वय आणि वलय – डॉ. नेन्सी विन्सेंट डिमेलो

वय आणि वलय

  •  डॉ. नेन्सी विन्सेंट डिमेलो, गास, वसई.

          “काय ग, किती बारीक झाली आहेस ? खूप मेनटेन ठेवले आहेस स्वतःला… तू आणि तुझी मुलगी बहिणी बहिणी दिसतात.” ही स्तुती ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. गेल्या अनेक महिन्यांचा तिचा डायट प्लान आज यशस्वी झाला होता.

          दोन मुलांच्या जन्मानंतर घर, संसार, नोकरी, मुलांचा अभ्यास इ. गोष्टी सांभाळता सांभाळता तिने स्वतःकडे कधी लक्ष दिले नाही. एव्हाना तिला तितका वेळही नव्हता. त्यामुळे तिची शारीरिक जडणघडण, राहणीमान हळूहळू बदलत गेले. स्वतःकडे बघण्यास तिला जराही उसंत मिळत नव्हती. हातात घेतलेले काम चालू असताना डोकं पुढच्या कामाचे प्लॅनिग करत असे. व्यायाम, मेकअप, हेअर स्टाइल, फॅशनेबल कपडे घालणे हे सगळं ती विसरली होती. आदर्श ग्रुहिणी, आदर्श पत्नी, आदर्श सुन, आदर्श आई बनण्यासाठी तिने दिवस रात्री एक केल्या. ह्या सर्वात तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्व कधी विरघळून गेले हे तिलाही कळले नव्हते.

          पण कालांतराने “जरा स्वतःकडे लक्ष दे. काय पोतेरे करून ठेवले आहेस स्वतःचे. नवरा काही बोलत नाही का तुझा अवतार पाहून ?” असे ताशेरे तिला मिळू लागले. अन् अचानक ती सर्वांना ‘गबाळी, मागासलेली’ भासू लागली. तिचे साधेपण तिला खुपायला लागले. तिला इतर बायका सुंदर वाटायला लागल्या. ती स्वतःची प्रत्येक स्त्रीशी तुलना करू लागली. ती या सगळ्या गोंधळात आपली कर्तव्ये यथोचित पार पाडत असे पण आतून ती स्वतःच वाळवी बनुन स्वतःला पोखरत चालली होती.

          आजच्या या मॉर्डन जगात स्मार्ट दिसण्याचा एक ताण प्रत्येक स्त्रीवर आहे.  बाजारात अनेक चकचकीत उत्पादने आलेली आहेत, जाहिरातींचा भडिमार सतत डोळ्यांवर होत असतो. स्मार्ट राहणे ही काळाची गरज झालीय. डाएट, जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या स्त्रीला लोक नटवी म्हणतात तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला काकूबाई म्हणतात.

          सरत जाणारे वय व्यक्तीभोवती एक प्रतिभासंपन्न वलय निर्माण करते. हे वलय तेज, परिपक्वता, प्रसन्नता निर्माण करते परिणामी इतरांना त्यापासून प्रेरणा मिळते. ह्यासाठी कृत्रिम बाबींची काही गरज नसते. पडद्यावरील कलाकारांचे तरुण दिसणे आपल्याला विचारात पाडते. आपण आपल्याच वयाच्या त्या कलाकारांशी स्वतःची तुलना करून त्यांच्याशी स्पर्धा सुरू करतो. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर चालणारी जीवनचर्या आपण जगत आहोत. त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, हार्मोनल चेंजेस अन् स्वतःचे आणि प्रियजणांचे बदलते मूडस आणि उशिराने  स्वतःबद्दल झालेली जाणीव ह्यांमुळे आपण स्मार्ट फिट दिसण्यासाठी शॉर्टकट अवलंबितो.

          वयावर आपण कसे मात करतो ? कसे दिसतो ? कसे राहतो ? ह्यावरून आपल्या अस्तित्वाची सार्थकता ठरते का ? मला फिट राहायचं आहे असे मनात आले की एक-दोन महिने व्यायाम, आहार इ. बाबींवर मेहनत घेऊन नंतर आयुष्यभर मजा करावी अशी ही प्रक्रिया नाही. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजच्या काळात फिट दिसण्यापेक्षा फिट असणं महत्त्वाचं आहे. वेगवेगळे आजार, दुखणे, व्याधी यापासून शरीराला मुक्त ठेवणे, स्वतःबरोबर इतरांचे जीवन आनंदी करणे ह्या बाबीना प्राधान्यक्रम देणे गरजेचे आहे.

          परंतु एखाद्या मर्यादेपलीकडे जाऊन स्लिम ट्रिम होण्यासाठी विविध औषधाचा शरीरावर भडीमार करणे, व्यायामाचा अतिरेक करणे, सतत उपवास करणे चुकीचे आहे. क्षणभंगुर आयुष्य साधे सोप असावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मोजमापाच्या साच्यात तंतोतंत बसण्यास आयुष्याची सार्थकता नाही हे व्यक्तीला लवकर कळत नाही. अयोग्य व  अपुरा आहार, सतत दिर्घकालीन उपवास, विविध महागडी औषध ह्या मार्गाने त्वरित आकर्षक शरीररचना प्राप्त करून घेताना अनेक आजार, दुखणी उशाशी येवून बसतात.

          याउलट काही जण यात उगाच स्वतःच्या वयाला मारून चांगलं दिसलच पाहिजे वगैरे भानगडीत पडत नाहीत. वयानुसार बदल घडणारच, प्रत्येकजण थोडीच विग लावतो, प्रत्येक जण थोडीच येता जाता मेकअप करतो, प्रत्येक जण थोडीच केसांना कलप लावतो, प्रत्येकाला थोडीच प्रसिद्धीची हाव असते. छोटी बालिका असो की  वय-स्कर आजी, दोघीही दातांशिवाय हसताना सुंदर दिसतात. गुलझार म्हणतात “जैसे जैसे उम्र बढ़ती हैं, दिन प्रतिदिन इंसान रईस बनता जाता है. चांदी बालों में, सोना दांतो में, मोती आंखों में, शक्कर खून में और महंगे पत्थर किडनी में पाए जाते हैं…!!