“विचार विचार करण्यासाठी….” – झेविअर डिमेलो

विचार विचार करण्यासाठी….”

  •  झेविअर डिमेलो, वसई

उरला अंधार…

सुर्य मावळतीला गेला होता. वातावरण संधिप्रकाशानं न्हाऊन निघालं होतं. दिवसभर हुंदडून आलेले पक्षी झाडावर बसले होते. त्यांचा कलकलाट, चिवचिवाट सुरू होता. दिवसभरात घडलेल्या गोष्टी ते एकमेकांना सांगत असावेत. आनंद साजरा केल्यानं वाढतो आणि दुःख सांगितल्यामुळं कमी होतं, हे त्या पक्ष्यांचा ठाऊक असावं. आणि अचानक कसलासा आवा​​ज आला. झाडावरून एक पक्षी (पक्ष्याचं बाळ  असेल ते) खाली जमिनीवर पडला. पक्ष्यांचा कलकलाट आणखी वाढला. काही पक्षी खाली येऊन त्या पक्ष्याला पाहून गेले. काही हवेत उडत होते. हे असं बराच वेळ सुरू होतं.

आता संधिप्रकाशाला अंधार घेरू लागला. हळूहळू झाडावरील पक्षी  आपापल्या घरट्याकडे निघून गेले. मागे उरले फक्त दोन पक्षी. नुकताच पाऊस पडून गेला होता. ओल्या गवतातील रातकिड्यांची किरकिर सुरू झाली. थांबणं शक्य नव्हतं म्हणून ते मायबाप पक्षीही अंधारातून वाट काढत उडून गेले. जमिनीवर पक्ष्याची, पिल्लाची फडफड सुरू होती. त्याच्या सोबतीला उरला होता अंधार आणि त्याचं अनिश्चित भविष्य.

कठीण समय येता कामास कोण येती?

नाती, गोती, प्रीती सोडून सर्व जाती..

माणसालाही हा अनुभव कधीतरी येतो.

Life is a crazy ride; nobody knows what is going to happen the next moment.

जीणं सदाफुलीचं 

दवात भिजल्या पहाटे सदाफुलीचं एक झाड दुसऱ्या झाडाला आपल्या व्यथा सांगत होतं…..

“कसलं मेलं हे जीणं.  सदा, नेहमी आपलं फुलायचं, एवढंच आपलं काम. रात्र, दिवस, उन्हं, थंडी, पाऊस… कधीही फुललेलं असायचं. नाही झोप, नाही विश्रांती, सदा जागलेपण. इतर झाडांवर फुलं कशी कधी तरी, केव्हातरी उगवतात. त्यांचं सुख आपल्या वाट्याला नाही. इतर फुलं कशी गजरे, वेण्या, हार, पुष्पगच्छ यांमध्ये असतात. कोठे, कोठे फिरतात, मिरवतात ती. तो आनंद आपल्या फुलांना नाही मिळत..

दुसऱ्या झाडांचे लाड तरी किती ? त्यांना मिळते भरपूर पाणी आणि अन्न. आपल्याला अंगणातील बागेत जागा मिळालीच तर ती कोठेतरी कोपऱ्यातील असते. नाहीतर आपण परसदारी किंवा कोठेही उगवतो. कुपोषित आणि आपण, फरक तसा काही नसतो. मात्र आपण खूप वाढलो तर आपल्याला उपटून काढून फेकून दिलं जातं. आपली पानं असतात कडू. म्हणून  पक्षी, कीटक आपल्याकडे फिरकत नाहीत. उराउरी भेटण्याचं ते सुखही आपल्या वाट्याला नसावं का? कोणाला कसं सांगावं की आम्ही कडू असलो तरी अंतर्यामी गोड आहोत आणि आमच्या मुळांमध्ये  औषधी गुणधर्म आहेत? 

रवींद्रनाथ टागोर यांच्या गीता मधले शब्द आठवतात…

आपल्यासाठी नसले कुणीही आपण तरी आहोत सर्वांसाठी

तक्रार नाही आपली काही

फक्त बळ मिळो आपल्याला जगण्यासाठी, 

फक्त बळ मिळो आपल्याला जगण्यासाठी.

