सांगे वडिलांची कीर्ती!
- डॉ.अनुपमा निरंजन उजगरे, ठाणे
हरिश्चंद्र भास्कर उजगरे, B.Sc.L.L.B.
३ जाने.१९२६ – १३ ऑक्टो.१९९६
एच. बी. उजगरे हे अत्यंत प्रामाणिक पोलीस ऑफिसर. अभिनेता राजकुमार आणि चार्ल्स शोभराजला पकडणारे श्री. मधुकर झेंडे हे त्यांच्याबरोबरचे ऑफिसर्स. काही दिवसांपूर्वी श्री. मधुकर झेंडे भेटले तेव्हा हरीश ह्या आपल्या मित्राविषयी फार भरभरून बोलत होते. बाबांचा उल्लेख काही जण त्यांच्या नावाची ह. भा. ही आद्याक्षरं घेऊनही करतात.
ह.भांच्या जीवनातील काही घटना सांगाव्याशा वाटतात…
इब्राहिम कासकरचं नाव ह.भा. अत्यंत विश्वासू माणूस म्हणून घेत. त्याची दाऊदसारखी मुलं कुख्यात निघावीत हा दुर्दैवी योगायोग! इब्राहिम असेल तरच ते मुलांना सर्कस वगैरे पाहायला पाठवत. एकदा एक जण ह.भांना लाच द्यायला म्हणून ब्रीफ केसमध्ये रोख रक्कम घेऊन घरी आला होता. घर होतं पहिल्या मजल्यावर. ह.भांनी त्याला अशी जबरदस्त लाथ मारली की, तो जिन्यावरून गडगडत खाली गेला. खाली उभ्या असलेल्या पोलीस शिपायांनी त्याचा कॅच घेतला! ह.भांची मुलं दार किलकिलं करून हे दृश्य बघत होती.
‘नया दौर’चा पहिलाच शो होता. ह.भांची ड्युटी होती. सिनेमा संपल्यावर त्यात हिरो असलेल्या दिलीपकुमारने विचारलं, “काय ऑफिसर, कसा वाटला सिनेमा?”
“होपलेस!” ह. भा. ताडकन् उत्तरले.
दिलीपकुमार नामक नटसम्राट ह्या स्पष्ट आणि अनपेक्षित उत्तराने चमकलाच! तरी त्याने पुढे विचारलंच… “निदान क्लायमॅक्स?”
“तो तर अगदीच फालतू! न पटणारा! कारण बैलगाडी नि कार ह्यांच्या शर्यतीत बैलगाडी जिंकूच शकत नाही!” नटसम्राटाचा चेहरा पहिल्याच शोच्या पहिल्याच प्रतिक्रियेला साफ पडला! पण नटसम्राटच तो! दुसर्याच क्षणी चेहर्यावर हसू आणत तो पुढच्या व्यक्तीकडे गेला.
काही कालावधीसाठी पंतप्रधान पं. नेहरूंकडे सुरक्षा अधिकारी म्हणून ह.भांची ड्युटी होती. नेहरूजी त्यांच्यावर फार खूश होते. कार्यकाल संपवून मुंबईला परतण्यापूर्वी पंडितजींनी ह्या तडफदार तरुण ऑफिसरला विचारलं, “तुला काही तरी गिफ्ट द्यावं, असं मला वाटतंय. तूच सांग, मी काय द्यावं तुला? काय हवं ते माग.”
“सर, उद्या सांगतो.” ह.भा. नम्रपणे म्हणाले. नेहरूंना ‘देशाचा राजा’ म्हणत. गाडी-माडी-शेतीवाडी काय हवं ते देणं त्यांच्या हातात होतं. दुसर्या दिवशी पंडितजींच्या टेबलावर त्यांचाच पोस्टकार्ड साईझ फोटो ठेवून ह. भा. म्हणाले, “सर, ह्यावर सही द्या फक्त!”
