संपादकीय …
प्रिय बंधुभगिनींनो, आपणास नाताळ सणाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा.
दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा साहित्यिक मेजवानी घेऊन आम्ही आपणापाशी आलो आहोत. मी नेहमी म्हणतो, आम्हा ख्रिस्ती धर्मीयांचा एकमेव सण म्हणजे नाताळचा सण. डिसेंबर महिन्यात एकदा आगमनकाळाला सुरुवात झाली की ख्रिस्ती घरामध्ये एक वेगळाच माहोल तयार होतो आणि त्याच उत्साहाने प्रेरित होऊन आम्ही तयारीला लागतो. मी प्रत्येक वर्षी संपादकीयामध्ये आवर्जून उल्लेख करतो आणि करत राहीन की दिवाळी सण आणि दिवाळी अंक हे जसे अतूट नाते आहे तसेच नाताळ सण व नाताळ अंक यांचे नाते व्हावे असे आमचे स्वप्न आहे आणि ते आम्ही २३ वर्षाअगोदर प्रथम छापील स्वरुपात अंक प्रकाशित करून प्रत्यक्षात आणि गेली पंधरा वर्षे हा अंक ऑनलाइन प्रकाशित करून ते पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत.
मंडळी, दरवर्षी वसई परिसरातले ज्येष्ठ लेखक- कवी ह्यांचा सहभाग या अंकात मला लाभतोच पण वसईबाहेरीलही साहित्यिक या उपक्रमात मनमोकळेपणाने सामील होत असतात. मी ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला अंकाच्या तयारीला लागलो की सर्वप्रथम माझ्याकडे असलेल्या लिस्टमधील सर्व लेखक-कवी-चित्रकार ह्यांना मेसेज करतो. मग लेख-कविता चित्रे यायला सुरुवात होते. पण काही व्यक्तींना माझ्या मनात विशेष स्थान आहेच आणि ते शेवटपर्यंत राहील, यावर्षी मी सर्वांची नावे इथे घेत नाहीय. पण त्यांचे हृदयातील स्थान नेहमीच अबाधित राहील. कारण त्यांचे फक्त लेखच येत नाहीत तर मार्गदर्शनपर सूचनाही येत असतात आणि कायम प्रोत्साहन मिळत असते, विशेष सांगायचे म्हणजे ह्यातील प्रत्येक जण साहित्यिक क्षेत्रात फक्त नावाजलेलच नाही तर आपले स्वत:चे असे खास स्थान निर्माण केलेले आहे.
ह्या माझ्या हितचिंतकांत फक्त वडीलधारी माणसेच नाहीत तर सर्व प्रकारच्या व्यक्ती आहेत. मी सदैव त्यांच्या त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. अंकातील लेखांविषयी मौलिक मार्गदर्शन करत सतत पाठीवर कौतुकाची थाप देणारे दिवंगत फा. फ्रान्सिस दिब्रिटो, साहित्यिक संपादनाचे बाळकडू पाजणारे फा. एलायस रॉड्रिग्ज, मला वाचनाची आवड निर्माण करणारे मामाकडील आजोबा ज्येष्ठ साहित्यिक सी. बी. दोडती, मला लिखाण
करण्यास ऊद्युक्त करणारे मामा मिल्टन दोडती, सामाजिक क्षेत्रातील आदर्श विजय मच्याडो व स्वत: अशिक्षित असूनही मी या अंकाची तयारी करायला बसलो की जागेवर सर्व आणून देणारी माझी आई, मर्सी ह्या सर्वांची विशेष आठवण करू इच्छितो. ह्या सर्वांबरोबर त्यांच्या उपस्थितीत काही न काही गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. त्या गोष्टी मी नक्कीच पूर्ण करायचा भविष्यात प्रयत्न करणार आहे. तीच माझी त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल.
मंडळी, मला दरवर्षी आपल्या मौलिक सूचना येत असतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दरवर्षी प्रकर्षाने येणारी सूचना म्हणजे छापील अंक. सध्याचा जमाना सोशल मीडिया आणि सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा असल्यामुळे ते शक्य होईल असे वाटत नाही. तरीसुद्धा पुढे यासाठी नक्कीच प्रयत्न करेन.
या अंकात सहभागी सर्व मान्यवर लेखककवी व चित्रकार यांचे मी विशेष आभार मानतो. दरवर्षी अंकाच्या तयारीला सुरुवात केली की व्हॉटसअप / फेसबुक मेसेजद्वारे मी त्यांना स्मरण करत त्रास देत असतो परंतु मला कोणाकडूनही आजपर्यंत नकार मिळाला नाही आहे. हे जे ऋणानुबंध जुळले आहेत हे असेच टिकून राहावे किंबहुना अधिक घट्ट व्हावेत अशीच मी प्रार्थना करेन. गेली चौदा वर्षे लेस्ली से. डायस हे ‘गीत’ हा छापील नाताळ अंक नियमितपणे प्रकाशित करत आहेत. सध्या विशेषांक सोडले तर फक्त नाताळ निमित्ताने प्रकाशित होणारे वसईतील ‘खिस्तायन’ ऑनलाईन व ‘गीत’ छापील हे फक्त दोनच नाताळ अंक आहेत.
गेली ८-१० वर्षे आपल्या या अंकाचे मुखपृष्ठ बनवून देणारे चित्रकार ‘पॉल डिमेलो, गास’ ह्यांना विशेष धन्यवाद. पॉल हे एक सत्कृत्य म्हणून विनामोबदला मुखपृष्ठ बनवून देत आहेत, त्यांचे खास आभार.
मंडळी, आम्ही हा अंक ‘पीडीएफ’ स्वरुपात देत आहोत, त्यामुळे आपणास अंक वाचण्यासाठी पूर्ण वेळ ऑनलाइन असण्याची गरज नाही. त्याचबरोबर या अंकाचे अँड्रॉईड अॅपही आहे. प्ले स्टोअर वरुन आपण हा अंक डाऊनलोड करून नंतर आपल्या सोयीप्रमाणे अगदी मोबाईलवरही वाचू शकता. आपण हा अंक वाचल्यानंतर इतरांनाही कळवा.. आणि आपल्या सूचना आणि अभिप्रायांची देखील आम्ही वाट पाहत आहोत.
नाताळ सणाच्या व नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
Merry Christmas & Happy New Year