वस्त्रहरण: ‘Mass’ आणि ‘Class’ जोडणारा साकव –  अक्षय शिंपी

वस्त्रहरण: ‘Mass’ आणि ‘Class’ जोडणारा साकव

  •  अक्षय शिंपी, मुंबई
  • (अभिनेता, कवी, दास्तानगो)

       मराठी रंगभूमी समृद्ध रंगभूमी आहे. सर्व प्रकारचं, सर्व प्रवाहातलं नाटक इथे होत आलेलं आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसादही मिळालेला आहे, मिळतो आहे. त्याचप्रमाणे वेळोवेळी समीक्षकांकडून तिचं यथायोग्य मूल्यमापनही होत आलेलं आहे. तथापि मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमी ही आविष्काराचे मोजके काही अपवाद वगळता प्रमाण भाषेतच बोलत राहिली आहे. विविध बोलींचे आविष्कार तिच्यावर समर्थपणे घडल्याची उदाहरणं फारच कमी आहेत. एवढंच नव्हे तर भलतीच सरमिसळीची भाषा, बोली म्हणून आणि पात्राची ग्रामीण पार्श्वभूमी अधोरेखित करण्यासाठी वापरली जात राहिली. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळात ‘स्थळ: दिवाणखाना’ नाटकात पडदा उघडताच, घरातला नोकर – बरेचदा ज्याचं नाव राजू किंवा रामू असे – त्या पात्राचा प्रवेश होई अन् ते फोनवर ‘बाईसाहेब अंघुळ करत्यात, काय निरूप देऊ त्यास्नी?’ वगैरे बोलून बोलीच्या आविष्काराचा आभास घडवे. किंवा वगनाट्यात कृष्ण-पेंद्याच्या प्रसंगात, त्या दोघांचा मावशी अन् गवळणींशी जो सामना चाले त्यात अन् पुढे येणाऱ्या बतावणीत बोली भाषेचा वापर ऐकायला मिळे. सर्वांत महत्वाचं म्हणजे पात्राचं गौणत्व वा कमतरता दाखवायची असेल, ते दुय्यम किंवा कमी प्रतीचं दाखवून हास्यास्पद करायचं असेल, तेव्हा त्या पात्रांसाठी बोलीची योजना केली जात असे.

         ही बोली बव्हंशी कोल्हापूरच्या भागाशी (कोल्हापूरी नव्हे) साधर्म्य सांगणारी असे. मराठी ग्रामीण चित्रपट आणि तमाशापटांत असे तशी. वाईच, त्यास्नी-यास्नी, न्हाय-व्हय, हिथं-तिथं, चाय, सौभाग्याचं लेनं वगैरे शब्द आले की मराठी प्रेक्षक पुढ्यात चाललेला खेळ हा ग्रामीण आहे, हे लागलीच ताडत असत. संपूर्ण महाराष्ट्रभर ही सरमिसळ झालेली भलतीच भाषा, बोली म्हणून प्रचलित झाली. कदाचित सर्व ठिकाणच्या प्रेक्षकांना नाटकाच्या खेळातला आशय समजणं सुलभ व्हावं, म्हणूनही हे घडलं असेल पण त्यात अस्सलपणा नव्हता, हेदेखील नाकारता येत नाही. त्यात नागर पार्श्वभूमी असलेले नट या बोलीचा प्रयोग करू लागले की कृतकपणात आणखीनच भर पडे. असो. 

