सांताक्लॉजचं अपहरण – सॅबी परेरा

सांताक्लॉजचं अपहरण

(एल फ्रॅंक बाऊमच्या कथेचे स्वैर रूपांतर)

  • सॅबी परेरा

(sabypereira@gmail.com)

          हसमुख नगरातील प्रशस्त वाड्यात सांताक्लॉज आपले निवडक यक्ष म्हणजे पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर यांच्या देखरेखेखाली लेबर कॅटेगरीतील यक्ष, गंधर्व आणि अप्सरा घेऊन वर्षभर खेळणी आणि भेटवस्तू बनविण्याच्या कामात मग्न असे. सांताक्लॉज, फाल्गुनी पाठक आणि मोती साबण यांच्यात एक प्रकारचं साम्य आहे. त्यांचं काम लोकांना केवळ एका विशिष्ट सीजनमध्ये दिसत असलं तरी त्यात आपण कुठे कमी पडू नये म्हणून ते वर्षभर मेहनत करीत असतात.

         हसमुख नगरीत सगळे सुखी-समाधानी आहेत म्हणून सगळीकडे आनंद भरून राहिलेला आहे. झरे आणि नद्यांचं मंजुळ संगीत दिवसभर वाजत आहे, गार वारा शीळ घालत आहे. कोवळ्या सूर्याची उबदार किरणं कोवळ्या गवतावर बागडत वातावरण प्रसन्न करीत आहेत. वर्षभर खेळणी आणि भेटवस्तू बनवायच्या आणि ख्रिसमसचा सण आला की लहान बालकांना गुपचूप ती खेळणी आणि भेटवस्तू  नेऊन द्यायच्या. असा आनंद वाटण्याचं सांताक्लॉजचं काम. हे काम सांताक्लॉज आणि त्याचे सहकारी वर्षभर मन लावून करायचे. असं म्हणतात की, प्रेम लाभे प्रेमळांना. मग स्वतः आनंदाने राहणाऱ्या आणि इतरांना आनंद वाटणाऱ्या सांताक्लॉजला कुणी शत्रू का असेल? कुणी त्यांचा द्वेष तरी का करील?

         पण नाही !

         हसमुख नगरीला लागूनच एक मोठ्ठा डोंगर आहे. त्यात पाच स्वतंत्र गुहांमध्ये पाच राक्षस राहतात. म्हणून त्याला राक्षसांचा डोंगर असे नाव पडले आहे. सांता लहान बालकांना बक्षीस देऊन खुश करतो, त्यांच्यात प्रेमाची लागवड करतो म्हणून ते राक्षस सांताचा द्वेष करतात. डोंगराच्या पायथ्याशी खूप सजवलेली जी गुहा दिसते तिथे मत्तुभाई राहतो. त्याला लागूनच असलेली दुसरी गुहा जलनसिंगची आहे. तिसऱ्या गुहेत नफरत मियाँ बसतो. थोडं पुढे गेल्यावर जी अंधारी गुहा लागते तिथे तिखा मिरची नावाचा राक्षस असतो. या चारही गुहांच्या पलीकडे डोंगराचा टोकदार सुळका असून तिथे जाणाऱ्याचा दरीत पडून मृत्यू ठरलेला असतो. या चारही गुहांमधून एक छोटी अंधारी वाट जाते ती डोंगराच्या पलीकडे असलेल्या तौबा राक्षसाच्या लहानशा गुहेस जाऊन मिळते. असे म्हणतात की हा तौबा राक्षस स्वभावाने खूप चांगला असून डोंगराच्या अलीकडील राक्षसाची कोंदट, अंधारी गुहा पार करून तौबा राक्षसाच्या गुहेपर्यंत पोहोचणाऱ्यांना तो स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळ्या हवेच्या दुनियेत सोडून देतो.

         सांता, लहान पोरांना भेटवस्तू देतो म्हणून ती आनंदी होतात. स्वार्थ त्यांच्या मनात आणि ती मुलं स्वार्थाच्या गुहेत शिरतच नाहीत म्हणून मत्तुभाई सांतावर खार खाऊन आहे. ही पोरं कुणाचा मत्सर करत आपल्या गुहेत येत नाहीत यामुळे जलनसिंग सांतावर नाराज आहे. स्वार्थ आणि मत्सर यापासून दूर असल्याने त्या मुलांना द्वेषाच्या किंवा रागाच्या गुहेचा आधार घ्यावा लागत नाही ही अनुक्रमे नफरत मियाँ आणि तिखा मिर्चीची सांताबद्दल तक्रार आहे. आणि या कुणाच्याच गुहेत न शिरल्याने मुलांना पश्चातापाची भावना वाटण्याचा किंवा तौबा राक्षसाच्या गुहेत शिरण्याचा प्रश्नच येत नाही. एकंदरीत या सांतामुळे आपण दुर्लक्षिले जातो म्हणून राक्षसांची सांतावर खुन्नस आहे.

