रंजलेल्यांचा रंजक नाताळ  – बर्नड लोपीस

रंजलेल्यांचा रंजक नाताळ 

  •  बर्नड लोपीस, सांबोडी, आगाशी

आजवर असंख्य नाताळ साजरे होत आले आहेत. ख्रिस्त जन्माला आला उपेक्षितांससाठी. पण एकूण ख्रिस्ती लोकांतील निष्ठूर व दांभिक प्रमाण पाहता ते किती खरे आहे‌ यावरही शंका येते.

गंमत म्हणून एक विनोद आहे, वेलंकनीला जाणाऱ्या एका भावि​काला त्याच्या गरीब मित्राने अर्पणासाठी म्हणून शंभर रुपये दिले. त्या मित्राने जाता जाता देवळासमोरच्या भीक मागत बसलेल्यांना देत देत  तीस रुपये संपवले. ऊरलेले सत्तर दानपेटीत टाकले. रात्री मावली त्याच्या स्वप्नात आली नि तीनं विचारले… तुला मित्राने अर्पणासाठी शंभर रुपये दिले होते ना ? मला फक्त तीसच रुपये मिळाले… सत्तर कुठे गेले ?

विनोद वगळता वस्तुस्थिती अशी आहे.

“जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा.”

संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात जे सांगून गेले. तेच “वैष्णव जन तो तेणे कहिये जे पीर पराई जाने रे, परदुखे उपकार करे तो मन अभिमान न आणे रे.” असं महात्मा गांधीजी आपल्या भजनात म्हणत. ख्रिस्ती श्रद्धा बाळगणारा कुठलाही माणूस कितीही उच्चविद्याविभूषित असो, उच्चपदस्थ असो वा धनवान असो, त्याला परोपकारी वृत्ती व गोरगरीबांचा कळवळा नसेल तर तो फक्त नावालाच  ख्रिस्ती ऊरतो. म्हणजे ख्रिस्ताच्याच शब्दात सांगायचे तर अशा वेळी तुमचा देवावरील विश्वास कितीही द्दढ असला नि त्या विश्वासाला दयाकृतीची जोड नसली तर तुम्ही  “फक्त झणझणणारी झांज किंवा शब्दाचे पोकळ बुडबुडे आहात”

कुठल्याही प्रापंचिकाने आपल्या शिक्षणाचा, वेळेचा, शक्तीचा व पैशाचा उपयोग करून गोरगरीबांना सहाय्य करण्यासाठी झटणे ही बाब जगातील कुठल्याही प्रार्थनेपेक्षा श्रेष्ठ होय. या पार्श्वभूमीवर मला आपल्या चर्चमधील विन्सेंट द पॉल संस्थेचे कार्य खूप खूप मोलाचे वाटते.

अगदी बालपणापासून मी आईसोबत चर्चला जात असे, आईसोबत जाऊन स्रियांची सोडालिटी, बंधूसोबत जाऊन, लिजन ऑफ मेरी व‌ नंतर पुढे वेदीसेवक संघ, पास मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघटना हे फक्त पहात  आलों आहे. तदनंतर मला स्वतःला युवासंघ, चर्च मालमत्ता समिती, पॅरिश कौन्सिल यातून कामही करायची संधी मिळाली. या सर्व चर्चसंलग्न संघटनेत, समाजातील दुर्बल घटकांना “प्रत्यक्ष मदत करणारी संस्था” म्हणून संत विन्सेंट द पॉल ही संस्था बालपणापासून माझ्या मनात आपुलकीचं स्थान मिळवून आहे. 

या संस्थेचे संस्थापक असलेले विन्सेंट द पॉल हे मुळचे फ्रांसचे धर्मगुरू. देऊळमातेने मृत्यूनंतर संतपदाचा सन्मान दिलेले सेंट विन्सेंट द पॉल यांचा गरिबाविषयीचा अपार कळवळा व त्यासाठी आपल्या पदाचा वापर करून जवळपास साठ  वर्षाचे केलेले सेवाकार्यच आजच्या आपल्या सभासदांना प्रेरणादायी  ठरले आहे.

आजचे सुपरसॉनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचे, स्पर्धेचे व अतिशय वेगाने बदलणाऱ्या काळाचे आहे. अशा वेळी आपला प्रपंच सांभाळत, या संस्थेत आपला बहुमूल्य वेळ देणारे सर्वंच सभासद जसे लोकांच्या अभिनंदनासोबत देवाच्या कृपेसही पात्र आहेत. अंत्यत गरजू व गोरगरीबांना मदत करणे हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने त्यांना सद्यस्थितीतील सेवेसाठी आव्हानेही कमी नाहीत.