         तरीदेखील महाराष्ट्रातील दक्षिण कोकण भागाची पार्श्वभूमी असलेला, तिथल्या लोककलेची आणि बोलीची डूब किंवा झालर असलेला एक रंगप्रयोग, नागर मराठी रंगभूमीवर प्रचंड गाजलेला होता. गेल्या दोन पिढ्यांचं या रंगप्रयोगानं मजबूत मनोरंजन केलेलं आहे आणि दक्षिण कोकण प्रदेशातली स्थिती, तिथले प्रश्नदेखील लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजमितीस पाच हजारांहून अधिक खेळ झालेला आणि गेल्या अर्धशतकापासून रंगभूमीवर वेळोवेळी, वेगवेगळ्या नटसंचात सादर होत राहिलेला – ‘वस्त्रहरण’ हा तो रंगप्रयोग. शब्दश: ‘एव्हरग्रीन’ म्हणावं असं हे नाटक प्रत्येक पिढीतल्या मराठी प्रेक्षकाला ठाऊक आहे. ‘इनोसन्स’ आणि ‘रॉनेस’ या दोन्ही काठांना स्पर्श करत प्रवाही असणारी ठसठशीत उदाहरणं ‘वस्त्रहरण’ वगळता, ‘जांभूळ आख्यान’ आणि ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ यातच आपल्याला सापडतात.

         गंगाराम गवाणकर लिखित आणि कै. रमेश रणदिवे दिग्दर्शित हे नाटक पुढे तालीम मास्तर म्हणून मंगेश कदम यांनी उभं केलं. त्यातल्या मोकळ्या जागा नव्यानं भरल्या. ‘भद्रकाली’ नाट्यसंस्थेचा भक्कम आणि भरवशाचा आधारस्तंभ म्हणून हे नाटक कायमच गणलं जात असलं तरी या नाटकाची महत्ता इथून पुढे सुरू होते. मराठी नागर रंगभूमी, जी बव्हंशी उच्चवर्णीयांच्या हातांत आहे, तिच्या अवकाशात, सर्वच अर्थानं गावकुसाबाहेर असलेल्या या नाटकानं आपला ऐसपैस अन् टोलेजंग बंगला उभा करावा अन् टिकवावा, हा एक देखणा अन् अर्थपूर्ण विद्रोह म्हणता येईल.

         द. कोकण भागातल्या मालवणी बोलीचा बळकट आणि मोकळाढाकळा (शिव्यांसकट) वापर, नाटकातलं नाटक या आयुधाचा नेमका उपयोग, बरंचसं सरळसोट किंवा एकरेषीय कथानक असलं तरी अर्थाची बहुस्तरीयता, लोककलेच्या बलस्थानांचा वापर आणि बहुजन कलावंताच्या मातीतून उगवून आलेल्या ठसठशीत आविष्काराचा अनुभव – ही या रंगप्रयोगाची वैशिष्ट्य आहेत. मराठी नागर प्रेक्षकांना हा खेळ म्हणूनच केवळ आवडत नव्हे तर कायम भिडत आलेला आहे. स्वच्छ, प्रमाण भाषेतले अनुनासिक उच्चार अंगवळणी पडलेली मराठी नागर रंगभूमी या उंच आणि जवळजवळ किंचाळत उच्चारलेल्या संवादांनी प्रेक्षकांना अधिकच खेटली, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. सर्व वयोगटातला, आवडी-निवडचा प्रेक्षक या खेळानं नाट्यगृहांकडे खेचून आणला. अनेकांची नाटक पहाण्याची सुरुवात या नाटकानं झालेली आहे.

         ‘वस्त्रहरण’ मधले सोंगाडे किंवा खेळकरी हे वाचिक किंवा आंगिक अभिनयातून हास्यरस निर्माण करण्यापुरते न रहाता सबंध नाटक उभं करण्याची प्रक्रियाच प्रेक्षकांपुढे ठेवतात. गावातली साधी, निरक्षर, हातावर पोट असणारी कष्टकरी माणसं कला फार पोटतिडिकीनं करतात. मात्र त्यात त्यांचे स्वभाव, सवयी, विसंगती लुडबूड करायला लागल्या की जी धमाल उडते, त्याला तोड नाही. खरंतर ही आपलीच अर्कचित्र आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी, योगक्षेम चालवण्यासाठी गाव सोडून शहरात आलेल्या, अडी-अडचणीत जीवन कंठणाऱ्या आणि मनातून गावातच जगणाऱ्या माणसांची तर कांकणभर अधिकच. त्यांना केवळ ‘नॉस्टेल्जिया’ची सफरच हे नाटक घडवून आणत नाही तर त्यापलीकडेही बरंच काही देतं. तो अनुभव वर्णनातीत आहे.