         पाचही राक्षस डोंगरावर झूम करून जमले. तेथे त्यांची एक मिटिंग झाली आणि त्यात, ‘या सांताचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा’ यावर सगळ्यांचं एकमत झालं. काहीतरी बहाण्याने सांताला आपल्या स्वार्थ, मत्सर, द्वेष किंवा राग यापैकी एका गुहेपर्यंत आणायचं म्हणजे गुहेपाठच्या दरीत कोसळून त्याचा कपाळमोक्ष होईल, असा प्लॅन ठरला.

         दुसऱ्या दिवशी मत्तुभाई सांताकडे गेला आणि म्हणाला, “इतक्या निगुतीने बनविलेली इतकी सुंदर खेळणी त्या बेशिस्त पोरांना देण्यापेक्षा तू स्वतःकडेच का ठेवत नाहीस?” आपला स्वार्थ जागवण्याचा हा डाव आहे हे सांताने ओळखले आणि केवळ एक स्मित करून मत्तुभाईला परत पाठवले.

         नंतर जलनसिंग सांताकडे गेला आणि म्हणाला, तुझ्या हातांनी बनविलेल्या खेळण्यापेक्षा बाहेर दुकानदाराकडे मिळणारी मशीनवर बनविलेली खेळणी अधिक सुबक आणि स्वस्त आहेत. सांता त्या दुकानदारांचा मत्सर करणे शक्यच नव्हते त्यामुळे जलनसिंगला देखील निराश होऊन परत यावे लागले.

         नंतर नफरत मियाँ सांताकडे गेला आणि म्हणाला, “तू इतकं चांगलं काम करतोस पण या जगात काही लोक असे आहेत की जे सांता आहे यावर विश्वासच ठेवत नाहीत. तू इतकी मेहनत करून, इतका खर्च करून ही खेळणी मुलांना फुकट वाटतोस म्हणून कित्येक लोक तुला मूर्ख म्हातारा म्हणतात.” आपल्या मनात द्वेषभावना जागविण्यासाठी या राक्षसाचे प्रयत्न चालू आहेत हे मनोमन ओळखून सांताने त्यालाही वाटेला लावले. 

         राक्षसांना कळून चुकले की सांताला आपल्या सापळ्यात अडकवणे सोपे नाही. त्याच्या हसमुख नगरातील प्रेमाच्या आणि आनंदाच्या वातावरणात जिथे त्याचे सगळे सहाय्यक त्याच्या भोवती सद्गुणांची झेड सेक्युरिटी बनून उभे असतात तिथे त्याचं आपण काहीच वाकडं करू शकत नाही. लवकरच ख्रिसमसचा सीजन सुरु होईल. युरोपात रेनडियरची स्लेज वापरणाऱ्या सांताने आशिया पॅसिफिक रिजनसाठी बनविलेली स्पेशल घोडागाडी घेऊन सांता, हसमुख नगरीतील वाड्याबाहेर पडेल तेव्हा सांताचा गेम करण्याचे राक्षसांनी ठरविले.

         डिसेंबरचा महिना सुरु झाला. सांताच्या आयुष्यातील वर्षभरातील सर्वात आनंदाची रात्र आली. मुलांना खेळणी वाटून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपल्याला पाहायला मिळणार या कल्पनेनेच सांताच्या अंगात उत्साह संचारला. तो शीळ वाजवू लागला, गाणी गाऊ लागला. नाचू लागला. आपल्या ताफ्यातील सर्वात सुंदर आणि उमदे घोडे त्याने आपल्या घोडागाडीला जोडले. सगळ्या भेटवस्तू गाडीत भरल्या. जिथे-जिथे भेटवस्तू वाटायच्या आहेत त्या शहरांची, गावांची आणि मुलांची लिस्ट पुन्हा एकदा नजरेखालून घातली. कोणत्या रस्त्याने गेल्यास कमीत कमी वेळात जास्तीतजास्त मुलांपर्यंत भेटी पोहोचवता येतील यासाठी नकाशा पहिला आणि सांताची घोडागाडी वाऱ्याच्या वेगाने निघाली.