ह.भांचं व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावी होतं. त्यांच्या मावशीकडून नात्यात असलेले शाहू मोडक सिनेमात प्रसिद्ध झालेले होते. शाहूराव म्हणजे घरातल्या तरुणांचं आकर्षणकेंद्र होते. शाहूरावांशी ह.भांचे चांगले संबंध होते. पण मुलांनी पदवीधर व्हावं, लवकर आपल्या पायांवर उभं राहावं अशी ह.भांच्या आईची इच्छा होती. ह.भांना सिनेमात जायला आईने कडक शब्दांत विरोध केला होता. कारण आपल्या वाढदिवसाच्या दुसर्याच दिवशी साधं टॉन्सिल्सचंच तर ऑपरेशन आहे, म्हणून सासवडहून रेव्ह. भास्करराव उजगरे एकटेच पुण्यात गेले होते. डॉक्टरकडून चुकून भलतीच शीर कापली गेल्याने ऑपरेशन टेबलवरच भास्कररावांचा आकस्मिक मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर अत्यंत कठीण परिस्थितीत पण खंबीरपणे सोनूबाईंनी आपल्या पाच मुलांना आणि अनाथ झालेल्या दिराच्या दोन मुलींना वाढवलं होतं. आईच्या आज्ञेचं ह.भां.नी नुसतंच पालन केलं नाही तर आईला सुखाचे दिवसही दाखवले.
अभिनेता राजकुमार ह.भांच्याबरोबरच पोलिस खात्यात होता. बॉक्सिंग खेळताना ह.भांची एकूण शरीरयष्टी पाहून घाबरून म्हणायचा, “ऐ उझी, (Uzgare) जरा संभलकर, धीरेसे मारना…”
पोलीस खात्यातील पगारात तीन मुलग्यांना उच्च शिक्षण देणं कठीण म्हणून बुश रेडियो फॅक्टरीच्या वर्क्स मॅनेजरची समोर आलेली संधी स्वीकारण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला. अठरा वर्षं बुश रेडिओ फॅक्टरीचं वर्क्स मॅनेजरचं पद त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळलं. त्या काळात एका युनियनकडून त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत. एका सकाळी ह.भा. घरातून निघायच्या घाईत असताना फोन खणखणला. निरंजन फोनजवळच पेपर वाचत बसले होते. त्यांनीच घेतला.
‘आता साहेब घरातून निघाले की, त्यांच्यावर हल्ला होणार’ असल्याची खबर देणारा फोन होता तो. बाबांनी बुशमध्ये मराठी कामगार भरतीला प्राधान्य दिलं होतं. फोन करणारा त्यांच्यापैकीच एक होता. निरंजन धावत जिना पार करून बाबांच्या खोलीत गेले. फोनवरचा निरोप ऐकून ह.भांनी शांतपणे ड्रॉवरमधून स्वसंरक्षणासाठी घेऊन ठेवलेलं आपलं पिस्तूल काढलं. म्हणाले, “काळजी करू नकोस आणि उषेला ह्यातलं काही सांगू नकोस. निघतो मी.”
नेहमीसारखे ते खाली उतरले. बाबांना पिता येईल एवढं कोमट करून दुधाचा ग्लास तयार ठेवण्याचं काम करून मी स्वयंपाकघरात थांबत असे. पुढे येत नसे. बाबा जायला निघत तेव्हा आई त्यांना निरोप द्यायला समोरच असत. आमचं एकत्र कुटुंब होतं. आपली मुलं निघाली की, सुनांनीही त्यांना निरोप द्यायला असंच हजर असलं पाहिजे असा आईंचा दंडक असे! बाबांनी दुधाचा ग्लास संपवला. आईंचा निरोप घेऊन ते निघाले. गाडी नजरेआड झाल्यावर आई खिडकीतून आत वळल्या तेव्हा निरंजनची अस्वस्थता त्यांच्या लक्षात आली. कारण समजल्यावर त्याही अस्वस्थ झाल्या. पण त्यांनी कुठलंही आकांडतांडव केलं नाही. कितीही अडवायचा प्रयत्न केला असता तरी ह.भांनी कुणाचं ऐकलं नसतं, अगदी आपल्याशी प्रेमविवाह केला असला तरी आपलंही ऐकलं नसतं हे आई ओळखून होत्या. त्यामुळे ‘तू आधीच का सांगितलं नाहीस मला?’ असा दोष त्यांनी दिला नाही. तिथेच बसून भरल्या डोळ्यांनी देवाकडे प्रार्थना करत राहिल्या.
आमचं स्वयंपाकघर त्याच मजल्यावर हॉलला लागून होतं. सगळी कामं सोडून आम्ही तिघं हॉलमध्ये फोन वाजायची वाट बघत बसलो. सकाळच्या वेळी बहुत करून आम्हा तिघांचाच इथे वावर असायचा. तासाभराने फोन वाजला. निरंजननेच उचलला. बाबा सुखरूप पोहचले होते! संध्याकाळीही नेहमीच्या वेळेत नेहमीच्या प्रसन्न मुद्रेने बाबा घरी आले. जिवावर बेतलेला हा माझ्या डोळ्यांसमोरचा प्रसंग. इतर किती असतील कोण जाणे!
