‘रॉ’ची दहशत….! – जॉन कोलासो

‘रॉ’ची दहशत….!

  •  जॉन कोलासो, वसई

  कॅनडा आणि भारत यांच्यातील राजकीय संबंध सध्या विकोपाला गेले आहेत. कॅनडामधून भारताविरोधात करावाया करणार्‍या ‘खलिस्तानवाद्यांना’ पाठिंबा मिळतो, त्यांना तेथे उदारहस्ते राजकीय आश्रय मिळतो. हे सर्व उघडपणे चालू आहे. त्यामुळे उभय देशांतील राजकीय शीतयुद्ध अनेक वर्षांपासून चालू होते. परंतु, आता ते विकोपास गेले आहेत, त्याचे कारण कॅनडामधील हरदीप सिंग निज्जर या खलिस्तानवाद्याची झालेली हत्या आणि ही हत्या भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’मार्फत केल्याचा खुद्द कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा जाहीर आरोप!

याप्रकरणी अमेरिका हा आपला मित्र देश असूनही तो कॅनडाचे समर्थन करीत आहे. कारण अमेरिकेतही गुरुपतवंतसिंग पन्नू या खलिस्तानवाद्याच्या खुनाचा प्रयत्न झाला होता व त्यामागे भारताची ‘रॉ’ हीच गुप्तचर संघटना असल्याचा आरोप अमेरिकन सरकारही करीत आहे. या दोन घटनांसंबंधी वृत्तपत्रांत रोजच सविस्तर बातम्या प्रसिद्ध होत आहेत, परिणामी ‘रॉ’ संघटना चर्चेत आहे. त्यामुळे साहजिकच या गुप्तचर संघटनेचे काम कसे चालते याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली असणार.

     कारण ‘युद्धस्य कथे’प्रमाणे हेरगिरीच्या रहस्यमय कथाही वाचकांना आता आवडतात. परंतु आपल्या देशातील हेरकथा गोपनीयतेच्या नियमामुळे स्पष्ट उघड करता येत नाहीत… तरीही अलीकडे इंग्रजीमध्ये अनेक पुस्तके उपलब्ध होऊ लागली आहेत. मात्र मराठीत अशा पुस्तकांची उणीव प्रकर्षाने भासते. ही उणीव भरून काढण्याचा स्तुत्य प्रयत्न पत्रकार श्री. रवी आमले यांनी ‘रॉ… भारतीय गुप्तचर संस्थेची गूढगाथा’ या पुस्तकाच्या रूपाने केला आहे.

     अमेरिकेची सीआयए, रशियाची केजीबी, इस्त्रायलची मोसाद या जगात सर्वश्रेष्ठ गुप्तचर संघटना समजल्या जातात आणि त्यांच्या तोडीस तोड भारताची ‘रॉ’ ही संघटना आहे, हे आता अमेरिका आणि कॅनडासारख्या देशांनाही समजून चुकले आहे. या सर्व संघटना आपापल्या देशाच्या हितासाठी परदेशांत हेरगिरी करण्याचे काम चोखपणे करीत असतात. पूर्वी भारत आणि सोव्हिएत युनियन  यांच्यात मैत्री होती. त्यामुळे अमेरिकेच्या सीआयएची भारतातील हेरगिरी सर्वत्र दिसून येत असे. त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी तर देशातील अनेक दुर्घटनांना सीआयएला जबाबदार धरत असत… त्या वारंवार ‘परकीय हाता’चा उल्लेख ते संसदेत व संसदेच्या बाहेर करीत असत. परिणामी स्वतंत्र पक्षाचे खासदार पिलू मोदी यांनी तर संसदेत प्रवेश करताना आपल्या शर्टावर ‘सीआयएचा हस्तक’ म्हणून बिल्ला लावून पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आरोपांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला होता.

     मित्र देश असला तरीही सोव्हिएत रशिया केजीबीमार्फत भारतात हेरगिरी करीत असे, परंतु, या यंत्रणेवर त्यावर उघड आरोप त्यावेळी करण्यात येत नसे.

हेरगिरी ही मैत्री व शांततेच्या काळातही करायची असते. या काळात मिळविलेल्या मित्र व शत्रू राष्ट्रांची माहिती युद्धजन्य परिस्थितीत उपयोगी पडत असते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राचे गुप्तहेर हे आपल्या मित्र किंवा शत्रू राष्ट्रांत हेरगिरी करण्याचे काम नित्यनियमाने करीत असतात.

     स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतात आयबी म्हणचे इंटलिजेंट ब्युरो या नावाने गुप्तहेर संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना देशातअंतर्गत छोट्यामोठ्या घडामोडींची माहिती सरकारला पुरविते. या संघटनेस कोणासही अटक करण्याचे अधिकार नाहीत. केवळ माहिती काढणे आणि ती सरकारला पुरविणे. आपल्या हाती आलेल्या माहितीचा वापर किंवा त्या आधारे कारवाई कशी व कधी करायची यासंबंधी निर्णय सरकार घेत असते.

