‘सत्य – जीवनाचा मार्ग’
- रेमंड मच्याडो – 8668639989
भारतात विविध धर्मांचे अनुयायी प्रतिवर्षी आपापल्या देव-देवतांचे धर्मेात्सव साजरे करत असतात. तसेच ख्रिस्ती धर्मीयांचा ‘नाताळ’ हा उल्हासाचा वार्षिकोत्सव! प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून तो जगभर २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. डिसेंबरचा महिना उगवला आणि थंडीचा मोसम सुरू झाला की आपोआपच खिस्तजयंती महोत्सवाची चाहूल लागते व अंतर्मनात एक प्रकारची उत्सवाची व उल्हासाची भावना तयार होते. तरूण-तरूणींमध्ये खेळी-मेळीचे वातावरण निर्माण होते. गावाच्या वेशीवर किंवा बावखलावर सार्वजनिक गोशाला उभारण्यात युवा पिढीमध्ये प्रचंड चैतन्य निर्माण झालेले असते. गृहिणी गोड पदार्थ करण्याच्या योजना आखण्यात मग्न असतात. लहान मुलं नवीन कपडे शिवण्यासाठी पालकांकडे आग्रह धरतात. पॅरीशमधील धर्मगुरू खिस्तीजनांची आध्यात्मिक तयारी करण्यासाठी कंबर कसतात. सकाळ-सायंकाळ चर्चमध्ये खिसमस संगीताचे सराव सुरू होतात, तेव्हा आसमंत पावित्र्याने निनादून जातो.
वरील सर्व गोष्टी बाह्यस्वरूपाच्या असल्या तरी त्याचा मूळ हेतू दैनंदिन धकाधकीच्या जीवनात वातावरण निर्मिती करणे हा असतो. अशा वातावरणात येशूच्या सांकेतिक आगमनासाठी आध्यात्मिक व वैयक्तिक तयारी करणे सुकर होते. खिस्ती विश्वासानुसार परमेश्वरपुत्र येशूचे पृथ्वीतलावर आगमन दोन हजार वर्षांपूर्वी झाले असले तरी प्रतिवर्षी त्याची जयंती साजरी करून त्याने दिलेल्या जीवनमूल्यांचे अनुकरण प्रतिदिन करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्येक खिस्ती माणसाने आपल्या आंतर्हृदयात येशूचा मार्ग स्वीकारून आपले दैनंदीन जीवन सात्विकतेने जगणे अपेक्षित असते.
येशूने उपदेशाद्वारे आपल्या अनुयायांना देवराज्यात प्रवेश मिळवण्यासाठी एक राजमार्ग दाखवला. दया, क्षमा, शांती, प्रीती व न्यायाचा तो मार्ग! प्रत्येक खिस्ती व्यक्तीने त्या मार्गावरून प्रवास करावा व तो प्रवास सतत चालूच ठेवावा असे अपेक्षित असते. येशूने दाखवलेला मार्ग अरूंद म्हणजेच कठीण आहे. आपले जीवन पावलोपावली विरोधाभासांनी गच्च भरले असताना येशूची वचने पाळणे इतके सोपे नसते. तरीपण त्या मार्गावरून सतत मार्गक्रमण करणे महत्त्वाचे आहे.
प्रभू येशू ख्रिस्ताने मार्क १०:२५ च्या शुभवर्तमानात म्हटले आहे: “श्रीमंत माणसाचे देवाच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या डोळ्यातून जाणे सोपे आहे.” यामधून येशू ख्रिस्त एक गहन आध्यात्मिक संदेश देतात: श्रीमंत व्यक्ती अनेकदा आपल्या संपत्तीवर, सामाजिक प्रतिष्ठेवर आणि आत्मनिर्भरतेवर अवलंबून असतात. हे त्यांना नम्रतेने देवाच्या राज्यात प्रवेश करण्यापासून अडवू शकते. सुईच्या डोळा म्हणजे सुईतील लहान छिद्र, ज्यातून धागा ओढला जातो. उंटासारख्या मोठ्या प्राण्याला त्यातून जाणे अशक्य आहे. उंट हे त्या काळातील सर्वात मोठे आणि भारदस्त प्राणी मानले जात होते. त्यामुळे हे रूपक अधिक प्रभावी ठरते. येशू ख्रिस्त हे सांगू इच्छितात की, देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी नम्रता, त्याग, आणि आत्मिक शुद्धता आवश्यक आहे. स्वतःसाठी संपत्ती वाईट नाही, पण ती जर माणसाच्या मनात गर्व, लोभ किंवा आत्मकेंद्रितता निर्माण करत असेल, तर ती आध्यात्मिक प्रगतीस अडथळा ठरते. देवाच्या राज्यात प्रवेश हा कृपेवर आधारित आहे, संपत्तीवर नाही.