स्वार्थी माणूस

फुलांच्या असतात अनेक जाती, माणसामाणसामध्ये असतात तशा. फुलांचा धर्म मात्र एकच असतो, तो म्हणजे सर्वांना आनंद देण्याचा. “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या ब्रीदवाक्याप्रमाणे असते त्यांचे वागणे. पलिकडच्या शेजाऱ्याच्या बागेतील फुलांनी डवरलेली  वेल बघा. तिची एक फांदी अलीकडच्या बाजूला कुंपणाच्या फटीतून आलेली आहे. तिच्यावरही फुले आहेत. ज्यांचे खायचे प्यायचे त्यांनाच मी फुले देणार असा स्वार्थी विचार या वेलीच्या मनात नाही.

अलीकडच्या जागेत कुंपणाजवळ लिंब, कडीपत्ता,शेवगा,डाळिंब अशी  झाडे डवरली आहेत. त्यांच्या काही फांद्या कुंपणावरून पलीकडे गेल्या आहेत. या झाडांची देखील काही तक्रार नाही. मालकाप्रमाणे शेजारी सुद्धा त्यांच्या साठी सारखेच. दोघांच्याही ती उपयोगी पडतात. राग, लोभ, आकस, हेवा, द्वेष या गोष्टी फुलांना, झाडांना ठाऊक नसतात, ज्या माणसाच्या मनात असतात.

माणूस आकाशात उडायला, पाण्यात विहार करायला शिकला. तो चंद्रावरही पोहोचला. पण दुर्दैवाने माणसाने माणसाबरोबर कसे वागले पाहिजे हे त्याला अजून समजलेले नाही. माणसासाठी अनेक देवदेवतांनी, संतांनी आपल्या शिकवणीचा अमूल्य ठेवा मागे ठेवला आहे.

पण अहंपणा, स्वार्थी विचार आणि आपलेच तेवढे खरे या विचारांनी वेढलेल्या माणसाला काहीच सुचेनासे झाले आहे. त्याला देवदेवता व संत तरी काय करणार ?  

बहरण्यासाठी…

पहाटेची वेळ. पाऊस थांबला होता. आकाशातील काळे ढग पांगले होते. सुर्य हळूहळू डोंगराआडून वर येत होता. पावसाच्या सरी झाडांवर, गवतावर कोसळल्या होत्या. एका झाडाच्या पानांवर पावसाचे काही थेंब जमले होते. आकाशातून वेगवेगळ्या सरींबरोबर आलेले हे थेंब थोड्या सहवासाने आता मित्र बनले होते. त्यांना नव्हते ठाऊक की आपली लवकरच ताटातूट होणार आहे. थोड्या वेळाने जोराचा वारा आला आणि बरेच थेंब जमिनीवर कोसळून दिसेनासे झाले.उरले होते आता तीनचार फक्त.

आपले मित्र गेल्याचे दुःख त्यांच्या मनात होते. आता आपले काय होणार असा विचार त्यांच्या मनात  चालू होता. पुन्हा एकदा वारा आला आणि दोन थेंब जमिनीवर घेऊन गेला. मागे उरलेला एक थेंब मात्र पानावर घट्ट चिकटलेला होता. वाऱ्याला तो दाद देत नव्हता. आपला शेवट त्या थेंबांप्रमाणे होईल का अशी धाकधूक  त्याच्या मनात होती.

सुर्य आता चांगलाच वर आला होता. झाडाच्या फांद्यामधून त्याची किरणे थेंबावर पडली. त्या दाहक किरणांनी तो थेंब हळूहळू नाहीसा होत गेला आणि शेवटी दिसेनासा झाला. वेगवेगळ्या मार्गांनी आलेले पावसाचे थेंब सहवासाने मित्र बनले. शेवटी ते एकेक करून सर्वच नाहीसे झाले.

जीवन क्षणभंगुर आहे. मित्र, आप्तेष्ट यांचा सहवास काही काळ लाभतो. एकेक मग बोलावणे येईल तसा परतीच्या मार्गाला लागतो. झाडावरील पावसाचे थेंब आणि माणूस, प्राणी, पक्षी, झाडे, फुले यांच्यामध्ये फरक तो काय?

जायचे सर्वांनाच असते. पण, साऱ्यांची धडपड असते जगण्यासाठी, फुलण्यासाठी, बहरण्यासाठी आणि……

फुलाची श्रीमंती

बागेतील फुलं नटून-थटून सजली होती. सणासुदीला सजण्यासारखी. त्याला कारणही होतं तसं.त्यांना भेटायला आज कोणीतरी येणार होतं. प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना निरोप धाडला होता_ “मी येतोय तुम्हाला भेटायला आज”. मग का सजणार नाहीत फुलं?

