वसईतील खिस्तसभा हा समूह, कळप की समुदाय?
- अॅड. अतुल आल्मेडा, निर्मळ
झाडं पक्षी जनावरे
प्रार्थना करीत नाहीत
तरीही सुखी असतात
देवाकडे भीक मागतो
त्यालाच आपण प्रार्थना म्हणतो.
– कवी सायमन मार्टिन.
ख्रिस्त आपल्या शिकवणुकीतून आणि आचरणाने विवेकी, प्रेमळ समाज निर्मितीसाठी कार्य करत होता. त्याची इच्छा होती, पृथ्वीवरील सर्व माणसांनी एकमेकांशी प्रेमाने आणि सलोख्याने एक कुटुंब म्हणून जगावे आणि नांदावे. यासाठी त्यांनी आपल्या दृष्टांतात शिकवणीद्वारे प्रेम करण्याचे उदाहरण, हे चांगल्या समारीतनच्या दाखल्याद्वारे, सज्जन आणि धार्मिक नाही तर अनोळखी माणूस सुध्दा प्रेमाने उपयोगी पडू शकतो. त्याचप्रमाणे विवेकी विचारानं वागण्याचे, उदाहारण, व्याभिचारी स्त्री संबधीत दाखल्याद्वारे, स्त्री एकटी कशी व्याभिचार करू शकणार! तिथे पुरुष असणारं, त्याने व्यभिचार केला की नाही? मग दोष फक्त तिलाच का? म्हणजेच स्वतंत्र विचाराने निर्णय घेण्याचे आणि वर्तणूक करण्याचे आदर्श शिकविले.
असे सर्व शिकवित असतांना, तत्कालीन असलेल्या धनगर समाजाचे उदाहरण, म्हणजे देव आणि त्याची प्रजा यासाठी, मेढपाळ व त्यांची मेंढरे हे प्रतिक वापरले आहे. ख्रिस्तसभा त्या वृतीनुसार आजही कार्य / व्यवहार करत आहे. थोडक्यात धार्मिक असो किंवा भौतिक असो निर्णय धर्मगुरू आणि बिशपांनी (मेंढपाळ) द्यायचे आणि लोकांनी (मेढरांनी) पाळायचे / माना डोलावयाच्या. ख्रिस्ताच्या शिकवणुकीचे जे आकलन मला झाले आहे, ते या कार्यपद्धतीच्या विरुद्ध आहे. का? विचार करू या!
ख्रिस्तसभेच्या माध्यमातून असे शिकवले जात आहे की ख्रिस्ती लोक / श्रद्धावंत हे एकत्र असतात, कारण ते एक समूह आहेत. वास्तवात मात्र हे पुर्ण असत्य आहे. कसे ते कळण्यासाठी, कळप, समूह आणि समुदाय या शब्दाचे अर्थ समजणे / आकलन होणे आवश्यक आहे.
१. कळप : इंग्रजीत herd कळप प्राण्यांचे असतात. उदा. मेढरांचा कळप, गुरांचा कळप तर पक्षाचा थवा, कळपात स्वतंत्र विचार नसतो. नेता घेईल तो निर्णय श्रद्धांवंत म्हणून आज्ञाधारकपणे पाळावयाची, चूकीचा असला तरी.
२. समूह : इंग्रजीत mass / community, विचार पुर्वक, सुख:दु:खाने बांधला गेलेला मानवी समाज. येथे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे विचार मांडण्याची मुभा असते. विवेकी विचाराने चर्चा करून निर्णय घेतला जातो.
३. समुदाय : इंग्रजीत collection of people. सुट्या व्यक्तीची एकाच किंवा समान हेतूने जमलेल्या लोकांचा जमाव.