समाजसेवा करायची म्हणून त्याकाळी चार आकडी, एवढा मोठ्ठा पगार असलेल्या ह्या नोकरीचा बाबांनी राजीनामा दिला (१९७८). त्याआधी मुलांना-सुनांना एकत्र बसवून आपला निर्णय सांगताना, “माझ्याकडून तुमच्या काही आर्थिक बाबतीतील अपेक्षा आहेत काय?” असं विचारलं. “नसतील तर मला मोकळं करा” म्हणाले.
आम्ही बाबांना त्यांच्या इच्छेनुसार जगण्यासाठी मोकळं केलं. निरोप समारंभापूर्वी बुश व्यवस्थापनाला प्रश्न पडला, “साहेबांना काय भेटवस्तू द्यावी?” त्यांनी उजगरेसाहेबांनाच विचारलं. उजगरेसाहेब म्हणाले, “ज्या खुर्चीवर मी १८वर्षं बसलो, तिच्यावर बसायला लायक माणूस तुम्हांला मिळणं शक्य नाही, तेव्हा ती खुर्ची माझ्या घरी पाठवून द्या! बाकी काही नको.”
ह.भां.ची भविष्यवाणी लवकरच खरी ठरली. त्या पदासाठी लायक व्यक्ती न मिळाल्याने बुश कंपनी बंद पडली! ह.भांच्या खुनाचा कट दोनदा मराठी माणसांनीच उधळून लावल्याचं नंतर कळलं. कामगारांच्या मनात उजगरेसाहेबांविषयी अतिशय आदर होता. आपल्या समस्या घेऊन, कधी साहेबांचं नुसतं दर्शन घ्यायला म्हणून काही कामगार येत.
एकदा भगवे कपडे घातलेला एक संन्यासी फाटकापाशी उभा राहून बराच वेळ बघत होता. मी ‘भिक्षा’ घेऊन बाहेर आले, तसं त्याने म्हटलं, “गुड मॉर्निंग. उजगरे साहेब इथेच राहतात का अजून? मी बुशमध्ये होतो. नंतर संन्यास घेऊन हिमालयात गेलो. माझं नाव बेल्लारे. फार वर्षांनी परतलोय हिमालयातून. आहेत काय साहेब?” त्यावेळी बाबा नाना चौकात राहायला गेले होते. मी तिकडचा पत्ता दिला. बाबांना फोन करून सांगितलं. त्यांनी नावानिशी त्याला ओळखलं.
सेवाभावी काम म्हणून अत्यल्प पगारावर ह.भांनी युनायटेड ख्रिश्चन नॉर्थ इंडिया ट्रस्ट असोसिएशनचे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून १९७८ ते १९९६पर्यंत पद सांभाळलं. त्यांच्यानंतर त्यांच्या जागेवर आलेल्या श्री. मसींच्याच शब्दांत सांगायचं तर, “एक चपरासी की तनखा से भी कम पैसा तनखे के नाम पर उजगरे साहब लिया करते थे.”
ह.भांचा आदर्श मात्र त्यांचे गुण गाणार्यांनी, त्यांच्यानंतर त्यांच्या पदावर आलेल्यांनी जपला नाही! UCNITA चं मॅनेजरपद सांभाळत असतानाच काही कायदेविषयक लेखनही ह.भांनी केलं. ते त्यांच्या दिल्ली कार्यालयाला बरंच मार्गदर्शक ठरलं. ते पुस्तकरूपाने मात्र काढण्याचं काम कार्यालयाकडून झालं नाही. त्या स्क्रिप्टची प्रतही आमच्याकडे त्यांनी दिली नाही.
‘ज्ञानोदय'(स्थापना १८४२) ह्या मराठी मासिकाचं संपादकपदही ह.भांनी त्याच काळात सांभाळलं आणि सर्वार्थाने मासिकाला ऊर्जितावस्था आणून त्याची धुरा प्रा. सुधीर शर्मा ह्यांच्यावर विश्वासाने सोपवली. त्यांनीही तो विश्वास सार्थ ठरवला. ह.भांनी ‘मराठी ख्रिस्ती समाज संघटना’ स्थापन केली. त्यांच्या निधनानंतर तिचं नेतृत्व करायला कोणी पुढे आलं नाही.
