रक्तापलीकडचे नाते
- सौ. सुनिता बर्नड परेरा.
गास, मदर तेरेजा शेजोळ
ऑक्टोबरची दाहकता संपून नुकतीच नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीला सुरुवात झाली होती. उटी येथील थंड हवेच्या ठिकाणी तर थंडीने अगदी कहर केला होता. तापमान पाच, सहा डिग्री पर्यंत गेले होते. सकाळची शाळा असल्यामुळे सर्व मुले, शिक्षक शाल, स्वेटर घालून शाळेत येत होते. आज शाळेत स्पोर्ट्स डे असल्यामुळे मिस जेनीची लगबग सुरू होती. संपूर्ण कार्यक्रमाची ती इन्चार्ज होती. त्यामुळे मुलांच्या सर्व तयारीची व्यवस्था, त्यांचे पोशाख, सर्व अँक्टिव्हिटी, साहित्य, मेकअप, सूत्रसंचालन सर्वच जबाबदाऱ्या ती अगदी कार्यकुशलतेने पार पाडणार होती.
मिस जेनी उटीतील सेंट जॉन बॉस्को शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. पाच वर्षांपूर्वी तिने टीचर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केला होता. मुळातच हुशार आणि चाणाक्ष असलेल्या जेनीने प्रथम दर्शनीच आपली हुशारी दाखवून ही नोकरी संपादन केली. फादर गिल्बर्ट शाळेचे प्रिन्सिपल होते. ४० वर्षापासून त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले होते त्यामुळे त्यांची निवड कधीही चुकणार नव्हती. जेनीसारख्या हुशार, उत्साही शिक्षिकेला त्यांनी निवडले होते. आणि त्या दिवसापासून जेनी अगदी मन लावून अध्यापनाचे काम करत होती. बालपणापासून अनाथ असलेल्या जेनीला फादर गिल्बर्ट ह्यांच्या ओळखीवरून शाळेपासून वीस मिनिटाच्या अंतरावर एक घर भाड्याने मिळाले होते. त्यामुळे जेनी दररोज सायकलवरून शाळेत ये जा करीत असे. अत्यंत लाघवी आणि प्रेमळ असलेल्या जेनीने अल्पावधीत सहकारी शिक्षकांचे आणि आपल्या विद्यार्थ्यांचे मन जिंकून घेतले. Learn by fun ह्या तत्वाचा अवलंब करून कठीण घटक सोपा करून मुलांमध्ये मूल होऊन ती शिकवत असे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ती ओळखली जाऊ लागली.
आजचा स्पोर्ट्स डे उत्तमप्रकारे पार पाडला. सर्वांनी तिचे अगदी मनापासून कौतुक केले. दररोज जीन्स, टॉप घालणाऱ्या जेनीने आज गुलाबी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. हलकासा मेकअप आणि चेहऱ्यावरील निर्मळ हास्य ह्यामुळे ती अगदी नखशिखांत सुंदर दिसत होती. गालावरील खळी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होती. त्यामुळेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेल्या वरूणचे लक्ष तिच्या चेहऱ्यावरून काही केल्या हटत नव्हते. वरुण हा तिथल्या खासदारांचा एकुलता एक मुलगा होता. M.B.A पर्यंत शिक्षण पूर्ण करून तो वडिलांचा व्यवसाय सांभाळत होता. अतिशय रुबाबदार आणि देखणा तरुण असलेला वरुण वडिलांची कंपनी कार्यकुशलतेने सांभाळत होता. त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरत होती. दिमतीला गाड्या, नोकरचाकर, धनदौलत असलेला वरुण तोंडांत जणू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला होता.
असा हा गर्भश्रीमंत, रुबाबदार आणि उद्योजक तरुण जेनीच्या प्रेमात पागल झाला होता. कार्यक्रम संपल्यावर त्याने सर्वात प्रथम जेनीचे मनापासून कौतुक केले. जेनी देखील त्याच्या स्वभावावर आणि व्यक्तिमत्वावर फिदा झाली. आग दोनो तरफ से बराबर लगी थी… दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. हळूहळू भेटीगाठी वाढू लागल्या. परस्परांना लग्नाचे वचन दिले गेले. सिनेमा पाहणे, बागेत भेटणे, तलावाशेजारी झाडीत बसून तासनतास गप्पा मारणे हा जणू त्याचा दिनक्रमच झाला.
जेनी नियमितपणे त्या दिवशी शाळेत आपल्या मुलांना शिकवत असताना तिच्या वर्गात एक नवीन अनोळखी चेहरा तिला दिसला. अत्यंत बावरलेला रडका, उदास चेहऱ्याचे एक गोंडस मूल तिच्याकडे बघत होते. तिने त्याला जवळ बोलावून नाव विचारले. संचितने तिला रडत रडत आपले नाव सांगितले. तिने प्रेमाने त्याला जवळ घेऊन सावरले. आणि त्याक्षणी संचितची भीती नाहीशी झाली. संचितचे वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांची वारंवार बदली होत असे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शिक्षक आणि त्या शिक्षकांची कडक शिस्त… त्यामुळे त्याच्यात न्यूनगंड निर्माण झाला होता. पण मिस जेनीचा प्रेमळ स्वभाव त्याला खूप आवडला आणि हळूहळू त्याची अभ्यासात प्रगती होऊ लागली.