     तथापि, स्वातंत्र्यानंतर १९६२ साली भारतास चीनच्या अतिक्रमणास तोंड द्यावे लागले. चिनी आक्रमणाच्या तयारीबाबत भारतास कोणतीच पूर्वकल्पना नव्हती. पंतप्रधान पंडित नेहरू चीनसोबत ‘भाई भाई’च्या भ्रमात वावरत असताना चीन भारताचा अरुणाचल प्रदेश गिळंकृत करण्याची जय्यत तयारी करीत होता. या युद्धात आपण सपाटून मार खाल्ल्यावर लक्षात आले की, परदेशांतील माहिती काढण्यासाठी आपल्यालाही एक स्वतंत्र गुप्तहेर संघटना बांधणे आवश्यक आहे. अशी संघटना उभारण्यास वेळ लागतो. दरम्यान पाकिस्तानने भारतावर १९६५ साली युद्ध लादले. या युद्धात सोव्हिएत रशियाने मध्यस्थी करून ताश्कंद करार घडवून आणला. परंतु या करारानंतर ताश्कंदमध्येच पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे अकस्मात निधन झाले. श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यांनी गुप्तहेर संघटना उभारण्याच्या कामी तातडीने लक्ष घातले. आयबीमधील वरिष्ठ अधिकारी श्री. रामेश्वरनाथ काव यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली. त्यांनी ती चोख पार पाडली.

     ही गुप्त संघटना परराष्ट्रांच्या लक्षात येऊ नये म्हणून तिचे नाव ‘रॉ’ म्हणजेच ‘रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंग’ असे ठेवण्यात आले. २१ सप्टेंबर १९६८ रोजी स्थापना करण्यात आलेली ही संघटना म्हणजे नावाप्रमाणे आता केवळ ‘रॉ’ राहिलेली नाही तर पाकिस्तानसह अनेक राष्ट्रांच्या छातीत धडकी भरणारी संघटना बनली आहे. तिने आतापर्यंत शेजारी देशांतच नव्हे तर इतरत्रही अनेक साहसी आणि धाडसी मोहिमा यशस्वीपणे राबविल्या. फक्त एवढेच की ही संघटना या मोहिमेतील यशाचे उघडपणे ‘क्रेडिट’ घेत नाही.

     ‘रॉ’ने आतापर्यंत केलेल्या कामगिरीचे कौतुक इतर राष्ट्रांकडूनच ऐकावे लागते. पाकिस्तानचा आणखी एक तुकडा करून स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती करण्यात ‘रॉ’ने पेरलेल्या गुप्तहेरांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. इतकेच नव्हे तर भारतात आलेल्या बांगलादेशी निर्वासितांना शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देण्यातही ही संघटना होती. तर सिक्किमला भारतात विलीन करून भारताची सीमारेषा विस्तारित करण्यातही हीच संघटना आघाडीवर होती. सिक्किम भारतात विलीन झाल्याने चीनचा, इशान्य भाग तोडून भारताचे तुकडे करण्याचा इरादा धुळीस मिळाविण्यासही या संघटनेने केलेली कामगिरीस उपयुक्त ठरली.

     ‘खलिस्तान’ संघर्षाच्या वेळी आणि सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांना हुसकावून लावण्याच्या कामी पंजाब पोलिस आणि भारतीय सेना यांना योग्य ती माहिती मिळवून देण्याची कामगिरीही ‘रॉ’मुळेच शक्य झाली होती. याशिवाय ‘खलिस्तान’ला मदत करणार्‍या पाकिस्तान सरकारवर ‘सिंध प्रांत’ फोडून काढण्यासाठी मोहीम आखण्याच्या कामीही ‘रॉ’चाच पुढाकार होता.  पाकचे अशाप्रकारे नाक दाबण्याचे काम ‘रॉ’च करू शकते.

     म्हणूनच पाकिस्तानचे अधिकारी ‘रॉ’बद्दल म्हणतात, कौटिल्याचे तंत्र भारतीय गुप्तचर वापरतात. तर पॅलेस्टाइन मुक्ती संघटनेचे त्यावेळचे प्रमुख यासर अराफत भारतीय नेत्यांना सांगत असत की, पाकिस्तान भारतीय लष्कराला घाबरत नाही तर ‘रॉ’ला वचकून आहे. तर श्रीलंकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्या पराभवास ‘रॉ’ कारणीभूत असल्याचा आरोप श्रीलंका फ्रीडम पार्टीचे प्रमुख श्री. महिंद्र राजपक्षे यांनी केला होता. ते राष्ट्राध्यक्ष असतानाच पुन्हा निवडणूक लढवित असताना त्यांचा पराभव झाला होता. ते पराभूत होतील, असे कोणाच्या स्वप्नातही आले नव्हते. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेने लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम (एलटीटीई)चा खात्मा केला होता.

     पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेने नेपाळमध्ये जाळे पसरविले होते. एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून समजणार्‍या नेपाळने पाकिस्तानी दहशतवाद्यांना आसरा दिला होता. चीनशी राजकीय आणि व्यापारीद़ृष्ट्या नवे संबंध स्थापन करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न चालू केला होता, अशावेळी  नेपाळमध्ये बसलेल्या प्रमुख दहशतवाद्यांची माहिती काढून त्यांची तयार केलेली फाइल नेपाळ पोलिस आणि सरकारकडे सोपवून त्यांना त्यांच्यामार्फत अटक करण्याची कामगिरीही ‘रॉ’ पार पाडत आहे.

     ‘रॉ’च्या अशा अनेक कथा आपणास ‘रॉ… भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ पुस्तकात वाचायला मिळतात. तसेच ‘खलिस्तान’ चळवळ, सुवर्ण मंदिरातील कारवाई, पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी व श्री. राजीव गांधी यांची हत्या या प्रमुख घटनांच्या काळात या गुप्तचर संघटनेस अपयश का आले, यासंबंधी कारणमीमांसाही मिळते.

     त्याच्यात आता कॅनडा आणि अमेरिका ‘रॉ’वर उघडपणे करीत असलेल्या आरोपांची भर पडली आहे.