तरुणांना लिहितं करण्यासाठी त्यांनी ‘ज्ञानोदय’मधून रेव्ह.भास्करराव उजगरे ह्यांच्या नावाने निबंध स्पर्धा, कथा स्पर्धा आयोजित केल्या. ह.भांच्या षष्ट्यब्दीपूर्ती समारंभात त्यांना अर्पण करण्यात आलेल्या शैलीत आणखी रक्कम घालून त्यांनी ती ‘ज्ञानोदय’ला दिली.
कॅथलिक आणि प्रोटेस्टंट समाजाला एकत्र आणण्यासाठी साहित्यविषयक अनेक उपक्रम ह.भा आणि फादर डॉमिनिक आब्रिओ ह्यांनी मिळून वसईत आणि मु़ंबईत केले. ज्येष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिकांना ह.भा.आपल्या गाडीतून वसईत घेऊन येत. फादर आब्रिओ बिशप म्हणून औरंगाबादला गेले तरी दोघांची मैत्री कायम राहिली.
कविवर्य विंदा करंदीकर, शंकर वैद्य, सरोजिनी बाई, गंगाधर गाडगीळ, अनंत काणेकर, रा.भि.जोशी अशा मंडळीशी ह.भांचा जवळचा संबंध होता. मंगेश पाडगांवकर हे तर त्यांच्या बहिणीचे यजमान होण्याआधी विल्सन कॉलेजमधले मित्रच होते. ह.भांचा पिंड वैचारिक बैठकीचा. त्यांच्या संपादकीय लेखांचा ‘जागर’ हा संग्रह प्रकाशित झाला. कविता मात्र अप्रकाशित राहिल्या. त्यांची चित्रांची वहीही काळाच्या उदरात गडप झाली.
बाबांचं प्रभावी आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व, परखडपणा, मनमिळावू आणि प्रेमळ स्वभाव, दरारा, विनोदबुद्धी, विविध खेळांमधलं प्रावीण्य, कौटुंबिक मोठे समारंभ स्वखर्चाने साजरे करणं, आपले वडील ‘भाषाभास्कर’ रेव्ह.भास्करराव उजगरे ह्यांनी सुरू केलेली मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनं भरवण्यासाठी तन मन धन खर्चणं… रोटरी क्लब प्रेसिडेंट म्हणून केलेलं लक्षणीय काम…अनेक पैलूंवर खूप काही लिहिता येईल…
बाबांना आम्हा दोघांचं फार कौतुक. “साहित्यिक जोडपं”, “मेड फॉर इच अदर”, अशा शब्दांत ते आमचं कौतुक करायचे. निरंजन रोटरी क्लबचे प्रेसिडेंट झाले तो कौतुकसोहळा पास्ट प्रेसिडेंट ह.भांनी आणि इनरव्हील पास्ट प्रेसिडेंट उषा उजगरे ह्यांनी डोळे भरून पाहिला. घरी आल्यावर बाबा म्हणाले, “थांबा, मला तुम्हा दोघांचा फोटो काढू द्या.” लग्नानंतर १५ वर्षांनी काढलेला तोच फोटो माझ्या मोबाईलवर आहे. बाबांनी आनंदाचे अनेक प्रसंग दिले. माझ्यावर पितृछत्र कायम ठेवलं.
आई-बाबा सुनांना ‘मुली’च मानत. मला मात्र बाबा शेवटी शेवटी “अनुपमा माझा चौथा मुलगा आहे” असं म्हणू लागले होते. आईंना ते आवडत नसे. त्या म्हणत, “अहो, तीन तीन मुलगे आहेत ना आपल्याला.” बाबा पुन्हा म्हणत, “आहेत ना, पण तरीही अनुपमा माझा चौथा मुलगा आहे!
निरंजन जागतिक मराठी परिषदेसाठी इस्रायलला जायला निघाले तेव्हा बाबांनी त्यांना म्हटलं, “जपान, इंग्लंड, अमेरिका पाहिलं. पण हा एक देश पाहायची इच्छा राहून गेली. तुझ्या डोळ्यांनी बघेन!”
माझ्याकडून बाबांनी आपल्या अखेरच्या प्रवासाची पूर्ण तयारी करवून घेतली. कॉफिनची लांबी-रुंदी किती असावी, सूट कोणता चढवायचा, चष्मा, डेथ सर्टिफिकेट च्या प्रती काढून ठेवणं वगैरे लिहून ठेवलं…लॉन्ड्रीतून सूट आला आहे ह्याची माझ्याकडून खात्री करून घेतली. मी अशा प्रसंगातून कधीच गेले नव्हते आणि निरंजन जवळ नव्हते म्हणून पुढच्या काही गोष्टी कशा कराव्या लागतील, ह्याची मला त्यांनी कल्पना देऊन ठेवली होती.