         हसमुख नगरी बाहेरील जंगलातून जाताना, एका झाडावरून टाकलेला दोराचा फास सांताच्या गळ्याभोवती आवळला गेला. सांता अलगद उचलला गेला आणि रस्त्यावर आदळला. घोडागाडी आपल्या वेगात दौडत राहिली. सांताला शुद्ध आली तेव्हा त्याला घट्ट दोरीने बांधलेले आणि चारही बाजूंनी राक्षसांनी घेरले होते. ते राक्षस सांताला आपल्या डोंगरातील गुहेकडे घेऊन गेले आणि एका छोट्याशा गुहेत त्याला डांबून ठेवले.

         पाचही राक्षस सांताभोवती मोठमोठ्याने हसत गोल फिरू लागले. ते म्हणत होते, “आता तुझी लाडकी पोरं काय करतील रे थेरड्या ? त्यांनी ठेवलेल्या मोज्यात आणि ख्रिसमस ट्री वर त्यांच्या भेटवस्तू नसतील तर ती पोरं त्यांच्या आईवडिलांना आणि तुला रागावतील, शिव्या घालतील. कदाचित इतरांची भेट ते चोरतील. चोरता नाही आली तर त्याचा दुस्वास करतील, भांडणं करतील आणि येतील आमच्या गुहांत. तुझ्या आनंदाच्या फुग्याला आम्ही टाचणी लावली की रे थेरड्या! हा-हा-हा-हा!”

         घोडागाडीत पाठीमागे बसलेल्या पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर या सांताच्या सहाय्यकांना सांता गायब झाल्याचे कळेपर्यंत घोडागाडी बरीच दूर आली होती. त्यांनी आजूबाजूला आणि मागे वळून पहिले पण त्यांना सांता कुठे दिसला नाही. पिटर म्हणाला की आपण घोडागाडी वळवून सांताला शोधू या. पण ज्युपिटर म्हणाला, कुणीतरी सांताचे अपहरण केले आहे आणि सांताच्या लाडक्या बालकांना दुःखी करण्याचा त्यांचा उद्देश असावा. आपण आता सांताला शोधायला गेलो तर त्यात खूप वेळ जाईल आणि उरलेल्या वेळात आपल्या भेटवस्तू वाटून होणार नाहीत. सांताला शोधण्यात वेळ घालवण्यापेक्षा आशेने वाट पाहत असलेल्या मुलांना खेळणी आणि भेटवस्तू देऊन त्यांचा ख्रिसमस आनंदी करणे सांताला अधिक आवडेल. रिपीटरनेही ज्युपिटरच्या म्हणण्याला दुजोरा दिला. गाडी हाकायला सांता नसला तरी त्याचे इमानदार घोडे योग्य रस्त्याने दौडत राहिले.

         पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर यांनी आजवर सणातील भेटवस्तू वाटण्यात सहाय्य केलेले असले तरी स्वतंत्रपणे ही कॅबिनेट दर्जाची जबाबदारी पहिल्यादाच त्यांच्या खांद्यावर आल्याने ते भांबावले होते. त्यामुळे त्यांच्याकडून काही छोट्यामोठ्या गफलती झाल्या. कुणा मुलाला खेळण्यातील कार द्यायची त्याला बाहुली दिली गेली. कुणा मुलीला फ्रॉक द्यायचा तिला क्रिकेटची बॅट दिली गेली. तरीही कमीत कमी चुका करत त्या तिघांनी दुसऱ्या दिवशीचा सूर्य उजाडे पर्यंत सगळ्या भेटवस्तू ज्याच्या त्याला वाटून टाकल्या. 

         भेटवस्तू वाटून परत येताना रस्ताभर पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर यांनी सांताचा शोध घेतला पण तो त्याला कुठे दिसला नाही. रस्त्यात एके ठिकाणी शिकारीच्या दोरखंडाचा फास आणि त्याबाजूला पडलेली सांताची लाल टोपी, त्याच्या दाढीचे काही पांढरे शुभ्र केस आणि त्याच्या बुटाचे ठसे पाहून त्यांच्या लक्षात आले की त्या दुष्ट राक्षसांनीच सांताला किडनॅप केले असणार. त्यांनी आपला मोर्चा राक्षसांच्या डोंगराकडे वळवला.

         आपल्याला बंदी बनवलंय यापेक्षा आपल्या लाडक्या बालकांना ख्रिसमसच्या भेटी मिळणार नाहीत, ते दुःखी होतील या कल्पनेने सांता अधिक दुःखी झाला होता. पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर हे आपले चेले आपल्या अनुपस्थितीत देखील आपलं काम चोख करतील याची सांताला खात्री असली तरी आपण स्वतः हे काम करू न शकल्याबद्दल त्याला खंत वाटत होती. बाजूला उभे असलेले राक्षस त्याला टोमणे मारून त्याच्या दुःखावर डागण्या देण्याचे काम करीत होते. 

