शारद सुंदर चंदेरी राती…
- सौ. सुनिता बर्नड परेरा, गास
दहावीचा निकाल लागला, अंजूला ९७% मिळाले. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून ती प्रथम आली होती. तर अलकाला ७२% मिळाले. अंजू आणि अलका लहानपणापासून अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी ! दोघींचे एकमेकींवर खूप प्रेम होते. अगदी खेळापासून अभ्यास करण्यापर्यंत ! अंजूची घरची परिस्थिती बेताची होती, तिचे आईवडील शेतात राबायचे. हातावर कमावून पानावर खायचे, अशी बिकट परिस्थिती ! पण अंजू खूप हुशार व मेहनती होती. तिने पहिला नंबर कधी सोडला नाही. याउलट अलका अतिशय चंचल, खोडकर आणि गर्विष्ठ होती. तिचे वडील गावातील सुप्रसिद्ध उद्योगपती होते. ते स्वतः शाळेचे आणि कॉलेजचे विश्वस्त होते. गावात त्यांचा दरारा होता.
अलका त्यांची एकुलती एक कन्या, त्यामुळे ती खूप लाडवलेली होती. ती कोणाबरोबर मिसळत नसे. फक्त अंजू तिची खास मैत्रीण होती. अंजू नेहमी अलकाच्या घरी येत असे. अलकाचे आईवडील अंजूवर सुद्धा खूप प्रेम करत असत. अंजूला विज्ञानात खूप रस होता, त्यामुळे तिने सायन्स शाखेत प्रवेश घेतला. M.sc करून तिला प्रोफेसर व्हायचे होते. अंजू सायन्स शाखेत गेली म्हणून अलकाने देखील तिथेच प्रवेश घेतला. दोघी मैत्रिणी एकत्र कॉलेज मध्ये जाऊ लागल्या.
ऐन पावसाळ्याचे दिवस होते, कॉलेज सुरू होऊन महिनाभर झाला होता. आज अंजूचे प्रॅक्टिकल होते त्यामुळे ती थांबली होती. अलका घरी निघून गेली होती. प्रॅक्टिकल संपले आणि सगळी मुले निघून गेली. थोड्या वेळाने अंजू देखील स्टॉपवर आली, अचानक जोरदार पाऊस सुरू झाला होता. अंजू छत्री शोधू लागली, पण दुर्दैव ! आज घाई गडबडीत ती छत्री विसरली होती. एका झाडाचा आडोसा घेऊन ती अंग चोरून उभी होती.
अचानक एक तरुण तिच्या समोर आला. “May I help you? तुझ्याकडे बहुतेक छत्री नाहीय, म्हणून तू भिजत आहेस, हरकत नसेल तर तू माझ्या छत्रीत येऊ शकतेस !” त्याच्या बोलण्याने अंजू किंचित बावरली. पण पर्याय नव्हता, त्यामुळे ती त्याच्या छत्रीत उभी राहिली. अंजूचा गोरापान रंग, भिजलेले लांबसडक केस तिच्या लावण्यात अधिक भर घालत होते. तिचे देखणे रूप अधिक खुलून आले होते. त्या तरुणाने स्वतःची ओळख करून देत म्हटले, “मी ब्रायन… बारावीला आहे. तुझे नाव काय?” अंजू थोडी घाबरली होती. एका अपरिचित तरुणासोबत ती एकाच छत्रीत उभी होती, त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. पण तिने मनात देवाचा धावा करून स्वतःचे नाव सांगितले.
ब्रायनने ओळखले होते की अंजू बावरली आहे. त्यामुळे वातावरण हलके फुलके करण्यासाठी तो तिच्याशी कॉलेज संदर्भात गप्पा मारू लागला. पण ब्रायन अंजूचे रूप बघून घायाळ झाला होता. छत्री छोटी असल्यामुळे मधून मधून अंजुचा स्पर्श होत होता. प्रत्येक स्पर्शागणिक त्याच्या मनाची हुरहूर वाढत होती. तो स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता. ब्रायन अंजूच्या प्रेमात पडला होता. बस लवकर येऊच नये असे त्याला मनोमन वाटत होते. अंजूचा सहवास त्याला आवडला होता. अंजू मात्र मनातून खूप घाबरलेली होती, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात मात्र गुदगूल्या होत होत्या. आजपर्यंत अशी स्थिती कधीच झाली नव्हती, आपण भले की आपला अभ्यास भला ! या समीकरणात जखडून ठेवणाऱ्या अंजूला आज मात्र ब्रायन खूप आवडला. इतक्यात बस आली, अंजूने एक प्रेमळ कटाक्ष टाकला आणि ती ब्रायनचे आभार मानून निघून गेली.
दूर चहाच्या टपरीवर लावलेल्या रेडिओवरून ‘आज प्रीतीला पंख हे लाभले रे, झेप घेऊनी पाखरू चालले रे’ ह्या मंदधुंद प्रणयगीताचे स्वर ब्रायनच्या कानावर पडले आणि तो देहभान विसरून अंजूच्या आठवणीत गुंतला. ब्रायन, एक अतिशय हुशार, प्रामाणिक आणि मेहनती मुलगा. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपलेल्या ब्रायनची घराची स्थिती खूप गरीब होती. आई शिवणकाम करून त्याला शिक्षण देत होती.