पार्किन्सनने बाबांची अवस्था विकल झाली होती. आपल्याला अशा अवस्थेत कुणी भेटायला येऊ नये असं त्यांना वाटत असे. तरीही मी विचारत असे, “कुणाला भेटायला बोलवायचंय आहे काय?” बाबा खुणेनेच नकार देत. पण एकदा म्हणाले, “ताई आणि मंगेशला बोलावून घे!”
मंगेशमामा अचूक भविष्य सांगत. बाबांना सिंघानियात ठेवलं तेव्हा मला ते बाजूला घेऊन म्हणाले होते, “१३ऑक्टो.ची रात्र त्याने काढली तर तो आणखी काही वर्षं जगेल. पण मला ते कठीण दिसतंय. निरू इस्राएलला गेलाय. तूच बघते आहेस सगळं. तेव्हा मानसिक तयारी ठेवावीस म्हणून तुला हे सांगतोय.”
मंगेशमामांनी वर्तवलेल्या भविष्यावर माझा विश्वास असायचा. मी १२ता. रात्री आईंना घेऊन सिंघानियात गेले.आईंना भेटवून बाहेर बसवलं आणि पुन्हा आत गेले. बाबा कोमातच होते. मी त्यांच्या कपाळावर हात ठेवून म्हटलं, “आईंची काळजी माझ्यावर सोपवलीत. काळजी करू नका. शांत मनाने जा!” आईंना घेऊन मी घरी गेले.
रणजीतने “मला आजोबांना भेटायला जायचंय” म्हणून हट्ट धरला. मी आणि आई ‘रात्र फार झालीय, रस्ता सुनसान आहे’, म्हणून नको म्हणत होतो पण आमच्या विरोधाला न जुमानता तो दार जोरात आपटून गेला. तो कॉलेजला जाण्याइतका मोठा झाला होता तरी त्याने असं एकट्याने जाण्याची काळजी वाटणं साहजिक होतं. रणजीत आयसीयूत आजोबांच्या कॉटजवळ जाऊन उभा राहिला तोच आजोबांनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत ओळखीची चमक दिसली. आमचा रणजीत एरवी कमी बोलणारा. पण त्यावेळी कसं कोण जाणे घडाघडा बोलून गेला, “आजी आणि आम्ही सगळे बरे आहोत. बाबा परवा येणार आहेत. काळजी करू नका. मी आहे इथेच.” आजोबांनी त्याचं बोलणं ऐकून घेतलं आणि समाधानाने डोळे मिटले.
१३ ऑक्टो. तारीख उजाडली आणि बाबांनी शेवटचा श्वास घेतला! मंगेशमामांची भविष्यवाणी खरी ठरली!
निरंजनचे बाबा त्यांच्याइतकेच माझेही बाबा होते. बाबा गेल्यानंतर ‘तुझे वडील गेल्याचं कळलं’ म्हणत निरंजनऐवजी मलाच काही सांत्वनपर पत्रं आली…तेव्हा माझे वडील हयात होते ! माझे वडील गेले तेव्हा मला एकही पत्र आलं नाही!
मी कधी Ph.D.च्या भानगडीत पडेन असा स्वप्नातही विचार केला नव्हता. बाबा गेल्यावर माझ्या डोळ्यातलं पाणी थांबेना. तेव्हा त्या अवस्थेतून मला बाहेर काढण्यासाठी मी Ph.D. करावं असं निरंजननी सुचवलं. बाबा एल. एल. बी. चा आणि मी पीएच. डी. चा अभ्यास एकाच वेळी करत होतो. पण मी जुळ्या मुलांची आई होणार असं समजल्यावर माझा अभ्यास थांबला होता. मी डॉक्टरेट मिळवावी, हे बाबांचं स्वप्न होतं. माझं नव्हतंच. मी अभ्यासात रमले. मग डोळ्यातलं सतत वाहणारं पाणी आपोआपच थांबलं. बाबांचं स्वप्न निरंजननी माझ्याकडून असं पूर्ण करवून घेतलं….
पुनर्जन्म असलाच तर बाबांचीच मुलगी म्हणून जन्मायला आवडेल मला…