         पाचही राक्षस आळीपाळीने सांतावर लक्ष ठेवून होते. तिखा मिरचीच्या तिखट टोमण्यांनी सांता बेजार झाला असला तरी त्याने आपल्या मनाची शांती आणि चेहऱ्यावरील हसू ढळू दिले नाही. तिखा मिर्ची नंतर, तौबा राक्षस सांतावर नजर ठेवायला आला. हा त्या आधीच्या चौघांपेक्षा मृदू आणि सहृदयी होता. तो म्हणाला, “माझे चौघे राक्षस बंधू माझ्यावर फारसा विश्वास ठेवत नाहीत. मला ठाऊक आहे जे झाले ते खूप वाईट झाले. मी तुला सोडलं असतं पण त्याचा काही फायदा नाही. आता सूर्य उगवला आहे आणि पुढील वर्षीच्या ख्रिसमस पर्यंत तू बालकांना भेटवस्तू द्यायला जाऊ शकत नाहीस.”

         सांता म्हणाला, “तू जे म्हणतोस ते बरोबर आहे. ख्रिसमस-संध्या टळून दिवस उजाडलेला आहे आणि इतक्या वर्षात पहिल्यांदा मी माझ्या लाडक्या मुलांना भेटू शकलो नाही, भेटवस्तू देऊन त्यांना आनंदी करू शकलो नाही”

         तौबा राक्षस म्हणाला, मला ठाऊक आहे मुलं खूप नाराज झाली असतील. या नाराजीमुळे ते कदाचित स्वार्थी होतील, रागावतील, एकमेकांचा दुस्वास करू लागतील, आणि अंतिमतः ती मुलं माझ्या राक्षस बंधूंच्या गुहेत येतील. त्या मुलांचा विनाश होईल. पण मी तुला वचन देतो की त्यातील काहीं मुलांना तरी मी तौबाच्या म्हणजे माझ्या पश्चातापाच्या गुहेपर्यंत घेऊन येईन आणि मुक्त करण्याचा प्रयत्न करीन.

         “तुला स्वतःला कधी पश्चाताप झाला नाही का?” सांताने तौबाला विचारले.

         “खरंतर मला तुझ्या अपहरणात भाग घेतल्याबद्दल आताही पश्चाताप होतोय. आता उशीर झालाय हे मला ठाऊक आहे. पण पश्चाताप हा नेहमी चूक झाल्यानंतरच करायचा असतो ना!” तौबा म्हणाला.

         “अच्छा. बरोबर आहे. म्हणजे जे कुणी पाप करणार नाहीत त्यांना तुझ्या गुहेपर्यंत यायची गरजच भासणार नाही. बरोबर ना? सांताने विचारले.

         “खरंय! पण तू काहीच पाप केलेले नसले तरी माझ्या पापाचे प्रायश्चित म्हणून मी तुला माझ्या गुहेत नेणार आहे आणि तिथून तुला मुक्त करणार आहे.” तौबा म्हणाला.

         मग तौबाने सांताला साखळदंडातून सोडवले. त्याच्या पाया पडून त्याची माफी मागितली. त्याला आपल्या गुहेत नेले आणि तिथून स्वच्छ सूर्यप्रकाश, हिरवी वनराई आणि मोकळ्या हवेच्या दुनियेत सोडून दिले.

         स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घेताच सांताच्या चित्तवृत्ती पाहिल्यासारख्या बहरून आल्या. तो तौबा राक्षसाला म्हणाला. “माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलीही अढी नाहीये. तुझ्याविना हे जग अगदी निरस होईल.” असे म्हणून त्याने तौबा राक्षसाला मिठी मारून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

         तो बाहेर पडला. पाहतो तो काय? पिटर, रिपीटर आणि ज्युपिटर आपली देवदूतांची फौज घेऊन सांताच्या सुटकेसाठी येताना त्याला दिसले. सांताला निवांतपणे येताना पाहताच ते तिघेही पुढे येऊन त्यांनी सांताला आलिंगन दिले आणि सगळ्यां बालकांना ख्रिसमसच्या भेटवस्तू वेळेत पोहोचवल्याची खुशखबर दिली.

         आपल्या अनुपस्थितीतही आपले काम चोख बजावून, ख्रिसमसच्या दिवशी बाळगोपाळांना आनंदी केल्याबद्दल सांताने त्या तिघांनाही शाबासकी दिली आणि शीळ वाजवीत, गाणी गात, नाचत ते हसमुख नगरीतील आपल्या वाड्याकडे निघाले.