चिंतन
सत्य काय आहे? ते जे आहे ते आहे.
— सबिना थॉमस फोस (चर्च-वॉर्ड,गास)
मोबाईल : 84469 01602
जगण्याचा खरा आधार कोणता आहे ? आज नावाचे सत्य की उद्या नावाची आशा ? ह्या दोघांपैकी भिस्त कशावर ठेवावी आणि राहिलेल्याला किती महत्व द्यावे ? ह्या दोन्ही गोष्टींना सांधणारा पूल नेमका कोणता ? तो कशाने बनतो ? काल नावाच्या अनुभवाने की आणखी कशाने ?
काल व उद्या हे दोन्हीही ह्या क्षणी अस्तित्वात नाहीत. ह्या क्षणी अस्तित्वात आहे, ती फक्त आज म्हटलेली वेळ. आणि ते आहे म्हणून ते सत्य आहे. कारण सत्यस्वरूप देवच म्हणतो की ‘मी जो आहे तो आहे’ त्यामुळे आज ह्या सत्याची कास सोडून चालणार नाहीच, परंतु उद्या नावाच्या आशेचीही साथ सोडून चालणार नाही. कारण माणसाला जीवन प्रवासात पुढे-पुढे घेऊन जाणारी दोरीच असते ही आशा म्हणजे. माणूस स्वप्ने पाहतो, पुढच्या योजना आखतो, आज अस्तित्वात नसलेल्या व पुढे अस्तित्वात येऊ शकतात अशा गोष्टींचा विचार करतो म्हणून जग सुरू आहे. किंबहुना तो विचार करत राहतो, शोधत राहतो म्हणून त्याला सापडते, त्याला नवनवे शोध रोज लागतात.
आदीमानवाला दगडी हत्यारांचा शोध लागला म्हणून तो पोट भरू शकला व त्यामुळे जगला. त्याला चाकाचा शोध लागला म्हणून तो स्वतःचा विभाग सोडून इतर टोळ्यांच्या विभागात जाऊन त्यांच्या जगण्याची माहीती, नवे ज्ञान मिळवू शकला. त्याने आणखी विचार केला, आणखी स्वप्ने पाहिली म्हणून त्याने बनवलेल्या मुळ वाहनात सुधारणा होत गेल्या म्हणून तो दुसऱ्या गावांत, शहरांत व राज्यात जाऊ शकला. त्याने आणखी स्वप्ने पाहण्याचे सोडले नाही म्हणून तो समुद्र, आकाश व अवकाशातूनही प्रवास करू शकला.
ह्या सर्व सुविधांच्या योगाने माणूस स्वतःच्या जीवनाची खूप मोठी प्रगती साधू शकला; आणि ही शक्यता अजूनही संपलेली नाही. म्हणून माणूस स्वप्ने जरी उद्याची पाहत असला तरी स्वप्ने पाहण्याची क्रिया व ती पुरी होण्याची शक्यता ह्या दोन्ही गोष्टी मात्र आज अस्तित्वात आहेत; त्यामुळे त्या सत्यच मानाव्या लागतील. आणि काल नावाचा अनुभव आज अस्तित्वात नसला तरी त्याच्या स्मृती मनात अस्तित्वात आहेत. त्यामुळे ह्या स्मृती सत्य आहेत.
थोडक्यात कालच्या अनुभवाची स्मृती, आज आता येत असलेल्या अनुभवाची जाणीव, आजची स्वप्न पाहण्याची क्रिया आणि उद्या ती पुर्ण होण्याची शक्यता घ्या सर्व गोष्टी आज अस्तित्वात असून त्या सत्य आहेत. त्यामुळे त्या सर्व गोष्टी सोबत घेऊनच रोज जीवन जगणे योग्य. हेच जगण्याच्या आधाराचे चार पाये. फक्त ह्या सर्वांमधील सत्याचे योग्य प्रकारे पृथक्करण करून त्यातून सकारात्मक सत्य व नकारात्मक सत्य वेगळे काढून हे चार पाये मजबूत करता यायला हवेत.