लता मंगेशकर आणि त्यांच्या समकालीन गायिका –  प्रा. मॅक्सवेल लोपीस

लता मंगेशकर आणि त्यांच्या समकालीन गायिका

  •  प्रा. मॅक्सवेल लोपीस, नंदाखाल

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना जाऊन साडे तीन वर्षे पूर्ण झाली. संगीताचा इतका मोठा इतिहास काळाच्या पडद्याआड गेला. परंतु त्यामुळे संगीत जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली, संगीत क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले… वगैरे वगैरे मी नाही बोलणार! कारण मुळात लतादीदींनी आपल्या अभूतपूर्व गायनाने संगीतविश्व ज्याप्रमाणात समृद्ध केलेले आहे ते प्रमाण पाहता अजून हजार वर्षे तरी त्यांच्या सांगितिक प्रतिभेची चिकित्सा होऊ शकते. दीदींच्या गायनावर विविध दृष्टिकोनांतून विचार करताना अभ्यासाचे निरनिराळे पैलू समोर येतात. यापैकी एक अभ्यासकांनी विशेष लक्ष देण्यासारखा विषय म्हणजे लता मंगेशकर आणि त्यांच्यासोबत तुलना झालेल्या त्यांच्या समकालीन गायिका. वास्तविक पाहता दीदींची तुलना कुणासोबतच होऊ शकत नाही. परंतु तरीही हा तौलनिक अभ्यास अशासाठी महत्त्वाचा ठरतो की त्यामुळे लतादीदींच्या गायकीला नव्या अर्थाने पाहण्याची समज मिळते, त्यांची विविध वैशिष्ट्ये होतकरू संगीत साधकांना मार्गदर्शक ठरतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अज्ञानापायी वा द्वेषापायी त्यांच्या गायन प्रतिभेवर काहींनी लावलेला कलंक पुसता येण्यास मदत होते.

या मध्ये सर्वात अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे ‘सुमन कल्याणपूर’. वरवर पाहता दोघींच्या आवाजामध्ये साधर्म्य असल्याने सुमनबाईंची ओळख बऱ्याचजणांना त्यांच्या बऱ्याचशा गीतांतून होत नाही. परंतु यात दोष जर कोणाचा असेलच तर तो गायनातील सुक्ष्मता कधी टिपूच न शकणाऱ्या किंवा तसा साधा प्रयत्नही न करणाऱ्या सर्वसामान्य रसिकांचा! खरे पाहता सुमन कल्याणपूरचा आवाज हा गोड आहे. तर दीदींचा आवाज गोड असूनही त्यात अगदी हलकीशी तीक्ष्णता आहे. म्हणजे थोडक्यात सौंदर्य शास्त्राच्या निकषानुसार ती तशी नकारात्मक बाजूच! परंतु ही बाजूच दीदींच्या गाण्याचे खरे सौंदर्य ठरते. उदाहरण म्हणून दीदी आणि सुमन कल्याणपूर या दोघींच्याही आवाजातील जहाँआरा सिनेमातील ‘हाल-ए-दिल यूँ उन्हें सुनाया गया’ हे गीत. सुमनजींचे सुर अगदी अवखळ पैजणांप्रमाणे नादत राहतात. परंतु दीदींचे स्वर अगदी तरवारीप्रमाणे हृदय भेदून जातात. दीदींच्या आवाजातील हलकीशी तीक्ष्णता त्या गायनाचे वैशिष्ट्य ठरते. त्यातील हर एक शब्दांवर दिलेले वजन, गाताना त्यामागील धीरगंभीर विचार दाखवून देतो की मदनमोहनची गीते दीदींनीच गावी असे का म्हटले जाते!

‘रहे ना रहे’ हे दीदींचे प्रसिद्ध गीत सुमनबाईंच्या आवाजात देखील आहे. या दोन गीतांना एकापाठोपाठ ऐकताना दीदींचे स्वरांना थेट भेदणे आणि सुमनबाईंचे अंदाज घेत सुरेल गाणे या दोहोंमधील फरक कळून येतो.