आज प्रचंड संख्येने खिस्तीजन येशूची आराधना व भक्तीपूजा करतात, त्याच्यावर अपार प्रेम करतात, त्याला राजा व तारक मानून आपल्या हृदयात स्वीकारून आपल्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी बसवतात. परंतु त्याचे वास्तवात अनुकरण करणारे खिस्तीजन फार थोडे असतात. अनेकांसाठी येशूवर विश्वास ठेवणे म्हणजे फक्त त्याच्यावर प्रेम करणे किंवा त्याच्या बाबतीत घडलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे असा आहे. उदा. देवपुत्राने मानवी रूप धारण करून गरिबीमध्ये जन्म घेतला, मानवाच्या पापांसाठी त्याने क्रूसावर मरण पत्करले व जगाच्या शेवटी तो आपला न्याय करावयास पुन्हा येईल, इत्यादी. आपल्या विश्वासाचा हाच एक दृष्टीकोन ठेवला तर येशूने दिलेल्या महत्त्वाच्या संदेशावर आपले दुर्लक्ष होऊ शकते. एकीकडे श्रद्धावंत येशू हा देवाचा पुत्र आहे यावर ठाम विश्वास ठेवतात परंतु दुसरीकडे वैयक्तिक व स्वकेंद्रित जीवन जगतात, गरिबांच्या गरजांवर दुर्लक्ष करतात, इतर धर्माच्या किंवा जातीच्या लोकांचा द्वेष करतात, लांडीलबाडी करतात, लोकसेवा व सहकाराच्या नावाखाली भ्रष्टाचार करतात व सत्ता गाजवतात. ही सर्व जीवनातील विरोधाभासाची लक्षणे आहेत.
काही लोक जाहिररित्या ‘प्रेझ द लॉर्ड’ म्हणून किंवा गळ्यामध्ये रोझरी व क्रूस टांगून येशूवरील प्रेम व्यक्त करत असतात. परंतु येशू आमचा राजा व स्वामी आहे हे फक्त जाहीर करणे म्हणजे त्याच्यावर प्रेम करणे नव्हे. येशूवर प्रेम करणे म्हणजे त्याचे अनुकरण करणे आणि त्याचे अनुकरण करणे म्हणजे जगाशी प्रत्यक्षरित्या आपले नाते जोडणे. येशू आपल्या शिष्यांना प्रश्न करतोः “तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही?” (लुक-6:46).
येशूचे अनुकरण करणे म्हणजे त्याची वचने पाळणे व ती प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवणे. येशूचे अनुकरण करणे म्हणजे न्याय व शांतीचे जीवन जगणे. जगात न्याय असल्याशिवाय शांती असू शकत नाही. म्हणजेच न्यायासाठी झटणे म्हणजे येशूचे वचन पाळणे. येशूचे अनुकरण करणारा निराळा असतो. तो सामान्यातील असामान्य असतो. त्याचे जीवन संघर्षमय असते. त्याला अन्याय सहन होत नसतो. तो लांडीलबाडी व हिंसा करणार्यांशी हातमिळवणी करीत नसतो. येशूच्या स्फूर्तीने तो निर्भय बनतो व अन्यायाविरूद्ध तो पेटून उठतो. अशावेळी येशूवरील भक्ती व त्याची आराधना त्याने दाखवलेल्या मार्गावरून प्रवास करताना फार उपयोगी पडते, त्यातून निर्माण होणारी ऊर्जा प्रवासाला पूरक ठरते.