प्रत्येकाचा रुबाब, ऐट, नखरा काही औरच होता. गुलाब, जुई, चाफा, मोगरा, पारिजातक, निशिगंध, रातराणी ही फुलं आपला सुगंध आणि सौंदर्य घेऊन तयार होती. झेंडू, जास्वंद, तगर, सदाफुली, तेरडा, बोगनवेल, लीली, बकुळ, शेवंती, चमेली,अबोली अशी बरीच फुलं आपापल्या ऐपतीप्रमाणे सजली होती.

फुलांचा आज सण होता, उत्सव होता. दुसऱ्यांना निरखण्याचा आणि आपल्यांना  दुसऱ्यांना दाखवण्याचा देखील दिवस होता. आणि ती वेळ आली. आकाशातील ढग पांगले. त्यांचा गडगडाट झाला. सूर्यासारखा  तेजस्वी प्रकाश आसमंतात पसरला. देव आपल्या दुतांसमवेत फुलांना भेटण्यासाठी येत होते.

देवाच्या आगमनाने फुले आनंदली. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, उत्साह ओसंडून वाहत होता. देव प्रत्येकाला भेटले, त्यांच्याबरोबर बोलले. शेवटी देव बागेच्या कुंपणाकडे निघाले. कुंपणावर काट्याकुटयात उमललेल्या निस्तेज, कुपोषित, रंगहीन, गंधहीन अशा त्या चिमुकल्या फुलापाशी ते पोहचले. देवाला आपल्याकडे आलेले पाहून ते फुल हरखले, गोंधळले.

” देवा, तुम्ही माझ्याकडे आलात? माझ्याकडे नाही सौंदर्य, श्रीमंती, रुबाब जे त्या बागेतील फुलांकडे आहे”; आणि त्या फुलाचे डोळे अश्रुंनी डबडबले.

देवांनी त्या फुलला जवळ घेतले, कुरवाळले आणि म्हटले, “चिमुकल्या फुला, मी केवळ तुझ्याचसाठी पृथ्वीवर अवतरलो होतो. तुझ्याकडे जे आहे ते त्या फुलांकडे नाही. तुझा साधा, सालस, प्रेमळ आणि गर्वाचा लवलेश नसलेला स्वभाव ही तुझी श्रीमंती आहे” 

देव त्या चिमुकल्या फुलाला सोबत घेऊन, हृदयाशी कवटाळत स्वर्गाकडे निघाले होते. बागेतील सजलेल्या फुलांचे चेहरे आता कोमेजले होते.

अंधार – प्रकाश

सुकलेल्या पानांचा सडा झाडाखाली पडला होता. वारा येईल तशी ती पानं इतस्ततः उडत होती. काही पार, पल्याड पोहोचली होती. निष्पर्ण, उघडं- बोडकं झालं  होतं झाड. बालपण, तारुण्य, म्हातारपण अनुभवून मुक्त झाली होती पानं.त्यांच्याबरोबरचा सहवास संपल्याचं दुःख झाडाला होतंच.

पण…

अंधाराच्या पलीकडे प्रकाश असतोच ना?

लवकरच ऋतू बदलणार होता. सृजनाचे नवे अंकुर लेवून सृष्टी सजणार होती. हिरव्याकंच पानांनी झाड लगडणार होतं. खोडकर वारा पानांबरोबर खेळणार होता. फुललेल्या फुलांबरोबर लगट करायला कीटक, फुलपाखरं, पक्षी येणार होते. सारा आसमंत आनंदाची  गाणी गाणार होता. त्या सुखद  क्षणांसाठी झाड आसुसलं होतं. त्याच्या ओठी प्रार्थना होती….

“या सुखांनो या

 आनंद खुपसा घेऊन या

विरहाच्या दुःखात मी

हात द्या मला, साथ द्या”

निष्पर्ण झाडाप्रमाणेच सृष्टीतील सकलांना जीवनाच्या रहाटगाडग्यातून जावं लागतंच

ना?  कारण तेथेही असतो अंधार-  प्रकाश, हार- जीत आणि बरेच काही…

आस्वाद आनंदाचा..

क्षितिजानं सूर्याचं स्वागत केलं. सूर्याचं प्रकाशाचं उधळणं सुरू झालं. तसा आकाशातील ढगांचा गुलाबी, लाल, पांढरा असे रंग बदलण्याचा खेळही सुरू झाला. पक्षी घरट्यातून बाहेर आले. आपल्या गोड आवाजात ते सकाळची प्रार्थना करीत होते. हळूवार वाऱ्यानं हिरवं गवत नाचत होतं, फुलझाडं डुलत होती, रंगीबेरंगी फुलं खेळत होती.