         सर्वसाधारणपणे गोष्टी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे ‘Windo’ आणि दुसरी म्हणजे ‘Mirror’. Windo म्हणजे जे जग आपल्या परिचयाचं नाही, ते जग वाचक- प्रेक्षक ज्या कलाकृतींतून, आविष्कारांतून बघतात, अनुभवतात त्या. आणखी सोपं करून सांगायचं झालं तर एखादी परदेशी कलाकृती वा आविष्कार आपल्यासाठी ‘Windo’ ठरतो कारण, त्या खिडकीतून आपण त्या देशाची संस्कृती, आचार-विचार-व्यवहाराच्या तऱ्हा, सामाजिक-राजकीय स्थिती जाणून घेतो. आणि ‘Mirror’ म्हणजे ज्या कलाकृती आणि आविष्कारांत आपल्याला आपलंच स्वच्छ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास होतो त्या! ‘वस्त्रहरण’ हे ‘Windo’ आणि ‘Mirror’ हे एकत्रच असल्याचं दुर्मीळ अन् अपवादात्मक उदाहरण आहे. कोकण प्रांतातल्या तळाच्या भागातली लोकसंस्कृती आणि लोकजीवन ही विदर्भ-मराठवाडा-खान्देशमधल्या आणि महाराष्ट्राबाहेर कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या पुढल्या पिढ्यांसाठी ‘Windo’ ठरते. गाऱ्हाणं घालणे, दशावतारी खेळाची झलक, मालवणी माणसाच्या स्वभावाचे इरसाल नमुने, त्यांची रसरशीत बोली त्याला या खिडकीतून अनुभवतात येतात. खुद्द कोकणातून कमी कमी होत चाललेल्या एकेकाळच्या चालीरिती, विशिष्ट छापाचे वेशदेखील पहायला मिळतात. नाटकातला मास्तर कोट, सदरा, धोतर आणि विशिष्ट टोपीत आहे. तात्यादेखील सदरा, धोतर, जाकीट आणि गांधीटोपीत आहे. आता कोकणातल्या कुठल्या शाळेत कुणा शिक्षकाचा, असा मास्तराचा आणि कुणा सरपंचाचा, तात्यांसारखा वेश क्वचितच आढळेल. धोतरं सोडाच पण पायांकडे मोठी तोंडं असणारे लेंगे आणि गांधीटोपीदेखील आता कालबाह्य झाली. तरी या नाटकातला मास्तर आणि तात्या आपापला पारंपरिक वेश बऱ्यापैकी राखून आहेत. असो. तर वर म्हटल्याप्रमाणेच कोकण प्रांत सोडून पोटापाण्यासाठी महानगरांची वाट धरलेल्या माणसांना तीत आपलं प्रतिबिंब दिसतं, या अर्थानं ‘वस्त्रहरण’ हे ‘Mirror’ देखील ठरतं.

         या नाटकाला सुरुवातीच्या मूळ नटसंचात झालेल्या खेळांना फारसा प्रेक्षक प्रतिसाद मिळत नव्हता आणि मग पुलंनी प्रयोग पाहून लिहिलेल्या पत्रामुळे चित्र पालटलं, वगैरे वगैरे इतिहास इथे लिहिण्याचं काहीच प्रयोजन नाही. सर्वांना तो ठाऊकच आहे. मराठी रंगभूमीच्या समकालीन परिप्रेक्ष्यात हे नाटक कुठे उभं आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे.