येशूने आपणास जगाचे परिवर्तन करण्यास पाचारण केले आहे. जे एकाकी आहेत, जे निराधार आहेत, जे बेघर आहेत, जे दुर्लक्षिलेले आहेत त्यांची सेवा करण्यासाठी येशूने आपणास आव्हान दिले आहे. येशूचे खरे शिष्यत्व ख्रिस्तमंदिराच्या चार भिंतींच्या बाहेर आपणास प्रत्ययास येते – जेथे हजारो लोक आतंकवाद्यांच्या बाँबस्फोटामुळे मृत्यूमुखी पडतात, जेथे त्सुनामी, तुफान, अतिवृष्टी, धरणीकंप, वणवा इत्यादी नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेले अभागी आणि निर्वासित लोक टाहो फोडून मदतीची हाक देतात, ती हाक येशूची असते व त्यांच्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा पीडित लोकांना मदत करण्यास धाव घेणे म्हणजेच येशूने दाखवलेल्या दिशेने मार्गक्रमण करणे होय.
आपण येशूचे फक्त चाहते आहोत की त्याचे अनुयायी आहोत हा फरक जाणणे महत्त्वाचे आहे. चाहता निष्कर्मीपणे विचार करत बसतो तर अनुयायी प्रत्यक्ष अनुकरण करतो. महात्मा गांधींचे अहिंसेचे व्रत पाळणारे आणि अमेरिकेमधील कृष्णवर्णीय लोकांवर होणार्या अन्यायाविरूद्ध लढणारे, हुतात्मा झालेले मार्टीन लुथर किंग ज्युनिअर म्हणाले होते: “आपणास जीवनमार्गावरून जाणारा ‘चांगला शोमरोन’ बनण्यासाठीच नव्हे, तर येरूसालेमहून यरिहोकडे जाणार्या रस्त्याचे परिवर्तन करण्यासाठी पाचारण केले गेले आहे. तो रस्ता लुटारूमुक्त करणे आवश्यक आहे, जेणेकरून रस्त्यावरील प्रवासी लुटले जाणार नाहीत. भिकार्यांना दान करणे ही करूणा असली तरी माणसाला भिकेला लावणारी शासनव्यवस्था बदलणे आवश्यक आहे!”
येशूने दान व न्याय या दोन्ही गोष्टींचा पुरस्कार केला. म्हणून भुकेल्या गरिबांना मोफत अन्न वाटण्यापलीकडे त्यांना उत्पन्नाची सुविधा उपलब्ध करून देणे अधिक न्याय्य ठरते. जगातील धर्मादाय संस्था दानावर अधिक भर देतात. कारण त्यामुळे गरजवंतांच्या तात्काळ गरजा भागल्या जातात व दात्यांना उपकृत होण्याची संधी प्राप्त होते. अशा धर्मादाय संस्थांची सरकारकडून प्रसंशा होते, कारण सरकारची नागरिकांप्रत असलेली जिम्मेदारी आपोआपच पार पाडली जाते. ब्राझीलमधील बिशप हेल्डर कामारा म्हणाले होते: “मी जेव्हा गरिबांना अन्न देतो तेव्हा सरकार मला संत संबोधते. परंतु ते गरीब का? असा प्रश्न केल्यास ते मला कम्युनिष्ट समजतात.” दान माणसाला संत बनवते तर न्यायासाठी आग्रह धरणा-या माणसाला क्रुसावर चढवले जाते. येशूच्या याच धर्माने त्याला क्रुसावर चढवले!
आज जगात प्रचंड प्रमाणात विविध धर्म-संप्रदाय पाळणारे आस्तिक अनुयायी आहेत. त्यात मूलतत्ववादी, उदारमतवादी, नास्तिक व अज्ञेयवादीही आहेत. या सर्व संप्रदायांतील विविध धर्मकायदे, परंपरा, नीतितत्वे, अनेक प्रकारच्या धर्मविधी व रूढी यांचा विचार करताना सर्वसामान्य माणून गोंधळून जाऊ शकतो. परंतु आपल्या दैनंदीन जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्मसहिष्णुता व न्याय ही जीवनमूल्ये सर्व भारतीयांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर भिन्नविभिन्न धर्मसंप्रदायांच्या व्यक्तींतील फरक जाणवणार नाही. खिस्तीजनांनी आपण राहात असलेल्या परिसरातील इतर जाती-धर्मीय लोकांबरोबर दुधात साखर एकरूप होते त्याप्रमाणे समाजाच्या नैतिक, आर्थिक व राजकीय जीवनशैलीत सहजरित्या समरस होणे सर्वहितकारक बनते.