जर ख्रिस्तसभा सांगते, ते मान्य केले, तर ख्रिस्ती श्रद्धावंताचा समाज म्हणजेच प्रेषितांच्या काळात कार्यरत असलेला समाज, समूह असायला हवा. पण आज वसई धर्मप्रांतातील ख्रिस्ती समाज किंवा वसईतील कुठल्याही धर्मग्रामा़तील समाज हा ख्रिस्ती समूह आहे, असे आपण म्हणू शकतो का? माझ्या मते उत्तर प्रत्येक ख्रिस्ती म्हणवणाऱ्या व्यक्तीने शोधले पाहिजे, दिले पाहिजे. उत्तर शोधण्यासाठी उपलब्ध पर्याय असे असू शकतात. धर्मप्रांताचे निर्णय घेताना श्रद्धावंताचे विचार ऐकून घेतले जातात का? आणि ऐकून घेतले जात असतीलच, तर त्यांना प्राधान्य दिले जाते का? अशाप्रसंगी खुली चर्चा, संवाद होतो का?? हे विचार ऐकून घेण्याची प्रक्रिया समूहांतील सर्व वर्गाचे प्रतिनिधित्व असते का? ख्रिस्तसभा लोकशाहीच्या गोष्टी भरपूर बोलते, पण वर्तन तसे नसते.
देव प्रेम आहे. देव प्रेमळ आहे. त्याला आपली गरज नाही असे माझे ठाम मत आहे. हे माझे मत बदलण्यासाठी कोणी पुरावा देईल का? (देव आणि देवळाचा, सुताराम संबंध नाही, देवळात राहायला देव आपला पगारी नोकर थोडाच आहे.- कवी सायमन मार्टिन) परंतु श्रद्धाव़तांना तो एकमेकांशी विवेकपूर्ण विचारानं आणि प्रेमाने वागण्याची शिकवण प्रत्येक धर्मात देत आहे. कारण मनुष्याने एकमेकांशी न भांडता एक कुटुंब म्हणून जगावे अशी त्याची इच्छा आहे. पण ती शिकवण माणूस पाळत नाही. अंगिकारत नाही.
आपण देवाची पूजाअर्चा करतो. म्हणजे पुजाअर्चनाद्वारे आपण धर्म पाळतो. आपण सर्व भक्त आहोत, शिष्य किंवा अनुयायी नाही. खरं म्हणजे आपण धर्म जगायचं असतो. धर्म जगायला आपले पुजारी / धर्मगुरू सांगत नाहीत. कारण त्यांनाच कृतीशील धर्म जगणे अवघड जाते. त्यामुळेच दोघांनाही धर्म न जगता धर्म पाळल्याचे समाधान लाभते. प्रत्येक माणसाने आपापल्यापरी धर्म जगायचं ठरविले तर जगांत आणि मानवांत शांती नांदू शकते. धर्म जगणे म्हणजे मानसाने माणसावर प्रेम करणे व आकस न धरणे हा माझा विश्वास आहे. मला असे राहून राहून जाणवते, की ख्रिस्ताने त्यासाठी जून्या करारांतील दहाही आज्ञा बाजूला सारून, अन्यायी व समतेची समाजव्यवस्था बदलून समतेचा समाज समाज निर्माण करण्याचा आदेश दिला आहे. (मोझेसचा धर्म नाहीसा नाही, तर पुर्ण करावयास आलो आहे).
एकच नवी आज्ञा सांगितली आहे. “मी एक नवीन आज्ञा तुम्हाला देतो; एकमेकांवर प्रेम करा. मी तुमच्यावर प्रेम केलं तसंच तुम्हीदेखील एकमेकांवर प्रेम करा. तुमच एकमेकांवर प्रेम असलेलं, तरच तुम्ही माझे शिष्य आहात हे सर्वांना पटेल!” (पहा योहान १३: ३४ व ३५) “स्वत:सारखं शेजार्यावरही प्रेम कर” असे चांगला सॅमेरीटन या दाखल्यातून ख्रिस्त शिकवत आहे. आपले राष्ट्रपिता आणि आधुनिक जगाचे आध्यात्मिकपिता महात्मा गांधी यांची विचारधारा योग्य वाटते. कुठलेही ख्रिस्ती कर्मकांड न करता ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे जीवन जगलेला माणूस. आपल्या ‘My Religion’ या पुस्तकात म्हणतात, ‘संग्रह करणे, भविष्याची तरतूद करणे, संग्रह करण्याच्या वृतीमुळे अनेक असमानता निर्माण झाल्या आहेत, ज्यामुळे दु:खं भोगावी लागतात.’
