर जाऊँ, तब मुझे खूब सजाना। मेरी माँग में सिंदूर भरना, ताकी लोग बोल सके, सती लक्ष्मी चल बसी।” अन ही वाक्ये बोलताना तिने बंद केलेले डोळे, तिच्या चेहर्याचा तो क्लोजप…आपल्याला वाटते, तिचे प्रेतच बोलते आहे. जणू तिला कळालेले असते, आपल्या घोडागाडीपाठोपाठ आपला मृत्यू आपला पाठलाग करतोय…” अचानक घोडागाडीसमोर मारेकरी उभे ठाकतात. घोडे खिंकाळू लागतात. कोणीतरी तिचा हात ओढतो. तेव्हा मनगटाचा क्लोजअप दाखवला आहे. त्या मनगटात असलेली बांगडी आपल्याला दिसते. पाठोपाठ तिची किंकाळी….
भूतनाथ शुद्धीवर आल्यावर तिचा शोध घेऊ पाहतो. हवेलीचा इमानदार नोकर रुग्णालयात भूतनाथला भेटायला येतो. तेव्हा भूतनाथ त्याच्याकडे छोट्या बहुची चौकशी करतो. पण तो सांगतो. तिचा काहीच पत्ता नाही….
फ्लॅशबॅक संपतो.
एव्हाना हवेली जमीनदोस्त झालेली आहे. इतक्यात एक मजूर धावत येतो. हवेलीच्या तळघरात काहीतरी सापडल्याचे सांगतो. भूतनाथ त्याच्या मागोमाग धावत जातो. तळघरात एक सांगाडा सापडलेला असतो. भूतनाथला दिसते त्या सांगाड्याच्या मनगटात एक बांगडी आहे. तो ओळखतो हा सांगाडा छोट्या बहुचा आहे. त्याला तिची वाक्य आठवतात, “जब मै मर जाऊँगी, तब मुझे खूब सजाना!” तिचा तो सांगाडा अन भूतनाथला आठवत असलेली तिची ती मीनाकुमारीच्या दर्दभर्या आवाजात बोललेली वाक्ये, “जब मै मर जाऊँगी….” आपल्या काळजाचे पाणी पाणी होते. वाटते, काय हवं होतं तिला? फक्त पतीचं प्रेम. आणखी काय हवं होतं तिला? मृत्यूनंतर सजलेलं पार्थिव. तेही तिच्या नशीबात नसावं. ज्या बांगड्या शाबूत राहाव्यात त्यासाठी जिवाचा आटापिटा केला. त्या तिच्या बांगड्याच तिची ओळख पटवून देतात.