बारावीनंतर मेडिकलला जाऊन डॉक्टर बनायचे स्वप्नं त्याने उरी बाळगले होते. त्यादृष्टीने तो दिवसरात्र मेहनत करत होता. संध्याकाळी लेक्चर संपल्यावर तो जास्तीचा अभ्यास करण्यासाठी कॉलेज मध्येच थांबत असे. सर्व शिक्षक त्याला अभ्यासासाठी विशेष सहाय्य करत असत. असा हा अभ्यासू मुलगा आज चक्क अंजूच्या प्रेमात वेडा झाला होता. अंजूच्या हृदयातील भावना त्याने तिच्या डोळ्यात वाचल्या होत्या. तो घरी परतला खरा, पण अंजूचे ते निरागस देखणे लावण्य त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हते.
अंजूची सुध्दा हीच परिस्थिती झाली होती. ब्रायनचे राजबिंडे रूप तिला खूप आवडले होते. रात्रभर दोघांची अबोल प्रीतवेल बहरत होती.
अंजू आणि ब्रायनचे प्रेम खूप पुढे गेले होते. कॉलेज मध्ये त्यांच्या प्रेमाची कळी हळूहळू उमलत होती. नजरानजर होत होती, दोन ह्रदये धडकत होती. चोरटा कटाक्ष बघून घायाळ होणारे हे दोन मने प्रत्यक्ष भेटू लागली. किशोरवयात चोरून भेटण्यातील आनंद वेगळाच असतो, त्यात दोन प्रेमात पडलेली आणि स्पर्शासाठी आतूरलेली मने असतील तर स्वर्गीय आनंद ! ब्रायन आणि अंजू ह्यांच्या प्रीतीला प्रणयाचे पंख लाभले होते.
एकदा त्यांच्या कॉलेजची बायोलॉजी विभागाची ”जंगल भेट“ सहल गेली होती. अलका कॉम्प्युटर सायन्सला असल्यामुळे ती ह्या जंगल भेटीला आली नव्हती, त्यामुळे अंजू तिच्या इतर मैत्रिणीसोबत गेली होती. ब्रायनदेखील ह्या सहलीला आला होता. प्रोफेसर वेगवेगळी फुले, पाने, झाडे त्यांची वैशिष्टे दाखवत होते, अशावेळी ब्रायन आणि अंजू मात्र त्या फुलांमध्ये प्रेमाचा सुगंध अनुभवत होते. रात्रीच्या चांदण्याच्या मैफिलीत शेकोटी नृत्य करताना ब्रायनने तिच्या कमरेभोवती विळखा घालून घट्ट मिठी मारली, त्याक्षणी अंजू अक्षरशः वेडीपिशी झाली. दोघेही उत्तेजित झाले होते. त्याच आवेगात ब्रायनने अंजूच्या कपाळावर एक दीर्घ चुंबन घेतले. दोघेही परस्परांच्या मिठीत साखरेसारखी विरघळली. शेकोटीपाशी कोणीतरी गुणगुणत होते, ”शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नाचा झुलव झुला, थंड ह्या हवेत घेऊन कवेत साजन झुलव मला…”
जंगल भेट त्यांच्या साठी एक यादगार प्रेमसफर झाली होती. ह्याच भेटीचा सुगंध अनुभवत दोघेही आपापल्या अभ्यासात गुंग झाले. एके दिवशी नेहमीप्रमाणे अंजू अलकाच्या घरी गेली होती. अलका आंघोळीला गेली होती, त्यामुळे सहज अंजू अलकाची वही चाळत होती. अचानक तिला त्या वहीत ब्रायनचा फोटो दिसला, त्या फोटो खाली अलकाने ब्रायनवरील तिची प्रेमाची भावना शब्दातीत केली होती. दुसऱ्याचे पत्र कधीही चोरून वाचू नये, ही समज असणारी अंजू मात्र ब्रायनचे नाव पाहताक्षणी हादरून गेली. तिने भराभर ते पत्र वाचले आणि तिच्या घशाला कोरड पडली. अलकाच्या भावना समजल्यावर तिच्या हृदयाच्या चिंधड्या उडाल्या, क्षणभर तिला गरगरले आणि ती वही तशीच बंद करून जागेवर बसली. इतक्यात अलका आली, आज ती खूप खुश दिसत होती. तिने अंजूला घट्ट मिठीत घेतले आणि ती म्हणाली, “अंजू, I am in love… I love Brayan…. I love him so much dear…”
अंजू निःशब्द ! चेहऱ्यावर बळेच हसू आणण्याचा ती केविलवाणा प्रयत्न करत होती. अतीव दुःख झाले होते तिला, त्याच क्षणी ती घरी परतली, ब्रायनला हे माहित असेल का ? त्याला कळले तर त्याची काय स्थिती होईल ? माझी जीवाभावाची मैत्रिण माझ्या प्रियकरावर खूप प्रेम करते ! तिला आमच्या प्रेमाची कल्पना नसेल का ? नाना प्रश्न तिच्या मनात रुंजी घालत होते. ब्रायनची बारावीची परीक्षा सुरू होती, उद्या त्याचा शेवटचा पेपर होता. उद्या बोलूया का त्याच्याशी ? असंख्य प्रश्न आ वासून तिच्या समोर उभे होते.