परंतु केंद्र सरकारपासून ते राज्य, जिल्हा, तालुका, नगरपालिका व ग्रामपंचायत पातळीपर्यंत भ्रष्टाचार, अन्याय, नागरी हक्कांची व मानवी मूल्यांची पायमल्ली शासनाच्या नसानसात घुसली आहे. या परिस्थितीत खिस्ती म्हणून आपण मात्र बघ्याची भूमिका घ्यायची का? भारतीय राजघटनेने प्रत्येक नागरिकाला धर्मस्वातंत्र्य दिले असले तरी अलिकडे अनेक सनातनी व हिंदुत्ववादी धर्मांध संघटनांनी धर्मविद्वेष व आकस यापोटी अल्पसंख्यांकावर अत्याचार करण्याचा विडा उचलला आहे. गेल्या काही वर्षांत कट्टर धर्मांध व जात्यंध संघटनांद्वारे आदिवासी, मुस्लिम व खिस्ती बंधूंवर प्राणघातक हल्ले झाले व होत आहेत. अशा वेळेला यरिहोच्या रस्त्यावर लुटारूंनी अर्धमेला केलेल्या पथिकाकडे याजकासारखे आपण दुस-या बाजूला पाहून निघून जावे की शोमरोनसारखे त्याची मलमपट्टी करावी, की मार्टीन लुथर किंग सुचवितात त्याप्रमाणे यारोहोचा रस्ता लुटारूमुक्त करावा?
येशूने दाखविलेला मार्ग हा एक प्रवास आहे. प्रवासामध्ये आपण पुढे जात असतो, त्यात आपण स्थितप्रज्ञ नसतो, त्यात नवीन काहीतरी घडत असते. येशूने स्थापन केलेल्या खिस्तसभेचा प्रवास दोन हजार वर्षे पुढे आलेला आहे. गतकाळात इतिहास घडला. जसा तेव्हाच्या व आजच्या जीवनशैलीमध्ये बदल झाला तसा खिस्तसभेच्या प्रवासातसुद्धा बरेच बदल झाले व होत आहेत. सत्य शोधण्याच्या प्रक्रियेत सुदृढ ख्रिस्तसभेने भाविकांना सतत प्रश्न विचारले पाहिजेत आणि तसेच शंका विचारणाऱ्यांचे स्वागत केले पाहिजे. यामुळे सर्व संबंधितांच्या ज्ञानात भर पडून जीवनाचे रहस्य उलघडण्यास मदत होते. माणसाची विवेकबुद्धी बळकट करण्यासाठी सदर प्रक्रिया महत्त्वाची असते. प्रश्न विचारणाऱ्या थोर पंडितांनी उपस्थित केलेल्या शंकांमुळेच आज मानवी ज्ञानामध्ये प्रचंड भर पडून त्यांची प्रगती होत आहे.
संत पोप जॉन तेविसावे यांनी १९६२ मध्ये व्हॅटिकन येथे सुरू केलेली दुसरी व्हॅटिकन विश्वपरिषद पोप पॉल सहावे यांच्या कारकिर्दीत १९६५ मध्ये संपन्न झाली. परिषदेमध्ये धर्मपिठाने पारित केलेले सुधारित कायद्यांद्वारे जागतिक कॅथलिक ख्रिस्तसभेला नवीन दिशा मिळाली. पुढील २६ वर्षे महान पोप संत जॉन पॉल द्वितीय यांनी ख्रिस्तसभेचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख केला. दि. १३ मार्च २०१३ रोजी कॅथलिक ख्रिस्तसभेचे परमगुरूस्वामी म्हणून निवडून आलेले पोप फ्रान्सिस यांनी कॅथलिक बिशपांच्या सर्वसामान्य वैश्विक धर्मपरिषदेच्या तयारीसाठी सप्टेंबर २०२१ मध्ये जागतिक स्तरावर जागृतता मोहीम आरंभिली आणि ती २९ ऑक्टोबर २०२३ रोजी व्हॅटिकन येथे संपन्न झाली. या धर्मसभेचा विषय होता – ‘एकमेव सिनोडल ख्रिस्तसभेच्या जीवनातील सहप्रवासासाठी सहभागिता, सहभाग आणि मिशन’. सदर धर्मपरिषदेद्वारे पोप महाशय ख्रिस्तसभेच्या उगमापासून संपूर्ण परमेश्वर प्रजेचा समावेश असलेल्या एकत्रित जीवनयात्रेला नवीन चालना देण्याचा प्रयत्न करीत आहेत!