अपरिग्रहाच्या मूल्याचे व्यवस्थित पालन करावयाचे असल्यास मानवाला पक्षाप्रमाणे राहावं लागेल. ख्रिस्तानेच हा विचार दिला आहे. संग्रह करावा. पण किती? संग्रहाला मर्यादा असायला हवी. समुहात राहण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक श्रद्धावंताने विचार केला पाहिजे, हा विचार करताना, मी ख्रिस्ताचा भक्त की अनुयायी याचाही विवेकी विचार व्हावा. असे म्हणतात ‘पृथ्वी सगळ्याच्या गरजा भागविण्यासाठी देईल, पण प्रत्येक माणसाची हाव पुर्ण करण्याएवढे नाही. ख्रिस्ती श्रद्धांवतांवर एक वेगळी जबाबदारी आहे. याची जाणीवच त्याला नाही. हपापलेल्या एखाद्या मनुष्यासारखा कुठलाही विचार न करता कल्पनेत येईल तितके कमवून आपले घर भरण्यासाठी आपल्या बुद्धिचे, शक्तीचे व युक्तीचे प्रदर्शन तो करत आहे. हेच एक कारण आहे, समाजात समतेऐवजी विषमता वाढत आहे. यासाठी गांधींच्या ‘स्वयं-साधेपणाचा’ नियमाचा अवंलब करणे महत्त्वाचे आहे. हा नियम म्हणजे स्वत:च्या इच्छा नियंत्रित करून, आवश्यक गरजा भागवून साधे आयुष्य जगणे. हेच ख्रिस्त शिकवत आहे. ख्रिस्ताची धर्मशिकवण स्थितीवादी नसून परिवर्तनवादी आहे. हे नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आज धर्मबाजी भरपूर चालू आहे, पण समाजातून नैतिकता लोप पावत चालली आहे.असे मला समजते. तुम्हाला काय वाटते? विवेकी विचार करून ठरवा.
मेंढपाळ आणि कळप, या धर्म पाळण्याच्या धारणेतून दोघांनी बाहेर पडल्या-शिवाय ख्रिस्ताला अभिप्रेत असलेला ख्रिस्ती समूह हे दिवास्वप्नच आहे. नाहीतर चारशेहून जास्त वर्षे जपत असलेले श्रद्धावंत ज्या कर्मकांडाच्या हेतूने उद्धेशाने रविवारी देवळात येतात, त्याच्याअगदी विसंगत हेतूने त्यांच्यापैकीच बहुतेक सोमवार ते शुक्रवार वसईच्या Temple of justice, न्यायालयात / कोर्टात एकमेकांना भेटले नसते. हे बदलणे कठीण आहे. मात्र अशक्य मुळीच नाही. स्वतंत्र, समता, बंधुता आणि न्याय समाज निर्माण करण्यासाठी फक्त प्रवचने आणि उपासना पुरेशी नाही, हे चारशे वर्षाच्या अनुभवांतून आपण शिकलो पाहिजे. आपले संविधानसुद्धा समूह विचाराची प्रेरणा देणारे आहे. विवेकी कृती करण्याची आज आवश्यकता आहे. ती वेळ येऊन ठेपली आहे. जग बदलण्याची सुरवात स्वत:पासून करू या. ख्रिस्ता-सारखे विवेकी आणि चिकित्सक होऊ या. शांतीचे आणि समाधानी जीवन जगू या.