सुमनबाई आणि दीदी यांच्या आवाजातील अजून एक भेद म्हणजे सुमनबाईंच्या आवाजात हलकासा कंप होता. याचा अर्थ असा नाही की दीदींनी कंपनयुक्त गाणी गायली नाहीत. परंतु या दोन्ही गायिकांच्या कंपन देण्याची पद्धत पूर्णपणे भिन्न. बाईंच्या कंपनात तारूण्यातील चंचलता तर दीदींच्या कंपनात द्रूत गतीत गायलेल्या आंदोलनांची गंभीरता! हा फरक लक्षात घ्यायचा असेल तर ‘ब्रह्मचारी’ सिनेमातील सुमनजींच्या ‘आज कल तेरे मेरे’ मधील कंपनयुक्त आवाज आठवावा. आणि दीदींसाठी ‘रूस्तम सोहराब’ सिनेमातील ‘ए दिलरुबा’ आठवावे. व्हायोलिनच्या लेबनिज स्टाईलमधील सुरावटी संपताच दीदींचा त्या सुरांना भेदणारा आंदोलनमय कंपनयुक्त तो आलाप आणि मग ते लेबनिज संगीत धारण केलेले ते शब्द! लेबनीज गायिका ‘फैरूज’ या दीदींच्या आवडत्या गायिका होत्या. सदर गीत गाताना दीदींनी त्यांच्या आवाज लावण्याच्या पद्धतीचा सखोल अभ्यास केलेला असावा असा भास हे पूर्ण गीत देत राहते. वेगळ्या संस्कृतीतील शैली गातानाही स्वतःचे अस्तित्व अबाधित ठेवणाऱ्या दीदी म्हणूनच एकमेवाद्वितीय!

परंतु या दोघींमधील सर्वात मोठा फरक म्हणजे वयपरत्वे दीदींचा बदलत गेलेला तरीही खणखणीत स्वरांची फेक असलेला आवाज. तर सुमनबाईंचा थकलेल्या अवस्थेतही तसाच भासणारा आवाज. त्यासाठी सोनू निगम सोबत सुमनबाईंनी गायलेले ‘बाद मुद्दत की ये घडी आयी’ ऐकावे. दीदींची तर ‘लुक्का छुपी’ आणि ‘आता विसाव्याचे क्षण’ ही १९४८ मधल्या त्यांच्या आवाजाचा मागमूस देखील दिसणार नाही अशा अगदी वेगळ्या आवाजातील आणि तरीही प्रचंड ताकदीने गायलेली गीते ऐकली नाहीत असे रसिक न सापडणे!

सुमन कल्याणपूर पाठोपाठ दीदींवर लादलेली स्पर्धक म्हणजे खुद्द त्यांची धाकटी बहिण आशाताई. परंतु इथे दोघींच्याही गाण्याचा ढंग, गाण्याची निवड, व्हॉईस मॉड्युलेशन, एकंदरीत पूर्ण सादरीकरण आणि त्या साकारणाऱ्या नटी, त्यांची भूमिका सगळेच भिन्न! दोघींनी गायलेली द्वंद्वगीते जर ऐकायला लागलो तर या भिन्न शैलींची अजून स्पष्ट कल्पना येते. ‘पडोसन’ मधील ‘मै चली मै चली’ हा त्याचा एक नमुना. दीदींचा बेफामपणे स्वर फेकणारा आवाज! नायिकेच्या स्वैर पळणाऱ्या सायकलची गती दाखवणारा! तर आशाताईंचा खोडकर, रूसवे, लडिवाळ असे भाव दाखवणारा! यांमध्ये अभ्यासाच्या दृष्टीने सर्वोत्तम गीत म्हणजे ‘जानवर’ चित्रपटातील ‘आँखो आँखो में’. या गीताची एकंदरीत आकृतीच इतकी कठीण आहे की ते गावे तर मंगेशकरांनीच.  सदर गीताचा शेवट करताना दोघींसोबत मन्ना डे देखील आहेत. यामध्ये दोघींनींही स्वतःच्या शैलीतील व्हॉईस मॉड्युलेशन अगदीच कमी घेतलेली आहेत. परंतु तरीही दोघींमधील भेद सहज दिसतो. इथे दीदींचा आवाज सहज नैसर्गिक वाटतो; तर आशा ताईंचा दमदार रियाजाने कसलेला. गाण संपता संपता एक तान मात्र दोघींनीही एकत्रितपणे इतकी एकरूप होऊन घेतलेली आहे की मन्नादांशी जणू दोघी मंगेशकर भगिनी एक होऊन जुगलबंदी करीत असाव्यात!