         पुस्तक प्रदर्शनात मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर सुरूवातीलाच अनेक लोकप्रिय लेखकांची गाजलेली पुस्तकं पहायला मिळतात. पुस्तक प्रदर्शन सर्वांसाठी असतं. तिथे पट्टीचा वाचक आणि ग्रंथसंग्राहकही येणार असतो तसाच नव्यानंच वाचायला सुरुवात केलेला वा करू पहाणारादेखील येणार असतो. हा दुसऱ्या गटातला वाचक अधिक महत्वाचा असतो. त्याला सुरूवातीलाच काम्यू, काफ्का, सार्त्र, बोदलेर वगैरे लेखकांची पुस्तकं दिसली तर वाचन वा पुस्तक नावाच्या गोष्टीचा तो धसका घेऊ शकतो. या सुरूवातीच्या टप्प्यावर तो साध्या, एकरेषीय, मातृभाषेतल्या गोष्टीच वाचायला केव्हाही प्राधान्य देईल. हा विचार करून त्याच्या नजरेस कोणती पुस्तकं पडावीत त्याप्रमाणे पुस्तकांची जागा ठरवली जाते. या पुस्तकांना ‘Entry Books’ असं म्हणतात. नाटकाबाबतही हेच. नव्या प्रेक्षकाला ‘वस्त्रहरण’ सुरुवातीच्या टप्प्यावर दाखवणं हा त्याच्यासाठी उत्तम ‘Entry Play’ ठरू शकतो. नाट्य माध्यमातली उर्जा, त्यातला मोकळेढाकळेपणा, नटांचे पात्र होण्याच्या प्रक्रियेतले सायास, भाषिक वैभव, अस्सल मालवणी बोलीचं संगीत, साधं तरी सुदृढ कथानक हे सारं अनुभवायला मिळाल्यानं तो या माध्यमाकडे वळण्याची शक्यता जास्त बळकट होईल. मुरलेल्यांना हे नाटक दर खेळागणिक नव्यानं उमगू शकेल. लोककलांतला लवचिकपणा, थेट आणि नि:संदिग्ध भाष्य करण्याची ताकद, समकालीन सामाजिक-राजकीय व्यवस्थेवर केलेल्या अत्यंत चतुर टिप्पण्या / मारलेल्या कोपरखळ्या याचा पुन:पुन्हा आस्वाद घेता येईल.

         ‘वस्त्रहरण’ हे जितकं द. कोकणच्या प्रांतातलं रोपटं आहे तितकाच तो सबंध महाराष्ट्र आणि मराठी रंगभूमीवरचा महावृक्ष आहे. साहित्य, संगीत आणि नाट्य यांची घट्ट वीण या नाटकात घातली गेली आहे. अगदी नेमकी उपमा वापरायची झाली तर, कोकणात लहान लहान कालवे – ज्यांना ओहळ आणि बोलीत ‘व्हावळ’ म्हणतात – त्यांच्यावर लहान पूल, लाकडी साकव बांधलेले असतात. गंगाराम गवाणकर यांची ही कृती  ‘Mass’ आणि ‘Class’ या दोन्ही टोकांना सांधणारा भक्कम साकव आहे, असं म्हणता येईल. 

         बहुजन कलावंतांनी नेहमीच मातीतल्या गोष्टी सांगितल्या. त्या सांगताना लोकभाषा वापरली, आपल्या जगण्याचा परिवेश त्यातून मांडला. परिस्थिती आणि ‘स्व’शी झगडा करत असतानाही जीवनमूल्य जपली. म्हणूनच भाषा, प्रांत हे घटक भिन्न असले तरी ते उंबरे ओलांडून या कृती सर्वत्र पसरू शकल्या. कारण माणूस सर्वत्र सारखाच आहे. अर्थात नाटकासारख्या समूह माध्यमातून गोष्ट सांगताना अनेक विभागांचा सहभाग त्यात होत असतो. ‘वस्त्रहरण’ च्या रंगमंचावरील, पीटातील आणि रंगमंचामागील प्रत्येकाचाच ही कृती मोठी करण्यात समान वाटा आहे. किंबहुना या नाटकाचा प्रयोग हा एकजिनसीपणाचा अनुभव आहे. चहा वा कॉफी केल्यानंतर त्यांतले जिन्नस स्वतंत्र काढता येत नाहीत तसंच या नाटकातल्या नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा या घटकांबद्दल स्वतंत्रपणे बोलता येत नाही, हेच या नाटकाचं यश. सगळे जिन्नस एकजीव होऊन कायमस्वरूपी लक्षात रहाणारा एक धारदार, अविस्मरणीय अनुभव देतात.