वातावरण शांत, प्रसन्न होतं, सुखद गारव्यानं व्यापलं होतं. जणू काही, सळसळत्या, सर्जनशील पहाटेनं आपल्या अंगावर आनंदाचा अंगरखा पांघराला होता. निसर्गामध्ये विविध रूपांनी ओतप्रोत भरलेला हा आनंद, थोडा वेळ का असेना, टीपकागदाप्रमाणे टिपता आला पाहिजे. या आनंदाचा आस्वाद घेता येणं ही एक आनंदाची पर्वणी असते. पण…, आनंदाच्या, सुखाच्या शोधात असलेला माणूस असतो कोठे? 

तो तर…, न गवसणाऱ्या आनंदाच्या, सुखाच्या मागे धावत असतो. आणि ते न मिळाल्याने खिन्न होत असतो.

संतश्रेष्ठ तुकाराम म्हणूनच म्हणतात….

मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण!

आणि पुढे सांगतात….

आनंदाच्या डोही आनंद तरंग,

आनंदचि अंग आनंदाचे.

Joy does not simply happen to us. We have to choose joy and keep choosing it every day.

निंदकाचे घर…

टीकाकार सर्वत्र असतात. घरात, गावात, समाजात आणि कामाच्या ठिकाणीही. नटसम्राट नाटकामध्ये अप्पांवर चोरीचा आळ येतो. तेथे असतो संशय व नंतर टीका. गावात, समाजात “मेरे कमीज से तेरी कमिज सफेद कैसी” असा दृष्टीकोन असणारी माणसे आढळतात. त्यांच्या मनात  द्वेष असतो आणि नंतर टीका. कामाच्या ठिकाणी अनेक ठिकाणची, विचित्र चित्राची माणसे काही वेळेसाठी एकत्र असतात. “मै भला और मेरा काम भला” अशा विचाराने वागणाऱ्यांच्या चुकाही तेथे इतरांना (अगदी चष्मा वापरणाऱ्यांना व न वापरणाऱ्यांना सुद्धा!) सहज दिसतात.  “जो न देखे रवी वह देखे कवी” अशा कवी मनाची माणसं असतात ती! उगाच नाही, भाषेच्या पुस्तकात  धड्यांबरोबर कविताही असतात अधूनमधून! असो.

“निंदकाचे घर असावे शेजारी” असे कोणीतरी म्हटले आहे, खरं आहे ते. कारण आपल्याला न दिसणाऱ्या चुका त्यांना अचूक दिसतात. उलट त्यांचे शेजारी म्हणून त्यांच्या चुकाही आपल्याला सहज लक्षात येतात.

चालायचेच. म्हणजे, चुका सर्वांकडून घडतात, हे चूक नाही. बायबलमधील उदाहरण आठवून बघा, त्या स्रीवर दगड मारायला आलेले लोक त्यांच्या मध्ये अचूक, निरपराध कोणी नसल्याने एकेक करून निघून जातात. टीकाकार व समीक्षक यांच्यामध्ये फरक असतो. टीकाकार फक्त टीका करतात. मात्र समीक्षक टीका करतात आणि चांगले काय हे देखील सांगतात.

आपली भूमिका समीक्षकांची असावी. आई आपल्या बाळाला कधी मारते पण नंतर ती त्याला जवळही घेते. आपली मानसिकता अशीच असावी, नाही का?

A critic is a person who knows the way but can’t drive the car हे केनेथ टाईनन यांचे विचार या संदर्भात मननीय वाटतात. टीका करणाऱ्यांना रस्ता ठाऊक असतो पण गाडी कशी चालवायची हे ठाऊक नसते, असे ते म्हणतात. म्हणजेच, टीका करणाऱ्यांना वरील गोष्टीचे भान असले पाहिजे. थोडक्यात, (आणि तितकेच महत्त्वाचे) टीका जरूर करावी, पण ती जीवघेणी, अनैतिक नसावी.

आणि बरं का, दुसऱ्या व्यक्तिंमधील चांगले गुण बघायला, प्रसंगी त्यांची स्तुती करायला, इतरांना त्यांच्याविषयी चांगले काही सांगायला सध्यातरी पैसे लागत नाहीत! (जीएसटी व इतर कर देखील पूर्ण माफ आहेत!)

(सकाळी-संध्याकाळी फिरताना मनात आलेल्या विचारांना मूर्त स्वरूप दिले आहे)