परंतु आज गरीबीची व्याख्या ठरवणं अवघड काम आहे. वरवर सुखवस्तू भासणारी कित्येक मध्यमवर्गीय कुटुंबेही कोरोना काळात आतून कोसळली आहेत. त्यातही  नुकसानीत गेलेले व्यवसाय, सुटलेल्या नोकऱ्या, वाढती महागाई, सामाजिक असुरक्षितता यात मदतीची याचना करणारे व मदत करणारे अशा  सर्वांचेच जीवन होरपळून निघाले आहे.

विन्सेंट द पॉल संस्था ही केवळ दानशूर‌‌ भाविकांच्या देणगीवर चालवली जाते आहे. त्यामुळे या संस्थेच्या मदतकार्याला आर्थिक मर्यादाही आहेतच. भाविकांकडून व चर्चकडूनही विन्सेंट द पॉल संस्थेला जास्त गांभीर्याने पाहण्याची जशी गरज आहे. तशीच विन्सेंट द पॉल साठी होणारे दुसरे कलेक्शन खरंच पुरेसे आहे का? यावरही फेरविचार करण्याची गरज आहे. 

कोरोना काळात सर्व धर्मप्रांत चिडीचूप झाले होते. सरसकट रिपोर्ट पॉझिटिव्ह करणाऱ्या पेनांच्या शाईत आणि कंप्युटरच्या किबोर्डवर कोरोना बसला होता. व्हाँटसप नि टिव्हीवरील बातम्यांतून तो वहात होता. लोकांचा देवापेक्षा जास्त विश्वास व्हँक्सीनवर बसला होता. रेमेडिसिवियर हाच सेव्हियर म्हणजे तारणहार वाटू लागला होता. “मृत्यू हा जीवनाचा शेवट नसून ती एका नवीन जीवनाची सुरुवात आहे” हे तत्वज्ञान पोकळ वाटावे अशी  भाविकांचीच नव्हे तर धर्मवरिष्ठांचीही अवस्था होती…. अशा आणीबाणीच्या वेळी काही कॉन्व्हेंटस व काही  ठिकाणी मात्र चर्चच्या सहकार्याने विन्सेंट द पॉल संस्था मात्र गोरगरीबांच्या पाठीशी आपल्या कुवतीनुसार उभ्या राहील्या होत्या. 

आजवर विन्सेंट द पॉल संस्थेने कित्येक विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला असेल अशा लाभार्थ्यांनी आता आपला वेळ किंवा आर्थिक मदत देणे हे त्यांचे कर्तव्य आहे 

तात्पर्य हेच की भाविकांनो, आपल्या गरजू बंधुभगिनींच्या  मदतसाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. विन्सेंट द पॉल संस्थेचे हात मजबूत करण्यासाठी खूप काही करता येऊ शकते. चर्चमध्ये सणासुदीला स्टाँल लावणाऱ्या सगळ्या संस्थांनी आपलं नफा विन्सेंट द पॉल संस्थेला द्यायला हरकत नसावी. महिन्याकाठी लाखभर रुपयांची “कशीन” टाकणारे भाविक व चर्चच्या वेगवेगळ्या कामांसाठी व आपल्या वाढदिवशी, लग्न सोहळ्यात उदार हस्ते देणग्या देणारे दानशूर यांनी विन्सेंट द पॉल संस्थेला अग्रक्रम द्यायला हवा. कुठल्याही संघटनेत काम करणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची तयारी ठेवणे. विन्सेंट द पॉल संस्थेनेही आपल्या संस्थेसाठी आर्थिक आधार स्तंभ आता वेगळ्या पद्धतीने उभे करणं आवश्यक आहे

सध्या सगळीकडे विन्सेंट द पॉलची सभासद संख्या  पाचपंचवीस सभासदांचीच दिसते. त्यांना  मदत मागण्यासाठी घरोघरी फिरायला लागणे हा आपण ख्रिस्ती असण्याचा अपमान ठरणार आहे. जवळपास दोन डझन देवळं व एक लाखाहून अधिक संघटित लोकसंख्या असलेल्या ख्रिस्ती लोकांच्या संस्थेला मदतीसाठी कुठेही हात पसरावा लागू नये इतकी क्षमता आपल्यात नक्कीच आहे. आर्थिक स्थैर्यासाठी व गरजूंना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय‌ वेगवेगळ्या कल्पना राबविल्या जाऊ शकतात. मात्र यासाठीही चर्चने सहकार्य केले पाहिजे. चर्चची धोरणं लोकाभिमुखच हवीत.

ख्रिस्त म्हणाला होता “देवाचे ते देवाला द्या व कैसराचे कैसराला द्या. जर करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी अशी खुद्द देवाचीच मागणी असेल तर गोरगरिबांसाठी झटणाऱ्या विन्सेंट द पॉलला मदत हीच खरी देवाला अर्पण केलेली प्रार्थना असणार आहे.