आशा ताईंचा आवाज सुरूवातीला दीदींसारखाच होता हे बहुतेकांचे म्हणणेही काही फारसे खरे वाटत नाही. कारण त्यांचा १९४९ सालातील ‘दो चार इधर दो चार उधर’ हे गीत जर ऐकले तर त्यात गीता दत्त, मुबारक बेगम, सुरय्या अशा अनेक गायिकांशी मिळतेजुळते गाणे आढळते. दीदींची झलक तर खूप कमी दिसतेच; परंतु खुद्द त्यांच्या स्वतःच्या नंतरच्या गायकीच्या देखील काही खुणा त्यात दिसत नाहीत. अशाप्रकारे या दोन बहिणींबाबत उपस्थित केलेला प्रश्न कलेच्या नजरेतून पाहिल्यास तरी अतार्किक ठरतो.

खरे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात एका महान कलाकाराचा आभास देणारे दुसरे कलाकार होते. जसे हेलन आणि मधुमती, वैजयंतीमाला आणि पद्मिनी, गीता दत्त आणि मीना कपूर इ. सारांशतः एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या पूर्व प्रभावामुळे भले त्या काळातील त्यांच्यासारख्या वाटणाऱ्या इतर कलाकारांना वाव मिळाला नसेल. त्याचा सरसकट दोष त्या महान व्यक्तीच्या माथी मारण्याची सामान्य मानसिकता आहे. दीदींनी सुमनताई, आशाताई यांच्यावर अन्याय केले असे म्हणणे हा देखील त्यातीलच एक भाग. कदाचित सुमनताईंना दीदींइतके यश जर मिळाले असते तर कदाचित सुमनजींच्या आवाजाशी मेळ खाणाऱ्या परंतु प्रसिद्धीपासून लाखो कोस दूर असलेल्या त्यांच्या धाकट्या बहिण श्यामा चित्तार यांच्या आणि सुमनताईंच्याबाबत देखील असेच काहीसे बोलले गेले असते! शेवटी परिपूर्ण स्वतःचे अस्तित्व दाखवल्याखेरीज तुमच्याकडे कितीही परमोच्च दर्जाची कला असली तरीही तुम्ही त्या अढळ स्थानापर्यंत पोहोचू शकतच नाही हे अभ्यासकांनी विचारात घेण्याचे तात्पर्य! इथे अजून एका गोष्टीची आठवण होते की दीदींनी आपल्या मृत्यूच्या अगदी चार महिने आधी आपल्या आयुष्यातली शेवटची मुलाखत देताना ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याच्या स्मृतीमध्ये जात सुमन कल्याणपूर यांची आठवण केलेली होती. प्रतिस्पर्धेची जर भावना दीदींनी कधी जोपासली असती तर इतक्या सहजपणे त्यांचे नाव घेतले नसते. अशा सहजतेमुळेच दीदींचे गाणे देखील तितक्याच सहज रसिकांच्या मनाचा ताबा घेणारे आहे. त्यांच्या अमाप यशाचे सगळ्यात महत्त्वाचे रहस्य हे त्यांच्या निखळ आणि स्वतंत्र स्वरापुढे अन्य काहीही असू शकत नाही!

                                                            (लेखक भारतीय संगीताचे अभ्यासक आहेत.)