ब्रायनची परीक्षा संपली, तो आणि अंजू आज भेटणार होते. किती तरी वेळ तो तिची वाट बघत होता. पण ती आलीच नाही. थोड्या वेळाने तो घरी आला तेव्हा अलका त्याचीच वाट पाहत होती. तो येताच अलकाने त्याला मिठी मारली व आपले प्रेम व्यक्त केले, तो आश्चर्यचकित झाला. काय बोलावे तेच त्याला कळेना. तो गप्प राहिला. हळूहळू अंजू त्याला टाळू लागली. त्याच्या लक्षात आले की अलकामुळे अंजू आपल्याला टाळत आहे. त्याने अंजूला समजावण्याचा प्रयत्न केला. पण अंजूला अलकाचा हट्टी स्वभाव माहित होता. तिला जे हवे ते ती मिळवतेच ! त्यामुळे ती पुढील शिक्षणासाठी मुंबईला मावशीकडे निघून गेली.
ब्रायन बारावीला उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला. त्याला पुण्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. पण बेताची परिस्थिती असल्यामुळे फी भरणे त्याला परवडत नसल्याने डॉक्टर होण्याचे स्वप्नं भंगते की काय ? असा प्रश्न उभा राहिला. ह्याच गोष्टीचा फायदा अलकाच्या धूर्त व्यावसायिक वडिलांनी घेतला. त्याने ब्रायनला पैशाच्या जोरावर विकत घेतले, तो ही पैसे आणि दहशतीपुढे हतबल झाला. त्याने अलकाच्या एकतर्फी प्रेमाचा स्वीकार केला व शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याला गेला. इथे अलकाने अभ्यासाकडे साफ दुर्लक्ष केले, त्यामुळे ती बारावीत जेमतेम पास झाली, पुढे तिने शिक्षण सोडून वडिलांच्या कामात मदत करू लागली.
अंजूने मात्र M.Sc करून कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर संशोधन केले आणि डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. ब्रायन डॉक्टर झाला व तो अलकाशी लग्न करून परदेशी रवाना झाला. अंजू आणि ब्रायन ह्यांच्या प्रेमाचा अध्याय कायमचा मिटला गेला. प्रेमाचे फुल उमलण्याआधीच कोमेजले होते. त्यांच्या प्रीतीचे पंख मैत्रीच्या हट्टामुळे कापले गेले.
काळ सरकला… अंजू शिक्षणाच्या जोरावर खूप पुढे गेली, तिला मुंबई युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदावर बढती मिळाली. अनेक ठिकाणी तिची व्याख्याने गाजू लागली. वयाची पन्नाशी जवळ आलेली अंजू अजूनही अविवाहित होती. केवळ ब्रायनच्या आठवणींवर ती जगत होती. आणि अचानक तो परत तिच्या आयुष्यात आला.
पार्ल्याला तिचे व्याख्यान होते, त्या ठिकाणी परत दोघांची भेट झाली. वयानुसार थोडासा पोक्त वाटत होता, पण रूप तेच होते. अंजू मात्र अजूनही वयाच्या मानाने तरुण दिसत होती. गर्दीत ब्रायनने तिला साद घातली, पण तिने मात्र त्याला टाळले. तेव्हा मात्र तो पुढे आला व तिचा हात हातात घेतला. तिला काही सुचेना. तेव्हा ब्रायन तिला म्हणाला, ”अगं तुझी मैत्रीण हट्टी होती, त्यामुळे तू तुझे मन दाबून आपल्या प्रेमाचा त्याग केलास. आणि मी परिस्थितीपुढे हतबल होतो. पण अलकाने आपल्या प्रेमाचा गळा दाबून स्वतः कधीच सुखी झाली नाही. लग्नानंतर काही वर्षातच कॅन्सरने तिला गाठले, खूप उपचार केले, पण ती जगू शकली नाही. तिच्या स्वार्थी हट्टापायी आपल्या तिघांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली.” अंजूला गलबलून आले. तिने ब्रायनला मिठीत घेतले.
ब्रायनने तिला विचारले, “अंजू ,येशील का माझ्या आयुष्यात परत ? मी अजूनही फक्त तुझाच आहे“ अंजूने मानेनेच होकार दिला. दोघेही परत एकमेकांच्या मिठीत साखरेसारखे विरघळले. दूरवर कुठेतरी गाणे वाजत होते… ”शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नाचा झुलव झुला, थंड ह्या हवेत घेऊन कवेत साजान झुलव मला…“