         द्रौपदीचं वस्त्रहरण हा महाभारतातला प्रसंग आपल्याला चांगलाच ठाऊक आहे. मात्र सोवळेपणा ल्यालेल्या नागर मराठी रंगभूमीचं वस्त्रहरण विजय तेंडुलकर यांनी आपल्या पद्धतीनं केलं तर ‘वस्त्रहरण’ कर्त्यांनी आपल्या पद्धतीनं केलं. हे दोन्ही आणि दोघांचेही प्रयत्न रंगभूमी मोकळी आणि उन्नत होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. विजय तेंडुलकर आता हयात नाहीत पण नागर मराठी रंगभूमी पुन्हा सोवळेपणाच्या आलवणात गुंडाळली जाऊ नये म्हणून ‘वस्त्रहरण’ नाटकाचे खेळ सुरू रहाणं आवश्यक आहे. तो एक सजग प्रयत्न असेल.

‘वस्त्रहरण’ कर्त्यांना सलाम.

अक्षय शिंपी

(अभिनेता, कवी, दास्तानगो)

* २०१० पासून व्यावसायिक  स्तरावर पूर्णवेळ अभिनेता आणि लेखक म्हणून कार्यरत.

* ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘ पुनश्च हनीमून’, ‘आधी बसू मग बोलू’, ‘अगदीच शून्य’, ‘ बॅकस्टेजवाला कोणी’ ‘Mr. & Mrs.’ ‘ मराठी वाङ्मयाचा घोळीव इतिहास’, ‘इन्विजिबल सिटी’ या मराठी नाटकांतून, तर ‘हॅलो फ़रमाईश’, ‘बस्ती में मस्ती’ ‘विरासत’, ‘हयवदन’, ‘राम सजीवन की प्रेमकथा’ या हिंदी नाटकातून अभिनेता म्हणून काम

 • ‘१९०९’, ‘चक्की’, ‘सेल्समन’ ‘हिजडा’ आदी चित्रपटांमधून अभिनय.

* सोनी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेतून अभिनय. (भूमिका: रवी भालेराव)

* झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ या मालिकेतून अभिनय. (भूमिका: नामजोशी)

* Drama School Mumbai या  संस्थेतून नाट्यप्रशिक्षणातील महत्वपूर्ण आवाजसाधना या विषयाचा प्रशिक्षक म्हणून कार्यरत.

* मुंबई शहरावरील ‘दास्तान-ए-बड़ी बांका’ आणि ‘दास्तान-ए-रामजी’ या मराठीतील दास्तानगोईचे प्रयोग सुरू आहेत.

* ‘दास्तानगोई’ हा उर्दू कलाप्रकार मराठीत आणला.

* ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे'(२०२०) आणि ‘अव्याकृत’ (२०२५) हे कवितासंग्रह प्रकाशित.

 • ‘पीयूष बबेले’ लिखित ‘नेहरू: मिथक और सत्य’ या पुस्तकाचा  मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. मराठी पुस्तकाचे शीर्षक: नेहरू: मिथक आणि सत्य, मराठी अनुवाद: अक्षय शिंपी

* ‘शंकर शेष फाउंडेशन, मुंबई’ ची शिष्यवृत्ती सलग तीन वर्ष जाहीर.

* शरद पवार इन्पायर फेलोशिप साहित्य विभागात जाहीर.

* साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती प्राप्त. (२०२३)

‘मैत्र जीवांचे’ पुरस्कार, ‘सूर्यांश साहित्य पुरस्कार’, ‘अक्षर कला वाड़्मय पुरस्कार, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई’चा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा ‘विशाखा’ सन्मान, प्रकाश रसाळ भूमी काव्य पुरस्कार – आदी महत्त्वपूर्ण पुरस्कारांनी सन्मानित.