जेनीचे घर त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे जेनी त्याला रोज तिच्या सायकलवरून शाळेत घेऊन येऊ लागली. शाळा सुटल्यावर त्याची शिकवणी घेऊ लागली. संचितवर ती आईसारखी माया करू लागली. संचितला अभ्यासाची गोडी वाटू लागली. वर्ष सरले आणि पुन्हा संचितच्या वडिलांची बदली झाली. संचितने आकांडतांडव केले. त्याला मिस जेनी आणि ह्या शाळेपासून दूर जायचे नव्हते. पण नाईलाज झाला. त्याला जावे लागले. दुसऱ्या शाळेत त्याचे मन काही रमेना, त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी निर्णय घेतला आणि त्याला जेनीच्या शाळेत परत घेऊन येत असताना त्याच्या गाडीला अपघात झाला आणि त्याच्या आईवडिलांचे जागेवरच निधन झाले. संचित सुदैवाने वाचला. संचित आता अनाथ झाला होता. रस्त्यावर भटकत होता. पण त्याचे नशीब बदलणार होते….
दरम्यानच्या काळात तेथे पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले होते. जेनी आणि वरुणच्या प्रेमाची खबर वरुणच्या बाहूबली असलेल्या वडीलांना लागली होती. त्यांनी डाव साधला आणि वरुण जेनीला वेगळे करण्याचा कट केला. आपल्या माणसाकरवी जेनीला किडनॅप करून तिला मुंबईला एका कोठ्यावर विकले. एक हुशार, उत्साही शिक्षिका कोठ्यावर घुंगरू बांधून नाचू लागली. सुरुवातीला तिने खूप विरोध, विनवण्या केल्या पण कोणाचेही हृदय द्रवले नाही. शारीरिक आणि मानसिक ताकद संपली आणि शरीर विकणे हेच तिच्या नशिबी आले. वरुणही स्वार्थी बनला होता. प्रेमापेक्षा पैशाला महत्त्व देऊन त्याच्या कुळाला शोभेल अश्या श्रीमंत मुलीशी त्याने लग्न लावून संसार थाटला. जेनीच्या अचानक गायब होण्याने संपूर्ण शाळा हवालदिल झाली. त्यांनी जेनीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण पैशाच्या ताकदी समोर सर्व हरले. जेनी कोठ्यावर आपले आयुष्य जगू लागली. एक उच्चशिक्षित शिक्षिका, तिची स्वप्ने… सर्वांचा चुराडा झाला होता.
पण म्हणतात ना ‘काळयाकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा कुणीतरी एक मेणबत्ती घेऊन समोर उभा असतो’. तिच्याही जीवनात तोच प्रकाश पडला. दैवी योजना वेगळ्या असतात. संचित रस्त्यावर अनाथ म्हणून भरकटत असताना एका माणसाने त्याला आधार दिला, त्याला काम दिले आणि आपल्यासोबत घरी घेऊन आला. तोच माणूस जो कोठ्यावर पठाण म्हणून काम करत होता. त्याने छोट्या संचितला कोठ्यावर चहा आणणे, झाडलोट करणे अशी किरकोळ कामे दिली. आणि इथेच त्याची प्रेमळ टीचर जेनी त्याला भेटली. दोघेही नशिबापुढे हतबल झालेले…. एकमेकांना गच्च मिठी मारून खूप रडले. देवाने दोघांची भेट घडवून आणली होती. आणि मग सुरू झाला एक नवीन अध्याय. रात्री घुंगरू बांधून गिऱ्हाईकाचे मनोरंजन करणारी वेशा दिवसा मात्र संचितची आदर्श शिक्षिका बनली. तिने संचितवर अगदी मातृवत प्रेम केले. वर्षे सरली. मौसम बदलले. संचितने बाहेरून फॉर्म भरून दहावीची परीक्षा दिली. आणि कोठ्यावर किरकोळ काम करणारा संचित संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने पास झाला. पुढे बारावीनंतर M.B.B.S करून तो सुप्रसिद्ध सर्जन झाला. आणि पुढील शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला.
जेनीचे वय वाढले होते. चाळीशीनंतर कोठ्यावर स्त्रीला काडीमात्र किंमत नसते. जेनी कोठ्यावर किरकोळ कामे करु लागली. एक दिवस अचानक सरकारी आदेशानुसार प्रत्येक कोठ्यावर आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले गेले. दैवी योगायोग. शिक्षणासाठी बाहेर पडलेला संचित डॉक्टर बनून ह्याच कोठ्यावर तपासणीसाठी आला. थकलेल्या जेनीला पाहताक्षणी त्याच्या अश्रूचा बांध फुटला. कित्येक वर्षानंतर दोघे भेटले होते. एकमेकांना घट्ट मिठी मारली. आणि त्याक्षणी संचितने निर्णय घेतला. जेनीला कायम आपल्यासोबत घेऊन जाण्याचा. आज मायलेकरांची भेट झाली होती. उटीच्या शाळेत प्रेमाने पायाभरणी केलेल्या ह्या नात्यावर मायेचा कळस चढला होता…