वाचनानुभव – सौ. वर्षा दौंड

वाचनानुभव


— सौ. वर्षा दौंड, वडाळा, मुंबई

मोबाईल – 9757430685


            वि. स. खांडेकरांची ‘ययाति’ कुमार वयात असतानाच हातातून गेली. तिचे महात्म्य त्यावेळीही माहीत होते. पण लहानपणी कितीशी कळणार! आज काल पुन्हा त्याच, त्या काळच्या कादंबऱ्या पुन्हा वाचायला घेतल्या आहेत. ‘स्वामी’ झाली. ‘मृत्युंजय’ झाली. ‘महानायक’ झाली. ‘लोकहितवादी’ची ‘शतपत्रे’ झाली. ‘मी’ ह. ना. आपटे झाली… सगळ्यांच्या समीक्षा भीतभीत लिहून काढल्या आणि आता ‘ययाति’ पण झाली.

         कादंबरीचा तीन चतुर्थांश भाग वाचून झाला, पण काही लिहायला जमेल असे वाटेच ना! पण मग शेवटचा भाग वाचनात येऊ लागला. तशा मनातून उर्मी उठायला लागल्या… वाचनाची गती वाढली… आणि इच्छा झाली की काहीतरी लिहायला हवे! ‘ययाति’ ही ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्राप्त कादंबरी. २६ फेब्रुवारी १९७६ रोजी पुरस्कार घेताना इंग्रजीतून वि. स. खांडेकरांनी जे भाषण केले, त्याचा अनुवाद त्यांच्या मनोगतात त्यांनी मांडला आहे. आपल्या भाषणात ‘ज्ञानपीठाची’ ते कृतज्ञता व्यक्त करतात. तसेच हा पुरस्कार हा आपला वैयक्तिक नसून सौंदर्य, सामर्थ्य आणि साधुत्व या गुणांनी संपन्न असलेल्या मराठी सर्जनशील साहित्याचा एक प्रतिनिधी म्हणून स्वतःला तो लाभला आहे असेही ते आपल्या भाषणात म्हणतात. आपल्या मनोगतात वि .स. खांडेकर म्हणतात, “भाषा ह्या नद्यांप्रमाणे असतात. दोन्ही लोकमाता. भारतातल्या नद्या जनतेचे पिढ्यानपिढ्या शरीर पोषण करतात, तर भाषा शतकानुशतके आत्मिक पोषण !”

         महाभारतातील राजा नहुषाचा मुलगा ययाति… त्याच्या जीवनावर आधारित ही कादंबरी. कादंबरी वाचताना आपणास कळते की, ययाति हा एकटाच नव्हता. त्याचा वडील भाऊ ‘यती’ याचाही उल्लेख कादंबरीत येतो. राजा नहुष हा अत्यंत पराक्रमी राजा. स्वर्गातील इंद्राचा त्याने पराभव केला. पण आपल्या यशाच्या अहंकाराने आणि मदमस्तपणामुळे भान न राहून इंद्राणीच्या लोभाने मदोन्मत्त, वासनांध होऊन इंद्राणीच्या मंदिरात जाण्यासाठी अतिघाई होऊन त्यांची पालखी वाहून नेणाऱ्या ऋषींची गती वाढावी म्हणून त्यातील एका ऋषीच्या मस्तकावर लाथ मारली. ते अगस्त्य ऋषी होते. त्यांनी नहूषाला शापवाणी उच्चारली, “नहुषाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत!” पुढे जाऊन यतीला हे जेव्हा समजले तेव्हा सुखाच्या शोधासाठी यती बाहेर पडला. त्याने राजवाडा सोडला. हे दुःख राजमाता मनी कवटाळून असते!

         ययाति हा वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीचा नायक आहे. पण तो पुराणकथेपेक्षा वेगळा रंगवलाय लेखकाने. नायिका देवयानी, शर्मिष्ठा यांची ग्रंथातील रुपे खांडेकरांनी आपल्या कल्पनेनुसार बदलली आहेत. महाभारतातील ययाति, देवयानी, शर्मिष्ठा, कच हे वेगळे आहेत, यांचा उल्लेख लेखक आपल्या कादंबरीच्या पार्श्वभूमीमध्ये देतात.

