​म्हातारपणाची काठी – बॅप्टिस्ट एम वाझ

म्हातारपणाची काठी

  • बॅप्टिस्ट एम वाझ, दारसेंग गोम्सआळी.
  • मो. 9970650757 / baptistvaz410@gmail.com

         आई जन्म देते, बाबा आयुष्य उभे करतात. आई संस्कार देते, बाबा जगण्यासाठी उर्जा पुरवतात. आई बोट धरून चालायला शिकविते, बाबा जीवनातील समस्यांवर मात करायला शिकवितात. थोडक्यात आपलं बालपणापासून ते अर्थार्जन करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यापर्यंतचे जीवन आईबाबांनी व्यापून टाकलेलं असतं. तोपर्यंत आपण आई बाबांच्या अर्ध्यावचनात असतो. आपल्या मुखावर त्यांचं नाव सतत खेळत असतं. कारण लहान मोठ्या आपल्या सर्व गरजा आईबाबा पुरवत असतात. अपार मेहनत घेऊन आपल्याला काही कमी पडू देत नसतात.

         पण आपण मोठे होत जातो वयाने आणी शिक्षणानेही. अर्थार्जन करू लागतो. खिशात पैसे खुळखुळू लागतात. मित्रमैत्रिणी जवळच्या वा​​टू लागतात. त्यांचा सहवास आवडू लागतो व हळूहळू आईचे बोट सूटू लागते. बाबांचे विचार कालबाह्य वाटू लागतात. तारुण्याचा घोडा चौफेर उधळू लागतो. पण त्यावरील मांड पक्की असेल आणि लगाम जर हातात असेल तर आयुष्याचं सोनं होतं. जर मांड पक्की नसेल व लगाम सैल सोडले असतील तर जीवन उध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यातच जेव्हा एखाद्याचे जीवन उध्वस्त होण्याच्या बेतात असते त्यावेळी ते सावरण्यासाठी आई बाबा कंबर कसून पुढे येत असतात.

         आपण आजारी पडतो, आई रात्रंदिवस आपल्या पायाशी बसलेली असते. आपल्याला औषधपाणी वेळेवर देत असते. वडिल आपल्याला काय हवं नको ते पाहत असतात. पण वडील आजारी पडतात, आम्ही आईला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगून स्वत:च्या जबाबदारीतून मुक्त होतो. आम्हाला बाबांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यांचे क्षेमकुशल विचारण्याचे साधे सौजन्य आमच्याकडे नसते. बाबांनी आमच्या आजारपणात रात्र, रात्र जागून आम्हाला काय हवं नको ते पाहून धीर दिलेला असतो हे आम्ही पार विसरुन जातो.

         पुढे आईबाबा निवृत्त होतात. दरम्यान आम्हीही मोठे होतो. पसंतीच्या मुलीशी लग्न करतो. आमच्या लग्नाचा खर्च, रहायला घर सर्व काही आईबाबांनी निवृत्तीच्या फंडातून केलेला असतो. कालांतराने आम्हाला मुलं होतात. आम्ही आईबाप होतो. आम्ही दोघंही कामावर जातो. आमच्या मुलांचं हगणं-मुतणं, आजारपण, घरसफाई, जेवणखाणं सर्वकाही आईबाबा करत असतात. हळूहळू आमची मुलं मोठी होतात. त्यांना आता आमची वा आमच्या आईबाबांची गरज नसते. आमचे आईबाबा देखील म्हातारे झालेले असतात. त्यांचे हात पाय थरथरत असतात. रक्तातील साखर, रक्तदाब व मांडींचं दुखणं वाढलेले असते. हातात काठी आलेली असते. त्यांना आता आधाराची गरज असते. त्यांचा मित्रांशी संपर्क तुटलेला असतो. काही समवयस्क त्यांना सोडून पैलतिरी गेलेले असतात. ते एकटे पडलेले असतात. त्यांच्याशी वार्तालाप करायला कोणाकडे वेळ नसतो.

         यावेळी ते आपल्या मुलांकडे आशेने पाहत असतात. मुलांनी आपल्या बरोबर थोडावेळ बसावे, गप्पा माराव्यात असं त्यांना नेहमी वाटत असते. पण मुलांनाही वेळ नसतो. ते त्यांच्या ‘करिअर’च्या उच्च पातळीवर विराजमान झालेले असतात. त्यातच त्यांना आपल्या मुलांचं आयुष्य घडवायचे असते. त्यामुळे ते आपल्या आईबाबांना इच्छा असून सुद्धा वेळ देऊ शकत नाही. आईबाबांनी सुद्धा ही बाब विचारत घेऊन तक्रार ‘मोड’मध्ये न जाता आपले जुने छंद आठवावे. वाचन, संगीत, बागकाम व पर्यटनसारखे छंद जोपासावे. जमेल तशी समाजसेवा करावी. प्रार्थनेत मन रमवावे. मन रिकामी न ठेवता स्वत:ला कोणत्यातरी छंदात गुंतवून ठेवावे. काळजी करण्याचे सोडून द्यावे. मुलांच्या संसारापासून थोडे अलिप्त व्हावे.

         वास्तविक वसईचा ख्रिस्ती समाज केवळ सुशिक्षित नसून उच्चशिक्षित व सुसंस्कृत आहे. चर्चची शिकवण, नातेवाईक व सामाजिक बंधनांच्या रेट्यामुळे अजूनतरी आपली मुलं आईबाबांशी जोडली गेली आहे. तरीही काही कुटूंबात बेबनाव आहे. कलह आहेत, वाद आहेत. अशा कुटूंबात काही मुलांनी आपल्या आईबाबांची आपल्या भावंडात विभागणी केलेली पहायला मिळते. म्हातारपणी ज्यावेळी जोडीदाराची गरज असते त्याचवेळेला त्यांना विभक्त केले जाते. आईबाबांचा पैसा व संपत्ती स्वत:च्या नावावर झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. एकेकाळी ऐटीत व रुबाबात जगणाऱ्या आईबाबांना आपल्या अपत्यामुळे लोकांपुढे हात पसरण्याची नामुश्की येते. म्हणून आई बाबांनो, जीवंत असे पर्यंत आपला पैसा अडका, जमीन जुमला मुलांच्या नावावर करण्याची घाई करु नका. कारण म्हातारपणाचा काळ खूप खडतर असतो. आजारपणं मागे लागलेली असतात. शरीर कृश व गात्रं कमजोर झालेली असतात. या कठीण काळात आपल्याकडे पैसाअडका किंवा जमीनजुमला नसेल तर जवळची माणसे आपल्याला दूर लोटतात. परंतू पैसे, संपत्ती असेल तर हीच माणसे आपली प्रेमाने विचारपूस करतात. विदारक असले तरी हेच सत्य आहे.

         संत पौल म्हणतात, “मुलांनो प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबाबांच्या आज्ञेत राहा, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”पण आपण आईबाबांची आज्ञा पाळतो का? त्यांच्या मान राखतो का? ते ‘म्हातारपणाची काठी’ म्हणून आपल्यात आधार शोधत असतात. परंतू या काठीने जर आधार देण्याचे नाकारले तर म्हाताऱ्या आईबाबांनी कोणाकडे पहावे? मुलांनो आपल्या आईवडिलांच्या चिंतातुर चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम फक्त तुम्हीच करू शकता! प्रश्न हा आहे की तुम्ही हे नेक काम करणार का? आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यावर आनंद प्रसवणार का? उत्तssर? तुम्हालाच ठाऊक….!