संपादकीय …

संपादकीय …

प्रिय बंधुभगिनींनो, आपणास नाताळ सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.

दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा साहित्यिक मेजवानी घेऊन आम्ही आपणापाशी आलो आहोत. मी नेहमी म्हणतो, आम्हा ख्रिस्ती धर्मीयांचा एकमेव सण म्हणजे नाताळचा सण. डिसेंबर महिन्यात एकदा आगमनकाळाला सुरुवात झाली की ख्रिस्ती घरामध्ये एक वेगळाच माहोल तयार होतो आणि त्याच उत्साहाने प्रेरित होऊन आम्ही तयारीला लागतो. मी प्रत्येक वर्षी संपादकीयामध्ये आवर्जून उल्लेख करतो आणि करत राहीन की दिवाळी सण आणि दिवाळी अंक हे जसे अतूट नाते आहे तसेच नाताळ सण व नाताळ अंक यांचे नाते व्हावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते आम्ही २२ वर्षाअगोदर प्रथम छापील स्वरुपात अंक प्रकाशित करून प्रत्यक्षात आणि गेली चौदा वर्षे हा अंक ऑनलाइन प्रकाशित करून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.

         मंडळी, आज हे संपादकीय लिहित असताना विशेष स्मरण करतोय ते म्हणजे फा. फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांचे. २५ जुलै २०२४ रोजी त्यांचे निधन झाले. माझ्यावर त्यांचा विशेष लोभ होता. त्यांना श्रद्धांजली वाहणारा वेगळा लेख या अंकात आहेच. पण त्यांची आठवण करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्येक वर्षी फा. दिब्रिटो ह्यांचे फक्त लेखच मिळत नाही तर मार्गदर्शनपर आशीर्वाद मिळत होते. यावर्षी आणि यापुढेही त्यांच्या उणीव नेहमी भासत राहील.

         दरवर्षी वसई परिसरातले ज्येष्ठ लेखक- कवी ह्यांचा सहभाग या अंकात मला लाभतोच पण वसईबाहेरीलही साहित्यिक या उपक्रमात मनमोकळेपणाने सामील होत असतात. मी ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला अंकाच्या तयारीला लागलो की सर्वप्रथम माझ्याकडे असलेल्या लिस्टमधील सर्व लेखक-कवी-चित्रकार ह्यांना मेसेज करतो. मग लेख-कविता चित्रे यायला सुरुवात होते. पण काही व्यक्तींचा मला प्रकर्षाने उल्लेख करावा वाटतोय, कारण त्यांचे फक्त लेखच येत नाहीत तर मार्गदर्शनपर सूचनाही येत असतात.  असेच कायम प्रोत्साहन मिळत असते ते म्हणजे ज्येष्ठ लेखिका

डॉ.अनुपमा निरंजन उजगरे, ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ कवी सायमन मार्टिन, फा. (डॉ.) रॉबर्ट डिसोजा, प्रथितयश कवी वर्जेश सोलंकी, महेश लीलापंडित, माझ्यावर मोठ्या बहिणीप्रमाणे मार्गदर्शन आणि प्रेम करणार्‍या डॉ. नेहा सावंत, मी ज्यांना कुपारी पू. लं. म्हणतो ते मित्रवर्य सॅबी परेरा, प्रथितयश तरुण कविद्वय व जवळचे मित्र झालेले डॉ. फेलिक्स डिसोझा व इग्नेशियस डायस, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे, पत्रकार सुहास बिऱ्हाडे, वैष्णवी राऊत ह्या सर्वांचे सतत मार्गदर्शन आणि मोलाच्या सूचना मिळत असतात, त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून ते नेहमी माझ्यासाठी वेळ काढतात, त्यामुळे मी सतत त्यांच्या ऋणात राहू इच्छितो.

       या अंकाची अनुक्रमणिका बगितली तर तुमच्या लक्षात येईल की अनेक मान्यवर लेखक-कवी आणि चित्रकार ह्यांचा समावेश आहे. ह्या सर्वांना दरवर्षी मी देत असलेल्या त्रासाला न वैतागता व मानधनाची अपेक्षा न करता फक्त साहित्यिक चळवळ म्हणून ते कुटुंबिय म्हणून माझ्या सोबत असतात. या सर्वांना माझे मन:पूर्वक धन्यवाद.

         मंडळी, गेली तेरा वर्षे लेस्ली से. डायस हे ‘गीत’ हा नाताळ अंक नियमितपणे प्रकाशित करत आहेत. ‘खिस्तायन’ ऑनलाईन व ‘गीत’ छापील अंक हे नाताळ अंक यावर्षी आम्ही त्याविषयी माहिती अंकात दिली आहे. एक विशेष बाब म्हणजे गेली ८-१० वर्षे आपल्या या अंकाचे मुखपृष्ठ बनवून देणारे चित्रकार ‘पॉल डिमेलो, गास’ ह्यांचे गेल्याच महिन्यात वसईतील स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रांचे प्रदर्शन ख्यानाम अशा जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये संपन्न झाले. पॉल हे एक सत्कृत्य म्हणून विनामोबदला मुखपृष्ठ बनवून देत आहेत, त्यांचे खास आभार.

         मंडळी, आम्ही हा अंक ‘पीडीएफ’ स्वरुपात देत आहोत, त्यामुळे आपणास अंक वाचण्यासाठी पूर्ण वेळ ऑनलाइन असण्याची गरज नाही. त्याचबरोबर या अंकाचे अँड्रॉईड अ‍ॅपही आहे. प्ले स्टोअर वरुन आपण हा अंक डाऊनलोड करून नंतर आपल्या सोयीप्रमाणे अगदी मोबाईलवरही वाचू शकता. आपण हा अंक वाचल्यानंतर इतरांनाही कळवा.. आणि आपल्या सूचना आणि अभिप्रायांची देखील आम्ही वाट पाहत आहोत.

नाताळ सणाच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Merry Christmas & Happy New Year