         लेखक महान तेव्हाच बनतो जेव्हा तो अखंड शिकत राहतो. वि. स. खांडेकर सुद्धा गाढे अभ्यासक होते. लहानपणापासून ऐकण्याची. वाचनाची आवड त्यांना होती. पुराणकथेसारख्या साहित्याकडून सामाजिक साहित्याकडे वळले पाहिजे हे त्यांनी जाणले. लेखकाने पौराणिक कथेतील ययाति व इतर पात्रांचे अंतरंग या कादंबरीत बदलले आहे, परंतु ते म्हणतात, “ययातिची कथा ही महाभारतातले हे एक उपाख्यान आहे. ते मध्यवर्ती कथानक नाही. राम-सीता किंवा कृष्ण-द्रौपदी यांच्या स्वभावात ललित लेखकाने आमुलाग्र बदल करणे हे साहित्याच्या दृष्टीने अतिक्रमण होईल! पण पुराणातल्या दुय्यम व्यक्तींना हा नियम लागू करण्याचे कारण नाही. उपाख्यानातील पात्रे ही बहुधा जनमाणसांकडून पिढ्यानपिढ्या पुजली जाणारी दैवते नसतात.” (ययाति -पान नंबर ३१८/३१९ ,प्र. आ.) आणि म्हणूनच कादंबरीतील शर्मिष्ठा, देवयानी पुराणकथेहून थोडी भिन्न आहेत. आपल्या कादंबरीच्या पार्श्वभूमीत त्यांनी त्याची स्पष्ट उदाहरणे दिली आहेत व वेगळेपण दाखवले आहे.

         ययाति ही एक स्वतंत्र कादंबरी आहे. ‘कच’ या व्यक्तिरेखेचा उल्लेख करून ते म्हणतात,  “महाभारतातील संजीवनी विद्येचे हरण करून देवलोकी गेलेला कच आपल्याला कधीच भेटत नाही… पण ययातिमध्ये तो परत येतो. ययाति, देवयानी, शर्मिष्ठा यांच्याशी निरनिराळ्या धाग्यांनी तो जोडला जातो.” हे काल्पनिक चित्रण लेखकाने केलेले आहे. पार्श्वभूमी वाचता वाचता लेखकाच्या बदलत्या, क्रांतिकारक विचारसरणी व नवतेचा पुरस्कार पाहिला असता त्यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार किती योग्य आहे हे जाणवते !

         लेखणीतून लेखक समाज परिवर्तन घडवतात, म्हणूनच ती मानास पात्र असतात. समाजात धर्माचे नियंत्रण नसेल मग तो धर्म जुन्या काळच्या ईश्वर श्रद्धेसारखा अथवा कर्तव्यनिष्ठेसारखा असो किंवा नव्या काळातल्या समाजसेवेसारखा अथवा मानव प्रेमासारखा असो ! त्या समाजाचे अध्:पतन झाल्याशिवाय राहणार नाही .’ययाति’च्या कथेची चिरंतन स्वरूपाची ही शिकवण आहे (ययाति पान न. ३२७ प्र .आ.)

ययाति कादंबरीतील विविध व्यक्तिरेखा वि. स .खांडेकर यांनी त्यांच्या अलौकिक कल्पकतेच्या आणि अभिजात प्रतिभेचा वापर करून अशा रंगवल्या आहेत की मन गुंतून राहते .विचार करायला भाग पाडते. जीवन विषयक अनेक मौलिक विचारांचे प्रसंगानुरूप दर्शन घडवते. अनेक रूपके, उपमा आणि भाषेचे सौंदर्य संवादातून वाचावयास मिळते. कल्पनाविलास कसा असावा याची अनुभूती वाचनातून मिळते. अतिशय उत्कृष्ट वाचनीय कादंबरी !!!

‘ययाति’- वि. स. खांडेकर.

प्रकाशक – देशमुख आणि कंपनी प्रा. लि.. प्रथमावृत्ती. सदाशिव पेठ, पुणे.


** कादंबरीतील मला आवडलेले उतारे…

         “मानवी जीवनात आत्मा हा रथी, शरीर हा रथ, बुद्धी हा सारथी आणि मन हा लगाम आहे. विविध इंद्रिय हे घोडे आहेत. इंद्रिय हे शरीर रथाचे घोडे आहेत. कारण त्यांच्या वाचून तो क्षणभरसुद्धा चालू शकणार नाही. रथाला नुसते घोडे जुंपले तर ते सैरावैरा उधळून रथ केव्हा कुठल्या खोल दरीत जाऊन पडेल आणि त्याचा चक्काचूर होईल याचा नेम नाही म्हणून इंद्रियरुपी घोड्यांना मनाच्या लगामा चे बंधन सतत हवं पण हा लगामदेखील सदैव सारथ्याच्या हातात हवा, नाहीतर तो असून नसल्यासारखाच. म्हणून मनावर बुद्धीचे नियंत्रण हवे. बुद्धी आणि मन दोन्ही मिळून संयमाने हा रथ चालवू शकतो.

         “दैव ही मोठी अद्भुत शक्ती आहे महाराणी,  ज्या आकाशात शुक्राची चांदणी चमकत असते तिथून उल्का पृथ्वीवर पडते आणि दगड बनते!”

         “युद्ध ते दोन व्यक्तीतील असो, दोन जातीतले असो अथवा दोन शक्तीतील असो, मला नेहमीच निंद्य आणि निषेधार्ह वाटत आलं आहे.”

वाचन एक आगळाच आनंद !!!!!